प्रचंड उलथापालथीतून पृथ्वी निर्माण झाली. पुढे पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली. अप्रगत आदिमानवाचे रुपांतर आज आधुनिक महामानवात झाले. देश, सत्ता, भूखंड इतकेच काय तर ग्रह, ताऱ्यांवरही अभ्यासपूर्ण बोलले जाऊ लागले. आपला देश, आपले राष्ट्र याविषयीचा जाज्वल्य अभिमान जोपासला जाऊ लागला… पण इतकी सारी प्रगती होत असतांना अर्थात ‘ग्लोबलायझेशन’ होत असतांना कळत न कळत आपण काही जीवनमूल्ये, चांगल्या संस्कृती, परंपरांपासून दूर तर नाही ना होत? जागतिकीकरण करता करता आपल्या घराचं घरपणच आपण हरवू पाहतो की काय? अशी शंकाही येते.
एकत्र कुटुंब पद्धती विविध कारणांनी लयास जात आहे. आणि मग दिसून येतात ते अनेक ठिकाणी निर्माण झालेले वृद्धाश्रम. विभक्त कुटुंबे आई-बाबांच्या नोकरीच्या कसरतीत मुलांची होणारी कुचंबणा या लहान मुलांच्या मनात निर्माण होणारा एकटेपणा. पर्यायाने त्यांना लागणाऱ्या वाईट सवयी या साऱ्या गोष्टी मनाला पटूनही आपण थांबवू शकत नाही.
त्यातही पुन्हा आजी-आजोबांशिवाय असणारं घर, की ज्या घरात शुल्लक वादांवरुन आजी-आजोबांचं नावही घेतलं जात नाही. घेतलं तरी त्यांची कुचेष्टा, निंदा केली जाते व नकळतपणे घरातील लहानांना ते द्वेषाचे धडे घरातच मिळतात. त्यांचीही वृत्ती संकुचित होऊ लागते. बाबा आजीला घरी का आणत नाहीत? मित्रांप्रमाणे आपणही दिवाळीला आजोबांकडे का जात नाही? आई-बाबांमध्ये नेहमी आजी-आजोबा, काका-काकी, आत्या यांवरुन भांडणच का होतात? यासारखे अनेक प्रश्न अनेक कोवळ्या मनात निर्माण होतात. ज्यांची समाधानकारक उत्तरे कोणाकडेच नसतात. अशा मुलांचे संकुचित मनोवृत्तीचे आई वडील मुलांच्या मनावर नाती संस्कारीत करतात ती याप्रकारे..
मुलगा म्हणून, सून म्हणून असणाऱ्या आपल्या कर्तव्याची पैशाच्या जमीन जुमल्याच्या हव्यासाच्या मनात कायम धुमसत राहणाऱ्या तिरस्कारांच्या होळीत कधीच राख झालेली असते. पैसा तेथे नाते असे व्यवहारी गणित त्यांनी कधीच मांडलेले असते. अशी मुले आपल्या सर्वच नातेवाईकांना कायमचे तोडून कधीच दूर गेलेली असतात आणि त्यांना परतीच्या वाटाही नसतात.
माणसाने कितीही आव आणला तरी त्याला स्वतःची मनःशांती पैशाने विकत घेता येत नाही. आई-वडिलांसारख्या खऱ्याखुऱ्या दैवतांना दुखावून देव भक्तीमध्ये रममाण होऊन मनाची शांती शोधतांना त्यांना त्यांच्या आराध्य दैवतांमध्ये त्यांचे जन्मदाते पोषणकर्ते आई-वडील कधीच कसे दिसत नाहीत?
ही सारी खंत आजच्या वाढत्या वृद्धाश्रमांकडे बघून निरपराध असहाय्य आजी-आजोबांकडे बघून वाटते त्यांचा स्वाभिमान आणि काळाची पावले ओळखून त्यांनी घेतलेली खबरदारी त्यांच्यावर स्वतःच्या आजारपणातही मुलांकडे हात पसरायची वेळ आणत नाही. किंबहुना मृत्यूनंतरही त्यांनी आपली उरलीसुरली संपत्ती मुलांसाठीच ठेवलेली असते. ती घेतांनाही तसूभरही पश्चात्ताप, दुःख न वाटता निर्लज्जपणे स्वीकारणारी किंबहुना ती मिळावी म्हणून जीवाचा आटापिटा करणारी कित्येक स्वार्थी मुले दिसून येतात. पण या साऱ्या गोष्टी कोणाला किती लाभदायी ठरतात हे येणारा काळच ठरवत असतो.
‘ग्लोबलायझेशन’मुळे इतर देश, राष्ट्र यांच्याशी नातेसंबंध निर्माण करतांना अंतर्गत नाजूक नाती जर आपण हरवून बसलो तर जगणे केवळ ‘यांत्रिक’ होऊन जाईल. भाव भावना नात्यांमधील ओलावा, प्रेम, आपुलकी यासाऱ्या गोष्टी हळूहळू भूतकाळातील किंवा पुस्तकातील बनून राहू नयेत. तर त्यांच्यातील गोडवा जपून देशाच्या प्रगतीसह स्वतःची आत्मिक प्रगती करुन घेणेच जास्त सुज्ञपणाचे ठरेल. म्हणूनच संत श्री ज्ञानेश्वरांनी जगाच्या कल्याणासाठी मागितलेले ‘पसायदान’ इथे आजही लागू पडते.
‘दुरितांचे तिमीर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो
जो जे वांछिल तो ते लाहो.. प्राणीजात ।
असं मागणं मागतांना दारिद्र्याचा, अज्ञानाचा, द्वेषाचा, दुःखाचा तिमीर नष्ट होऊन स्वात्माजागृती, स्वात्मशुद्धी होऊन मग अखंड विश्व सुखात, समाधानात, ज्ञानाच्या प्रकाशात उजळून जाऊ दे. अर्थात आत्मविकास जगाच्या कल्याणाकडे घेऊन जाईलच. असा आशावादही संत ज्ञानेश्वरांनी या आर्जवात मांडला आहे.
हाच आशावाद आपणही मनात ठेवून भविष्यकाळात वृद्धाश्रमांची गरजच न भासता आजी-आजोबांना त्यांचे कुटुंबातील पूर्वीचे स्थान प्राप्त होईल. ‘जशा नाण्याला दोन बाजू असतात, त्याप्रमाणे आजी-आजोबाही आपल्या मुलांना नातवंडांना सर्वार्थांनी समजून घेऊन एकत्र कुटुंब पद्धतीचा दिवसेंदिवस होत जाणारा ऱ्हास थांबविण्यास महत्वपूर्ण हातभार लावतील आशी ईच्छा मनात ठेवून त्याप्रमाणे वागायला काय हरकत आहे?
– सौ. मृणाल महागांवकर, महाड
कायस्थ वैभव या अंकातून संकलित
संकलन : शेखर आगसकर
Leave a Reply