नवीन लेखन...

जादूचे दुकान (संक्षिप्त रूपांतरीत कथा ९)

मी कांही वेळा त्या जादूच्या दुकानाजवळून गेलो होतो.
कांचेतून छोट्या छोट्या जादूच्या वस्तू, जादूचा चेंडू, बोलक्या बाहुल्या, जादूचे पत्ते, अशा कितीतरी वस्तू दिसत.
मी आत जायचा कधी विचार केला नव्हता.
एके दिवशी दीपू बरोबर होता, तो मात्र माझ्या बोटाला धरून मला दुकानात घेऊन आला.
तोपर्यंत त्या दुकानाचं डीमेलो रोडवरचं अस्तित्व मला जाणवलं नव्हतं.
एका बाजूला चित्रांचं दुकान होतं आणि दुस-या बाजूला फुलांचे.
मला वाटत होतं की मी पूर्वी ते दादरला पाहिलं होतं.
पण आता इथे समोरच होतं.
दीपू बोटांनी वस्तू दाखवून सांगत होता, “माझ्याकडे खूप पैसे असते तर मी हे घेतलं असतं नि ते घेतलं असतं.”
तिथे लिहिलं होतं, ‘पेटी घ्या आणि मित्रांना चकीत करा.’
दीपू म्हणाला, “मी वाचलंय पुस्तकांत. हा कोन आहे ना तो ज्या गोष्टीवर ठेवाल ती गायब होते आणि बाबा ती पेटी आहे ना त्यांत अधेली टाकली तर नाहीशी होते.”

दीपू हट्ट करणारा मुलगा नाही.
हे घ्या, ते घ्या म्हणून माझ्या मागे नव्हता लागणार.
एका बाटलीकडे बोट दाखवत तो म्हणाला, “ती जादूची बाटली आहे ना !”
मी म्हटले, “तुला हवी कां ती ?”
त्याचा चेहरा एकदम फुलला.
तो म्हणाला, “मी ती यशोदेला (बहिणीला) दाखवीन.”
मी म्हणालो, “दीपू, तुझा वाढदिवस जवळ आलाय.”
त्याने कांही न बोलतां माझ्या हातांवरची पक्कड घट्ट केली व माझा हात दरवाजावर दाबला.
अशा रितीने आम्ही दोघे दुकानांत आत पोहोचलो.
साध्या खेळण्याच्या दुकानात दीपू जो उत्साह दाखवत असे तो इथे नव्हता.
मलाच बोलावे लागले.
कांही वेळ आम्ही तिथे दोघेच होतो.
दुकानांत कुणी दिसतं नव्हतं.
आम्ही सभोवताली पाहिले.
एका कांचेच्या पेटीत डोळ्यात दया असलेला एक वाघ काउंटरवर होता आणि त्याचे डोके विशिष्ट पध्दतीने हलत होते.
अनेक स्फटिकाचे लोलक आजूबाजूला होते.
चीनी मातीच्या बनवलेल्या एका हातांत जादूचे पत्ते होते.
अनेक जादूचे वाडगे होते.
एक आंतली स्प्रिंग दाखवणारी उध्दट हॅट होती.
जमीनीवर आरसे होते.
एक आरसा तुम्हाला उंचच उंच काडीसारखे लांब करणारा होता तर दुसरा तुमचे डोके खूप मोठे दाखवून पाय गायब करत होता.
तिसरा तुम्हाला जाड आणि बुटके करत होता.
आम्ही आमची ही रूपं पाहून हंसत असतानाच बहुदा दुकानदार आंत आला.

कुणास ठाऊक कसा आला पण तो काउंटरवर उभा होता.
काळा, फिक्कट वाटणारा, एक कान दुसऱ्याहून खूप मोठा असणारा विचित्र माणूस होता तो.
त्याची हनुवटी बुटाच्या टोकासारखी निमुळती होती.
तो म्हणाला, “बोला, तुमची काय सेवा करू ?”
मी म्हणालो, “माझ्या मुलाला कांही सोप्प्या जादू घ्यायच्यात मला.”
त्याने विचारले, “हातचलाखीच्या, यांत्रिक की घरगुती ?”
मी म्हणालो, “ह्यांतल्या कोणत्याही गंमतीशीर चालतील.”
“अच्छा !” असे म्हणून कांही सेकंद त्याने डोके खाजवले आणि मग डोक्यांतून एक कांचेचा चेंडू काढून आमच्या पुढे धरून म्हणाला, “हा चालेल ?”
हे अपेक्षित नव्हतं.
ही युक्ती मी अनेक ठिकाणी जादूच्या प्रयोगांत पाहिली होती.
मी हंसून म्हणालो, “मस्त !”
दीपूने तो चेंडू त्याच्या हातातून घ्यायला आपला हात पुढे केला तर दुकानदाराचा हात रिकामाच होता.
दुकानदार म्हणाला, “चेंडू तुझ्या खिशांत आहे बघ.”
आणि खरंच तो चेंडू दीपूच्या खिशांत होता.
मी विचारले, “किती किंमत आहे ह्याची ?”
तो आणखी एक चेंडू हाताच्या कोपरांतून काढून काउंटरवर ठेवत म्हणाला, “आम्हाला चेंडू असेच मिळतात. आम्ही ते फुकट देतो.”
हे सांगतानाच त्याने आणखी एक चेंडू मानेतून काढला आणि काउंटरवर दुसऱ्याच्या बाजूला ठेवला.

दीपूने हातातल्या चेंडूकडे पाहिले मग त्या दोन चेंडूकडे पाहिले व शेवटी दुकानदाराकडे पाहिले.
दुकानदार हंसला आणि म्हणाला, “हे दोन्हीही तू घेऊ शकतोस आणि हा सुध्दा.”
असे म्हणतांना त्याने तोंडातून एक तसाच चेंडू काढला.
दीपूने नजरेने माझी संमति घेतली आणि चारीही चेंडू घेतले.
मग माझे बोट गच्च धरून तो पुढचे नवल बघायला तयार झाला.”
आमच्या सगळ्या लहान जादू आम्हाला अशाच मिळतात.”
दुकानदार म्हणाला.
मी थट्टेच्या सुरांत म्हणालो, “खरंय ! होलसेलमध्ये विकत घेण्यापेक्षाही स्वस्त आहे हे.”
दुकानदार म्हणाला, “अर्थात, एका दृष्टीने हे स्वस्त तर आहेच पण शेवटी आम्हांला त्याची किंमत द्यावी लागते.
लोकांना वाटतं तसं नाही.
आमच्या रोजच्या जरूरीच्या वस्तू आणि मोठ्या जादूच्या वस्तू आम्हांला ह्या हॅटमधून मिळतात.
साहेब, तुम्हाला ठाऊक आहे ? खऱ्या जादूच्या वस्तू होलसेलमधे मिळत नाहीत. आमच्या दुकानावरचा फलक पाहिलांत ना ? ‘खरोखरीच्या जादूच्या वस्तू !’ बघा.”
आमचं लक्ष त्याने दुकानाच्या नांवाकडे वेधलं.
मग पुन्हां म्हणाला, “अगदी खऱ्याखुऱ्या जादूच्या. कोणतीही फसवणूक नाही.”

माझ्या मनांत आले, “हा थट्टा अगदी गंभीरतेने करतोय.”
तो दीपूकडे पाहून मंदस्मित करत म्हणाला, “बाळा, तू एक चांगला मुलगा आहेस.”
खरंच दीपू शहाणा होता पण आम्ही तो लाडावू नये म्हणून घरीही तसा उल्लेख नाही करायचो.
दीपू स्तुतीने भुलला नाही.
तो दुकानदाराकडे स्थिर नजरेने पहात होता.
“कारण फक्त शहाणी मुलंच ह्या (दुकानाच्या) दरवाजांतून आत येऊ शकतात.”
दुकानदार पुढे म्हणाला.
जणू कांही त्याच्या बोलण्याचे प्रात्यक्षिक म्हणून दुकानाच्या दारावर धडका ऐकू येऊ लागल्या.
“मला इथे आत जायचंय, बाबा मला जायचय आत.” असा एका मुलाचा ओरडा ऐकू आला.
मागून वडिलांचा आवाज आला, “अशोक, पण दरवाजाला आतून कुलुप आहे राजा.”
मी म्हणालो, “पण दरवाजाला तर कुलुपच नाही.”
दुकानदार हंसला आणि म्हणाला, “साहेब, कुलुप आहे दुकानाला. त्याच्यासारख्या मुलांसाठी आहे कुलुप.”
तो हे बोलत असतांना आम्हाला एक अति खाऊन जाडा झालेला, गाल फुगवलेला, चिडलेला, एका हट्टी मुलगा कांचेवर हात आपटताना ओझरता दिसला.
मी मदत करावी म्हणून दरवाजाकडे वळत होतो तर दुकानदार म्हणाला, “साहेब, त्याचा कांही उपयोग नाही.”
त्या बिघडलेल्या मुलाचे वडील त्याला ओढत घेऊन गेले.
मी विचारले, “हे कसं करतां तुम्ही ?”
“जादूने” तो दुकानदार हात हवेत फिरवत म्हणाला.
त्याच्या हाताच्या हालचालींबरोबर रंगीत अग्निरेखा चमकली.

“तुला “एक पेटी विकत घ्या आणि मित्रांना चकीत करा” ह्या आमच्या फलकावर दाखवलेली पेटी हवीय ना !”
दीपूने बऱ्याच प्रयत्नाने ‘हो’ म्हटले.
दुकानदार म्हणाला, “खिशांत पहा.”
मग काऊंटरवरच जरा ओणवं होऊन हात लांब करून त्याने खरंच दीपूच्या खिशातून एक जादूची पेटी काढली.
मग त्या हॅटमधून त्याने एक कागद काढला.
मग तो म्हणाला, “दोरा”.
तोंडात दोऱ्याचे रीळ आले.
हवा तेवढा दोरा त्यांतून येतच होता.
ते पार्सल त्याने क्षणात त्या धाग्याने बांधलं.
दोऱ्याच काम होताच दोऱ्याचं रीळ त्याच्या तोंडात गायब झालं.
त्याने ते गिळल्यासारखं वाटलं.
मग एका बोलक्या बाहुलीच्या नाकावर मेणबत्ती पेटवली.
त्यावर आपले बोट धरले.
त्या बोटाला तांबडी लाख होती.
ती वितळवून त्याने पार्सल सील केलं.
मग म्हणाला, “ते गायब होणारं अंडे द्यायचं राहिलं.
असं म्हणून त्याने माझ्या कोटांच्या खिशांत हात घातला व अंडे बाहेर काढले.
तेही बांधले.
मग ‘रडणारी मुलगी’ अगदी माणसाची मुलगी, तीही पार्सलमधे टाकली.
मी सगळी पार्सले दीपूकडे देत होतो व तो ती छातीशी घट्ट धरत होता.
तो कांही बोलत नव्हता पण त्याचे डोळे चमकत होते आणि त्याने माझा हात गच्च धरला होता.
त्याच्या भावना त्याला खेळवत होत्या.

माझ्या हॅटमधे कांही हालचाल झाल्यासारखे वाटले.
मी पटकन हॅट काढली.
एक कबुतर माझ्या डोक्यावरून उडून काउंटरवर बसलं मग जाऊन वाघाच्या पेटीच्या मागे जाऊन बसलं.
दुकानदार म्हणाला, “छे, ही कबुतर कुठेही घर करतात. अंडी घालतात.”
त्याने माझ्या हॅटमधून दोन तीन अंडी काढली.
त्याने माझी हॅट हलवताच, त्यांतून अंड्यापाठोपाठ, खेळायच्या मोठ्या गोट्या, एक घड्याळ, काचेचे तीन चार चेंडू तर होतेच, चुरगळलेले कागद, अशा अर्धा डझन वस्तू त्याने माझ्या हॅटमधून काढल्या आणि म्हणाला, “साहेब, अनेक गोष्टी उगीचच साठत जातात, तुम्हीच असं नाही, सर्वच ग्राहक हेच करतात. हॅट मधून मधून साफ करायला पाहिजे. आपण काय काय साठवतो हे पाहिलं तर चकीत व्हाल.”
असं म्हणत असतांना काउंटरवरचा चुरगळलेला कागद उभा झाला आणि उंच उंच वाढू लागला.
दुकानदाराच्या आणि आमच्या मधे जणू भिंतच उभी रहात होती.
तो दिसेनासा झाला पण त्याचा आवाज ऐकू येत होता.
“आपल्या आत काय काय दडलंय ते सांगण कठीण आहे, साहेब. आपण फक्त बाहेरून चकचकीत केलेल्या वस्तूसारखे असतो. आपल्या कवचात असतो……”
मधेच त्याचा आवाज बंद झाला.
जणू कांही ग्रामोफोन कोणीतरी दगड मारल्याने बंद पडला.
मी म्हणालो, “माझ्या हॅटचं काम झालं कां ? मला जायचंय.”
पण कांही उत्तर आले नाही.

“तो आपली चेष्टा करतोय. आपण काऊंटरच्या मागे पाहूया.”
आम्ही पाहिलं तर तिथे कोणी नव्हतं.
फक्त माझी हॅट होती.
ससा बाहेर बसला होता.
मी हॅट घेतली.
दीपू म्हणाला, “बाबा, मला हे दुकान आवडले.”
मीही म्हणणार होतो की मलाही आवडले पण तेवढ्यात काऊंटरने आमची दरवाजाकडची वाट अडवली.
दीपूने ससा उचलला आणि म्हणाला, “तू मला एक जादू दाखवतोस ?”
आणि त्याचे डोळे बंद दरवाजावर खिळले.
तात्काळ दरवाजा संपूर्ण उघडला आणि तोच दुकानदार तिथून आत आला.
त्याने माझ्याकडे चेष्टेने आणि रूबाबात पाहिले आणि म्हणाला, “साहेब, आमची शोरूम बघायचीय ?”
मला ती जादू आता जरा अति झाल्यासारखे वाटत होते.
मी म्हणालो, “आम्हाला वेळ नाही.”
पण तोपर्यंत आम्ही शोरूममधे पोहोचलोही होतो.
“साहेब, इथे फक्त खऱ्याच जादूच्या वस्तू मिळतात.”
अचानक त्याने माझ्या कोटाच्या बाहीवर कांहीतरी पकडलं, एक लाल शेपूटवाला कीडा वळवत होता.
त्याने पकडला आणि सहज काऊंटरमागे टाकला.
रबराचा असणार तो.
दीपू एका घोड्याकडे पहात होता.
बरं झालं, त्याने तो कीडा पाहिला नव्हता.
मी हलक्या आवाजात दुकानदाराला म्हणालो, “अशा बऱ्याच वस्तू आहेत कां तुमच्याकडे ?”
दुकानदारही हंसत हंसत हलक्या आवाजात म्हणाला, “नाही. तुम्ही बाहेरून घेऊन आलात त्याला. लोक काय काय बरोबर बाळगतात सांगतां येत नाही.”

मग दीपूला त्याने विचारले, “इथले कांही आवडले कां तुला ?”
दीपूला बऱ्याच गोष्टी आवडल्या होत्या.
त्याने विचारले, “ही जादूची तलवार आहे ?”
तो विक्षिप्त दुकानदार म्हणाला, “हो, ती वांकत नाही, तुटत नाही, हात कांपत नाही. ती वापरणाऱ्याला अठरा वर्षापर्यंतचं कोणीही हरवू शकत नाही. अगदी स्वस्त.”
त्याच्याबरोबर चिलखत आणि टोप आणि इतर योध्द्याचं साहित्यही आलंच.
मी सर्वांची किंमत विचारली.
पण त्याने माझ्याकडे लक्ष दिले नाही.
दीपू आता त्याच्या मुठीत होता.
दीपूने माझे बोट सोडून त्याचे धरले होते.
तो दीपूला अनेक गोष्टी दाखवत होता.
मला मत्सर वाटला.
दीपूने त्याचे बोट तेवढ्याच विश्वासाने पकडले होते.
मी त्यांच्या मागे फिरत होतो.
दीपू खुशीत होता.
जायची वेळ येईल तेव्हा तो कुरकुरणार नाही हे मला माहित होते.
ती शोरूमची जागा लांबलचक होती.
अनेक वेगळे भाग, कमानी, खांब यांनी भरली होती.
तिथून दुसरे विभाग दिसत होते.
तिथले विक्रेते तिथल्या पडद्यांच्या आणि आरशांच्या मधे आणखीच विचित्र वाटत होते.
एव्हाना आम्ही आत आलो तो दरवाजा मला दिसत नव्हता.
दुकानदाराने दीपूला मशीन, इंधन यांवाचून चालणारी ट्रेन दाखवली.
मग एक आत सैनिक असलेली पेटी होती.
“त्यातले सैनिक बाहेर काढले की सरळ जिवंत होऊन संचलन करू लागतात.”
दुकानदाराने हळूच सांगितले ते दीपूने ऐकलंच.
त्याचे कान आईसारखेच तिखट आहेत.
दुकानदार म्हणाला, “ही पेटी घेणार तू ?”
मी म्हणालो, “घेणार पण तिची किंमत द्यायला मला बँकेच कर्ज घ्यावं लागेलं.
“तसं कांही नाही.” त्याने सैनिक पेटीत भरले आणि पेटी हवेत फिरवली.
तर एक सुंदर वेष्टनातली भेटवस्तू तयार झाली आणि त्यावर दीपूचं पूर्ण नाव आणि पत्ताही होता.
माझ्या चेहऱ्यावरलं आश्चर्य टीपत तो दुकानदार म्हणाला, “इथे १०० टक्के खरी जादू मिळते.”
मी उपहासाने म्हणालो, “ही जरा जास्तच खरी वाटते.”

तो कांही न बोलता दीपूला इतर जादूच्या वस्तू दाखवून त्या काय काय करतात ते सांगू लागला.
दीपू मन लावून ऐकत होता आणि मान हलवत होता.
मी ऐकत नव्हतो पण दोघे अधूनमधून एकमेकांना टाळ्या देत होते.
इतर गोष्टी माझं लक्ष वेधून घेत होत्या.
जमीन, वरचे छत, खुर्च्या, सगळं विचित्र वाटत होतं.
अनेक ठिकाणी मातीचे साप होते, ते खरेच वाटत होते.
अचानक माझे लक्ष कांही अंतरावर एक विक्रेता कांही काम नसल्याने खांबाला टेकून उभा होता त्याच्याकडे गेले.
तो वेळ घालवायला चाळे करत होता.
त्याच्या नाकाच्या शेंड्याकडे तो पहात होता आणि ते नाकाचं टोक लांब होऊन पुढे पुढे जाऊ लागलं.
तो जीभ वळवावी तसं नाक फिरवत होता.
फारच ओंगळवाण दृश्य होतं ते.
मला वाटत होतं की दीपूचे त्याच्याकडे लक्ष जाऊ नये.
मी मागे फिरलो.
दीपू दुकानदाराच्या गप्पांत मग्न होता.
त्याच्या मनांत कांही विचित्र नव्हते.
ते दोघे माझ्याकडे पाहून बोलत होते.
दीपू एका छोट्या स्टूलावर उभा होता आणि दुकानदाराच्या हातात एक मोठ पिंप होतं.
दीपू म्हणाला, “बाबा, लपालपी खेळतोय.”
मी पुढे होऊन खेळ थांबवणार होतो, तेवढ्यात दुकानदाराने पिंप त्याच्यावर ठेऊन त्याला झाकून टाकले.
मी ओरडलो, “काढून टाक ते पिंप. मुलगा घाबरून जाईल.” तो लहानमोठे कान असणाऱ्या दुकानदाराने ताबडतोब पिंप उचलले आणि मला ते रिकामे पिंप दाखवले.
स्टूलावरही दीपू नव्हता.
माझा मुलगा गायब झाला होता.
माझा स्वत:वरचा ताबा सुटला.
मी स्टूलाला लाथ मारली आणि दुकानदाराला रागाने विचारले, “माझा मुलगा कुठे आहे ?”
तो म्हणाला, “बघा, आमची जादू पूर्ण खरी आहे.”
मी आणखी चिडलो, त्याचा गळा पकडायला धावलो पण त्याने मला चकवले.
तो एक दार उघडून आंत गेला.
मीही त्याच्या मागे त्या दारांतून आंतल्या काळोखात शिरलो.

मी कुणावर तरी आपटलो.
तो माणूस म्हणाला, “माफ करा, मी तुम्हाला समोरून येतांना पाहिलं नाही.
पाहिले तर चक्क मी डीमेलो रोडवरच्या एका माणसाला आपटलो होतो.
दोन पावलांवर गोंधळलेला दीपू उभा होता.
मग तो हंसून माझ्याकडे आला.
जणू कांही कांही क्षण त्याची माझी चूकामूक झाली होती.
त्याच्या हातांत चार पार्सले होती.
येतांच त्याने माझे बोट पकडले.
मला काय चाललंय तेच समजेना.
मी ते दुकान पहाण्यासाठी वळलो तर ते दुकान तिथे नव्हतेच.
फोटो फ्रेमचे दुकान फुलांच्या दुकानाला लागूनच होते.
मी व्हिक्टोरीयाला हात केला.
मी दीपूला व्हिक्टोरीयात चढवले.
मोठ्या कष्टाने मी घराचा पत्ता त्याला सांगू शकलो.
हाताला माझ्या कोटाच्या खिशांत कांहीतरी मिळाले, तो कांचेचा चेंडू होता.
मी तो रागाने व्हिक्टोरीयांतूनच बाहेर भिरकावला.
दीपू कांही बोलला नाही.
थोडा वेळ आम्ही गप्पच होतो.
मग दीपू म्हणाला, “बाबा, ते दुकान छान होते.”
मला सर्व आठवले.
मी दीपूकडे पाहिले.
त्याच्यावर त्या दुकानांतून कोणत्याच गोष्टींचा परिणाम झालेला दिसला नाही.
तो घाबरलाही नव्हता किंवा सैरभैरही नव्हता झाला.
तो फक्त ती चार पार्सले घट्ट धरून समाधानी होता.
कोणास ठाऊक त्यात काय असेल.
मी दीपूला म्हणालो, “आपण नेहमी अशा दुकानांत जात नाही ना !”
त्याने नेहेमीसारखेच शांतपणे ते ऐकले.

मग मलाच वाईट वाटले.
ती पार्सले उघडली तेव्हां तीनामधे सैनिक असलेल्या पेट्या होत्या.
साधे शिशाचे सैनिक.
एकात खरीखुरी छोटी मनीमाऊ होती.
हे सहा महिन्यांपूर्वी झालं.
आता माझा विश्वास बसला की ते मांजर इतर मांजरांसारखच होतं.
सैनिक कुठल्याही कर्नलला हवेसे वाटतील असे शिस्तीचे होते.
शहाण्या पालकांने घ्यायला हवी ती काळजी मी घेतली होती.
तरीही एक दिवस मी दीपूला विचारले, “तुला तुझे हे छोटे सैनिक जिवंत झाले तर आवडेल कां ?”
दीपूने शांतपणे उत्तर दिले, “निदान माझे सैनिक तरी बाहेर काढतांच जिवंत होतात.”
मी विचारले, “मग ते संचलन करतात.”
दीपू उत्साहाने म्हणाला, “हो बाबा. त्यांनी कवायत, संचलन केले नाही तर मला ते आवडणार नाहीत.”
मला खूप आश्चर्य वाटले.
मग एक दोन वेळा तो सैनिक घेऊन खेळत असतांना मी न सांगतां मागे जाऊन उभा राहिलो.
पण मला ते कांही हालचाल करतांना दिसले नाहीत.
शिवाय एक गोष्ट बाकी राहिली आहे.
त्या खेळण्यांचे पैसे मी दिलेले नाहीत.
मला कोणाची बाकी ठेवणे आवडत नाही.
डीमेलो रोडने जातां येतां मी ते दुकान शोधतो पण ते दिसत नाही.
पण मला त्याची काळजी नाही.
त्यांना दीपूचा पत्ता माहित आहे.
तेव्हां मी त्यांनी बिल पाठवायची वाट पहावी हेच उत्तम.

अरविंद खानोलकर.

मूळ कथा : मॅजिक शॉप

मूळ लेखक – एच. जी. वेल्स (१८६६ – १९४६)


तळटीप: एच. जी. वेल्स हे वैज्ञानिक वाडमय लिहिणारे लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. टाईम मशीन ही त्यांची कादंबरी खूप गाजली. तिच्या कल्पनेवर चित्रपट निर्माण झाले. इनव्हीजिबल मॅन ही देखील तितकीच गाजलेली कादंबरी. ‘फर्स्ट मेन ऑन द मून’ आणि इतर वैज्ञानिक कथांमधून त्यांनी जणू कांही भविष्याचा वेधच घेतला.
त्यांनी कल्पिलेल्या अनेक गोष्टी पुढे वास्तवांत आल्या. त्यांनी जगाचा इतिहासही लिहिला आणि आदर्श जग कसं असावं ह्याच्या कल्पनाही कथा कादंबऱ्यांतून मांडल्या. त्यांच्या अनेक कथाही लोकप्रिय झाल्या. ब्लाईंड मॅन, व्हॅली ऑफ स्पायडर, इ. कथांमधे कल्पना विलास तर आहेच पण बरोबरच शिकवण पण आहे. मॅजिक शॉप ही त्यांची जरा वेगळीच कथा. ह्या कथेत तर्कसंगत विचार करू पहाणाऱ्या बापाचा जादूवरला अविश्वास किंवा जादू म्हणजे युक्ती असे मत आणि त्याच्या लहान मुलाचा जादूवरला संपूर्ण विश्वास ह्या विरोधाभासावर कथा आधारीत आहे.
बापाला आलेला अनुभव तर्कसंगत वाटत नाही. तो अजूनही त्यावर विश्वास ठेवू इच्छित नाही. त्याच्या तर्कनिष्ठेला धक्का तर बसलाय पण ते त्याला गैर वाटतय. मुलगा तेच सत्य म्हणून सहज स्वीकारतो. जेवढं आणि जसं आपण पहातो तसंच दुसरा पहात नाही. त्याची जाणीव वेगळ्या पातळीवरची असू शकते. ह्यात योग्य, अयोग्य कांही नाही.
पण आपली जाणीवच खरी व दुसऱ्याची चुकीची असा दुराग्रह असू नये. गोष्टीत जादूकडे वेगळ्या दृष्टीने पहाणारा लहान मुलगा त्याचाच असतो, म्हणून तो ते सहज स्वीकारतो, इतकेच.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..