नवीन लेखन...

डिजिटल सुवर्णसंधी

लेखक डिजिटल पब्लिशिंग क्षेत्रात ३० वर्षांहून अधिक काळ कार्यरत. भारतीय भाषांच्या इंटरनेटवरील पदार्पणासाठी १९९५ मध्ये तंत्रज्ञान निर्मिती करून ‘मराठीसृष्टी डॉटकॉम’ ह्या १९९५ मध्ये सुरू केलेल्या जगातील पहिल्या मराठी पोर्टलचे ते संस्थापक आणि मराठी साहित्यिकांच्या ग्लोबल बँडिंगसाठी ‘स्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक’ ह्या प्रकल्पाचे ते जनक आहेत. भारतीय भाषांमधील १००० हून जास्त वेबसाईटच्या निर्मितीत त्यांचा सहभाग आहे. सामान्य माणसांपासून ते उद्योगजगत, प्रकाशन संस्था वगैरेंसाठी मराठी टायपिंग, डीटीपी, फॉन्ट्ससहित मराठी OCR Font Conversio, भाषांतर इत्यादीसाठी त्यांनी सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे.

आज ‘डिजिटल’ ह्या शब्दाचा बराच बोलबाला आहे. जिकडे-तिकडे सगळं डिजिटल होतंय. आज जगच डिजिटल होत चाललंय म्हटल्यावर व्यवसायसंधीसुद्धा डिजिटल झाल्या नाहीत तर नवलच ! ऑनलाईन व्यवसायसंधी देणाऱ्या अनेक जाहिराती तुम्ही रोजच बघत असाल. ह्यात डिजिटल मार्केटिंग, ऑनलाईन विक्री, Affiliate मार्केटिंग, एवढंच नाही तर SEO, Email मार्केटिंग ह्यांसारख्या संधींच्याही अनेक आकर्षक जाहिराती तुम्ही बघितल्या असतील. ह्या सगळ्या जाहिरातीतला एक महत्त्वाचा भाग म्हणजे ह्यातील बहुसंख्य व्यवसाय करण्यासाठी तुम्ही क्रिएटिव्ह असण्याची फार गरज नसते. किंबहुना तुमच्या क्रिएटिव्हिटीचा तिथे उपयोग करून घेतला जात नाही.

हा लेख युवा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आहे. इथे येणारे तसेच हा लेख वाचणारे युवक हे नक्कीच क्रिएटिव्ह असणार, तेव्हा इतर विषयांतील व्यवसाय संधीविषयी चर्चा करण्यापेक्षा साहित्याशी निगडित संधींचा विचार करणे जास्त उपयुक्त होईल. कदाचित तुम्ही विचारही करू शकणार नाही इतक्या संधी आज ह्याच विषयात उपलब्ध आहेत. आपल्यातली क्रिएटिव्हिटी वापरून डिजिटल युगात वावरण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधींचाच आपण विचार करणार आहोत.

ऑनलाईन आणि डिजिटल व्यवसायसंधी म्हटल्यावर इंग्रजीवर प्रभुत्व असलंच पाहिजे असा गैरसमज मात्र करून घेऊ नका.

ह्यातील बहुसंख्य गोष्टी आपण आपल्या मातृभाषेतही करू शकतो. ह्यासाठी आपल्याला काय हवं? अगदी सोपं आहे. विचार करण्याची शक्ती, आपले विचार लोकांसमोर मांडण्याची कला, थोडीशी कलात्मकता, कदाचित ग्राफिक्सची आवड, ह्या झाल्या प्राथमिक गोष्टी. ह्यांचाच वापर करून, त्यात थोडी भर घालून आपण काय काय करू शकतो ते बघा.

ब्लॉगिंग – लेखन – कन्टेन्ट रायटिंग
डिजिटल युगात ब्लॉगिंग-कन्टेन्ट रायटिंग ही पहिली पायरी. तुमचा स्वत:चा ब्लॉग असेल तर उत्तमच. अन्यथा अशा अनेक वेबसाइर्ट्स आणि पोर्टल्स आहेत जिथे तुम्ही तुमचं लेखन प्रदर्शित करू शकता. आपल्यापैकी अनेक जण फेसबुकवर लिहीत असतील. तिथे लाईक्स मिळतात. कॉमेंट्स मिळतात. पण पुढे काय? फेसबुकवर लिहिण्यापेक्षा स्वत:चा ब्लॉग बनवून तिथे लिहा आणि त्याची लिंक फेसबुकवर शेअर करा. फेसबुकला मोठं करण्यापेक्षा स्वत:ला मोठं करा.

असं म्हटलं जातं की, Content is The King. ज्याच्याकडे कन्टेन्ट तयार करण्याची क्षमता आहे तो ह्यापुढे राज्य करील. हा कन्टेन्ट अनेक प्रकारे तयार करता येतो. तुम्ही जे विचार करता तेच कागदावर … सध्याच्या काळात संगणकाच्या पडद्यावर उतरवू शकता. तुमच्याकडे वेगवेगळ्या विषयांवर जी माहिती असेल तिचं पुनर्लेखन करून सोप्या पद्धतीने ती लोकांसमोर आणू शकता. तुमच्या आवडीच्या एखाद्या विषयावर लेखमाला सुरू करू शकता. इतर भाषांमधील मजकूर भाषांतरित करून त्याचं मराठीत पुनर्लेखन करू शकता.

ह्या लेखनातून पैसे मिळवण्याच्या अनेक संधी आहेत. मात्र अगदी पहिल्या दिवसापासूनच त्यातून उत्पन्न मिळेल अशी स्वप्नं बघू नका. त्यासाठी थोडा धीर धरायला हवा. तुमचं नाव व्हायला हवं. त्यासाठी तुम्हीच प्रयत्न करायला हवेत. स्वतःचं मार्केटिंग किंवा ब्रँडिंग करायला हवं. ह्यासाठीही अनेक तंत्र आणि मंत्र आहेत.

तुम्ही यूट्यूबवर अनेक व्हिडिओ बघत असाल. वेगवेगळ्या विषयांवर असणारे हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर views मिळवत असतात. पूर्वी टिकटॉकवर आणि आता इन्स्टाग्रामसह इतर अनेक माध्यमांमध्ये व्हिडिओजचा सुळसुळाट बघायला मिळतो.

तुमच्याकडे माहितीचा साठा आणि लोकांशी बोलण्याची कला असेल तर तुम्ही अतिशय प्रभावीपणे तुमचे विचार मांडू शकता. तेसुद्धा कॅमेऱ्यासमोर आणि हेच व्हिडिओज यूट्यूबवर किंवा इतर प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करू शकता. लॉकडाऊनच्या काळात असे अनेक चांगले व्हिडिओज आपल्याला बघायला मिळाले. एवढंच काय, सध्या मोबाईल कॅमेऱ्याचा वापर करून Short Films सुद्धा बनवल्या जातात. आता तर ऑनलाईन व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअरसुद्धा Monthly Subscription वर उपलब्ध आहेत.
तंत्रज्ञान सोपं झालंय आणि खिशाला परवडणारंही.

तुम्हाला फिरण्याची आवड असेल तर तुम्ही तुमचा ट्रॅव्हल ब्लॉग सुरू करू शकता. खाण्यापिण्याची आवड असेल तर वेगवेगळ्या होटेल्स रेस्टॉरंटना भेट देऊन तिथले व्हिडिओज बनवून शेअर करू शकता. ह्यासाठी रेस्टॉरंट मालकांकडून चांगले पैसेही मिळू शकतात.

पॉडकास्ट
तुमच्याकडे माहितीचा साठा भरपूर आहे, आवाजही चांगला आहे पण कॅमेऱ्यासमोर यायची अडचण वाटते? काळजी करू नका. पॉडकास्ट हे माध्यम तुमच्यासाठीच आहे. वेगवेगळ्या विषयांवर पॉडकास्ट सुरू करा. कथाकथन, अभिवाचन, पुस्तकपरिचय अशा अनेक गोष्टी करता येतील. ह्यातही चांगले पैसे मिळू शकतात.

इंटरनेट रेडिओ चालक
तुम्ही कधी विचार केलाय का की, तुमचं एखादं स्वत:चं रेडिओ स्टेशन असेल? आता डिजिटल युगात तेही सहज शक्य आहे आणि अत्यंत कमी खर्चात. तुमच्याकडे चांगला कन्टेन्ट असेल, ऑडिओजचा साठा असेल, मदत करायला आणि मिळालेलं उत्पन्न वाटून घ्यायला थोडे मित्र असतील तर हा तुमच्यासाठी आणखी एक छान मार्ग तुमचं २४ तास चालणारं रेडिओ स्टेशन!

ऑनलाईन पत्रकारिता
जसा आपल्या सगळ्यांमध्ये एक लेखक दडलेला असतो तसाच आपल्यात एक पत्रकारही दडलेला असतो. बातम्या वाचताना, बघताना किंवा ऐकताना तो जागा होतो आणि त्यावर स्वत:ची मतं मांडत असतो. प्रसंगी समोरच्याशी तावातावाने वादही घालतो. अशा ह्या पत्रकाराला जागं करून त्याला लिहित करण्यासाठी डिजिटल माध्यमातली ही ऑनलाईन पत्रकारिता कामाला येते. सिटिझन जर्नालिस्ट हा ह्याचाच एक भाग. थोडं पुढे जाऊन ह्याच सिटिझन जर्नालिस्टपैकी अनेकांनी स्वतःची नियतकालिकं आणि ऑनलाईन वृतपत्रंही सुरू केलेली आहेत.

ग्राफिक्स डिझायनर
तुम्हांला ग्राफिक्सची आवड असेल तर तुम्ही एक उत्कृष्ट ऑनलाईन डिझायनर बनू शकता. इंटरनेटवर अशा अनेक वेबसाईट्स आहेत जिथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची डिझाइन्स बनवू शकता. Product Brochures, Invitations, लोगो, पुस्तकांची कव्हर्स… अगदी काहीही बनवता येतं. ह्यासाठी आपल्याला महागडी सॉफ्टवेअरसुद्धा विकत घ्यावी लागत नाहीत. ह्या सर्व वेबसाईट्सवर ती Monthly Subscription वर वापरता येतात. canva ही ह्यासाठी एक अतिशय सोपी आणि उत्कृष्ट वेबसाईट आहे. सोशल मिडिया आणि युवा पिढी हे एक घट्ट समीकरण आहे. अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना, कंपन्यांना, कलाकारांना, संस्थांना त्यांची सोशल मिडिया अकाउंट्स अद्ययावत् ठेवण्यासाठी युवकांची आवश्यकता असते. अशा ठिकाणी आपल्यातील क्रिएटिव्हिटीचा अत्यंत चांगला उपयोग करण्याची संधी असते. आपण सोशल मिडिया डिझायनर आणि प्लॅनरच्या भूमिकेतून ह्या सर्वांना व्यावसायिक सेवा देऊ शकता आणि चांगले पैसेही मिळवू शकता.

भाषांतरकार
तुम्हांला मातृभाषेपलीकडे काही भाषा अवगत असतील तर तुम्ही उत्तम भाषांतरकार होऊ शकता. आज मराठीतले काही प्रकाशक केवळ भाषांतरित पुस्तकांच्या प्रकाशनातून मोठा व्यवसाय करत आहेत. अनेक वर्तमानपत्रं केवळ भाषांतरित बातम्यांवर जगतात. त्यांना भाषांतरकारांची सतत गरज असते. ह्यालाच थोडी जोड देऊन मराठीतील लेखन इंग्रजी किंवा इतर भाषांमध्ये भाषांतरित करण्यासाठी तुम्ही मराठी लेखकांना मदत करू शकता. म्हणजे इथे दोन्ही बाजूंनी संधी आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे आता भाषांतर करणारी सॉफ्टवेअर्ससुद्धा उपलब्ध आहेत. त्यातून होणारं भाषांतर १०० टक्के बरोबर नसलं तरी त्यात बदल किंवा सुधारणा करण्यासाठी तुमचं भाषिक कौशल्य तुम्ही वापरू शकता.

इ-पुस्तक प्रकाशन
येणारा काळ हा पारंपरिक प्रकाशनक्षेत्रासाठीच्या कसोटीचा काळ आहे. छापील पुस्तकांची संख्या कमी होऊन इ-पुस्तकांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात आपण डिजिटलचं सामर्थ्य अनुभवलं आहे. इ-पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय हा एक महत्त्वाचा व्यवसाय होणार आहे. इ-पुस्तकांचं प्रकाशन किफायतशीर आहेच, त्याचसोबत त्याची विक्री आणि वितरणसुद्धा जागतिक स्तरावर होत असल्याने वाचकवर्गात मोठी भर पडणार आहे. DRM सारख्या तंत्रज्ञानामुळे इ-पुस्तकांची कॉपी होण्याला आळा घातला जात आहे. प्रकाशनक्षेत्रातल्या ह्या बदलत्या प्रवाहात उतरण्याची तयारी आपण आत्तापासून सुरू करू शकता. डिजिटल युगात ह्याव्यतिरिक्त अनेक छोटे-मोठे व्यवसाय आहेत जे आपण करू शकता. मात्र सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे ह्या लेखात मुख्यतः साहित्याशी निगडित व्यवसायसंधींचाच विचार केला आहे. ह्याबद्दल कोणतीही अधिक माहिती लागल्यास माझ्याशी pradhan2000@gmail.com वर संपर्क साधू शकता. डिजिटलचं साहित्यविश्वातील सामर्थ्य समजून घेण्यासाठी एक छोटंसं उदाहरण देतो. २६ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘मराठीसृष्टी’ (www.marathisrushti.com) ह्या माझ्या पोर्टलची टॅगलाईन होती. ‘तुमच्या सगळ्यांच्यात एक लेखक दडलाय. त्याला जागा करा.’

आयुष्यात कधी लिखाणाचा विचार न केलेल्या सामान्य वाचकांनी लिहायला सुरुवात केली. लिहीत गेले. सुमारे साडेचार लाख सभासदांपैकी जवळजवळ ५००० सामान्य वाचक ह्या टॅगलाईनशी जोडले गेले आणि आज त्यातले अनेक जण प्रथितयश लेखक झाले आहेत आणि ब्लॉगर्सही. त्यांनी पुस्तकंही लिहिली आहेत. इ-पुस्तकंही प्रकाशित केली आणि तीसुद्धा कुणाच्या मदतीशिवाय.

मराठी भाषेत डिजिटल माध्यमांमध्ये १० लाख पानं उभी करण्याचा ‘मराठीसृष्टी’चा प्रकल्प आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणाही उभी झालेली आहे. सध्या सुमारे ४ लाख पानांचा मजकूर प्रकाशित झाला आहे. ह्या यंत्रणेचा वापर तुम्ही करू शकता आणि अर्थार्जनाबरोबरच आपल्या मायबोलीचीही सेवा करू शकता.

जाता जाता आपल्या सगळ्यांना डिजिटल युगातल्या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी शुभेच्छा.

-निनाद प्रधान

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..