नवीन लेखन...

कवठ : एक विस्मृतीत गेलेले फळ

शास्त्रीय नाव फेरोनिया एलेफंटम् व लिमोनीया अॅसीडिस्सीमा, रुटेसी कुळ. इंग्रजी शब्द – वूड एप्पल, कर्ड फ्रूट, मंकी फ्रुट, संस्कृत – कपित्थ, दधिफल, कपिप्रिय, मराठी – कपित्थ, कवंठ, कवंठी, कवठ इ.

कवठ हा वृक्ष मूळचा दक्षिण भारतातला आहे. कवठ हा काटेरी व पानझडी प्रकारचा वृक्ष आहे. भारतासहीत पाकिस्तान, श्रीलंका, जावा, ब्रह्मदेश, बांगला देश इ. प्रदेशांत कवठाचे वृक्ष आढळतात. हे फळ दक्षिण महाराष्ट्रात खूप प्रमाणात आढळते. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात या वृक्षाची उपस्थिती लक्षणीय प्रमाणात आहे. त्यामुळेच औदुंबर, नरसोबावाडी येथे मिळणारी प्रसिद्ध कवठ बर्फी दुसरीकडे मिळत नाही.

या झाडाची उंची ६-९ मी. असते. याची पाने संयुक्त, विषमदली, पिसासारखी एकआड एक, चकचकीत व गुळगुळीत असतात. पानांच्या खाली (stipule) काटे असतात. दले ३-९, समोरासमोर, बिनदेठांची, अखंड व गोल टोकाची असून उन्हाळ्यात गळून पडतात. या झाडाच्या खोडाची साल पांढरट-हिरवी किंवा काळी, खरबरीत, जाड व भेगाळलेली असते.

फळ:
फेब्रुवारी ते एप्रिल या काळात या झाडांच्या फांद्यांच्या टोकास विरळ परिमंजरीवर लहान आकाराची फिकट लाल व आखूड देठांची फुले येतात. मोहर आल्यानंतर साधारणत: २-३ महिन्यांनी फळे तयार होतात. या फळांची साल कठीण असते (वूड अँपल). घनकवची (कठिण सालीचे) मृदुफळ ५-७ सेंमी. व्यासाचे मोठे, गोल, कठिण व करड्या रंगाचे असते. मगजामध्ये भरपूर बिया असतात. बिया लांबट व दबलेल्या असतात.या फळांचा रंग हा करडा असतो. कवठाचे पिकलेले फळ चवीला आंबट-गोड व तुरट असते. एवढेच नव्हे तर शिवरात्रीस उपासाचे खास फळ म्हणून याची ख्याती आहे. पिकलेल्या कवठातील गर गडद काळपट लाल, कॉफी रंगाचा असतो. त्याची चव आंबट गोड असते. जास्त पिकलेले जास्त गोडसर लागते. आत खूप बिया आणि शिरा असतात.

कवठ आणि महाशिवरात्र :
माघ कृष्ण चतुर्दशी या तिथीला महाशिवरात्री म्हणून साजरा केला जाते. या दिवशी अनेक जण व्रत किंवा उपवास करतात. शंकर पार्वतीचा विवाह दिवस म्हणूनही हा साजरा केला जातो. या दिवशी काश्मीर मधील लोक उपवास न करता गोड पक्वान्ने खाऊन सण साजरा करतात. यासोबतच भगवान शंकराची आराधना केली जाते. बेलाच्या पानांनी शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो. महाशिवरात्री म्हटली की कवठ आलेच. महादेवाला कवठ खूप आवडते, त्यामुळे महाशिवरात्रीला याचाच नैवेद्य दाखवला जातो. भक्तांनाही कवठ प्रसाद म्हणून दिली जाते. कवठाशिवाय महाशिवरात्री सण पूर्ण होतच नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त शंकराची आराधना करून देवाची मनोभावे पुजा करतात. महशिवरात्रीपासून थंडी संपते आणि उन्हाळ्याची सुरुवात होते. महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाला विशेष महत्त्व असते. एरवी बाजारात सहजासहजी न मिळणारे कवळ महाशिवरात्रीला आवर्जून मिळते आणि खाल्ले जाते. कवठ वसंत ऋतूत मिळणारे फळ आहे. हिवाळा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या प्रारंभीच महाशिवरात्री येते. या काळात वातावरणातील गारठा कमी होऊन उष्णता वाढू लागल्यामुळे कफदोष निर्माण होऊ शकतो. विशेषत: श्वसनमार्गाच्या तक्रारी वाढतात. सर्दी, खोकला, घसा सुजणे, दमा, तसेच गोवर, कांजिण्या, ज्वर (ताप) यासारखे आजार वाढू लागतात. भूकही मंदावते. या सर्वांवर बेलफळ आणि कवठ ही फळे उपयुक्त ठरतात. त्यामुळेच त्यांचे पदार्थ आहारात घेणे हा आरोग्यदायी दृष्टिकोन आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी कवठ फोडून कवठाचा गर घालून प्रसाद केला जातो. महाशिवरात्रीला कवठाच्या बीमध्ये अमृत उतरते अशी यामागे श्रद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक घरात प्रसाद म्हणून कवठ दिले जाते.

कवठाची लागवड
मजबूत मूळ (Root) प्रणालीमुळे कवठाचे झाड दुष्काळ सहन करण्याबरोबरच नापिक ते पडीक जमिनीत तसेच हलक्या आणि खराब झालेल्या जमिनीत उत्तम वाढते. कवठाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित झाल्या आहेत. औषधी गुणधर्म, वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे कवठ फळांना चांगली मागणी आहे.
• महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि पश्चिम हिमालयात लागवड आढळते. महाराष्ट्रात नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यात शेती बांधावर, गोठ्याजवळ दोन, चार झाडे आढळतात.
• झाडाच्या जोमदार वाढीसाठी उष्ण व कोरडे हवामान, २५० ते ३०० मिलिमीटर पाऊस आणि २० ते ३५ अंश सेल्सिअस सरासरी तापमान लागते. मध्यम कोरड्या हवामानात तसेच समुद्रसपाटीपासून ५००० मीटर उंचीवर झाडे आढळतात.
• हे झाड ४८ अंश सेल्सिअस आणि हिवाळ्यातील -६ अंश सेल्सिअस तापमान सहन करू शकते. शुष्क हंगामामध्ये कवठाची फूल व फळ धारणा होते.
• हे फळझाड पर्णपाती, हळुवार वाढणारे आणि फांद्या सरळ ते अर्ध-पसरलेल्या असतात.
• व्यापारीदृष्ट्या लागवडीस हलकी व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. चुनखडी व खारवट जमिनीमध्ये काळजी घ्यावी लागते.

उपयोग:
या फळांच्या गरापासून खाण्यासाठी चटणी, मुरंबा, जेली, बर्फी बनवतात. फळातील मगज आंबटगोड व खाद्य असतो. मगज स्तंभक, उत्तेजक व दीपक असून पोटाच्या तक्रारींवर गुणकारी आहे. याची चटणी, बर्फी, मुरंबा व सरबत करतात. विषारी कीटकदंशावर बाहेरून लेप लावतात.हे फळ पित्ताचे शमन करण्यास मदत करते व यामुळे भूक वाढते. कवठ कंठाची शुद्धी करते, दमा, क्षयरोग, रक्‍तविकार, उलटी, वातदोष, श्रम, उचकी, विष, तृष्णा, ग्लानी वगैरे तक्रारीत हितकर असते. तिन्ही दोषांचे (वात, पित्त व कफ) संतुलन करते. शौचासह आव, मूळव्याध वगैरे त्रासावर कवठाचा बिया व धागे काढलेला गर ताकासह घेण्याचा उपयोग होतो. फळाची साल पित्तावर उपयुक्त असते; तसेच ती कातडी कमाविण्यासाठी व रंगविण्यासाठी वापरतात. वाळलेली फुले उकळून त्यांपासून रंग मिळतो. बियांतील तेल खाजेवर लावतात. पाने सुवासिक, वायुनाशी व अंगावर पित्त उठल्यास त्यांचा रस लावतात.
या झाडापासून डिंक ही मिळतो हा डिंक अर्धपारदर्शक, तांबूस भुरा असतो. बाभळीच्या डिंकास पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यापासून चित्रकाराचे जलरंग व इतर रंग- रोंगने तयार करता येतात. या झाडापासून मिळणारे लाकूड मजबूत आणि टिकाऊ स्वरूपाचे असल्यामुळे घरबांधणीसाठी लाकूड करडेपांढरे किंवा पिवळसर, कठिण, मजबूत आणि टिकाऊ आहे. त्याचा उपयोग घरबांधणी तसेच तेलाचे घाणे, चाकाचे आरे व शेतीची अवजारे तयार करण्यासाठी होतो. फळाच्या कठिण कवचापासून शोभिवंत वस्तू बनवितात.

कवठ कसे खावे?

कवठ हे पिकलेलेच खावे, कच्चे कवठ खाल्ल्याने सर्दी, खोकला, डोकेदुखी होऊ शकते. कवठाची पाने स्वच्छ धुऊन त्याची मेथीच्या भाजीसारखी भाजी बनवावी किंवा ही पाने पिठामध्ये मळून थालिपीठे बनवावी. कवठाच्या पानांमध्ये भरपूर पोषक घटक, फायबर व ‘ब’ जीवनसत्त्व असल्याने ती आरोग्यसाठी लाभदायक असतात.

हे नुसतेच खाण्यायोग्य नाही तर आयुर्वेदिक औषधी गुण असलेले कठीण कवचाचे फळ आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर (फेब्रुवारी -एप्रिल) कवठाचा हंगाम असतो. याचा नैसर्गिक शीतल गुण उन्हात थंडावा देण्याचा असतो. याचे हल्ली विविध पदार्थ बनवितात उदा. सरबत, जेली, जॅम , चटणी. बीटाकॅरोटिन, क जीवनसत्व , प्रथिने , अँटी ऑक्सिडेंट्स ने भरपूर असा कवठाचा गर असतो.

कवठ हे फळ फार कमी जणांना माहित असेल. कठीण आवरण असलेलं हे फळ चवीला थोडसं आंबड, गोड असं असतं. याला वुड अॅपल असंदेखील म्हटलं जातं. अनेक ठिकाणी हे फळ उपवासाच्या दिवशीदेखील खाल्लं जातं. कवठाच्या आतील गर विटकरी रंगांचा असून त्याचा उपयोग सहसा चटणीसाठी, सरबतासाठी, मुरंबा व जॅमसाठी करतात. बऱ्याच वेळेला फळांच्या गरामध्ये गूळ घालून पोळीसोबत खाणे अनेकजण पसंद करतात. विशेष म्हणजे कवठ खाण्याचे अनेक फायदे आहेत. मसालेदार चटणी अधिक उत्कृष्ट बनवणारे हे आंबट फळ आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. कवठ साधारण छोट्या नारळासारखं दिसतं. ते पिकलेलं आहे की नाही, हे बघण्यासाठी त्याची ‘बाउन्स टेस्ट’ उपयोगी पडते. ते कठीण पृष्ठभागावर पाडा. ते बाउन्स झालं, तर त्याचा अर्थ ते पिकलेलं नाही. पिकलेलं असेल, तर ते जमिनीवर एक विशिष्ट आवाज करून पडेल आणि बाउन्स होणार नाही. पूर्णपणे पिकलेल्या कवठाचा गर फिकट करड्या किंवा ‘टॉफी ब्राऊन’ रंगाचा असेल. चला त्यामुळे याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

कवठाचे फायदे :

कवठ फळात कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन नावाचे भरपूर पोषक असतात. हे बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, थायमिन आणि राइबोफ्लेविन देखील समृद्ध आहे. विविध पौष्टिक पदार्थांनी समृद्ध झाल्यामुळे पोटाच्या विकारात कवठ खूप फायदेशीर आहे. हे व्हिटॅमिन सी चे समृद्ध स्रोत आहे आणि व्हिटॅमिन सी ची कमतरता दूर करते.

पचन चांगले राहते-चांगली पचनक्षमता ठेवतो , शरीराचे तापमान तसेच कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतो .शरीराला थंडावा देतो. तहान शमवून रक्तविकारापासून मुक्त करतो,बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा करतो. पोटाचे जंत नाहीसे करतो.

* रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते – झाडाच्या खोड व फांद्यांमध्ये फेरोनि नावाचा डिंक असतो. रक्तातील साखरेचा प्रवाह, स्राव आणि संतुलन व्यवस्थापित करण्यास मदत करतो. हे डिंक इन्सुलिन आणि रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास रोखतो.
* डोकं दुखी कमी करतो- हृदय रोग आणि डोकेदुखीसाठी कवठ फळ फायदेशीर आहे. याचा सेवन केल्याने डोकेदुखीच्या समस्येपासून मुक्त होतो आणि यामुळे हृदयाचे आरोग्यही राखण्यास मदत करतो.
* ऊर्जेची पातळी वाढवतो- या मध्ये जास्त प्रमाणात प्रथिने आढळतात ज्यामुळे ते शरीरास ऊर्जा प्रदान करण्यात मदत करते. याचा उपयोग शरीरात उर्जा टिकवून ठेवण्यासाठी केला जातो. कोणत्याही स्वरूपात याचे सेवन करणे फायदेशीर आहे.
* बऱ्याच वेळेला फळांच्या गरामध्ये गूळ घालून पोळीसोबत खाणे अनेकजण पसंद करतात.

कवठ खाण्याचे आरोग्यदायी फायदे –
1) भूक लागण्यासाठी उपयुक्त –
कवठ खाल्ल्याने भूक वाढण्यास मदत होते. त्यामुळे पुरेशी भूक लागत नसल्यास हे फळ जरूर खावे.
2) पोट साफ होण्यासाठी उपयुक्त –
कवठ फळात मुबलक प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते. ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी हे फळ खाल्ले पाहिजे. तसेच यामुळे मूळव्याधची समस्या देखील कमी होण्यास मदत होते.
3) पोटाच्या विकारांवर उपयोगी –
पोटातील जंत कमी होण्यास यामुळे मदत होते. तसेच जुलाब लागल्यास किंवा उलट्या व मळमळ होत असल्यास कवठ खाल्ल्याने आराम मिळतो.
4) हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त –
कवठ हे वाईट कोलेस्टेरॉल कमी करते तसेच यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होत असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी हे फळ चांगले असते.
5) मळमळ, उलटी असा त्रास होत असेल तर कवठ खावं. यामुळं त्रास कमी होतो.
6) जुलाब होत असेल तर कवठाचं सेवन करावं.
7) अंगावर पित्त उठलं असेल तर कवठाच्या पनांचा रस अंगाला लावल्यास फायदा मिळतो.
8) कवठाची पानं सुवासिक व वातशामक असतात.
9) कवठ हे उत्तेजक असून अपचन, आमांश आणि अतिसार आदी विकारांवर उपयुक्त आहे.
10) मूळव्याध, अल्सर यासारख्या व्याधींवर कवठ हा उत्तम उपाय आहे. त्यामुळे त्रास होत असेल तर कवळ खावे.
11) ज्या लोकांना हृदयरोग किंवा छातीत धडधडते अशा लोकांनी कवठ खाणे फायद्याचे ठरते.
12) उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी कवठ खाणे फायद्याचे ठरते. कवठामुळे कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहते.
13.) कवठामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
14) कवठ हे मधुर आम्लरसाचे असल्यामुळे भूक कमी लागत असेल तर याच्या सेवनाने भूक वाढीस मदत होते.
15.) कवठ हे स्तंभनकार्य करीत असल्यामुळे जुलाब होत असतील तर कवठ सेवनाने जुलाब कमी होतात.
16.) कवठ खाल्ल्यामुळे कंठाची शुद्धी होते व आवाज चांगला होतो. हे फळ उष्ण, पित्त व वात या तिनंही दोषांचे संतुलन राखते.
17.) मूळव्याधीच्य त्रासास कवठाचा गर ताकासह घेतल्यास फायदा होतो.
18.) उलटी, उचकी यावर सुद्धा हे फळ गुणकारी आहे.
19.) भूक लागत नसेल किंवा कमी झाली असेल तर कवठ खावं.

कवठ खाण्याचे नुकसान –
जास्त प्रमाणात कवठ खाल्ल्यास पोटात दुखणे, गॅस होणे, अपचन होणे, ॲसिडीटी होते असे त्रास होऊ शकतात.

मधुमेह रुग्णांनी कवठ फळ खावे का?
कवठ फळ खाल्ल्याने रक्तातील साखर कमी होऊ शकते. त्यामुळे डायबेटिस रुग्णांनी जास्त प्रमाणात हे फळ खाऊ नये. कधीतरीच आणि तेही थोड्या प्रमाणातचं कवठ फळ मधुमेही रुग्णांनी खाल्ले पाहिजे.
कवठाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण:
• जलांश ६१.१ %
• प्रथिने १८ %
• कार्बोदके ३१.८ %
• लोह २.६ मिली
• जीवनसत्व ‘क’ २ मिली
• कॅल्शियम ८५ मिली
• तंतुमय पदार्थ २.९ %.

कवठ कसे खावे?

पिकलेलेच कवठ फळ खाल्ले पाहिजे. कच्चे कवठ खाऊ नये. कारण कच्चे कवठ खाल्ल्याने कफाचा त्रास वाढून सर्दी खोकला होणे, डोके दुखणे असे त्रास होऊ शकतात.

राष्ट्रीय रसायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे उतिसंवर्धन विभागात कवठावर बरेच संशोधन झाले आहे.

(सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने)

डॉ. दिलीप कुलकर्णी
मोबा. ९८८१२०४९०४
२७.०३.२०२४

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 77 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

4 Comments on कवठ : एक विस्मृतीत गेलेले फळ

  1. डी के साहेब तुमचा कवठ फळावरील लेख वाचल्यानंतर कवठ पाहताच ते खाल्याशिवाय राहवनार नाही.खूपच छान माहिती आहे. अभिनंदन साहेब!
    जगताप ए डी

  2. नेहेमी प्रमाणे उपयुक्त माहिती..

    धन्यवाद..

  3. डॉ.कलकर्णी ह्याचा ‘कवठ’, फळांचा लेख नुकताच वाचनात आला. नेहमी प्रमाणे लेखकाने फळांवर खूप छान माहिती दिली आहे. अभिनंदन!

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..