नवीन लेखन...

राम गणेश गडकरी यांचे वाङमय

मराठी भाषेचे शेक्सपिअर, प्रेमाचें शाहीर, विनोदी साहित्यातील बिरबल, अवघे ३३ वर्षे ७ महिने व २८ दिवस आयुष्य जगलेल्या परंतु सरस्वतीच्या दरबारातील एक प्रतिभा सम्राट म्हणून प्रसिध्दीस आलेले राम गणेश गडकरी यांचा जन्म गुजरातमधील नवसारी ह्या गावी २६ मे १८८५ रोजी झाला.

ज्या नवसारीत उद्योग महर्षी जमशेटजी टाटा व राजकारण धुरंदर दादाभाई नौरोजी यांचा जन्म झाला त्याच नवसारीत मराठी भाषेच्या शेक्सपिअरचा जन्म झाला व नवसारीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले.

राम गणेश गडकरी यांचे प्राथमिक शिक्षण गुजरातमध्ये गुजराती भाषेत झाले. राम गणेश गडकरी यांचे शिक्षण जरी गुजराती भाषेत होत असले तरी त्यांच्या मातोश्री सरस्वतीबाईंनी त्यांच्याकडून हरिविजय, रामविजय, भक्तीविजय, पांडवप्रताप, नवनाथ कथासार, शिवलीलामृतातील अकरावा अध्याय, व्यंकटेश स्तोत्र, भीमरुपी इ. पठण करून घेतले. त्यामुळे महाराष्ट्राच्या संत कवींची चरित्रे, राम पांडवादिकांच्या कथा, साधुसंतांची काव्यमधुर अमृतवाणी, प्रासादिक अभंग, सारांश व वीर चरित्रे ही सर्व गडकऱ्यांनी पुन्हा पुन्हा वाचून तोंडपाठ केली होती. तज्ज्ञांच्या मते ज्याला मराठीचे लेखक व्हायचे असेल त्याला मातृमुखातूनच मातृभाषेची मातब्बरी बालपणात मिळाली पाहिजे. गडकऱ्यांना ती मिळाली म्हणूनच त्यांच्याजवळ भाषा दारिद्र्य किंवा कल्पना दारिद्र्य १८९३ साली राम गणेश गडकरी यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या मातोश्री त्यांना कर्जत येथे घेऊन आल्या. १८९४ साली त्यांचा लहान भाऊ गोविंदा याचे निधन झाले. त्यांची आठवण म्हणून राम गणेश गडकरी यांनी ‘गोविंदाग्रज’ ह्या टोपण नावाने कविता लिहिण्यास सुरुवात केली.

पूर्वीच्या कुलाबा व सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे बाजापेठेतील भागवतांच्या चाळीत गडकऱ्यांचे बिऱ्हाड होते. कर्जतच्या मराठी मुलांची शाळा नंबर एक मध्ये (सध्याची जीवन शिक्षण मंदिर) त्यांचे नाव घातले. माधव गडकरी यांनी या शाळेच्या रजिस्टरमध्ये २१ व्या क्रमांकावर १८९५ साली आल्याची व १२ एप्रिल १८९७ रोजी शाळा सोडली असल्याची नोंद तपासली आहे. त्यांच्या मते २६५ क्रमांकावर ६ मे १८९७ रोजी शाळेत पुन्हा आल्याची व १२ जुलै १८९७ रोजी इयत्ता ५ वीत असतांना शाळा सोडल्याची नोंद आहे. यावरुन १८९५ मध्ये तिसऱ्या इयत्तेत गडकरी कर्जतच्या शाळेत आले आणि १८९७ मध्ये जुलै महिन्यात पाचवीत असतांना त्यांनी कर्जतची शाळा सोडली. या शाळेत राम गणेश गडकरी फक्त दोन वर्षे शिकले असले तरी कृष्णाजी भिकाजी जोगळेकर या हेडमास्तरांनी आपल्या आयुष्याची जडणघडण केली असा ते उल्लेख करत असत.

कर्जत येथून गडकरी कुटुंब पुन्हा नवसारी येथे वास्तव्यासाठी गेले व तेथून १९०१ साली विद्येचे माहेरघर व ज्ञानाचा सागर म्हणून प्रसिध्द असलेल्या पुणे शहरात राहावयास आले. त्यावेळेस राम गणेश गडकरी १५ वर्षाचे होते. १९०४ मध्ये न्यू इंग्लिश स्कुलमधून राम गणेश गडकरी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. आपले नाटकातील गुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांप्रमाणे पदवीधर होण्याची त्यांची आकांक्षा होती. परंतु १९०५ व १९१२ साली त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन सुध्दा ते पदवीधर होऊ शकले नाहीत.

कवितेतील गडकरी

कर्जत येथे मृत्यू पावलेल्या आपल्या धाकट्या भावाचे नाव घेऊन काव्यप्रांतात त्यांनी पाऊल टाकले. १९०१ साली ‘नदीस पूर आलेला पाहून’ त्यांनी पहिली कविता लिहिली. गडकऱ्यांचा पहिला विवाह फसल्यानंतर ‘रात्री ओरडणाऱ्या घुबडास’ ही कविता लिहिली. त्याच विषयावर ‘घुबडास’ ही एक लांबलचक कविता लिहिली. त्यानंतर ८ जून १९०७ च्या ‘करमणूक’च्या अंकातच ‘घरात बसलेल्या काजव्यास’ ही त्यांची दुसरी कविता प्रसिध्द झाली. मे १९०९ मध्ये ‘मनोरंजन’ मासिकात ‘अल्लड प्रेमास’ ही कविता प्रसिध्द झाली. मनोरंजन मासिकात त्यांच्या कविता येऊ लागल्या तेव्हा त्यांचे नांव कवी म्हणून रसिकांसमोर आले. मनोरंजन बरोबर काव्यरत्नावली, नवयुग या मासिकांत त्यांच्या कविता गोविंदाग्रज म्हणजे राम गणेश गडकरी आहेत हे अनेकांना माहीत नव्हते.

गडकऱ्यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी १९२१ मध्ये साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकरांच्या प्रस्तावनेसह ‘वाग्वैजयंती’ या नावाने प्रसिध्द झालेल्या काव्यसंग्रहात १३७ कविता आहेत. चरित्रात्मक कवितांचा अभ्यास केल्यास एका अभागी जीवाची कहाणी, दुःखाच्या राशीवरुन चालत हा कवी गेला व अल्पायुष्यात स्वतःची कहाणी आपल्या साहित्यातून सांगून गेला हे लक्षात येते. कवितेतील गडकरी शोधतांना त्यांच्या काव्यातील उत्तुंग शिखरांकडे दुर्लक्ष होऊ नये हीच अपेक्षा.

कवी मनाचे गडकरी यांनी ज्या कविता लिहिल्या. त्यांचे संपन्न शब्दभांडार, अफाट कल्पनाशक्ती, भावनांचे उत्कट प्रकटीकरण, विलक्षण अशी संवादशैली, शोकात्म, कारुण्य व्यक्त करण्याची प्रचंड ताकद हे त्यांच्या वाङ्मयाचे, कवितेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. गोविंदाग्रजांचे जीवन व मरण विद्युल्लतेप्रमाणे क्षणभंगूर होते. गडकरी खऱ्या अर्थाने कवीच होते. मग ते नाट्य असो, काव्य असो वा विनोदी लेखन असो. त्यात कवित्वच आढळतं. नाटक हे काव्याचे एक अंग मानले आहे. गद्य व पद्य यांच्या संयुक्त स्वरुपापासून नाटकाची उत्पत्ती आहे. नाटक हे काव्याचे उत्तर स्वरुप आहे असे गडकरी मानत असत.

कवितेच्या सागरात डुंबत असलेले गडकरी नाटकाच्या सागरात आपल्या प्रतिभेची होडी घेऊन २६ मे १९०६ मध्ये किर्लोस्कर नाटक कंपनीच्या बिऱ्हाडी गेले असले तरी १९०२ साली ‘मित्रप्रीत’ हे नाटक लिहून नाट्यक्षेत्रात प्रवेश केला. परंतु किर्लोस्कर नाटक कंपनीत दाखल झाल्यानंतर बालगंधर्वांनी त्यांना नाटके लिहिण्यास उद्युक्त केले. तसेच श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या नाटकांपासून प्रेरणा घेऊन नाटक लिहिण्यास सुरुवात केली. प्रेमाच्या वैराग्यावरील ‘प्रेमसंन्यास’ १९१२ साली, सद्गुणांचे वर्चस्व प्रकट करणारे ‘पुण्यप्रभाव’ १९१६ साली दारुचा दुष्परिणाम दाखवणारे ‘एकच प्याला’ १९१७ साली उत्कट विनोदी पण दुःखद अंताचे ‘भावबंधन’ १९१८ साली व सावनेर येथे अर्धवट राहिलेले ‘राजसंन्यास’ १९१८ साली ही नाटके लिहिली.

त्यांच्या हयातीत ‘प्रेमसन्यास’ व ‘पुण्यप्रभाव’ याच नाटकांचे प्रयोग झाले. त्यांचे सुप्रसिध्द ‘एकच प्याला’ व ‘भावबंधन’ या नाटकांचे यश ते पाहू शकले नाहीत.

अफाट वाचन, तल्लख बुध्दी व स्मरणशक्तीच्या जोरावर गडकरी आपल्या भोवतालचा सारा परिसर व व्यक्ती कल्पनेचे पंख लावून आपल्या नाटकात आणतात व त्यामधून एक नवे वाङमयीन विश्व निर्माण करतात. स्वतःच्या जीवनातील तसेच सभोवतालच्या जगातील घटनांची शिदोरी त्यांच्याजवळ भरपूर होती. परंतु त्यांना नाटकाच्या कोंदणात बसविणे सोपे नव्हते, किर्लोस्कर नाटक मंडळीत गणपतराव बोडस त्यांना नटांच्या मुलांचे मास्तर होण्यासाठी घेऊन गेले नसते तर नाटककार राम गणेश गडकरी निर्माण झाले नसते. नाटकाचे तंत्र आणि मंत्र याचे ज्ञान गडकऱ्यांना तेथे झाले.

गडकऱ्यांनी नाट्यक्षेत्रांत यश मिळवल्याने त्यांचा द्वेष करणाऱ्यांनी कोल्हटकरांच्या नाटकावरुनच गडकऱ्यांनी आपली नाटके लिहिली अशी टीका केली त्यांच्या मते ‘मतिविकारा’ वरुन ‘प्रेमसंन्यास’, ‘प्रेमशोधन’ वरुन ‘पुण्यप्रभाव’, ‘मुकनायका’ वरून ‘एकच प्याला’ आणि ‘मतिवाकारा’ वरून ‘भावबंधन’ नाटक लिहिले आहे. ज्यांना गडकऱ्यांनी गुरू मानले त्या श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनीही गडकऱ्यांना नाटककार म्हणून मान्यता दिली नाहीच परंतु ” गडकऱ्यांच्या नाटकातील विशेषतः ‘राजसंन्यासा’तील अनुप्रासांच्या व विशेषणांच्या प्राचुर्यामुळे रचनेस कृत्रिमता आली आहे.” अशी टीका केली आहे.

कोल्हटकरांनी एका मुलाखतीत सांगितले की गडकऱ्यांच्या वाङमयात त्यांची कविता श्रेष्ठ प्रतीची वाटते. त्यांच्या खालोखाल त्यांचे विनोदी लेख व अगदी शेवटी ‘भावबंधन’ बाकीची नाटके अगदीच टाकाऊ वाटतात. तर ‘राजहंस’ ही लोकप्रिय ठरलेली कविता म्हणजे रॉयल रिडरमधल्या एका कवितेचे शब्दशः भाषांतर आहे.

कोणी कितीही टीका केली तरी ‘एकच प्याला’ च्या ११ आवृत्या, भावबंधनाच्या १२, पुण्य प्रभावच्या ९, प्रेमसंन्यासच्या ५ व राजसंन्यास (अपूर्ण) च्या ७ आवृत्या निघाल्या यावरून नाट्य रसिकांनी राम गणेश गडकरी यांना नाटककार म्हणून स्वीकारले हेच सिध्द होते. ‘गर्वनिर्वाण’ हे गडकऱ्यांचे नाटक शासनातर्फे १९८५ च्या दरम्यान प्रकाशित झाले.

विनोदी लेखक

राम गणेश गडकरी यांनी ‘बाळकराम’ या टोपण नावाने अनेक विनोदी लेख लिहिले. ‘वरसंशोधन’ ‘लग्नाच्या मोहिमेची पूर्व तयारी’, ‘लग्न मोडण्याची कारणे’, ‘स्वयंपाकघरातील गोष्टी’, ‘कवीचा कारखाना’, ‘नाटक कसे लिहावे? ‘ ‘नाटक कसे पहावे?’, ‘प्रमादपंचदशी’, ‘लग्नाच्या मोहिमेतील ठळक स्वाऱ्या’, ‘दिवाळी सणवार’, ‘संक्रांत’, ‘तोड ही माळ’, ‘प्रेमपिशाच्च’, ‘वेड्यांचा बाजार’, ‘अचूक शरसंधान’, ‘नाट्यकलेची उत्पत्ती’, ‘समाजात नटांची जागा’ इत्यादी विनोदी लेख विविध मासिकात प्रसिध्द झाले होते. ते १९२५ साली ‘संपूर्ण बाळकराम’ या पुस्तकांत संकलित केले आहेत.

मराठी भाषेचे शेक्सपिअर म्हणून गडकरींचा उल्लेख केला जातो. शेक्सपिअरने ३६ नाटके लिहिली. तो ५२ वर्षे जगला. काव्यमयता, कल्पकता, भावनोत्कटता हे प्रतिभासाध्य गुण व भाषासौंदर्य, प्रसंगवैचित्र्य, व्यक्तीचित्रातील अद्भूतता हे प्रयत्नसाध्य गुण गडकऱ्यांत दिसतात व तेच शेक्सपियरमध्ये दिसतात त्यामुळे बाळ कोल्हटकर नेहमी म्हणत, शेक्सपिअरशी गडकऱ्यांची कसली तुलना करता गडकऱ्यांशी शेक्सपिअरची करा.

नाटककार वसंत कानेटकर म्हणत की, राम गणेश गडकरींचा अद्भूत स्पर्श ही मराठी भाषा, या भाषेतील कविता, विनोद आणि नाटक यांच्या प्रवासातील एक अपूर्व घटना आहे. मराठी साहित्यविश्वात राम गणेश गडकरी हे प्रमत्त वादळासारखे अकस्मात अवतरले. एखादी मेघगर्जना होऊन कडाडून वीज चमकावी तसे ते मराठी मनावर कोसळले. ‘गडकरी स्पर्श’ हा शक्तीचा स्पर्श आहे, तो नुसता मंत्रमुग्ध करणारा नाही तर चकीत करणारा आहे. शेक्सपिअरसारखाच हा चमत्कार आहे. प्रचंड लोकप्रियता आणि तज्ज्ञ जाणकार समीक्षकांचा मुजरा ही गडकरी स्पर्शाची पहिली फलश्रुती आहे.

राम गणेश गडकरी यांची आयुष्यात १८ नाटके, ५ कादंबऱ्या, २५० कवितांचे चुटके, २५ विनोदी लेख, व अडीच हजार अभंग विठ्ठलाच्या चरणी अर्पण करण्याची त्यांची आकांक्षा होती. अपेक्षित नाटकांपैकी १९०४ साली १२५ पदे असलेले ‘मित्रप्रिती’, ‘गर्वनिर्वाण’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘राजसंन्यास’ (अर्धवट), ‘वेड्यांचा बाजार’ ही नाटके लिहून झाली परंतु ‘महाराष्ट्र लक्ष्मी’, ‘तुळसीदास’, ‘सुरती’, ‘शिवराई शिक्का’, ‘शुन्य संन्यांस’, ‘बेडी वर बेडी’, ‘तोड ही माळ’, ‘भोगसंन्यास’ इत्यादी नाटके तसेच इतर वाङ्मयाची निर्मिती होण्यापूर्वीच २३ जानेवारी १९१९ रोजी राम गणेश गडकरी यांचे निधन झाले. अवघे ३३ वर्षे ७ महिने २८ दिवस आयुष्य लाभले. ह्या साहित्यिकाने जिवंतपणी स्वतःसाठी न जगता  हित्यासाठी आपले बलिदान केले. म्हणूनच मराठी भाषिक त्यांच्या अमरत्वाचे गीत गातो.

‘माझा मृत्यूलेख’ या चार ओळीच्या कवितेत गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी म्हणतात

यावज्जीवहि ‘काय मी’ न कळलें आप्तांप्रती नीटसे ।

मित्रांतेही कळ न गूढ-न कळे माझे मलाही तसे ।।

अज्ञाता ! मरणोत्तर प्रकट ते होईल तूते कसे ।।

कोठे आणि कधी तरी जगतिं मी होऊन गेलो असे।।१।।

अल्पायुष्य लाभलेल्या, मनात इच्छा असूनही भरपूर वाङमय निर्मिती करु न शकलेल्या, खडतर आयुष्य जगलेल्या सर्वस्वी सरस्वती पुत्राला फार मोठ्या सन्मानाची अथवा पुरस्काराची अपेक्षा नव्हती तर आपल्या मृत्यूनंतर आपण या जगात जन्म घेतला होता याची आठवण रहावी इतकी माफक अपेक्षा होती. त्यांनी निर्माण केलेल्या अल्प परंतु दर्जेदार वाङमयामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही ते अजरामर ठरले आहेत. अशा या सरस्वती पुत्रास माझे साष्टांग दंडवत.

– दिलीप प्रभाकर गडकरी
कर्जत

कायस्थ वैभव 2011 या अंकातून संकलित

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..