नवीन लेखन...

नेस्ट रिटर्नड इंडियन्स

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लड, आखाती देश अशा जगभरातील अनेक ठिकाणी भारतातील युवा पिढी स्थिरावत असल्याचं चित्र आजकाल सहास पाहावयास मिळतं. भारतात एखादी पदवी हस्तगत करुन उच्चशिक्षणासाठी परदेशी जाणं आणि नंतर तिथेच कामधंद्याच्या निमित्ताने स्थिरावणं हा जणू आजकालच्या युवापिढीचा शिरस्ताच बनून गेला आहे. मुंबई पुण्यातील जवळजवळ प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातील कुणीतरी परदेशात असतं असं म्हंटल तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. काही कुटुंबातील दोनतीनजण परदेशातच असतात. वसुधैव कुटुंबकम चा खरा अर्थ आज भारतातील वयस्क मंडळी अनुभवत आहेत. वर्षातून पाचसहा महिने परदेशी जाऊन राहणं हे या मंडळींच्याही अंगवळणी पडलं आहे.

भारतातील युवा पिढीने परदेशात उच्चशिक्षणासाठी जाणं हा विषय तसा नवीन नाही. सुमारे साठसत्तरच्या दशकात हा प्रकार आपल्या इथे सुरु झाला. त्याकाळी परदेशी जाणाऱ्या मंडळींचं कौतुक वर्तमानपत्रांतूनही होत असे. अमुक अमुक यांचं उच्च शिक्षणासाठी परदेशी प्रयाण अशी बातमी तेव्हा वर्तमानपत्रांतून फोटोसहीत छापून येत असे. नव्वदच्या दशकात परदेशी जाणाऱ्या मंडळींचं प्रमाण वेगाने विस्तारलं आणि मग हे वर्तमानपत्रातील छापील कौतुक कमी झालं. आपला सुपुत्र अथवा आपली सुकन्या परदेशात स्थिरावली आहे हे सांगताना मात्र मातापित्यांना आजही अभिमान वाटतो आणि ते ऐकणाऱ्यांनाही.

परदेशातील शिक्षणाचा खर्च खरंतर अवाढव्य असतो. तिथल्या युनिव्हर्सिटीजची फी भरणंच मुळी सामान्यांच्या आवाक्याबाहेरचं असतं. याशिवाय तिथला दोनतीन वर्षांचा राहण्याचा खर्च वेगळाच धरावा लागतो. राष्ट्रीयकृत बँकांनी मध्यमवर्गीयांची ही समस्या ओळखून त्यावर एज्युकेशन लोनचा उतारा लागू केला व पाहतापाहता चित्र बदलून गेलं. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च पेलण्यासाठी आज बँकांकडून सुलभ हप्त्यावर कर्ज उपलब्ध होऊ शकतं. हे कर्ज फेडण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा पुरविल्या जातात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही सुमारे पाचसात वर्षे कर्ज फेडण्याचं बंधन नसतं. नोकरीत स्थिरावल्यानंतर हप्त्याहप्त्याने बँकेचं कर्ज फेडता येतं. बँकांनी कर्जाचा भार सुसह्य केल्याने गेल्या एकदोन वर्षांत परदेशी जाणाऱ्या युवकयुवतींच्या संख्येत प्रचंड वाढ झाली.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लडमधील युनिव्हर्सिटजची आणि तिथल्या शहरांची नामावळी घराघरात पोहोचली. इंटरनॅशनल कॉल्स, चॅटिंग, स्काईप हे शब्द सर्वतोमुखी झाले.

जगभरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी परदेशात युनिव्हर्सिटीजमध्येही वर्क परमिट मंजूर केलं जातं. विद्यार्थ्यांना आठवडयातील ठराविक तास नोकरी करण्याची रीतसर परवानगी सरकारतर्फे दिली जाते व या संधीचा लाभ उठवून नोकरी आणि शिक्षणाची कसरत विद्यार्थी पार पाडतात. अभ्यासक्रमातील केवळ पहिल्या टर्ममध्ये विद्यार्थी फी व लिव्हिंग एक्स्पेन्सेसचं कर्ज बँकेकडून घेतात. सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांना कुठेतरी पार्टटाईम नोकरी सहज मिळून जाते. त्यानंतर फक्त युनिव्हर्सिटजची फी बँकेकडून घ्यावी लागते. स्वतःचा दैनंदिन खर्च भागविण्याइतपत मिळकत विद्यार्थी सहजरित्या कमावू लागतात. भारतात केवळ शिक्षणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विद्यार्थ्यांचं परदेशात नवं रुटिन सुरु होतं.

परदेशातील नव्या रुटिनमध्ये युवा पिढी जे कष्ट उपसते त्याला खरोखरीच तोड नाही. कॉलेजचा अभ्यास संभाळून ही मुलं संध्याकाळी नोकरीवर जातात. ही नोकरी म्हणजे काबाडकष्टांची परिसीमा असते. डिपार्टमेंट स्टोअरमध्ये, हॉटेलमध्ये, पुस्तकविक्रेत्याकडे, जिथे मिळेल तिथे ही मुलं नोकरी स्वीकारतात. या नोकरीमध्ये अंगमेहनतीची सर्व प्रकारची कामे त्यांना उरकावी लागतात. नोकरी आटोपल्यावर रात्रौ दहानंतर कधीकधी अकरा नंतरही ही मुलं घरी परततात. घरी परतल्यावर दुसऱ्या दिवशीच्या नाश्तापाण्याची तयारी करावी लागते. रात्रौ जेवल्यानंतर भांडीकुंडी उरकावी लागतात. शनिवार रविवारच्या सुट्टीत बाजारहाट करण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंत सर्व काही उरकावं लागतं. पुन्हा सकाळ उजाडली की अभ्यास आणि नोकरीचं रुटीन सुरु! उच्चशिक्षणासाठी अपार कष्ट उचलण्याची या मुलांची जिद्द खरोखरच वाखाणण्याजोगी असते.

उच्चशिक्षण आटोपल्यावर या मुलांना आपापल्या क्षेत्रात प्रतिष्ठेची नोकरी मिळते. साऱ्या जगात भारतीय मुलांनी इमानेइतबारे काम उरकण्याचा लौकिक कमावला आहे. कामातील कौशल्यामुळे आणि कष्ट उपसण्याच्या सवयीमुळे आज भारतीय युवा पिढीचं नाव सर्वतोमुखी झालं आहे. अवघ्या दोनतीन वर्षांच्या कालावधीत ही मुलं नोकरीमध्ये उत्तम पदाचा भार सांभाळू लागतात. भारतात कल्पनाही करता येणार नाही असा पैसा यांच्या हाती खेळू लागतो. स्वतःचं घर, गाडी, आईवडिलांच्या परदेश वाऱ्या सारं काही या मुलांच्या आवक्यात येतं. घडीचा संसार आकाराला येतो. कोवळ्या वयातच या मुलांना ऐश्वर्य उपभोगता येतं, सुखाची परमावधी अनुभवता येते.

तिसरी पिढी जन्मल्यावर मात्र आता परदेशातच राहायचं की भारतात परतायचं याबाबत विचारविनिमय सुरु होतो. परदेशातील मुक्त संस्कृतीत आपल्या मुलांना वाढू देणं इष्ट की अस्सल भारतीय संस्कृतीचे संस्कार त्या छोटयांवर घडवणं इष्ट याचा खल परदेशात स्थायिक झालेल्या मंडळींच्या सुखवस्तू घरात मग सुरु होतो. हाती येणाऱ्या पैशांचा ओघ भारतात परतल्यावर मंदावणार आहे याची खंत सर्वांनाच जाणवत असते. मात्र आजवरच्या नोकरीत जमवलेल्या बॅकबॅलन्सचा मोठा आधार पाठी असतो. शिवाय भारतात काही ना काही मिळकत मिळणारच याची खात्री असते. अनेकदा भारतात परतण्याचा कौल स्वीकारण्याचं नक्की ठरतं. मंडळी फॉर गुड भारतात परततात.

अशा नेस्ट रिटनर्ड इंडियन्स चं नवं पर्व आता भारतात अवतरलं आहे. आपण या घरट्यात परतणाऱ्या पक्षांचं मनापासून स्वागत करूया.

– सुनील रेगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..