पृथ्वीतलावर जीव सृष्टी निर्माण झाल्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये पदोपदी भेदभाव दिसून येतो. मानवात तर तो अतिशय मोठ्या प्रमाणात दिसतोच. परंतु मुक्या प्राण्यांमध्ये सुध्दा दिसतो.
पूर्वी प्राणी व मानव आपला चरितार्थ चालविण्यासाठी एका भागातून दुसऱ्या भागात स्थलांतर करीत होते. स्थलांतरीत झाल्यानंतर त्या भागातील प्राणी व मानव त्या प्राणीमात्रांना सामावून घेत नसत. परंतु काही कालावधीनंतर मुके प्राणी सुध्दा भेदभाव न करता एकत्र रहाताना दिसत होते.
काळ बदलला, निसर्ग बदलताना दिसत आहे. काळाबरोबर निसर्ग बदलायला तसा मानवप्राणीच कारणीभूत आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. प्रत्येक ठिकाणी समाजात भेदभाव करताना मनुष्य प्राणीच तुम्हाला दिसेल. उदा. लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, अशक्त-सशक्त, स्त्री-पुरुष, जात-पात अशा अनेक प्रकारात भेदभाव उघडपणे दिसतो. पण आम्ही डोळे उघडे ठेवून न पाहिल्यासारखे करून सोईस्करपणे दुर्लक्ष करीत असतो.
ज्याच्या त्याच्या कर्मानुसार दर्जा दिलेला असेल किंवा समाजाने अलिखित स्वरुपात लादला असेल, परंतु पशु-पक्षी, मानव यांच्यामध्ये भेदभाव तुम्ही आम्ही केला तरी जीव आत्मा यात फरक नसतो हे श्री ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून सिध्द करून दाखविलं आहे.
आज अनेक शहरात प्रत्येक ठिकाणी मानवप्राणी उघडपणे भेदभाव करताना आढळतो. अशाच एका पर्यटनस्थळी मी कुटुंबासह गेलो होतो. माझे बरोबर असलेले सर्व त्या पर्यटनस्थळावर फिरण्यात मशगुल झाले होते.
चालता चालता एका ठिकाणी मी पाहिलं, दोन ४ ते ५ वर्षाची मुलं खेळत होती. एकाच्या अंगावर फाटक्या कपड्या शिवाय काहीही नव्हतं, कपड्यावरून तो फुटपाथवर राहणारा असल्याचं दिसत होतं. दुसऱ्या मुलाच्या अंगावर चांगले कपडे होते. त्यावरून तो सुखवस्तू घरातील असावा असं वाटत होतं.
त्या दोन मुलांच्या चेहऱ्यावर लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव दिसत नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता.
ती मुले खेळात मग्न असताना एक स्त्री कदाचित त्या सुखवस्तु घरातील मुलाची आई असावी. काहीतरी पहाण्याच्या नादात असताना तिचा मुलगा फुटपाथवरील मुलांबरोबर खेळत होता. ती बाई आली आणि मुलाच्या पाठीत धपाटा घालून त्याला ओढत घेऊन गेली. त्यामुळे तो रडत होता. तरी दुसरीकडे फुटपाथवरील मुलगा निर्वीकार चेहऱ्याने त्या मुलाकडे पाहत होता. त्याच्याकडे दुसरा पर्याय नसल्याने तो पुन्हा फुटपाथवर जाऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे पहात बसला.
त्याचवेळी माझा मोबाईल वाजल्यामुळे माझी तंद्री भंग पावली आणि मनात विचारांचं काहुर माजलं. हा भेदभाव कधी संपणार नाही का?
मी पोलीस खात्यात ३२ वर्षाच्या सेवेत असे अनेक भेदभाव पाहिले होते आणि आजही पहात आहे. परंतु तो प्रसंग अविस्मरणीय असाच होता.
ती दोन मुले एकत्र खेळताना त्यांच्यामध्ये कसलाच भेदभाव नव्हता. निखळ आनंद ओसंडून वहात होता. जात-पात, लहान-मोठा, गरीब-श्रीमंत यांचा चेहऱ्यावर लवलेशही नव्हता.
“आम्ही मानवांनीच तयार केल्या आहेत या जातीपातीच्या भिंती, आणि त्यातूनच तयार झाला आहे हा भेदभाव’
खरंच हा भेदभाव कोणी थांबवू शकेल का?
तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात सांगतात..’
असाध्य ते साध्य करित सायास ।
परि अभ्यास तुका म्हणे ।’
माणूस बदलून चालत नाही तर त्याची मानसिकता बदलली पाहिजे. तरच
त्यांच्यातला भेदभाव नष्ट होईल.
–व्यंकट पाटील
व्यंकट पाटील यांच्या ‘घर हरवलेला पोलीस’ या लेखसंग्रहातील हा लेख.
Leave a Reply