नवीन लेखन...

आणि प्रेत उठून धावू लागले

मुंबई शहरामध्ये पश्चिम उपनगरात स्वामी विवेकानंद रोडवर, पूर्वेच्या बाजूला खार पोलीस ठाण्याची इमारत दाटीदाटीनं बांधलेली आहे. अपुऱ्या जागेत कामाचं नियोजन करण्याची पोलिसांना सवयच असते. या खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनंत देसाई होते.

नावाप्रमाणे मनाचा अंत लागू न देणारे, अनुभवी, हुशार असे ते अधिकारी होते.

पोलीस खात्यात तशी नेहमीच मनुष्यबळाची वानवा असते. अनेक बंदोबस्त, तपास, कोर्ट, व्ही. आय. पी. इत्यादींचा मेळ घालता-घालता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि प्रभारी हवालदार यांची कसरत चालू असते.

एप्रिल, मे व जून महिन्यात लग्नसराई, शाळा-कॉलेजला सुट्टी असल्यामुळे पोलीस दलातील बहुतेक अधिकारी व अंमलदार रजेवर जाण्यासाठी अर्ज देऊन लाईनमध्ये थांबून कधी एकदा रजा मंजूर होते आणि कधी रजेवर जातो याची वाट पहात असतात.

सन १९९१ सालातील मे महिना. बरेच अधिकारी व अंमलदार सुट्टीवर गेलेले होते.

प्रभारी पोलीस हवालदार यांनी देसाई साहेबांच्या केबिनमध्ये प्रवेश करुन एक कडक सॅल्युट केला. हातातलं रजिस्टर साहेबांच्या समोर ठेवलं. त्यावेळी संध्याकाळचे सात वाजले होते.

अनंत देसाई साहेबांनी मान वर करुन त्यांचा सॅल्युट स्वीकारला. प्रभारी हवालदाराच्या त्रासिक चेहऱ्याकडे पाहताच साहेबांनी ओळखलं. काही तरी भानगड आहे.

‘बोला इन्चार्ज हवालदार, आज कोण आला नाही रात्रपाळी ड्युटीला? ‘ देसाई साहेबांनी विचारलं.

‘साहेब, आज रात्रपाळी ड्युटीकरीता झोनल वायरलेस गाडीवर फौजदार जाधव येणार नसल्याचं त्यांनी आत्ताच फोन करुन कळवलं. ‘ प्रभारी हवालदार म्हणाले.

त्या काळात प्रत्येक झोनमध्ये केवळ एक वायरलेस गाडी फिरत असायची. त्या गाडीवर पाच-सहा अंमलदार आणि एक अधिकारी नेमला जात असे.

देसाई साहेबांनी प्रभारी हवालदाराला विचारलं, ‘आज रात्रपाळीला डिटेक्शन ऑफीसर कोण आहे? ‘

‘सर, आज रात्रपाळीला फौजदार संजय सुर्वे आहेत.’ हवालदारानं सांगितलं.

‘जा, सुर्वे साहेबांना बोलावून आण.’ साहेब म्हणाले.

‘जी सर.’ म्हणून प्रभारी हवालदार केबिनमधून बाहेर आले.

फौजदार संजय सुर्वे म्हणजे एक आकर्षक व्यक्तीमत्त्व, तरुण तडफदार, स्वभावाने नम्र पण कर्तव्यनिष्ठ, सेलटॅक्स विभागातील नोकरी सोडून फौजदार व्हायचं ह्या ध्येयाने प्रेरित होऊन खात्यात दाखल झाले. वय अवघं पंचविस-सव्वीस वर्षे, मुंबईतच लहानाचे मोठे झाले, ते खार भागात. आणि योगायोगाने पहिली नेमणुक झाली ती पण खार पोलिस ठाण्यात. घर आणि पोलीस स्टेशन जवळ असल्यानं जास्तीत जास्त वास्तव्य पोलीस ठाण्यातच असायचं.

सुर्वे साहेब म्हणायचे, ‘कमी तिथं आम्ही.’

असे हे संजय सुर्वे, यांना रात्रपाळीची ड्युटी होती. पण डिटेक्शन ऑफीसर असल्यानं संध्याकाळी सहा वाजताच पोलीस ठाण्यात आपली कामं उरकण्यासाठी हजर ते झाले होते.

प्रभारी हवालदारानं सुर्वे साहेबांच्या डिटेक्शनरुममध्ये आत येउन सॅल्युट केला. सिनियर साहेबांनी बोलावल्याचा निरोप देऊन गेले.

सुर्वे, देसाई साहेबांच्या केबिनमध्ये आले.

‘बस संजय, आज काय विशेष? ‘ देसाई साहेबांनी विचारलं.

‘सर, दोन आरोपी कस्टडीत आहेत. घरफोडीचे आठ-दहा गुन्हे उघड झाले आहेत. त्यांची पूर्तता करतो आहे.’ सुर्वे म्हणाले.

‘संजय, अरे, आज फौजदार जाधव रात्रपाळीला ड्युटीवर येणार नाही. तू आजचा दिवस रात्रपाळी ड्युटी वायरलेस गाडीवर कर. ‘ देसाई साहेबांच्या आवाजात जरब होती. पण आपुलकी ही होती.

‘जी, सर, जातो. पण हातातलं काम संपवतो. एका तासानंतर गेलो, तर चालेल ना सर? ’ संजय सुर्वेनी अदबीनं विचारलं.

‘काही हरकत नाही, फक्त त्या वायरलेस गाडीवरील जमादाराला सांगून तासाभरानं गाडी बोलावून घे.’ देसाईसाहेब म्हणाले.

सुर्वे साहेब सॅल्युट करुन आपल्या रुममध्ये जाउन पुन्हा काम करीत बसले.

रात्रीचे दहा वाजले होते. एक जमादारानं सुर्वेसाहेबांच्या केबिनमध्ये येऊन सॅल्युट करुन सांगितलं, ‘सर, वायरलेस गाडी घेऊन आलो आहे.’

‘पाच-दहा मिनिटे गाडीत थांबा, मी युनिफॉर्म घालून येतो.’ सुर्वे म्हणाले.

सुर्वेसाहेबांच्या समोर घरफोडी करणारा आरोपी बसलेला होता. चौकशी चालली होती.

‘काय रे हरामी? कशाला चोऱ्या करता? अंगाने धडधाकट आहेस, मेहनत करुन इज्जतीनं जगायला शिका. माझ्याकडे बघ, ह्याच खार भागात लहानाचा मोठा झालो, कामं केली, गवंड्याच्या हाताखाली काम केलं आणि आता फौजदार म्हणून काम करतोय, बैला सुधर जरा.’ सुर्वे त्याला समजावित होते.

डिटेक्शनचा हवालदार म्हणाला, ‘साहेब कशाला, समजावताय ह्या गधड्याला? ह्या पूर्वी दहा वेळा मी सांगून बघितलंय, पण म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच.’

सुर्वेसाहेबांनी आरोपीला लॉकअपमध्ये ठेवण्याच्या सूचना दिल्या. वर्दी अंगावर चढवून वायरलेस गाडीवर रात्रपाळी करायला हजर झाले.

त्यावेळी बांद्रा झोनमध्ये बांद्रा, खार, सांताक्रुझ, जुहू, डी. एन. नगर, ओशिवरा, वाकोला ह्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गस्त करावी लागत असे. त्याशिवाय कंट्रोल रुमकडून एखादा कॉल आला म्हणजे तात्काळ मदतीकरीता जावं लागत असे.

वायरलेस गाडीवर फौजदार सुर्वे यांनी अंमलदारांसह रात्रपाळी ड्युटीला सुरुवात केली. कंट्रोल रुम मधून एखादा कॉल येत होता. ताबडतोब त्याची पूर्तता केली जात होती. रात्र कासवाच्या गतीने पुढे सरकत होती. गाडीतील अंमलदारांच्या डोळ्यावर झोप नावाची आक्काबाई आरुढ होण्याचा प्रयत्न करीत होती.

पण पोलिसांना झोपून चालणार नव्हतं. मुंबईची एक करोड जनता, तीस हजार पोलिसांच्या जीवावर निर्धास्त झोपली होती.

रात्रीचे अंदाजे दिड-पावणे दोन वाजण्याची वेळ होती. ‘कंट्रोल कॉलींग, झोन सेव्हन मोबाईल’ या कॉलच्या आवाजाने वायरलेस गाडीतील अंमलदारांची गडबड उडाली.

‘झोन सेव्हन, मोबाईल रिप्लायींग’, ऑपरेटरने उत्तर दिलं. एव्हाना गाडीतील फौजदार सुर्वे आणि अंमलदार कंट्रोलच्या पुढील आदेशाकडे कान लावून होते.

कंट्रोल रुम कडून कॉल मिळाला.

‘झोन सेव्हन मोबाईल सांताक्रुझ मिलन सबवेच्या पूर्व बाजूला महामार्गावर वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत, एका वाहन चालकाला मदतीची आवश्यकता आहे. आपण कोठून निघालात? ते लोकेशन द्या.’

झोन सेव्हन ऑपरेटर यांनी खार रेल्वे स्टेशन येथून निघत असल्याचा कॉल दिला. गाडी सांताक्रुझ मिलन सबवेच्या दिशेने रात्रीच्या शांत वातावरणात सायरन वाजवीत धाऊ लागली. मुंबई पोलिसांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ठ्य म्हणजे, तुम्ही मुंबईच्या कोणत्याही काना-कोपऱ्यातून १०० नंबर फिरवून कॉल दिलात की, पोलीस काही मिनिटांतच मदतीसाठी हजर होतात. त्या काळात पोलीस वाहनं फार कमी प्रमाणात होती. परंतु सध्याच्या परिस्थितीत तर अतिशय जलद गतीनं पोलीस मदत मिळते.

सांताक्रुझ मिलन सबवेच्या पूर्वेकडील भाग व पश्चिम द्रुतगती महामार्गाचा काही भाग वाकोला पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो.

फौजदार सुर्वे आणि स्टाफ काही मिनिटातच घटनास्थळावर पोहोचले. सुर्वे आणि स्टाफ खाली उतरुन तपासणी करीत असतांना हायवेवर एक शववाहिनी रोडच्या एका कडेला उभी होती. व्हॅन मधून आतून कोणीतरी ‘मला बाहेर काढा.’ असं ओरडत होता. हर्स व्हॅनपासून वीस-पंचविस फुट अंतरावर विमानतळाच्या संरक्षक भिंतीजवळ उभे असलेले दोन इसम सुर्वे साहेबांना आवाज देत होते.

‘ओ साहेब. इकडे या.’

सुर्वे साहेब आणि स्टाफ त्या दोन व्यक्तींजवळ गेले.

‘काय हो? काय झालयं? तुमचं नाव काय? आणि तुम्ही का ओरडताय? ‘ सुर्वे साहेबांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.

‘साहेब, मी दत्ता. ह्या व्हॅनचा ड्रायव्हर आणि यशवंता माझा मदतनीस’. दत्ता म्हणाला.

‘हं बोला काय झालं? ’ सुर्वे साहेबांनी विचारलं.

‘साहेब, ही व्हॅन कुपर हॉस्पिटलला असते. ह्या गाडीवर मी आणि यशवंता दोघेजण रात्रपाळी ड्युटीला आठ वाजता हजर झालो. ‘ दत्ता सांगू लागला, ‘रात्री साडेअकरा वाजता आम्हाला आर. ए. सब पोलीस स्टेशनच्या हद्दीत जंगलात एक बॉडी मिळाली आहे. ती कूपरला घेऊन जाण्यासाठी कॉल मिळाला. मी व यशवंता दोघेजण हर्स व्हॅन घेऊन आर. ए. सब पोलीस स्टेशनला गेलो. आम्हाला आरेच्या जंगलात मरोळकडे जाणाऱ्या रोडवर पहिल्या चौकाजवळ जायला सांगितले. आम्ही व्हॅन घेऊन आरेच्या जंगलातून मरोळकडे जाणाऱ्या रोडने पहिल्या चौकात गाडी थांबवली साहेब’ दत्ता बोलता बोलता थांबला.

त्याच्या कपाळावरुन घामाच्या धारा वाहात होत्या. तो अतिशय घाबरलेला दिसत होता.

‘पुढे काय झालं?’ सुर्वेनी पुन्हा त्याला विचारलं.

दत्तानं पाणी पिण्यासाठी मागितलं. दोन घोट पाणी पिऊन पुढे बोलायला सुरुवात केली.

‘साहेब, साधारण साडेबारा वाजून गेले होते. मी आणि यशवंता व्हॅन चौकात उभी करुन बॉडी कुठं आहे ते पाहू लागलो. पोलिसांना आवाज दिला पण तेथे कोणीच दिसेना. मग रोडच्या बाजूला जंगलात दहा-पंधरा पावलं चालत गेलो. त्या अंधारात एक सफेद कपड्यात गुंडाळून ठेवलेलं प्रेत दिसलं.

आम्ही हवालदार कुठे दिसतो का, ते शोधू लागलो. जवळ जवळ दहा मिनिटे वाट बघितली, कोणीच दिसेना, म्हणून सफेद कपडा टाकून ठेवलेलं प्रेत स्ट्रेचरवर ठेवून परत निघालो. येतांना रस्त्यात आरे सब चौकीला एक हवालदाराला निरोप दिला. आरेच्या जंगलातून प्रेत घेउन आलो. पण हवालदार जागेवर नव्हता. ‘ दत्ता म्हणाला.

‘अरे दत्ता तू प्रेत घेउन चाललास, पण त्याचे पंचनाम्याचे पेपर तुझ्याजवळ नाहीत. मग हॉस्पिटलला जाऊन काय करणार? ‘ सुर्वेंनी त्याला विचारलं.

‘साहेब, कधी कधी पोलीस आम्हाला सांगतात, ‘बॉडी घेऊन जा गाडीतून, आम्ही मोटार सायकलवरुन येतो. मग जातो गाडी घेऊन.’ दत्ता म्हणाला.

‘तूला आज हवालदार भेटला नाही, मग तू कशी काय बॉडी घेऊन चालला होतास?’ सुर्वेंनी विचारलं.

‘साहेब, तेच तर सांगतोय तुम्हाला. मी चौकीला हवालदाराकडे निरोप ठेऊन हॉस्पिटलला जाण्यासाठी हायवेला लागलो आणि गाडीतून मागच्या बाजूने आतून पत्र्यावर जोरजोरानं हातानं मारल्याचा आवाज येऊ लागला. त्या आवाजानं मी व यशवंता खूप घाबरलो. हायवेवरुन कुपरला जाणारा रोड कधी पार केला ते आम्हाला समजलंच नाही. ‘डेडबॉडी’ उठून आवाज देऊ लागल्याने पोटात भीतीनं गोळा आला होता. गाडी थांबवायचं धाडस होईना. पण मागून खूप मोठ्याने आवाज येऊ लागल्यानं गाडी थांबवून कंट्रोलला फोन केला.’ असं सांगुन दत्ता बोलायचा थांबला.

सुर्वे साहेब आणि त्यांचा स्टाफ एकदा व्हॅनकडे आणि एकदा दत्ताकडे पहात होते.

दत्ता सांगत होता, ‘सफेद कपड्यातील प्रेत उचलून आणलं पण तिकडे समोर हर्स व्हॅन मधून एक व्यक्ती ओरडत होती. ‘साहेब मला बाहेर काढा.’

सुर्वे साहेबांचं विचारचक्र सुरु झालं, हे काय सगळं त्रांगडं झालं? दत्ता सांगतो ते खरं की, हर्स व्हॅनमधील व्यक्ती?

सुर्वे साहेबांनी आपला मोर्चा आता शववाहिनीकडे वळवला. सर्वजण शांत झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती आणि प्रश्नचिन्ह दिसत होतं. व्हॅनजवळ जाऊन त्यांनी दत्ताला आवाज दिला.

‘यशवंता इकडे ये. दरवाजाचं कुलुप काढ.

यशवंता पुढे आला आणि त्याने खिशातून चावी काढली कुलूप उघडून बाजूला झाला.

‘यशवंता दार उघड.’ सुर्वेंनी सांगितलं. पण यशवंताची हिम्मतच होत नव्हती.

सुर्वे साहेबांनी कडीला हात लावला, तशी पुन्हा स्मशानवत शांतता पसरली. त्यांनी दरवाजा उघडला.

आतील व्यक्ती खांद्यावरचा सफेद कपडा खाली टाकून गाडीतून उडी मारुन पळून जाऊ लागली.

सुर्वे साहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या मागे धावायला सुरुवात केली. त्यांच्या मागे स्टाफ धाऊ लागला. कोणालाच कळेना काय प्रकार आहे ते.

साधारण दोनशे मीटर पाठलाग करुन सुर्वे साहेबांनी त्या व्यक्तीला पकडलं आणि विचारलं, ‘थांब, कुठे पळतोयस? कोण तू?”

ती व्यक्ती धापा टाकत होती. घामानं ओली चिंब झाली होती.

‘साहेब, मी मिटके हवालदार, आरे सब चौकीला नेमणुकीस आहे.’ तो म्हणाला. मग सांगितलं ‘साहेब जरा पाणी द्या प्यायला, ओरडून ओरडून घसा सुकून गेला आहे. ‘

एका अंमलदारानं त्याला पाणी दिलं. पाणी पिऊन झाल्यावर तो म्हणाला,

‘साहेब, मी मिटके हवालदार’. असं म्हणून त्यानं खिशातून ओळखपत्र काढून दाखवलं.

त्याचं ओळखपत्र पाहून सुर्वे साहेबांनी विचारलं.

‘मग तू त्या गाडीत कसा आलास? आणि ती डेडबॉडी कुठे आहे?

सुर्वे साहेबांनी एका अंमलदाराला मिटके हवालदाराच्या तोंडाचा वास घ्यायला सांगितलं. तसा मिटके हवालदार गळ्याला हात लावत म्हणाला, ‘साहेब, शपथ घेवून सांगतो, मी दारू नाही प्यायलो आणि मी आयुष्यात दारूला कधीच हात सुध्दा लावलेला नाही. साहेब, हा ड्रायव्हर आणि त्याचा मदतनीस यांनी डेड बॉडी समजून मलाच उचलून घेऊन आले.’

‘त्यांनी तुला गाडीत ठेवलं, तरी तुला समजलं कसं नाही? ‘ सुर्वे यांनी विचारलं.

‘साहेब, तेच सांगतो काय झालं ते, मिटके हवालदार बोलू लागला. ‘साहेब, हा चालू आठवडा पूर्ण रात्रपाळी ड्युटी करतोय, त्यात आज सकाळी रात्रपाळी ड्युटी केली. मग सेशन कोर्टात एक मर्डर केसमध्ये साक्षीसाठी दिवसभर हजर होतो. पाच वाजता ड्युटी संपल्यानंतर घरी न जाता रात्रपाळी ड्युटीकरीता सरळ पोलीस स्टेशनला आलो. ‘ मिटके म्हणाला.

सुर्वे साहेब डोकं खाजवित म्हणाले, ‘अरे पण मिटके, डेड बॉडी कुठे गेली? ‘

‘साहेब, रात्री आठ वाजता रात्रपाळी ड्युटीकरीता हजर झालो, अन् लागलीच डिस्ट्रीक हवालदारानं साहेबांबरोबर आरेच्या जंगलात बेवारस प्रेत मिळालं म्हणून पाठवलं. रात्री पंचनामा झाल्यानंतर राणे साहेब पोलीस स्टेशनला गेले. जातांना मला म्हणाले, ‘तू प्रेताजवळ थांब, शववाहिनी पाठवतो.’ मी थोडावेळ शववाहिनीची वाट बघितली. ती आली नाही. मी माझ्याजवळची सफेद शाल अंगावर घेऊन रोडच्या कडेला थोडा वेळ पडलो.

झोप कधी लागली ते कळलंच नाही. जाग आली, तर मी ह्या गाडीत स्ट्रेचरवर झोपलेलो होतो. ‘ मिटकेने कहाणी संपविली.

‘काय रे दत्ता, कशी कामं करता, डेड बॉडी राहिली जंगलात आणि हवालदाराला आणला होय स्ट्रेचरवरून, एकदम भारी लोक आहात तुम्ही. ‘ सुर्वे साहेब म्हणाले.

‘नाही साहेब, आम्ही पोलिसांना आवाज दिला. पण तिथं कोणी नव्हतं, म्हणून सफेद कपडा टाकून ठेवलेलं प्रेत उचलून आणलं. आम्हाला तरी काय माहित, या सफेद कपड्याखाली हवालदार झोपला आहे ते.’ ‘साहेब, खरं सांगतो, पहिल्यांदाच असं घडलं. हा माणुस गाडीत आवाज द्यायला लागला. आमचा दोघांचा जीव जायची वेळ आली होती. ‘ दत्ता म्हणाला.

मग सर्वजण पोट दुखेपर्यंत हसायला लागले.

सुर्वे साहेब मिटके हवालदाराला सोबत घेउन स्टाफसह आरे कॉलनीतील जंगलात गेले. मिटके हवालदार यांनी जागा दाखविली. त्या जागेवर सफेद कपड्यात झाकून ठेवलेलं प्रेत दिसलं.

सुर्वे साहेब दत्ताकडे पहात म्हणाले,

‘दत्ता एक बरं झालं, तू शव वाहिनीचा ड्रायव्हर आहेस, ‘यम’ नाहीस, नाहीतर आमचा हवालदार आता कुठं असता, हे मी सांगायची गरज नाही.’

‘साहेब, चूक झाली, असं कधी झालं नव्हतं. आम्ही तरी काय करणार? दिवस आणि रात्रभर प्रेतं उचलून अशी अवस्था झाली आहे की, सफेद कपडा झाकलेलं काही दिसलं की, ते प्रेतच वाटतंय. ‘ दत्ता म्हणाला.

‘बरं, चला आता टाईमपास करु नका, उचला ते प्रेत आणि जा घेऊन हॉस्पिटलला.’ सुर्वे साहेब म्हणाले.

ह्या गडबडीत डोळ्यावरची झोप तर उडालीच, पण एक नवीन विचित्र अनुभवही गाठीशी आला होता.

सुर्वेसाहेबांनी सर्व हकिगत कंट्रोल रुमला कळवली, तर तेथील अधिकारीही हसू लागले.’

आता या सत्य घटनेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु सुर्वेसाहेब आजही जेव्हा कधी त्या रोडने जातात, त्या-त्या वेळी त्यांच्या डोळ्यासमोर तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहतो, अन् ते एकटेच हसू लागतात, ‘त्या धावणाऱ्या प्रेताकडे पाहून.’

व्यंकट पाटील

व्यंकट पाटील यांच्या ‘घर हरवलेला पोलीस’ या लेखसंग्रहातील हा लेख.

Avatar
About व्यंकट भानुदास पाटील 15 Articles
सहायक पडोलिस आयुक्त या पदावरुन निवृत्त झालेले श्री व्यंकटराव पाटील ह पोलीस कथा लेखक आहेत तसेच त्यांच्या कादंबऱ्याही प्रकाशित झाल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..