नवीन लेखन...

बालनाट्याची पुढील दोन दशके(२००० ते २०२०) (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग४)

बालनाट्याची पुढील दोन दशके(२००० ते २०२०)

मुक्त अर्थव्यवस्था, मोबाईल क्रांती,डिजिटल युग, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स, मल्टीप्लेक्स सिनेमा, मॉल संस्कृती, टीव्हीचे वाढते चकचकीत चॅनेल्स या सर्वांमुळे एकूणच समाजजीवन बदलून गेलं.

लोकांकडे पैसे आले पण वेळ कमी झाला. वाढत्या स्पर्धेमुळे मुलांवरचा ताणही वाढला. शाळा-क्लास-छंदवर्ग यामुळे मुलेही आठ-आठ तास बिझी राहू लागलीत. विकएण्ड कल्चर आले.बाल मनोरंजनाचे असंख्य मार्ग पालकांसाठी उपलब्ध झाले आणि याचा परिणाम बालरंगभूमीवर झाला. बालनाट्य बघण्यासाठी गर्दी आता कमी होऊ लागली. कारण कॉम्प्युटर गेम्स, मॉलमधील गेम झोन्स, थ्रीडी सिनेमा, १० ते १२ कार्टून्स चॅनेल्स उपलब्ध असताना बालनाट्यासाठी वेळ आणि पैसा कोण खर्च करणार ? प्रेक्षकांअभावी बालनाट्य संस्थांचा ताळेबंद जमेनासा झाला. परिणामी व्यावसायिक बालनाट्य संस्था कमी होऊ लागल्यात. आता बालनाट्य फक्त उन्हाळी व दिवाळीच्या सुट्टीतच होऊ लागलेत. चिल्ड्रन्स थिएटर ही माझी संस्था,अशोक पावसकर (प्रेरणा),प्रवीणकुमार भारदे (माता अनुसया) या मुंबईतील तीन संस्थांनी बदलत्या काळाशी जुळवून घेत मनोरंजक बालनाट्य भूमी जागृत ठेवली. बालप्रेक्षकांवरचा टीव्ही कार्टून्सचा प्रभाव लक्षात घेऊन नाट्यसंस्थांनी लोकप्रिय कार्टून्सवर आधारित बालनाटिका करायला सुरुवात केली. यातूनच मग ‘पोकेमॉनच्या जंगलात’, ‘मिकीमाऊस हरवला’, ‘कार्टून नगरी’, ‘शिनच्यान झिंदाबाद’, ‘सिंहोबाच्या राज्यात झूझू’, ‘वीर छोटा भीम’, ‘माय फ्रेंड डोरेमॉन’ यांसारख्या शीर्षकाची बालनाट्ये आली आणि बालप्रेक्षक ते पाहायला गर्दी करू लागला. एक गोष्ट इथे नमूद करायला हवी,ती म्हणजे मनोरंजक बालनाट्य रंगभूमीवर जी बालनाट्य सादर होत होती त्यांचे स्वरूप शिबिर नाट्याचे होते.नाट्य शिबिरात बसवलेली ही बालनाट्य बाल कलाकारांना संधी देण्याचं काम निश्चितपणे करत होती मात्र बाल नाट्याचा दर्जा वाढविण्याचे कार्य या बालनाट्य प्रयोगांच्या गर्दीने वाढवले असे म्हणता येणार नाही.बालनाट्य दर्जा समाधानकारक नसल्यामुळे मनोरंजक बालनाट्य भूमी कडे अपेक्षेने बघणारा पालक आणि बालक प्रेक्षक वर्ग नाराज झाला आणि बालनाट्याशी कट्टी घेत दुरावला.दुसरे एक कारण असे की, इंग्लिश मिडीयम मध्ये शिकणाऱ्या मराठी बालकांना,मराठी भाषेतील नाटकांचे आकर्षण वाटेनासे झाले.इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स च्या प्रभावाने,११ ते १४ वर्षांची मुलं बालनाट्यापासून दुरावली आणि बालरंगभूमी चार ते दहा वर्षांच्या मुलांभोवती घोटाळत राहिली. या दशकात दखल घेण्याजोगं एक बालनाट्य झालं. ते होतं हुन्नर या संस्थेने सादर केलेलं राजा सिंह हे बालनाट्य.

शालेय रंगभूमीवरसुद्धा बक्षिसे मिळवण्याच्या हव्यासापोटी पर्यावरण, आतंकवाद, राष्ट्रप्रेम, साक्षरता यांसारख्या निरस विषयांवर बालनाटिका होऊ लागल्याने शालेय नाटिका स्पर्धांना मिळणारा प्रतिसाद संपला. बालप्रेक्षकांनी स्पर्धेतली नाटकं बघण्याचं नाकारलं आणि स्पर्धकांअभावी नामवंत शालेयस्पर्धा बंद पडल्या. शाळेच्या गॅदरिंगमधून बालनाट्य हद्दपार झालं. शाळेत, सोसायट्यांमध्ये आता रेडीमेड डान्स होऊ लागले.शालेय रंगभूमीचे कार्य मंदावले, पण याही परिस्थितीत ‘रविकिरण मंडळ’,नवी मुंबई महापौर चषक बालनाट्य स्पर्धा,(मुंबई) ‘ महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र , दीपाली काळे यांची ‘श्रीकला संस्कार संस्था (कल्याण,डोंबिवली), डॉ. सुधा प्रकाश कांकरीया (नगर) आंतर शालेय नाट्य स्पर्धा (कणकवली)यांसारख्या संस्थांनी शालेय नाट्यस्पर्धा आयोजित करून शालेय रंगभूमी वरील चैतन्य राखण्याचे अमोल कार्य केले.या सर्व संस्था त्या त्या जिल्ह्यातील बालनाट्य चळवळीला बळ देण्याचे कार्य करत होत्या.
२००४ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयानेदेखील राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा आयोजित करून बालनाट्य करीता एक नवा मंच उपलब्ध करून दिला. या स्पर्धेने शालेय रंगभूमीवर क्रांती घडवली.बालनाट्य चळवळ सर्वदूर पसरली.ग्रामीण भागातील मुलांना त्यांची नाट्य कला दाखविण्याची संधी या स्पर्धेने दिली.आज १७ वर्ष ही स्पर्धा नवे उच्चांक स्थापित करत जोमाने सुरू आहे. २०२० मध्ये ३५३ संस्थांनी प्राथमिक फेरीत सहभाग नोंदवला.. परंतु स्पर्धक फार आणि प्रेक्षक कमी ही या स्पर्धेची अवस्था चिंताजनक आहे.

या स्पर्धेत बालनाट्य चे पारंपरिक विषय, टाळून बालकांना सतवणाऱ्या विविध समस्या,त्यांचे प्रश्न, त्यांचे आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक घटना..जसे शेतकऱ्याच्या आत्महत्या,दुष्काळ,पर्यावरण प्रश्न,दहशतवाद,बाल गुन्हेगारी,इत्यादी…विषयांवर बालनाट्य या स्पर्धेतून व्यक्त होऊ लागली.व्यक्त होण्याचे बालसुलभ मार्ग न वापरता,परीक्षकांना आकर्षित करणारे,प्रौढ रंगभूमीवरील फंडे वापरण्यात येऊ लागले.बक्षीस प्राप्ती हेच अंतिम ध्येय असल्याने राज्य बालनाट्य स्पर्धेतील बालनाट्ये प्रेक्षकांचा पाठिंबा मिळविण्यात अपयशी ठरली.

राज्य नाट्य स्पर्धा…ही बालनाट्य क्षेत्रात नवे काही करू पाहणाऱ्यांसाठी प्रयोगशाळा ठरली.राज्य बालनाट्य स्पर्धेने बालनाट्याला – धनंजय सरदेशपांडे (पुणे), नाथा चितळे (नांदेड), असिफ अन्सारी (औरंगाबाद), त्र्यंबक वडस्कर(परभणी) यासारखे संवेदनशील लेखक मिळवून दिलेत तर,सतीश साळुंखे आणि सय्यद अमजद (बीड),रोशन नंदवंशी आणि वीरेंद्र गणवीर (नागपूर),राजेश राणे (ठाणे), श्याम शिंदे आणि डॉ.विजय जोशी (नगर),सुनील शिंदे आणि इरान्ना पाटील (कोल्हापूर) यांच्यासारखे प्रतिभावंत दिग्दर्शक देखील दिलेत.

या दोन दशकात बालनाट्य प्रयोग करणाऱ्या संस्थांची संख्या कमी झाली असली तरी बालनाट्य शिबिर आयोजित करणाऱ्या संस्थांची संख्या वाढली. याला कारण पालकांची मानसिकता. आपल्या मुलाने स्पर्धेत मागे राहू नये यासाठी, तो धीट व्हावा यासाठी, तो लाजाळू आहे, त्याला बोलता करण्यासाठी पालक मुलाला नाट्यशिबिरात पाठवू लागले. रिॲलिटी शो च्या प्रभावामुळे काही पालकांना मुलाचं कौतुक व्हावं, तो टीव्हीवर यावा असंही वाटू लागलं. पालक मुलांच्या प्रदर्शनासाठी खर्च करायला तयार होता. ‘मागणी तसा पुरवठा’ या न्यायाने बालनाट्य शिबिरांची संख्या वाढली.या शिबिरांच्या गर्दीत निष्ठेने बालनाट्य शिबिरे घेणारे काही नावे आहेत,संजय हळदीकर(कोल्हापूर),रामनाथ थरवळ,अरुंधती भालेराव,मंदार टिल्लू (ठाणे) डॉ.प्रशांत वाघ(नाशिक),गणेश वडोडकर (नागपूर),प्रकाश पारखी आणि देवदत्त पाठक (पुणे),संकेत ओक (डोंबिवली).तसेच राज्य शासनाच्या जवाहर बाल भवन तर्फे देखील गरीब आणि गरजू मुलांसाठी बालनाट्य प्रशिक्षणाचे वर्ग सुरू असतात.

रत्नाकर मतकरी यांच्या पुढाकाराने ठाण्यातील कामगार वर्गातील मुलांसाठी वंचित बाल नाट्य रंगभूमी सुरू करण्यात आली.बालनाट्य चळवळ तळागाळातील मुलापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी ठाण्यातील काही निष्ठावंत रंगकर्मींनी बजावली.

मराठी बालनाट्याला आज ६० वर्षे झालीत. पण बालप्रेक्षकांना नाटकाविषयी वाटणारे कुतूहल आणि आकर्षण अजूनही कमी झालेलं नाही. चांगल्या दर्जेदार बालनाट्यांना आजही प्रतिसाद मिळतो. बालनाट्य बघताना बालप्रेक्षक हसतात. देहभान विसरून नाटकात रमतात. टाळ्या वाजवतात. कित्येकदा नाचतातसुद्धा. बालप्रेक्षकांचा हा अद्भुत प्रतिसाद रंगकर्मींना आनंद देणारा असतो तर पालकांना समाधान देणारा, पालक मुलांच्या मनोरंजनासाठी पैसा खर्च करायला तयार असतात.आधुनिक पालकांची ही मानसिकता मनोरंजन क्षेत्रातील कॉर्पोरेट जगताने ओळखली आणि नव्या कॉर्पोरेट बालनाट्यांचा आरंभ २०१९ मध्ये अलबत्या गलबत्या या बालनाट्याने झाला. सेलेब्रिटींची भव्य दिव्य बालनाट्य मार्केटिंग च्या नव्या गणिताने अल्पावधीत लोकप्रिय झालीत.बालनाट्य प्रयोगांना प्रेक्षक नाही ही ओरड खोटी ठरली. अल बत्या गलबत्या या बालनाट्याने गर्दीचे नवे उच्चांक स्थापित करून सर्वांना चकित केले. कॉर्पोरेट बालनाट्य चे नवे युग अवतरले.त्या नंतर सेलिब्रिटी कलाकारांना घेऊन,अजून दोन भव्य दिव्य खर्चिक बालनाट्ये व्यवसायिक रंगभूमीवर आलीत.त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला.यामुळे व्यवसायिक मराठी बालनाट्याची परंपरा सुरू झाली.बालनाट्य मनोरंजक होत,तेच मनोरंजक बालनाट्य आता मात्र व्यावसायिक झालं.

बालनाट्य प्रयोगांना गर्दी होऊ लागली खरी.पण बालनाट्य भूमी खऱ्या अर्थाने बालकांची झाली का?मुलांचे या बालनाट्य क्षेत्रात स्थान काय? त्यांची भूमिका काय?सद्य बालनाट्य रंगभूमी बालकांना पोषक आहे का? हे आपण पाहू या लेखमालेच्या पुढील भागात.

— राजू तुलालवार.

टीप:(तुमचे प्रश्न आणि शंका कमेंट बॉक्स मध्ये मांडू शकता)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..