नवीन लेखन...

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नाना दुर्वे

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाला आदर्शवत ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणजे नारायण माधव तथा नाना दुर्वे हे होय. वयाच्या ९४ व्या वर्षात यशस्वीपणे वाटचाल करीत असतांना त्यांनी गेल्या अनेक वर्षात पाहिलेले चढउतार स्वातंत्र्याआधीचा काळ आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळ यशापयशाची पर्वा न करता केलेले मार्गक्रमण या साऱ्यातून त्यांचा वेगळा इतिहास पहावयास मिळत आहे.

नाना दुर्वे म्हटले की, त्यांचे प्रसन्नदायी व्यक्तिमत्व नजरेसमोर येते. आचार-विचारांची शुद्धता सतत परिश्रम घेण्यासाठी त्यांची झालेली धावपळ. राखावी बहुतांची अंतरे हा त्यांनी अंगीकारलेला दृष्टीकोन यशाने हुरळून न जाणे. अपयशाने खचून न ही त्यांची खासियत सर्वश्रुत आहे.

नाना दुर्वे हे चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजाचे अग्रणी आहेत. त्यांच्याविषयी साऱ्यांच्या मनात आदरभाव आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वापुढे सारेजण नतमस्तक होतात. “झाले बहु, होतील बहु, परंतु यासम हा” असेच त्यांचे व्यक्तीमत्व होते. नाना दुर्वे यांचे आणि माझे घराण्याचे अनेक वर्षापासूनचे ऋणानुबंध आहेत.

त्यांच्या जीवनाच्या वाटचालीचा मागोवा घेत असतांना त्यांचे अनेक पैलू दृष्टीपथास येतात. त्यांचा जन्म दिनांक १० ऑक्टोबर १९९४ रोजी नागोठणे येथे झाला. त्यांचे शिक्षण अलिबाग येथील प्राथमिक शाळेत व पुढे कोकण एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी शाळेत झाले. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई यांचे नानांच्या वयाच्या ११ व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे त्यांचे पालन-पोषण त्यांच्या वडिलांच्या आईने (आजीने) तसेच पुढे सावत्र आई झालेल्या मावशीने केले.

नानांचे वडील माधव दुर्वे हे त्याकाळी आयकर कार्यालयात नोकरीस होते. तो कालखंड १९३०-३१ सालचा होता. नाना शिक्षण घेऊन बाहेर पडले होते. प्रभातफेऱ्या निघायच्या. सत्याग्रहाच्या छावण्या उभारल्या जात होत्या. १५० वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला स्वतंत्र करण्यासाठी स्वातंत्र्यलढा उभारण्यात आला होता. या लढ्याच्या क्रांतिकारी विचाराने नाना भारावून गेले आणि छावणीत दाखल झाले. भारतमातेसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपणही वाटा उचलला पाहिजे अशी त्यांची मनोधारणा झाली होती. त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ वसंत दुर्वे यांनीही शाळा अर्धवट सोडून देऊन ते छावणीत दाखल झाले.

या दोघा बंधूंच्या रक्तात देशभक्ती भिनली होती. त्यामुळे स्वातंत्रलढ्यातील अनेक कार्यक्रमात हिरहिरीने भाग घेऊ लागले होते. त्यांचे वडील माधव दुर्वे हे ब्रिटीशांकडे इमाने इतबारे नोकरी करीत होते. त्यांनी सरकारकडे प्रतिज्ञापत्राकडे घोषित केले की, या मुलांशी माझा काहीएक संबंध नाही. मात्र तेवढ्याने ब्रिटीशांचे समाधान झाले नाही. पोलिसांनी त्यांच्या घराच्या झडत्या घ्यायला सुरुवात केली. परंतु त्यात अक्षेपार्ह कागदपत्रे सापडली. तेवढ्याच कारणावरुन ब्रिटीशांनी माधव दुर्वे यांना दिलेली बढती रद्द केली. याशिवाय नाना आणि वसंत दुर्वे या दोन भावांविरुद्ध वॉरंट निघाले. पर्यायाने त्यांना घराचे दरवाजे बंद झाले. कुठेतरी जेवायचे. पहाटेपूर्वी समुद्रामार्गे किनारपट्टीवरुन निघून जायचे. पोलिसांचा ससेमिरा चुकवायचा. हा त्यांचा नित्यक्रम ठरुन गेला होता.

नाना दुर्वे यांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिले असल्यामुळे परिणामांची भीती बाळगली नाही. आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा स्वातंत्र्य मिळविण्यासाठी खर्ची पडला पाहिजे असे मनोमन त्यांना वाटायचे. उक्ती आणि कृती यांचा ते समन्वय साधायचे. स्वातंत्र्यलढ्याच्या अनुषंघाने अलिबाग तालुक्यात ज्या ज्या मोहीमा आखल्या जायच्या त्यात त्यांचा सहभाग असायचा.

अलिबाग तालुक्यातील आवास येथील ढवण नावाचे कार्यकर्ते निवडुंगाच्या दाट वनात शिका प्रेसवर सरकार विरोधी बुलेटिन्स छापत असत. त्याठिकाणी पोलिसांची करडी नजर होती. ही बुलेटिन्स सूर्योदयापूर्वी घरोघरी टाकली जात असत. या कार्यात नाना सहभागी झाले होते. एकदिवस बंडू मेकडे या साथिदाराने अजाणतेपणाने त्यांना नावाने हाक मारल्यामुळे फौजदाराने नाना दुर्वे यांना पकडले आणि अलिबागच्या हिराकोट तुरुंगात डांबले. चार दिवस ते या तुरुंगात होते. याठिकाणी त्यांना डॉक्टर मथुरे यांचे चांगले सहकार्य लाभले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी चरितार्थाचा मार्ग शोधतांना क्लिनर होण्याचा निर्णय घेतला. अलिबागच्या इनुसभाई दणदणे यांनी त्यांना ड्रायव्हिंग शिकवले. पुढे त्यांनी गाडी चालवण्याचे लायसन्स मिळविले. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी ड्रायव्हर म्हणून नोकऱ्या केल्या.

१९४० साली त्यांचे रेवदंडा आगरकोट येथील कमळाबाई देशमुख यांचेशी लग्न झाले. लग्नानंतर त्यांचे नाव राधाबाई असे ठेवण्यात आले. चौल येथील बोरवणकर यांच्या भाड्याच्या घरात संसार थाटला. १९४० साली त्यानी चौल सोडले व ते मुंबईला गेले. वाढता खर्च लक्षात घेतल्यानंतर त्यांनी १९४९ साली रोहे गाठले. याठिकाणी असलेल्या अंधार आळीतील प्रधान यांच्या घरात राहू लागले. त्यांना तेथे रोहा तालुका सहकारी संघामध्ये हेड मॅकेनिक म्हणून नोकरी मिळाली. १९६० सालापासून ते चोंढी येथे रहावयास आले. नाना वयाच्या ८५ व्या वर्षापर्यंत स्वतः मालवाहू गाडी चालवित होते. नाना दुर्वे यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. निरनिराळे कडूगोड प्रसंग अनुभवले. एकीकडे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हिरहिरीने भाग घेतला. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला त्यावेळी त्यांचा आनंद द्विगुणित झाला. आपला भारत जगात सर्वच बाबतीत अग्रेसर रहावा असे मनोमन त्यांना वाटायचे.

स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष देत असतांना त्यांनी इतरांसाठी मदतीचा हात पुढे केला. त्यांचे पुत्र अनिल, कन्या उषा, शैला, विजया, वासंती, प्रतिभा या कर्तृत्ववान निघाल्या.

साने गुरुजी, भारताचे माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव देशमुख, शंकरगिरी महाराज, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले, रोह्याचे माजी नगराध्यक्ष यशवंतराव यशवंतराव देशमुख यांच्यासारख्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहवास, मार्गदर्शन त्यांना लाभले. त्यांच्या सहवासातील अनेक आठवणी नाना आवर्जून सांगत.

दिनांक १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ध्वजवंदनासाठी न्यावयास गाडी येत असे.

चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजाचा पेण येथे मेळावा झाला होता. त्यात नाना दुर्वे यांचा माजी मंत्री आप्पासाहेब धारकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. त्याचप्रमाणे आतापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा गुणगौरव केला आहे.

नाना दुर्वे यांची जीवनवाटचाल पाहता ती समाजबांधवांना दीपस्तंभासारखी आहे. हाती घेतलेले कार्य तडीस नेणे सर्वसामान्यांच्या हिताची जपणूक करणे जीवनातील प्रत्येक क्षण हा सत्कारणी लावणे निर्व्यसनीपणा अंगी बाळगणे अशी त्यांची कितीतरी गुणवैशिष्ट्ये होती.

श्री. नागेश म. कुळकर्णी- अलिबाग

कायस्थ वैभव या अंकातून संकलित

संकलक : शेखर आगसकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..