नवीन लेखन...

महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्षसंपदा – भाग ३ – सोनसळी पिवळा बहावा वृक्ष

आपल्या रोजच्या जीवनात निसर्ग आणि निसर्गातील बदलांना नेहमीच महत्त्व असते. प्रत्येक ऋतूत स्वत:चे आगळे वेगळेपण आहे. चैत्रात फुलणाऱ्या अनेक फुलांची एक ओळख आहे. एक नवा गंध आहे. त्या फुलांच्या वैविधतेबरोबरच उन्हाच्या तडाख्यात ओसाड, भकास झालेल्या वातावरणात मनाला आनंदाचा ओलावा देत प्रसन्न करतात. रणरणत्या उन्हात फुललेला बहावा, गुलमोहर, काटेसावर, पळस, सोनमोहर, तामणाने निसर्गाला जणू चैत्र बहाराची शाल पांघरली आहे.

ग्रीष्म ऋतू सुरु झाला की उन्हाच्या झळा लागू लागतात व बाहेर सर्व भकास वाटू लागते. परंतु निसर्गाने त्या काळात सप्तरंगी फुलाची उधळण केलेली असते. लाल रंगाचा पांगारा व गुलमोहोर, निळ्या रंगाचा जॅकरांडा, जांभळ्या रंगाचा अंजन, पांढऱ्या रंगाचा बकुळ, उक्शी, करवंद, कुडा, पिवळ्या रंगाचा बहावा यांचे वृक्ष त्या त्या रंगाच्या फुलांनी सजलेले असतात. फुलांच्या लडींनी भरलेले वृक्ष पाहणे म्हणजे नेत्रसुखच. ते दृश्य डोळ्यास थंडावा देते व उन्हाळा सुसह्य होतो. त्यापैकी ह्या लेखात आपण सोनसळी पिवळ्या रंगाच्या बहावा या वृक्षाची माहिती घेणार आहोत.

बहावा! एक नितांतसुंदर असं झाड. भारतीय हरितधनातील एक महत्त्वाची वृक्ष वर्गातील वनस्पती बहावा. मराठीत बहावा, संस्कृतमध्ये कर्णिकार, इंग्रजीत लॅबर्नम, गोल्डन शॉवर, हिंदीमध्ये अमलतास, दक्षिण भारतात कणिपू, पिवळ्या-सोनेरी रंगाच्या छटांमुळे ‘गोल्डन शॉवर ट्री’ असंही म्हणलं जातं. अशी अनेक नावं धारण करणारं भारतीय उपखंडातील मूळचं झाड. देखण्या चित्ताकर्षक फुलांच्या माळा आंगोपांगावर वागवणारं म्हणूनच नव्हे तर बहुगुणी, बहुऔषधी, बहुपयोगी म्हणूनही सर्वदूर लोकप्रियता प्राप्त करणारा हा राजवृक्ष आहे. बहावाच्या याच वैशिष्ट्यपूर्णतेवर टाकलेला एक दृष्टीक्षेप.

शास्त्रीय नाव: Cassia fistula L. मराठी नाव: बहावा, कर्णिकार. बहावाचे शास्त्रीय नाव ‘कॅशिया फिस्टुला’ हे नाव त्याच्या शेंगेवरून पडले. फिस्‌चुला (म्हणजे नळी)

बहावा हे निसर्गातील अतिशय सुंदर वृक्ष आहे. संस्कृतमध्ये या वृक्षाला ‘आरग्वध’ असे म्हणतात.

’आरग्वधो राजवृक्षशम्पाकचतुरंगुला:।
आरेवतव्याधिघातक्रुतमालसुवर्णका:॥’
[अमरकोश, ६९६]

याची अजून एक प्रजाती आहे त्याचा रंग गुलाबी असतो म्हणून त्यास गुलाबी बहावा (कॅशिआ वेरॉनिका) म्हणतात. हा अत्यंत दुर्मिळ आहे.

सह्याद्रीच्या जंगलात फिरताना आपल्याला हे झाड अनेक ठिकाणी दिसून येतं. कोकणात व घाटमाथ्यावरच्या जंगलात तो सामान्यपणे आढळतो. महाभारतात व रामायणात त्याचा कर्णिकार असा उल्लेख झाला असून कौटिलीय अर्थशास्त्रात याचा उपयुक्त वृक्षांच्या यादीत समावेश केला आहे. आयुर्वेदीय ग्रंथांत व संस्कृत वाङ्‌मयातही त्याचा उल्लेख आढळतो. टाकळा, तरवड, कासूद, हे झाड चिंच, गुलमोहर, शंकासूर, नीलमोहर, कांचन यांच्याच कुटुंबातील सदस्य आहे. इत्यादींच्या कॅसिया या वंशात त्याचा समावेश होत असल्याने त्यांच्याशी बहाव्याचे साम्य आहे. कॅसिया वंशात सु. ५०० जाती असून त्यांपैकी भारतात सु.२४ जाती आढळतात.

खूप उंच नाही आणि अगदी बुटुकबैंगणपण नाही हे वृक्ष साधारणतः 25 ते 30 फूट उंच वाढतात. मध्यमचणीच्या आणि साध्यासुध्या झाडाच्या कशाही वाढलेल्या फांद्या, त्यातच लोंबकळणार्‍या त्याच्या रबरी नळ्यांसारख्या शेंगा बघितल्या की लेकुरवाळ्या आईचीच आठवण येते. कोकणात व घाटमाथ्यावरच्या जंगलात तो ज्यास्त प्रमाणात आढळतो. बहावा, सदाहरित तसेच वर्षांवनात आढळणारी पानझडीची भारतीय वनस्पती.

अगदी हिमालयापासून थेट कन्याकुमारीपर्यंत मिळणारं हे झाड अगदी १००% भारतीय आहे. ऋग्वेदात म्हटल्याप्रमाणे ‘कर्णिकार’ आणि ‘कृतमाल’, म्हणजे कानात घालता येणारा अलंकार! या अलंकारासारख्या फ़ुलांच्या माळाच येतात. तर हे झाड हिंदीमध्ये ‘अमलतास’ या नावाने सर्वत्र ओळखल्या जाते. रखरखत्या उन्हात पाहणाऱ्याला अगदी वेड लागेल अशा पिवळ्या धम्म रंगामुळे या वृक्षाला ‘गोल्डन शॉवर ट्री’ या नावाने देखील ओळखले जाते. हिवाळ्यात या वृक्षाची पानगळ होऊन संपूर्ण झाडावर फक्त नळीदार काळ्या शेंगा दिसतात. उन्हाळ्यात या वृक्षाचे सौंदर्य बघण्यासारखे असते. याला झुबकेदार खाली लोम्बणारे फुलोरे येतात. कानात घालणारे अलंकारसुद्धा झुपकेदार असल्याने या वृक्षाला ‘कर्णीकार’ नावाने देखील ओळखले जाते.

हा खरोखर राजवृक्ष आहे. थायलंडमध्ये त्याला राजवृक्षाचा दर्जा आहे. या वृक्षाला फुले आल्यानंतर तेथे मोठा उत्सव साजरा केला जातो. बहावाचे फुल हे थायी संस्कृतीचे निदर्शक मानले जाते. त्याला ‘रॅचाफ्रुरेक’ म्हणून ओळखले जाते. बहावाच्या फुलण्याला ते ‘डोकू खून’ म्हणतात. आपल्याकडचे डाकू आणि खून हे दोन शब्द आठवतात. मात्र इतक्या सुंदर फुलांशी जोडला गेलेला शब्द ‘खून’ असला तरी तो थाई भाषेतील आहे.

बहाव्याच्या खोडाचा रंग पांढरट असतो. बहाव्याला पिवळ्या रंगाची फुले येतात. प्रत्येक फुलाला ५ पाकळ्या असतात. फुलांचे घोस झाडावर अशा प्रकारे लटकलेले असतात की, जमिनीकडे झुकलेले ते फुलांचे घोस जणू पिवळ्या रंगाचे झुंबर झाडाला लटकावे तसे ते दिसतात. फुलांच्या गुच्छांत कळ्या आणि फुले असे दोन्ही पाहायला मिळतात. पिवळ्या लिंबासारख्या रंगाच्या, ३-४ सेंटिमीटर आकाराच्या या तजेलदार फुलांमध्ये भरपूर पुष्परस असतो. त्यामुळे भुंगे आणि अन्य कीटकांना मेजवानीच मिळते. या कीटकांमुळे पक्ष्यांनादेखील अन्न मिळते.या फुलांच्या पाकळ्या वाळवून त्यापासून पिवळा रंग तयार करता येतो. या पाकळ्यांना मंद सुगंध असतो. बहावाच्या फुलाला एकसारख्या आकाराच्या पाच पिवळ्या नाजूक पाकळ्या असतात. त्याच्या केंद्रस्थानी दहा सारखे आणि तीन वेगळे पुंकेसर असतात. स्त्रीकेसर मात्र एक आणि लांब असतो. अशा अनेक कळ्यांचे घोस उलटे जमिनीकडे वाढत राहतात आणि फुले फुलायला सुरुवात होते. मात्र तो फुलांचा गुच्छ बनत नाही. तर ते दोलकाप्रमाणे भासतात. मात्र झुलतात झुंबरासारखे. छताला टांगलेल्या झुंबराप्रमाणे ते फांदीला चिकटलेले असतात. दिवसा कदाचित तुम्हाला बहाव्याच्या झाडाखाली गेलात तर फुलांचा सुगंध येणार नाही, पण रात्री बहाव्याच्या झाडाखाली गेलात तर फुलांचा मंद सुगंध मंत्रमुग्ध करतो. बहाव्याच्या पानांचा रंग गडद हिरवा असून ती संयुक्त प्रकारची असतात. बहाव्याला ३-८ पर्णिकेच्या जोडय़ा असतात. हा पानगळीचा वृक्ष असल्यामुळे साधारण फेब्रुवारीपासून पानगळीला सुरुवात होते.

साधारण पावसाळ्याच्या दरम्यान बहाव्याला शेंगा येतात. या शेंगाची लांबी साधारण शेवग्याच्या शेंगाइतकी असून त्या गुळगुळीत नि दोन्ही टोकांना गोलाकार असतात. या शेंगा कोवळ्या असताना त्यांचा रंग हिरवागार असतो. पानांमध्ये त्या लगेच दिसून येत नाहीत. पक्व झाल्या की त्यांचा रंग चॉकलेटी होतो. या शेंगामध्ये बिया असतात. जंगलात अनेक प्राणी या शेंगा खातात. गुरे मात्र हे झाड खात नाहीत. त्यांचा आकार बदामासारखा असून बिया चकचकीत असतात. बहाव्याच्या शेंगेमध्ये पिवळसर चिकट डिंक/ गम असतो. तो गोड लागतो. माकडांना तो फार आवडतो म्हणूनच कदाचित त्या शेंगांना ‘बंदरलाठी’ असेदेखील म्हणतात.

बहाव्याच्या नवीन रोपांची निर्मिती बियांपासून होते. बियांचे आवरण कडक असल्यामुळे ती जमिनीवर घासली असता गरम होते. त्वचेवर ती घासून टेकवली असता चटका लागतो. गावाकडील खोडकर मुलांचा हा आवडता खेळ. बहाव्याची पक्व शेंग खुळखुळ्यासारखी वाजवता येते.

नवे वर्ष हे आनंद आणि सुखसमृद्धीने भरलेले असावे, यासाठी या वृक्षाच्या फुलांनी घरे आणि मंदिरे सजवली जातात. सर्वत्र ही फुले झुंबरासारखी लावतात. श्रीलंकेतही बौद्ध मंदिराच्या भोवती या झाडांची लागवड केली जाते. सिंहली भाषेत याचे नाव ‘इहेला’ असे आहे. इंडोनशियामध्ये याला ‘कायुराजा’ म्हणून ओळखले जाते.

महाराष्ट्राचे राज्यफुल जसे जारूल आहे, तसे केरळचे राज्यफुल बहावा आहे. केरळच्या राज्यवृक्षाचा दर्जा या वृक्षाला मिळाला आहे. केरळमधील ‘विशू’ सणामध्ये या फुलांना विशेष महत्त्व असते. या सणामध्ये अय्यप्पाची पूजा केली जाते. अय्याप्पाच्या पूजेची आरास बहावाच्या फुलांनी करतात.
हे झाड चिंच, गुलमोहर, शंकासूर, नीलमोहर, कांचन यांच्याच कुटुंबातील सदस्य आहे. भारतीय उपखंडातील जरी हे झाड असले, तरी त्याच्या सौंदर्यामुळे आज जगभर त्याची लागवड केली जाते. पाण्याची निचरा होणारी जमीन या झाडासाठी योग्य. उलट पाणी जास्त असले तर ते बहरात येत नाही. म्हणजे म्हणावे तसे फुलत नाही. डोंगर कपारीतही हे झाड छान फुलते. ते क्षार मोठ्या प्रमाणात शोषून घेते. त्याला जास्त थंडी सहन होत नाही.

असे म्हणतात बहावा ज्या दिवशी बहरला त्या दिवशीपासून 60 दिवसांनी मान्सूनचा पहिला पाऊस पडतो. ‘नेचर इंडिकेटर’ अशी ओळख असणारी ही वृक्ष सध्या सर्वत्र गर्द पिवळ्या फुलांनी बहरली आहेत. मेळघाटात सातपुडा पर्वतरांगेत रखरखत्या उन्हात अनेक झाडांची पानगळ झाली आहेत; मात्र बहावाची पिवळी गर्द झाडे मेळघाटात येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे.

एक समज म्हणा किंवा अंधश्रद्धा, अशी आहे की, बहावा फुलला असताना त्याच्या खालून जर स्त्री गेली तर तिचा केशसंभार अधिक लांब होतो. ही अंधश्रद्धाच. कारण भेदभाव माणसाचा गुणधर्म; निसर्गाचा नव्हे! याची फुललेली फुले आणि शेंगा ज्या पद्धतीने जमिनीकडे असतात, ते पाहून बहावात मला विद्वान, सर्वगुणसंपन्न अशा विनम्र महात्म्याचा भास होतो. असे सर्वांना प्रिय असणारे सौंदर्यही नम्रपणे धारण करणारा बहावा, निश्चितच असा भेदभाव करू शकत नाही. केस वाढोत किंवा न वाढोत, त्या वादात न पडता,

हा बहुगुणी वृक्ष आहे. त्याच्या गुणधर्माप्रमाणे त्याला अनेक नावे मिळाली. त्याच्या वर्णनावरून आणि उपयोगाप्रमाणे ही नावे आली आहेत. हे झाड औषधी असून आयुर्वेदात त्याचे विविध उपयोग आहेत. या झाडाच्या शेंगांचा मुख्यत: उपयोग केला जातो. रोगांचा नाश करणारा म्हणून बहावाला ‘आरग्वध’ असे नाव मिळाले.याच्या शेंगाची पूड रेचक असल्याने बद्धकोष्ठता असणाऱ्या रूग्णासाठी वापरली जाते. त्यामुळे त्याला ‘आरेवत’ असेही नाव पडले. विविध व्याधींचा नाश करणारा म्हणून ‘व्याधीवत’, मानवाचे कल्याण करणारे फळ देणारा म्हणून याला ‘शम्पाक’ म्हणतात. हा वृक्ष आरोग्य चांगले ठेवण्यास सहाय्यकारक असल्याने त्याला ‘आरोग्यम्’ असेही म्हणतात. त्याची शेंग गुणकारी असल्याने त्याला ‘आरोग्यशिम्बी’ हे नाव मिळाले. तर त्या झाडाच्या वर्णनानुरूप त्याला ‘सुवर्णक’ म्हणजे सोनेरी रंगाचा, ‘स्वर्णाङ्ग’ म्हणजे सोनेरी काया असणारा, ‘स्वर्णभूषण’ म्हणजे सोन्याच्या दागिन्याप्रमाणे फुले असणारा, ‘स्वर्णद्रु’ म्हणजे सोनरी वृक्ष, ‘कृतमाल’ म्हणजे फुलांच्या माळा धारण करणारा, ‘दीर्घफल’ म्हणजे लांबलचक फळ असणारा, ‘चतुरङ्गुल’ म्हणजे दोन पानात चार बोटांचे अंतर असणारा, अशा विविध नावांचा धनी आहे हा बहावा. हा वृक्ष मूळ या मातीतील असल्याने त्याला अशी अनेक संस्कृत नावे येणे स्वाभाविक आहे.

बहावा व रामायण:

या झाडाचे मूळ भारतीय उपखंडात आहे. ब्रह्मदेशापासून दक्षिण पाकिस्तान आणि उत्तर प्रदेश बिहारपासून अगदी श्रीलंकेपर्यंत आढळणारे हे झाड. या अस्सल भारतीय झाडाचा उल्लेख येथील पुराणात आढळत राहतो. रामायणामध्ये सीताहरणावेळी सीता कर्णिकार वृक्षाला सांगते, ‘हे कर्णिकार वृक्षा, तू प्रभू रामचंद्रांना सांग की तुमच्या सीतेला रावणाने पळवले आहे.’ त्याचप्रमाणे रामही सीतेच्या विरहाने व्याकुळ होऊन कर्णिकार वृक्षाला मिठी मारतात आणि विचारतात, ‘तू सीतेला पाहिलेस का?’. रामायणात त्यापुढेही अनेक ठिकाणी या वृक्षाचा उल्लेख आला आहे. कवी कालिदासाने आपल्या काव्यात या झाडाचे वर्णन अनेकदा केले आहे.

ह्या शेंगांचा उपयोग जोरदार असतो. कसा? हा गर खाता येतो, फुलांच्या झुबक्याची भाजी आणि शेंगांची बर्फी केली जाते. पण एकदम ’सुखसारक’ देखील असतो. ह्याचा उपयोग अजूनही गावोगावी सारक म्हणजेच पोट साफ करायला एकदम “बहावाबाण’ म्हणून होतो. आपल्या काही पर्गेटिव्ह औषधांमधे ह्याचा वापर होतो. आपली कुत्रीमांजरं जशी पोट बिघडलं की गवत खातात ना, तसच जंगलात कोल्हे, माकडं,अस्वलं, भेकर हरणं अगदी काटे साळिंदरपण ह्याच्यावर आधी हात आणि मग पोट साफ करतात. मेळघाटातली अस्वलं ह्या शेंगांवर ताव मारतात. बहावा रेचक म्हणून अगदी सेफ समजला जात असल्याने आपल्याकडे गरोदर बायका आणि लहान मुलांना औषध म्हणून वैद्य हेच देतात.

बहाव्याच्या प्रत्येक भागाचा, मग ते फुलं असो,पानं असो की शेंगा, सगळं १००% उपयोगाचं आहेच.

औषधी उपयोग:
आधुनिक औषधशास्त्रातही बहावा महत्त्वाचा मानला जातो. अँटिऑक्सिडंट, अँटिइन्फेमेटरी, हिपॅटोप्रोटेक्टिव्ह, अँटिटय़ुमरस म्हणून बहावा ओळखला जातो. जखम बरी करण्यास, बुरशीजन्य आजार बरे करण्यास आणि गर्भनिरोधक म्हणून बहावा ओळखला जातो. विविध त्वचारोग, कफ, रक्तपित्त, गंडमाळा, हगवण, स्त्रियांचे आजार यावरही बहावा उपयुक्त ठरतो. बहाव्याला संस्कृतमध्ये ‘अरग्वध’ म्हणजेच रोगांचा नाश करणारा म्हणून ओळखले जाते. अन्य अनेक फळांपेक्षा बहाव्याच्या गरात जास्त कॅल्शियम असते. शेंगांचा उपयोग जोरदार असतो. हा गर खाता येतो, फुलांच्या झुबक्याची भाजी आणि शेंगांची बर्फी केली जाते. पण एकदम ’सुखसारक’ देखील असतो. ह्याचा उपयोग अजूनही गावोगावी सारक म्हणजेच पोट साफ करायला एकदम “बहावाबाण’ म्हणून होतो. आपल्या काही पर्गेटिव्ह औषधांमधे ह्याचा वापर होतो. आपली कुत्रीमांजरं जशी पोट बिघडलं की गवत खातात ना, तसच जंगलात कोल्हे, माकडं,अस्वलं, भेकर हरणं अगदी काटे साळिंदरपण ह्याच्यावर आधी हात आणि मग पोट साफ करतात. मेळघाटातली अस्वलं ह्या शेंगांवर ताव मारतात. बहावा रेचक म्हणून अगदी सेफ समजला जात असल्याने आपल्याकडे गरोदर बायका आणि लहान मुलांना औषध म्हणून वैद्य हेच देतात.

या पानांचा वेगवेगळ्या औषधांत वापर केला जातो. त्वचाविकारावर बहाव्याची पाने अत्यंत गुणकारी असून भाजल्यामुळे होणाऱ्या जखमेवरदेखील यांचा वापर होतो. कोरडा खोकला तसेच ताप यावरदेखील ही पाने औषधी म्हणून वापरतात. कॉमन इमिगंट्र नावाचे फुलपाखरू बहाव्याच्या पानावर अंडी घालते. त्याचा सुरवंट या झाडाची पाने खाऊन आपली उपजीविका चालवतो. बहावा ही कॉमन इमिग्रंट या फुलपाखराची खाद्य वनस्पती आहे.

बहाव्याच्या शेंगेमध्ये पिवळसर चिकट डिंक/ गम असतो. तो डिंक/ गम बद्धकोष्ठतेवर गुणकारी आहे. बहाव्याची साल आणि मुळंदेखील औषधात वापरली जातात. सर्दीमुळे वाहणाऱ्या नाकाला बहाव्याच्या मुळाची धुरी दिली असता तात्काळ फरक पडतो. बहाव्याची मुळेदेखील तापावर गुणकारी आहेत.

अन्नसाखळीत आहे महत्त्व:

बहावा या झाडाच्या फुलांना कडसर मंद मात्र हवाहवासा असा सुगंध येतो. शिवाय या फुलांमध्ये मुबलक पुष्परस असल्याने विविध भुंगे आणि कीटक या वृक्षाच्या फुलांभोवती पिंगा घालतात. कीटकांमुळे पक्षांचेसुद्धा हे आवडीचे वृक्ष आहे. यामुळे हे वृक्ष अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावतात.

‘या’ आजारांवर होतो उपचार: बहावा हे संपूर्ण वृक्ष मानवासह प्राण्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. या वृक्षांना येणाऱ्या बियांचे चूर्ण हे चर्मरोगावर रामबाण इलाज आहे. तसेच मधुमेहावर देखील या वृक्षांच्या बियांचे चूर्ण उत्तम औषध आहे. या वृक्षाची साल घशातील, गाठीसाठी उपयुक्त असते. या वृक्षाच्या गराचा लेप हा वातरक्त आणि आमवातमध्ये अतिशय गुणकारी आहे. यासह संधिवात, पित्तप्रकोप, हृदयरोग, उदरशुळ, गर्भपातन, संधिवात, पक्षाघात यामध्ये या वृक्षांची पाने, फुले, फळे, बिया, मूळ सारे काही उपयुक्त आहे. मेळघाटात या वृक्षांची फुले सुकवून त्याचा मुरब्बा केला जातो. हा मुरब्बा दोन-तीन वर्षे टिकतो.

बहाव्याच्या शेंगा प्राण्यांच्या आवडत्या. बहावा वृक्षाच्या पानांची भाजीदेखील विदर्भातील नागरिकांचे आवडते खाद्य आहे. हे वृक्ष एक आयुर्वेदिक औषध म्हणून अतिशय फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. कोल्हे, अस्वल, सायळ हे प्राणी देखील या वृक्षाला लागणाऱ्या शेंगांचा मगज खातात. त्यामुळे या प्राण्यांना पोटाच्या विकारापासून आराम मिळतो.

लाकूडही फायदेशीर: बहाव्याचे लाकूड अतिशय मजबूत आणि चांगल्या दर्जाचे असते. बैलगाड्या, होड्या, शेतीची अवजारे, शोभेच्या वस्तू, मूर्ती बनविण्यासाठी त्याचा वापर केला जातो. याचं लाकूड दणकट असल्यानं बैलगाड्या, होड्या, शेतीची अवजारे, शोभेच्या वस्तू, मूर्ती बनवण्यासाठी वापर होतो. बहाव्याचं लाकूड त्याच्या उष्मांक मूल्यामुळे चांगलं सरपण समजलं जातं. उत्तम कोळसाही मिळतो. जर हे झाड अती मोठं असतं ना, तर ह्याच्या लाकडाचा वापर घरं बांधायलापण झाला असता. हे झालं लाकडाचं. याची साल देखील उपयोगी आहे. सालीचा वापर कातडं कमवण्यासाठी करतात.

बहावा ही वनस्पती आयुर्वेदिक औषधी म्हणून वापरण्यात येते. विविध आजारांवर याचा प्रयोग केला जातो. परंतु, या झाडाच्या बिया, वाळलेल्या फांद्या यांपासून आकर्षक अशी उत्पादने केली जातात. खऱ्या अर्थाने टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेला साकारत तयार झालेली ही उत्पादने पर्यावरणपूरकदेखील ठरत आहेत. यामध्ये बास्केट, टी-कोस्टर, कटींग बोर्ड, शेल्फ्स, वॉल हँगिंग, डेस्क, विविध प्रकारचे दिवे, डेकोरेटिव्ह प्लेट, कार्ड होल्डर, बूक मार्कर, पेन स्टॅण्ड, बल्ब होल्डर, मोबाइल स्टॅण्ड, ब्रश होल्डर, हँगर आदींचा समावेश आहे.
स्वाभाविक आहे.

बहावाच्या लाकडावरील सालही पिवळसर हिरवी किंवा फिकट पोपटी रंगाची असते. त्याच्या सालीचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मुख्यत: कातडे कमावण्यासाठी ही साल वापरतात. घशाच्या गाठीवर बहावाच्या सालीचा काढा करून दिला जातो. खोडाची साल ‘सुमारी’ या नावाने ओळखली जाते. फळातील मगज पाण्याच्या साहाय्याने काढून व गाळून तो बाष्पीभवनाद्वारे लेपाप्रमाणे बनवितात त्याचा वापर औषधात करतात. त्यात पेक्टीन, हायड्रॉक्सिमिथिल अँथ्रॅक्विनोने व शर्करा यांचे प्रमाण जास्त असते.

हा गर तंबाखूला सुगंधी बनवण्यासाठी वापरला जातो. हा गर पित्तशामकही आहे. ही फळे पक्व होतात, तसा त्यांचा रंग हळूहळू तपकिरी आणि नंतर काळा होत जातो. उन्हाळ्यात या शेंगा पूर्ण काळ्या रंगाच्या बनतात. पूर्ण वाळलेल्या शेंगा वाऱ्यावर झुलू लागल्या की त्यातून मंजूळ आवाज ऐकायला मिळतो. शेवटी बिया सुट्ट्या न होता पूर्ण शेंगच जमिनीवर पडते. शेंग जड असल्याने आणि आवरण कठिण असल्याने याची निसर्गत: मोठ्या प्रमाणात रोपे तयार होत नाहीत. बिया जाणीवपुर्वक रूजवून मात्र हवी तेवढी रोपे बनवता येतात.

आपल्या काही पर्गेटिव्ह औषधांमधे ह्याचा वापर होतो. आपली कुत्रीमांजरं जशी पोट बिघडलं की गवत खातात ना, तसच जंगलात कोल्हे, माकडं,अस्वलं, भेकर हरणं अगदी काटे साळिंदरपण ह्याच्यावर आधी हात आणि मग पोट साफ करतात. मेळघाटातली अस्वलं ह्या शेंगांवर ताव मारतात. बहावा रेचक म्हणून अगदी सेफ समजला जात असल्याने आपल्याकडे गरोदर बायका आणि लहान मुलांना औषध म्हणून वैद्य हेच देतात.

आयुर्वेदामधे याच्या सालीचा काढा करुन घशाच्या गाठींवर देतात. याची पानं स्ट्रोक्सच्या [मज्जातंतूच्या] आजारावर वापरतात. गुरंढोरं याच्या पाल्याला तोंड लावत नाहीत म्हणून हा सगळीकडे लावता येतो. आदिवासी बहाव्याच्या फुलं आणि कळ्याची भाजी पण करतात. प्रयोग करून पाहणारे बहाव्याच्या फुलांचा गुलकंदासारखा प्रकार बनवतात.

बहावाचे आणखीन कांही औषधी उपयोग :
१. तोंडा मद्धे फोड आल्यास शेंगेचा गर लावतात.
२. जखम बारी करण्यासाठी मुलांचा वापर करतात.
३. टॉन्सिल च्या सुजेवर याचा उपयोग करतात.
४. खोकल्यावर पानांचा रस गुणकारी असतो.
५. आतड्यांच्या विकारावर फळांचा मगज मनुक्याबरोबर खावयास देतात.
६. बहावाच्या फुलाचा गुलकंद आतड्यांच्या विकारावर उपयोगी असतो.
७. अमलताश मूळव्याधीवर पण वापरतात.
८. हैड्रोसिल(अंडवृध्दी) या विकारावर शेंगाच्या बिया ची पूड वापरतात.
९. रक्तवाहिन्यांच्या आजारात ह्याची पाने तेला मद्धे शिजवून खावयास देतात.
१०. गर्भवती स्त्रियांच्या प्रसूतीनंतर येणाऱ्या स्ट्रेच मार्क्स साठी पाने दुधामद्धे घोटून स्ट्रेच मार्क्स
वर लावतात.
११. बहावा काविळी वरचा रामबाण उपाय आहे .याची पाने कफ नष्ट करणारी आहेत आणि फुलं
पित्त नष्ट करणारी शेंगा सर्वात जास्त गुणकारी आहेत. पित्तशामक कफशामक, विरेचक
आणि वातनाशक.

मराठी साहित्यातील बहावा :
बहावा फुललेला असताना कोणीही त्याखाली बसावे. मंद वाऱ्याची झुळूक यावी आणि त्याच्या पाकळ्यांचा सडा अंगावर घ्यावा तो आनंद मनात साठवावा आणि आयुष्यभर बहावाच्या फुलण्याचा त्याच्या सौंदर्याचा, नम्रतेचा, शालीनतेचाच आठव व्हावा.

पूर्ण फुललेला बहाव्याचा वृक्ष पाहाणे म्हणजे निसर्गातील अद्भुत घटनेचे साक्षीदार होणे. सध्या बहावा फुललेला आहे. जेव्हा तुम्ही बहाव्याचा फुलोरा पाहाल तेव्हा या झाडाच्या प्रेमातच पडाल आणि या पावसाळ्यात बहाव्याचे एक तरी रोप आपल्या सोसायटीमध्ये, शाळेच्या आवारात, घराच्या आवारात, शेताच्या बांधावर लावण्यासाठी घरातील मोठय़ा मंडळींकडे हट्ट धराल हे नक्कीच.

असा हा विविध रंगाची उधळण करणारा बहावा कवीला व लेखकांना भुरळ न पाडता तरच नवल. अनेक कवींनी बहाव्याला काव्यात बांधले आहे. अरूण सु. पाटील यांना फुललेल्या बहावाच्या झाडाकडे पाहताना नटलेली आणि हळद लावलेली नवरी दिसली. ते म्हणतात,

हिरवी हिरवी गार
साडी नवरी नेसली
सोनपिवळी फुलांची
अंगी हळद माखली’

तर फुललेला बहावा पाहून कवी बिपीन यांना कवळ्या प्रेमाची आठवण येते. ‘मायबोली’ ब्लॉगवर कवयित्री स्मिता यांनी ठेवलेल्या कवितेचा शेवट खूपच हळूवार केला आहे. कवीने बहावा गुलमोहराच्या कुशीत बहरत असल्याचे वर्णन केले आहे. रेखा घाणेकर यांच्या ब्लॉगवर बहावावर दोन कविता दिसतात. त्यातील एका कवितेत अगदी नेमक्या शब्दांत त्या म्हणतात ‘मन बहावा, बहावा, डोळे भरून पहावा’. बहावाचे फुलणे खरंच डोळे भरून पाहावे, असेच आहे. हिंदीतील सुप्रसिद्ध कवी, गीतकार गुलजार यांच्या ‘अमलतास’ या कवितेमुळे बहावाचे हिंदी नाव अनेकांना कळले.

मराठीतील ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी त्यांच्या ‘श्रावणात घननिळा बरसला’ या कवितेतील तिसरे कडवे हे बहावाचे फुलणे पाहूनच लिहिले असावे, असे  नेहमी वाटते. यात विज्ञानाचा विद्यार्थी असण्याचा भाग असावा. कवीच्या कल्पनेला अंत नाही, मर्यादा नाहीत. कोणतीच बंधने नाहीत. मात्र विज्ञान तसे मान्य करत नाही. त्या ओळी अशा आहेत,

‘पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा’

वसंतात विविध झाडांना पालवी फुटून झाडे हिरवीगार होतात, म्हणजे पाचूचा रंग धारण करतात. त्यावेळी म्हणजे वसंताच्या शेवटच्या काळात हळदीच्या रंगाची फुले धारण करत बहावा फुलतो. भाळावर घामाचे थेंब या काळात हमखास येतात. श्रावणात वातावरण बऱ्यापैकी थंड असते. त्यामुळे घामाचे थेंब भाळी येण्याची शक्यता नाही. मात्र भाळीचे थेंब श्रावणसरीमुळे आले असतील, तर त्या पावसामुळे माती गंधित होत नाही. तापलेल्या मातीवर पावसाचे थेंब जेव्हा पडतात, तेव्हा मातीचा गंध गगनाचा गाभारा भरून टाकतो. श्रावणातील पाऊस मातीला गंध देत नाही. बहावा फुललेला असतो तेव्हा तापलेल्या मातीवर वळीवाचा पाऊस पडतो. तेव्हा जमीन तापलेली असते. त्या मातीचा गंध येतो. म्हणून हे कडवे पाडगावकरांना बहावाच्या फुलण्याला पाहून सुचले असावे आणि नकळत या गाण्यात बसले असावे, असे वाटते. ‘श्रावणात घननिळा बरसला’ हे गीत निश्चितच आनंद देते. खूप सुंदर आवाजात ते लताजीनी गाईले आहे. मात्र या गाण्यातील या ओळी ऐकताना बहावाच आठवत राहतो.

या झाडाचा फुलण्याचा सोहळा उन्हाळ्याची चाहूल लागताच सुरु होतो. हिरवी पाने जाऊन नवी कोवळी पालवी येत असते, त्यातच पांढरी-पिवळी आणि हिरवट झाक असलेली टपोरी गोल गोल फुलं घोसात यायला लागतात. रखरखीत भुरकट-मातकट आणि हिरवट जंगलात हे सामान्य दिसणारं झाड असामान्य सुंदर होऊन जातं. वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकेबरोबर बहाव्याच्या फ़ुलांचे जमिनीकडे झेपावणारे घोस हलत असतात.

वसंतात फुलावा- मनाचा बहावा ,
त्याचा बहर -कोणी डोळे भरून पहावा !

बहावा म्हणलं कि मला बहर + पहावा = बहावा असं वाटतं. इंग्रजीत ह्या झाडाला गोल्डन शॉवर म्हणतात. हिंदीत काही नावे फार गोड आहेत. पळसाला पलाश आणि बहाव्याला अमलताश! वसंतात फुलणारा पिवळा बहावा आणि लाल पळस म्हणजे जणू चैत्राचे हळदी-कुंकूच!.

पीली तितलियों का घर है अमलताश
या सोने का शहर है अमलताश

एकदा मे महिन्याच्या सकाळी बहाव्याखाली बसून कोवळे ऊन बघा. लताच्या आवाजात पाडगावकरांचे “पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले” शब्द ऐकू येतील… ऊन हळदीचे आले…

कवितांचे झाले. मात्र या बहावाने एका शास्त्रज्ञालाही मोहात पाडले होते. डॉ. बिरबल साहनी हे वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक आणि पुरावनस्पती शास्त्रज्ञ. म्हणजेच पॅलिओबॉटनिस्ट. वनस्पतींच्या निर्जीव जीवाश्मांचा अभ्यास ते करत. त्यांनी याबाबतची राष्ट्रीय संस्थाही स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. बिरबल साहनी हे सौंदर्यदृष्टी असणारे रसिक व्यक्तीमत्व होते. त्यांच्या निवासस्थानी त्यांनी सुंदर बाग फुलवली होती. या बागेत ते स्वत: काम करत. घराची आणि आपली काळजी घेणाऱ्या पत्नीला कृतज्ञता म्हणून दररोज बागेतील गुलाबपुष्पांचा सुंदर गुच्छ भेट देत. त्यांनी लखनौमध्ये गोमती नदीच्या किनारी आपले घर बांधले. नदीच्या किनाऱ्यावर सर्वत्र बहावाची झाडे लावली. ऐन उन्हाळ्यात फुललेला बहावा हा पर्यटकांचे आकर्षण बनला. परदेशी पर्यटकही उन्हाळ्यातील हे सौंदर्य टिपण्यासाठी लखनौला भेट देत.

कवयित्री इंदिरा संत यांनी सुद्धा बहाव्याचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे.
नकळत येति ओठांवरती
तुला पाहता शब्द “वाहवा “
सोनवर्खीले झुंबर लेऊन 
दिमाखात हा उभा बहावा ।।
लोलक इवले धम्मकपिवळे
वबिंदूंतूनी बघ लखलखती
हिरवी पर्णे जणू कोंदणे
साज पाचूचा तया चढविती ।।
युवतीच्या कमनीय कटीवर
झोके घेई रम्य मेखला
की धरणीवर नक्षत्रांचा
गंधर्वांनी झुला बांधला ।।
कवयित्री – इंदिरा संत

तर असा हा सर्वाना वेड लावणारा व अत्यंत उपयोगी वृक्ष सोनसळी बहावा.

 

संदर्भ:
१. C. S. I. R.The Wealth of India, Raw Materials, Vol. II, Delhi, 1950.
२. सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने.

डॉ. दिलीप कुलकर्णी
मोबा. ९८८१२०४९०४
१९/०४/२०२४

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 68 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

4 Comments on महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्षसंपदा – भाग ३ – सोनसळी पिवळा बहावा वृक्ष

  1. बहावा वृक्षांची संपूर्ण माहिती असलेला अतीशय वाचनीय लेख डॉ.कुळकर्णी ह्यांनी लिहिला आहे.

  2. लेख खूप माहितीपर आहे. बर्याच नवीन गोष्टी कळल्या. या झाडानी मॅार्निंग वॅाकला जाताना बराच आनंद दिला आहे. कोथरूडला एका रस्त्याच्या मधोमध बहाव्याची झाडे लावली आहेत. दरवर्षी ती फुलतात.
    बहावाऽऽऽवा! वा!

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..