नवीन लेखन...

भारताचे एडिसन -डॉ. शंकर आबाजी भिसे

विसाव्या शतकाच्या प्रारंभी अनेकानेक लोकोपयोगी वैज्ञानिक शोध लावणारे, तसेच मुद्रण तंत्रज्ञानातील आपल्या युगप्रवर्तक शोधाने ‘भारतीय एडिसन’ हे बिरुद प्राप्त करणारे भारतीय शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म मुंबईतील एका चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सी.के.पी.) कुटुंबात २९ एप्रिल १८६७ रोजी झाला.

तत्कालीन पुस्तकी शिक्षण पद्धतीत चमकू न शकलेले भिसे ‘सायंटिफिक अमेरिका’ सारखी मासिके आवडीने वाचून अनेक प्रयोग करीत. वयाच्या दहाव्या वर्षीच भिसे यांनी तारेच्या टोकाला बांधलेल्या घंटेवर ठोके मारुन तारेद्वारे बातमीचे वहन केले. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी दगडी कोळशापासून निर्माण होणारा गॅस पुरेसा शुद्ध करणाऱ्या उपकरणाचा शोध लावला.

भिसे यांच्या वडिलांना मुलाने परदेशी जाऊन बॅरिस्टर व्हावे असे वाटत होते. परंतु भिसे यांना पुणे येथील पुना सायन्स कॉलेजमध्ये (आजचे पुण्याचे इंजिनिअरींग कॉलेज) प्रवेश घ्यावा असे वाटत होते. त्यास वडिलांनी विरोध केल्यामुळे भिसे यांनी स्वावलंबनाने आपली विज्ञान प्रयोगाची आवड जोपासण्यासाठी मुंबईतील अकाऊंटंट जनरलच्या कार्यालयात नोकरी धरली.

प्लॅस्टरच्या पुतळ्यावर एकाच वेळी प्रकाशझोत पाडून चेतना उत्पन्न करुन दाखवण्याचे जाहीर खेळ करुन झवेरीलाल याज्ञिक, राजा रविवर्मा, कोल्हापूरचे शाहू महाराज, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांची शाबासकी मिळवली. त्यांच्या ह्या प्रयोगाची ‘टाईम्स ऑफ इंडिया’ व ‘ॲडव्होकेट ऑफ इंडिया’ या वृत्तपत्रांनी दखल घेऊन भरपूर प्रसिद्धी दिली.

१९ ऑक्टोबर १८८३ रोजी काही व्यापारी मित्रांच्या सहाय्याने भिसे यांनी सायंटिफिक क्लब सुरु केला. त्याच्या सहाय्याने मासिक बैठकीत शास्त्रीय प्रयोग केले जात. तसेच वैज्ञानिक पुस्तकांचे व नव्या औषधाचे तज्ज्ञांकडून परीक्षण होई. भारतीय उद्योजकांना पेटंट व त्यांच्या मालास बाजारपेठा मिळवून देण्यासाठी त्यांची नावे संस्था प्रसिद्ध करी. संस्थेच्या कार्याची जगाला ओळख करुन देण्यासाठी ‘विविध कला प्रकाशन’ हे मासिक त्यांनी ऑगस्ट १८९४ पासून वर्षभर चालविले.

१८९३ च्या शिकागोतील औद्योगिक प्रदर्शनात भारतीय मालाच्या व पेटंटच्या अभावाबद्दल एका इंग्रजाने भारतीयांच्या विज्ञानातील मागासलेपणावर बोट ठेवले. तेव्हा देशाभिमानी भिसे यांनी युरोपला जाऊन भारतीयांच्या विज्ञान बुद्धीची साक्ष जगास पटवून देण्याची शपथ घेतली व पतियाळाच्या संस्थानिकांच्या मदतीने ऑक्टोबर १८९५ मध्ये भिसे इंग्लंडला गेले. ‘मॅचेस्टरच्या ‘फ्रि ट्रेड’ हॉलमध्ये आयोजित केलेल्या भिसे यांच्या मूर्ती संजीवनीच्या प्रयोगांची प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रांनी प्रशंसा केली. तिथे कागद तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करुन ते ६ मार्च १८९६ रोजी मुंबईस परतले.

साखरेसारख्या पदार्थाच्या राशीतून ठराविक प्रमाणातील माल आपोआप वजन करुन काढण्याच्या यंत्राचा नमुना त्यांनी तयार केला आणि जुलै १८९७ मध्ये लंडनच्या ‘द सोसायटी ऑफ सायन्स, लेटर अॅण्ड आर्टस’ने आयोजित केलेल्या स्पर्धेत त्यांच्या या पिष्ठमापन यंत्रास दहा पौंडाचे बक्षीसही मिळाले. टाईम्स ऑफ इंडियासह सर्व वृत्तपत्रांनी भिसे यांना भरपूर प्रसिद्धी दिली.

१९०१ साली भिसे यांनी संशोधिलेले ‘ऑटोप्लशर’ शौचकुपातील पाण्याच्या तोटीस लावले असता बटण दाबताच पाण्याचा नियमित प्रवाह शौचकुप स्वच्छ करी. जलप्रवाह हवा तेव्हा बंद करण्यसाठी नियंत्रकाची, तर दुर्गंधी नष्ट करण्यासाठी जंतुनाशकाची सोय या यंत्रात होती. त्यांनी शोधून काढलेल्या ‘बायसिकल स्टॅन्डॲन्ड लॉक’ या यंत्रात जाऊन सायकलला कुलुप बसे. शर्टाला बटण लावण्याच्या, मसाज करण्याच्च्या आणि चटणी वाटण्याच्या त्यांनी तयार केलेल्या यंत्रांना मोठी मागणी येऊ लागली.

वैज्ञानिक जगतात भिसे यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे ‘भिसे टाईप’ हे छाप पाडणारे यंत्र. पूर्वीच्या लायनो टाईपमधील उणीव भरुन काढण्यासाठी आणि एकंदरीत लहान आकाराच्या साध्या रचनेच्या, अल्प किंमतीच्या व प्रामुख्याने सुटे टाईप जुळवून छापणाऱ्या यंत्राची गरज भागवण्यासाठी भिशांनी जी खटपट केली, त्यातून भिसे टाईपचा शोध लागला.

त्यानंतर भिसे रसायनशास्त्र औषधीशास्त्राच्या संशोधनाकडे वळले. १९१७ साली त्यांना ‘शेला’ हे भरघोस खपाचे वॉशिंग कंपाऊंड तयार केले. औषधी शास्त्रात भिसे यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे ‘ऑटोमेडिन’ ही औषधे. ऑटोमेडिनचे मूळ स्वरुप ‘बेसलिन’ हे औषध मलेरियापासून मुक्तता करणाऱ्या एका ब्रह्मी औषधावर प्रक्रिया करुन भिसे यांनी तयार केले होते. पहिल्या महायुद्धात जखमा धुण्यासाठी पाणी शुद्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या या औषधाचा प्रयोग ब्रिटीश सैनिकांवर करण्यासाठी ब्रिटीश युद्धखात्याची परवानगी मागितली असता औषधाचे द्रव्यसत्र सांगण्यासाठी ब्रिटीश सरकारची मागणी भिसे यांनी फेटाळली. पुढे या औषधात आयोडिनचे प्रमाण वाढल्यावर ‘ऑटोमेडिन’ असे त्याचे पुनर्नामकरण झाले. १९२७ पर्यंत अमेरिकन वैद्यकीय नियतकालिकांत रक्तदाब, आतड्याचे विकार, पायोरिया, हिवताप, फ्लू इत्यादी आजारांवर रामबाण उपाय म्हणून ऑटोमेडिनला मान्यता मिळाली.

२९ एप्रिल १९२७ रोजी भिसे यांच्या ६० व्या वाढदिवशी अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत ‘अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. खरं तर १९०८ सालीच युरोपीय व अमेरिकन नियतकालिकांनी भिसे यांना ‘इंडियन एडिसन’ हे बिरुद बहाल केले होते. शिकागो विद्यापीठाने त्यांना सायको- ॲनालिसिसमधील डॉक्टरेट बहाल केली, तर माऊंट व्हेरनॉनच्या चेंबर ऑफ कॉमर्सने भिसे यांना मानद सदस्यत्व दिले. मुद्रणाशास्त्रातील भिसे यांच्या संशोधनाचा अंतर्भाव अमेरिकन पाठ्यपुस्तकात झाला. अमेरिकेतील ‘हुज हू’ मध्ये समावेश झालेले भिसे पहिलेच भारतीय होत.

जातीवंत वैज्ञानिक असूनही मनोविनोदन, ध्यानधारणा, फलज्योतिष आणि हस्तसामुद्रिक या विद्यामध्येही भिसे निष्णात होते. तसेच पूर्वघटनांच्या सहाय्याने ते स्वप्नांचा अर्थ लावू शकत. भिसे यांनी ‘गार्डन ऑफ अग्रा ॲण्ड डिप्लोमॅटिक दुर्गा’ या आपल्या नाटकात रंगविलेल्या दुर्गा आणि जॅक यांच्या प्रेमकथेतून त्यांनी बालविवाहात विरोध करुन स्त्री शिक्षण आणि आंतरधर्मीय, आंतरवांशिक विवाहांचा पुरस्कार केला होता.

दादाभाई नवरोजींचे अनुयायित्व स्वीकारलेल्या भिसे यांचा भारतीय, राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांशी निकटचा संबंध होता. १९०८ सालच्या मद्रास ट्रेड काँग्रेसमध्ये राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी भिसे यांचा सत्कार केला होता.

अशा या अष्टपैलू डॉ. शंकर आबाजी भिसे यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी ७ एप्रिल १९३५ रोजी निधन झाले. ७ एप्रिल २०१० रोजी भिसे यांच्या मृत्यूस ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकारने भिसे यांच्या नावे पोस्टाचे तिकिट प्रकाशित करावे. तसेच महाराष्ट्र शासनाने दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथी अथवा जयंतीनिमित्त त्यांच्या नावे संशोधन क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यास मोठ्या रकमेचा पुरस्कार द्यावा. भिसे यांची जन्मभूमी मुंबई असल्याने मुंबई विद्यापीठाने भिसे यांच्या नावे शिष्यवृत्ती सुरु करावी. तरच पुढील पिढीला भिसे यांचे स्मरण राहील.

डॉ. शंकर आबाजी भिसे हे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ चांद्रसेनिय कायस्थ प्रभू कुटुंबात जन्मले होते याचा सर्व ज्ञाती बांधवांना अभिमान वाटणे गरजेचे आहे. गाव पातळीपासून अखिल भारतीय पातळीपर्यंतच्या सी. के. पी. समाजाच्या मंडळींनी २९ एप्रिल ही भिसे यांची जयंती व ७ एप्रिल ही पुण्यतिथी विविध उपक्रम राबवून साजरी करावी. भिसे यांच्या नावे पोस्टाचे तिकीट प्रकाशित करण्यासाठी, तसेच महाराष्ट्र शासनातर्फे भिसे यांच्या नावे पुरस्कार देण्यास भाग पाडावे. मुंबई विद्यापीठातर्फे भिसे यांच्या नावे शिष्यवृत्ती सुरु करण्यासाठी मोठ्या रकमेची देणगी द्यावी.

कै. शंकर आबाजी भिसे यांच्या विज्ञान संशोधन कार्याचा अभ्यास करुन डॉ. समिधा घुमटकर यांनी स्वतःच्या अंधत्वावर मात करुन मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. सी.के.पी. समाजाच्या मोठ्या कार्यक्रमात त्यांचे व्याख्यान ठेवले तर भिसे यांच्याबद्दल अधिक माहिती समजू शकेल.

डॉ. शंकर आबाजी भिसे 

–दिलीप गडकरी

कायस्थ वैभव 2011 या अंकातून

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..