नवीन लेखन...

बालनाट्याची ६० वर्ष (बाल रंगभूमी माझ्या नजरेतून लेख – २)

१९५९ साली सुधा करमरकर यांच्या ‘लिटल थिएटर’ या संस्थेने सादर केलेल्या ‘मधुमंजिरी’ या बालनाट्याने महाराष्ट्रातील बालरंगभूमीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

आज मराठी बालनाट्याने वयाची साठी पार केली आहे. ६० वर्षांत अनेक बालनाट्य प्रयोग झालेत. या प्रयोगांमधूनच बालरंगभूमीच्या सोबत बालनाट्याचा उद्देश व कार्य स्पष्ट झाले. बालनाट्यांची उपयोगिता सिद्ध झाली आणि बालरंगभूमीवरील वेगवेगळे प्रवाह निश्चित होत गेले. १९६० नंतर,पहिल्या काही वर्षांतच बाल नाटयाने चांगले बाळसे धरले. पुढील काही वर्षांत बालनाट्य रंगभूमी वाढली-फोफावली विस्तारली आणि आता अधिक सशक्त होऊन कार्यरत झाली आहे. आज महाराष्ट्रात बालनाट्यांचे जेवढे प्रयोग होतात तेवढे भारतात कुठेही होत नाहीत. स्थापनेनंतर मुंबई-पुणे-नागपुरात स्थिरावलेली बालरंगभूमी आता गावागावांत प्रवेश करती झाली आहे. आणि याचे मुख्य कारण बालनाट्याची उपयोगिता. मुलांमधील सुप्त शक्ती विकसित व कार्यक्षम करण्यासाठी बालनाट्यासारखे उपयुक्त, सहज-सुलभ, मुलांच्या आवडीचे दुसरे साधन उपलब्ध नाही. चित्र काढणे आणि नाटक करणे या मानवाच्या अंगभूत मूळ प्रेरणा आहेत. त्यांचा वापर करायला मुलं नेहमीच उत्सुक असतात.

नाटक ही मराठी मनाची आवड आहे. संस्कृती आहे. बालनाट्यामुळे मुलांच्या व्यक्तित्वात फरक पडतो हे महाराष्ट्रातील सुजाण व रसिक पालकांनी ओळखलं आणि त्यांच्याच पाठिंब्याच्या जोरावर बालरंगभूमीने साठ वर्षांहून अधिक काळ कार्य केलं. पालकांबरोबरच बालरंगभूमीवर कार्यरत असलेले सर्व रंगकर्मी, संस्था कौतुकास पात्र आहेत. कारण त्यांनी बालनाट्याचे सांस्कृतिक व शैक्षणिक मूल्य ओळखून व्यवसायाच्या दृष्टीने कोणताही आर्थिक लाभ नसताना केवळ मुलांच्या भल्याचा विचार करून बालरंगभूमी कार्यरत ठेवली. मुलांना नाटक बघायला आवडते तसेच ते करायलाही आवडते. नाटक बघणं आणि नाटक करणं या दोन्ही गोष्टी त्याला शाळेत मिळत नाहीत. बालनाट्याला सरकारकडून अजूनही अनुदान मिळत नाही.

६० वर्षात बालनाट्य कसं बदललं? हे स्पष्ट करण्यासाठी ६० वर्षांचा कालखंड मी खालील तीन कालखंडात विभागणे पसंत करेन.

बालरंगभूमी : १९६०-१९८०

सुधा करमरकर यांनी बालनाट्याचा पाया तर रचलाच पण पहिल्या वीस वर्षांत अखंडपणे वीसच्या वर बालनाट्यांची निर्मिती करून त्यांचे हजारच्या वर प्रयोग महाराष्ट्रात करून बालरंगभूमीची इमारत पक्की उभी केली. मराठी बालनाट्याचे प्रयोग त्यांनी दिल्ली कोलकाता कर्नाटक व गोवा येथेही केले. जादूचा वेल, ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’, ‘अल्लादीन आणि जादूचा दिवा’, ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’, ‘चिनी बदाम’, हं हं आणि हं हं हं’, ‘एका फटक्यात सात’, ‘सिंड्रेला आणि राजपुत्र’, ‘आगपेटीतला राक्षस, ‘सर्कशीत चिमणा’, ‘अबब विठोबा बोलू लागला’ इत्यादी त्यांची बालनाट्ये खूप गाजली. सुधा करमरकरांनी बालनाट्य लेखनासाठी रत्नाकर मतकरी, कमलाकर नाडकर्णी, पुरुषोत्तम दारव्हेकर, दिनकर देशपांडे, शाम फडके, वसुधा पाटील, आत्माराम सावंत, विजय तेंडुलकर आदी नामवंतांना प्रेरित केले तर प्रौढ रंगभूमीला त्यांनी डॉ. काशीनाथ घाणेकर, भक्ती बर्वे, मनोरमा वागळे, भावना, नीलम प्रभू, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारखे थोर कलावंत दिले.

सुधा करमरकरांनंतर रत्नाकर मतकरी यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी ‘बालनाट्य’ या संस्थेद्वारे सतत पंचवीस वर्षे बालरंगभूमीवर वेगवेगळ्या विषयांवरची बालनाट्ये, वेगवेगळ्या रूपात, ढंगात सादर करून बालरंगभूमीला नवी दृष्टी दिली. बालनाट्य करताना रूढ, पारंपरिक व लोकप्रिय मार्ग सोडून त्यांनी नेहमी वेगवेगळ्या वाटेने प्रवास करून पाहिला आणि बालनाट्य बघणाऱ्या बालप्रेक्षकांना निखळ आनंद दिला. बालनाटय करणे सर्वांनाच सहजसाध्य व्हावे, कलाकार आणि बालप्रेक्षक यांच्यात जवळीक निर्माण व्हावी यासाठी त्यांनी रंगमंचाच्या विविध कलपना साकारल्या. ‘निम्माशिम्मा राक्षस’, ‘अलीबाबाचं आणि ३९वा चोर’, ‘गाणारी मैना’, ‘अदृष्य माणूस’, ‘इंद्राचं आसन-नारदाची शेंडी’, ‘सावळ्या तांडेल’ ही त्यांची बालनाट्ये वैविध्यपूर्ण होती.

सुधाताई व मतकरी दोघेही मुंबईचे. पण त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन पुण्यात सई परांजपे, श्रीधर राजगुरू यांनी बालनाट्याचा शुभारंभ केला तर नागपुरात थोर बालसाहित्यकार गोपीनाथ तळवळकर, पुरुषोत्तम दारव्हेकर आणि दिनकर देशपांडे यांनी बालनाट्याची पाळेमुळे घट्ट रुजवली. बालरंगभूमी जसजशी आकार घेऊ लागली, लोकप्रिय होऊ लागली तसतसे जुने-जाणते लेखक उत्सुकतेपोटी बालनाट्य लिहिण्यास प्रवृत्त झाले. याच काळात ‘नवे गोकुळ’, ‘वयंम् मोठं खोटंम’, ‘विठ्ठल तो आला आला’ (पु. ल. देशपांडे), ‘बाल गोविंद’ (वसंत बापट), ‘चिमणा बांधतो बंगला’, ‘चांभार-चौकशा’, ‘पाटलाच्या पोरीचं लगीन’ (विजय तेंडुलकर), राजू हरला’, ‘घरभेद्या’, ‘राजा नव्हे गुलाम’ (श्याम फडके), ‘कावळे’ (चिं. त्र्यं. खानोलकर) इत्यादी नामवंतांनी बालनाट्य लेखन केले तर ठाण्याच्या नरेंद्र बल्लाळ यांनी वैज्ञानिक गोष्टींवर आधारित बालनाट्ये लिहून बालनाट्याला विज्ञानाची जोड दिली. सई परांजपे यांनी ‘शेपटीचा शाप’, ‘सळो की पळो’, ‘जादूचा शंख’ सारखी बालनाट्ये लिहून ती आकाशवाणीवर सादर केली. बालनाट्य दिग्दर्शनाची जबाबदारी सुधा करमरकर, रत्नाकर मतकरी, कुमार शाहू यांनी उचलली तर अरुण जोगळेकर, विजया मेहता, सई परांजपे यांनीही नाटके बसवली.

मनोरंजनाबरोबरच सुसंस्कार करणे हे बालनाट्याचे प्रमुख उद्दिष्ट मानले गेले. या दोन दशकांत आलेल्या बालनाट्यांचा ओढा अदभूततेकडे जास्त होता. अधिकांश बालनाट्ये परीकथा किंवा फैंटसीवर आधारित होती. राजा-राणी, राक्षस-परी इत्यादी काल्पनिक पात्रांद्वारे जादू व चमत्कारांच्या साहाय्याने व विनोदी पद्धतीने बालनाट्य सादर करण्याकडे कल होता. वास्तववादी कथा-कल्पना, गंभीर विषय, शोकांतिका यांना बालनाट्यात स्थान नव्हते.

बालनाट्ये … दोन अंकाची किंवा दीर्घांक स्वरूपाची होती. तेंव्हाच्या व्यवसायिक प्रौढ नाटकांचा प्रभाव असल्यामुळे बालनाट्य दिर्घ लांबीचे असावे. पहिल्या दोन दशकात मुलांनी बालनाट्य पाहिलं. मुलांची भूमिका बाल प्रेक्षकाची होती आणि राहिली.

बालनाट्य करणाऱ्या ज्या काही मोजक्या संस्था होत्या,त्या संस्थांनी बाल प्रेक्षकांना उत्साहित केले परंतु बाल कलाकारांना बाल नाट्यात काम करण्यासाठी प्रोत्साहित केले नाही.फार थोड्या बाल कलाकारांना बाल नाट्यात काम करण्याची संधी मिळे.

बाल नाट्याची पुढील वीस वर्षे कशी होती? ते आपण पाहू पुढील लेखात.

— राजू तुलालवार.

टीप:(आपणास या विषयाशी संबंधित प्रश्न विचारायचे असल्यास आपण कॉमेंट करून विचारू शकता.)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..