नवीन लेखन...

मुंगी आणि टोळ (संक्षिप्त रूपांतरीत कथा २३)

जेव्हा मी लहान होतो, तेव्हां मला कांही नीतीकथा पाठ करायला लावल्या होत्या आणि त्यांचे तात्पर्य नीट समजावून सांगण्यात आलं होतं.
त्यांतलीच एक कथा होती, ‘मुंगी आणि टोळ.’ ह्या अपूर्ण जगांत जो उद्योगी राहतो त्याला बक्षिस मिळतं आणि आळशी किंवा मौज करत रहाणा-यांस शिक्षा मिळते, हा धडा मुलांच्या मनावर ठसवण्यासाठी ही नीतीकथा.
ही कथा सर्वांना माहिती असणारच तरी मी सांगतो की ह्या कथेत एक मुंगी उन्हाळ्यांतला प्रत्येक दिवस खूप मेहनत करून पावसाळ्यासाठी भरपूर अन्नाची बेगमी करत असते तर एक टोळ गवतावर बसून गाणी गात असतो.
पावसाळा येतो.
मुंगीकडे भरपूर अन्न असल्यामुळे ती आरामात असते तर टोळाकडे कांहीच खायला नसल्याने तो मुंगीकडे जातो आणि थोडं खायला मागतो.
मग मुंगी तिचं ते सुप्रसिध्द उत्तर देते,
“उन्हाळ्यांत काय करत होतास?”
टोळ म्हणतो, “मी गवतावर बसून गात होतो.”
मुंगी म्हणते, “मग जा आता नृत्य कर.”
मी स्वत:ला विकृत समजत नाही तरीही लहानपणी मला समज कमी असल्यामुळे असेल, मी ह्या गोष्टीशी कधीही सहमत झालो नाही.
माझी टोळाला सहानुभूती होती.
कांही काळ तर मी मुंगी दिसली की पायाखाली चिरडत असे.
अशा पध्दतीने ही गोष्ट व तिचे तात्पर्य न आवडल्याचा रोष मी प्रगट करत असे.
मी त्या दिवशी रामला एका हॉटेलमधे एकटा बसलेला पाहिलं तेव्हा मला ह्या गोष्टीचीच साहजिक आठवण झाली.
त्याच्या चेहरा म्लान दिसत होता.
सर्व जगातलं दु:ख त्याच्या डोक्यावर असावं असं भासत होतं.
मला त्याची कींव आली.
मला वाटलं की त्याचा कमनशिबी भाऊ लखन ह्याने त्याच्यासाठी पुन्हा कांहीतरी घोटाळा करून ठेवला असणार.
मी त्याच्याजवळ जाऊन बसलो.
मी विचारले, “राम कसा आहेस?” त्याने उत्तर दिले, “मी कांही मजेत नाही.”
मी विचारले, “परत लखनचा कांही घोटाळा?”
तो सुस्कारा सोडत म्हणाला, “हो. लखनचीच नवी भानगड.”
मी म्हणालो, “आजवर तू त्याला एवढी मदत केली आहेस तर आता त्याची जबाबदारी घेणं बंद कर.”
मला वाटते प्रत्येक कुटुंबात एखादं चुकांवर मेंढरू असतंच!
लखन गेले वीस वर्षे भारभूत होऊन बसला होता.
त्याने आयुष्याला सुरूवात चांगली केली, लग्न केलं, दोन मुलं झाली, धंदा करू लागला.
त्यांच उपाध्याय कुटुंब खानदानी होतं, सुरतमधे प्रसिध्द होतं आणि लखनही यशस्वी आणि प्रतिष्ठीत होईल ह्याची सर्वांना खात्री होती.
पण एक दिवस त्याने जाहिर केलं की त्याचं धंद्यात व संसारात मन रमत नाही.
तो गृहस्थीसाठी लायक नाही असं सांगून बायको आणि धंदा दोन्ही सोडून निघून गेला. कोणाचं कांही ऐकलं नाही. लखनकडे थोडे पैसे होते.
दोन वर्षे चक्क वेगवेगळ्या शहरांमध्ये, काही काळ परदेशीसुध्दा, फिरत तो पैसे कसेही उडवत राहिला.
त्याच्या उधळपट्टीच्या आणि व्यसनांच्या गोष्टी उपाध्याय कुटुंबाच्या कानावर येत.
सुरूवातीला त्यांना वाटे की हा पैसे संपले की परत येईल.
पण तसं कांही झालं नाही.
त्याची उधळमाधळ चालूच राहिली.
मग त्यांना कळले की तो पैसे कर्जाऊ घेत होता.
तो उमदा आणि धूर्त होता.
ज्याने कर्ज मागितल्यावर ‘नाही’ म्हणणं जड जाईल असा त्याच्याइतका समोरच्यावर छाप टाकणारा दुसरा कुणी मला ठाऊक नाही.
तो आपल्या मित्रांकडून सहज पैसे उकळत असे आणि नवे नवे मित्रही सहज जोडत असे.
तो नेहमी म्हणे की गरजेसाठी खर्च करण्यात ती मजा नाही जी चैन करण्यासाठी खर्च करण्यात आहे.
ह्या मोठ्या खर्चासाठी लखन, त्याचा मोठा भाऊ राम, याच्यावर अवलंबून असे.
त्यासाठी तो आपला प्रभाव वगैरे कांही वापरत नसे. राम अतिशय रूक्ष होता आणि त्याच्याकडे ह्या गोष्टींना थारा नव्हता.
राम समाजात एक आदरणीय व्यक्ती होता.
एकदा दोनदा तो लखनच्या सुधारण्याच्या वचनांना भुलला पण जेव्हां त्या मोठ्या रक्कमेतून त्याने कार आणि उंची सूट खरेदी केले, तेव्हा रामने पैसे द्यायला नकार दिला.
मग लखन त्याला ब्लॅकमेल करू लागला.
राम एक यशस्वी वकील होता.
लखन त्याच्या ऑफीसच्याबाबेर टॅक्सीचालक म्हणून उभा राही.
लखन म्हणे, “टॅक्सीचालक होण्यांत काय वाईट आहे?”
कधी कधी राम ज्या हॉटेलात जाई, नेमका तिथेच वेटर म्हणून येऊन लखन समोर उभा राही. आपला भाऊ ज्याला सर्व ओळखतात, तो ह्याच शहरांत तोही वेटर किंवा टॅक्सी ड्रायव्हर असणं रामला परवडण्यासारखं नव्हतं.
त्याऐवजी लखनला पैसे देणंच त्याला ठीक वाटे.
एकदा तर लखन अगदी तुरूंगातच जाणार होता.
राम खूप अस्वस्थ होता. त्याने झाल्या प्रकाराची माहिती घेतली.
लखनने सा-या मर्यादा ओलांडल्या होत्या.
तो उधळ्या, स्वार्थी, चैनी होता पण कायद्याचे उल्लंघन करणारा नव्हता.
ह्यावेळी मात्र त्याने ती मर्यादा मोडली होती. जर त्याच्यावर खटला भरला असता तर तो नक्कीच तुरूंगात गेला असता.
पण रामला आपला एकच भाऊ तुरूंगात गेलेला कसं चाललं असतं.
कानजीभाई नांवाच्या सूडबुध्दीने वागणा-या माणसाला लखनने ५०,००० रूपयांचा गंडा घातला होता आणि तो वसुलीसाठी कोर्टात जाणार होता.
कानजीभाई म्हणाला, “लखनसारख्याला धडा शिकवलाच पाहिजे. त्याला तुरूंगात जावं लागलं की तो शुध्दीवर येईल.”
रामने कानजीभाईला समजावण्यासाठी मध्यस्थ गांठून, खूप खटपट करून आणि त्याचे पन्नास हजार देऊन, ते प्रकरण कसंबसं मिटवलं होतं.
दोन दिवसांनी रामच्या खात्यांतून त्याने कानजीभाईला दिलेल्या पन्नास हजारांच्या चेकचे पैसे वजा झाले, त्याच वेळी त्याच्या कानावर आलं की तोंच कानजीभाई आणि लखन दोघे मिळून मुंबईला जुगार खेळायला गेलेत. तेव्हां तो भयंकर चिडला होता.
इतका क्रोध कुणाला कधी आलेला मी पाहिला नव्हता.
वीस वर्षे लखन रेस, जुगार, मुली, महागडी हॉटेल्स आणि छानसे कपडे ह्यावर लखन पैसे खर्च करत राहिला.
तो अगदी सुटाच्या जाहिरातीतला माणूस वाटे.
त्याचं सत्तेचाळीसावं वर्ष चालू होतं पण पहाणा-याला तो पस्तीशीचा वाटे.
तुम्हाला जरी माहिती असलं की लखन असा छंदीफंदी आहे तरी तुम्हाला त्याची सोबत आवडली असतीच, असे त्याचे वागणे/बोलणे असे.
तो नेहमी प्रसन्न असे, उत्साही असे आणि झोकातही असे.
मलाही त्याच्या जगण्याला मदत म्हणून कांही वेळां चार-पांचशेची फोडणी बसे, त्याचं मला कांही वाईट वाटत नसे.
मी जेव्हा त्याला पांचशे रूपये उसने (ते परत कधीच मिळत नसत.) देत असे, तेव्हा मलाच वाटे की मी त्याच्या ऋणांत आहे.
सगळे मोठे लोक लखन उपाध्यायला ओळखत आणि लखनही सगळ्यांना ओळखत असे.
तुम्ही त्याचं वागणं योग्य म्हणू शकत नव्हता पण तरीही तो तुम्हाला आवडत असे.
आणि बिचारा राम उपाध्याय.
त्याच्या अवलक्षणी भावापेक्षा फक्त एका वर्षाने मोठा पण आताच बिचारा साठीचा वाटू लागला होता. गेल्या पंचवीस वर्षांत त्याने कधी सुट्टी घेतली नव्हती.
सकाळी साडेनऊला तो आपल्या कचेरीत हजर असे आणि संध्याकाळ उलटल्यानंतरच घरी परत येई.
तो प्रामाणिक होता, उद्योगी होता आणि त्याची योग्यताही मोठी होती.
त्याची सुशील पत्नी होती आणि तो कधी मनानेही पत्नीशी बेइमान झाला नव्हता.
त्याला तीन मुली होत्या.
त्याने त्या तिघींचे लालन पालन, शिक्षण मनापासून केले होते.
तो आपल्या उत्पन्नाचा एक तृतीयांश भाग बचत करत असे कारण त्याची इच्छा होती की साठीनंतर काम करत न राहतां गांवी छोटसं घर घ्यायचं आणि बागकाम करायचं.
त्याच्या आयुष्यात नाव ठेवण्यासारखी गोष्ट नव्हती.
त्याचं वय वाढत होतं, त्याचाही त्याला कांही वाटत नव्हतं कारण लखनचही वय वाढत होतं.
तो नेहमी म्हणत असे, “आता चार वर्षांत लखन पन्नाशीचा होईल.
तरूणपणीचे रूप आणि रूबाब त्याला पन्नाशीत सोडून जातील.
मग त्याला कोण विचारणार आहे?
पैसे नसतांना कोण त्याच्याशी मैत्री करणार आहे?
त्यावेळी माझी बचत कित्येक लाखात असेल आणि लखन गटारांत लोळत असेल.
तेव्हा त्याला ते आवडेल कां?
मग त्याला कळेल की उद्योगी असणे चांगले की नुसतीच मौजमजा करणे चांगले ते!”
बिचारा राम! मी विचारांत पडलो.
लखनने आणखी कांहीतरी भानगड नक्कीच करून ठेवली असणार.
आता आणखी असं काय केलं असावं, ह्याचाच मी रामच्या बाजूला बसून विचार करत होतो.
राम खूपच उदास आणि विमनस्क दिसत होता.
रामने मला विचारले, “आता त्याने काय केले माहित आहे?”
लखनने अगदी वाईटात वाईट गोष्ट केली आहे, असं आता ऐकावं लागणार, अशी मी मनाची तयारी केली.
बहुदा लखन तुरूंगात तरी असावा किंवा लौकरच जाणार तरी होता असावा.
रामच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. जेमतेम धैर्य गोळा करून तो बोलू लागला, “माझं संपूर्ण आयुष्य मी प्रामाणिकपणे मेहनत करत राहिलो, सर्वांचा आदर मिळवला, संयमाने वागलो. मेहनतीचं, शिस्तीचं आणि काटकसरीचं जीवन मी नेहमी जगत राहिलो, तेव्हा कुठे मी समाधानी निवृत्तीचं जीवन जगण्याचं स्वप्न पाहिलं. दैवाने माझ्या वाट्याला आलेली आयुष्यातली सर्व कर्तव्यं मी नीट पार पाडली.”
मी म्हणालो, “खरं आहे.”
राम पुढे म्हणाला, “आणि तू हे नाकारणार नाहीस की लखन हा आळशी, अप्रामाणिक, निरूद्योगी जीवन जगला. जगांत जर न्याय असेल!”
मी म्हटलं, “हे ही खरं आहे.”
पुढे बोलतांना राम लालबुंद झाला व म्हणाला, “दोन महिन्यांपूर्वी निरूद्योगी लखनने त्याची आई शोभेल अशा वृध्द बाईशी लग्न केलं आणि आतां ती वारली. मरण्याआधी तिने आपली सारी इस्टेट, ज्यांत एक इथला एक बंगला, एक मुंबईचा वरळीचा फ्लॅट, एक गावाकडचं घर, बॅंकेतले पन्नास लाख रूपये आणि वीस लाखांचे शेअर्स आहेत.”
असं म्हणून रामने टेबलावर मूठ आपटली.
“हाच ईश्वरी न्याय आहे कां? हे योग्य आहे कां? नाही हा तर माझ्यावर अन्याय आहे.”
मी स्वत:ला आवरू शकलो नाही.
मी हंसत सुटलो, अगदी जोर जोरांत. (लखनला मदत करणारा भाऊ राम, लखन अचानक श्रीमंत होतोय हे ऐकून मत्सराने दु:खी कां व्हावा? ख-या आयुष्यांत निरूद्योगी टोळाची मजा झाली होती. मला हंसू येणारच ना!)
मी हंसलो ते रामला आवडलं नाही. तो आता माझ्याशी बोलत नाही.
लखन मला अधून मधून बंगल्यावर मेजवानी देतो.
कधी कधी तो माझ्याकडून उसने पैसेही मागतो पण ते केवळ संवयीमुळे आणि पन्नास रूपयांहून अधिक नाही.
— अरविंद खानोलकर.
मूळ कथा – ॲंट ॲंड ग्रासोफर
लेखक – डब्ल्यू. सॉमरसेट मॉम ( १८७४-१९६५)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..