नवीन लेखन...

बृहन्मुंबई महानगरपालिका (आरोग्य विभाग)

एक सुखकारक अनुभव
मुंबई महानगरपालिका , त्यांची कार्यपद्धती , गोंधळाचं वातावरण , हलगर्जीपणा आणि त्यातूनही महानगरपालिकेची इस्पितळं तर फारच भयानक , केविलवाणी परिस्थिती , तिथे येणारे रुग्ण , डॉक्टरांचा निष्काळजीपणा यावर आपण नेहमीच बोलत असतो , बोटं मोडत असतो. या संपूर्ण कोरोना काळात तर मुंबई महानगरपालिकेच्या इस्पितळांबद्दल सतत उलटसुलट प्रतिक्रिया येत होत्या.
या सगळ्या नकारात्मक पार्श्वभूमीवर माझ्या एके काळच्या ऑफिसमधील सहकारी मित्राला मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामधून आलेला अनुभव अत्यंत सकारात्मक , आशादायक आणि सुखदायक होता. प्रत्येक क्षेत्रात चांगली आणि वाईट दोन्ही प्रकारच्या व्यक्ती या असतातच. आपल्याला आलेल्या अनुभवानुसार आपण त्याकडे पहात असतो , हे जरी खरं असलं तरी कित्येक वेळा एखाद्या लहानशा गोष्टीला किंवा चुकीला मोठी आणि अतिरंजित करून कर्णोपकर्णी करण्याची आपल्याला सवय असते. परंतु तितक्याच सकारात्मकतेने आलेला सुखकारक अनुभव मात्र सांगितला जातं नाही.
आणि केवळ म्हणूनच माझ्या मित्राला आलेला सुखद अनुभव मला मनापासून आपल्यासमोर ठेवावासा वाटला म्हणून हा लेखनप्रपंच.
लॉकडाऊनचा काळ. मुंबईतील पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी इथे राहणाऱ्या संदीप शिर्केला अचानक पोटात गॅसेस चा त्रास जाणवू लागला. सुरवातीला त्याने तिकडे दुर्लक्ष केलं आणि काही घरगुती उपचार केले. तसं वय फार नसल्याने या वयात लहानसहान गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. पण हा त्रास रोजच सुरू झाला. लॉकडाऊन काळात डॉक्टरकडे जाणं हे एक दिव्यच होतं. सगळ्यांनाच आपल्या जीवाची काळजी होती. त्रास वाढल्यामुळे त्याही परिस्थितीत तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरनीही त्याला अंतर ठेवूनच होणारा त्रास विचारला. याने आपल्याला गॅसेस चा त्रास होतोय सांगितल्यावर विशेष तपासणी न करता त्यांनी औषधं लिहून दिली. परंतु औषधं घेऊनही त्रास कमी झालाच नाही उलट आता हा त्रास त्याला पाठीमध्येही जाणवू लागला. अखेर संदीपने दुसऱ्या डॉक्टरांना दाखवून त्यांचं मत घेण्याचं ठरवलं. आणि त्यासाठी तो हॉस्पिटल मध्ये दाखलही झाला. सगळ्या टेस्ट करून MRI , CT Scan काढण्यात आला. आणि त्यानुसार त्याच्या पाठीच्या कण्यामध्ये पस झाल्याचं लक्षात आलं. आणि संदीपला Spine Tb हा आजार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. संदीपची स्थिती एव्हाना फारच कठीण झाली होती. त्याला उठून बसणं तर सोडाच पण हलता येणं सुद्धा त्रासदायक होऊ लागलं होतं. डॉक्टरांनी सगळे रिपोर्ट्स पाहून ऑपरेशन हा पर्याय समोर ठेवला आणि त्यासाठी अपेक्षित खर्च चार साडेचार लाख सांगितला. स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या आणि आपली लहान मुलं पत्नी यांची जबाबदारी असलेल्या मध्यमवर्गीय माणसाला स्वतःवर एव्हढा खर्च करण्याचा निर्णय घेणं तसं अवघडच होतं. बाहेर कोरोनाचा कहर , ऑपरेशनचा खर्च आणि त्यानंतरही आपण यातून नक्की पहिल्यासारखे ठणठणीत बरे होऊ का ? ही सतत छळणारी शंका या तिहेरी कात्रीत संदीप सापडला. डॉक्टरांनी सांगितलेल्या ऑपरेशनच्या पर्यायाला काही दिवसांसाठी बाजूला ठेवून संदीपची पत्नी दुसरा पर्याय आहे का याची चाचपणी करू लागली. अर्थात डॉक्टरांनी सांगितलेली इंजेक्शन्स आणि औषधोपचार मात्र त्यांनी लगेच सुरू केले. संदीप तसा बिनधास्त स्वभावाचा. पण तो ही या आजाराने पार हादरून गेला. घरात लहान मुलं असल्याने त्याच्या पत्नीला या कोरोना काळात बाहेर जाणं कठीणच होत होतं.
अशातच कुणीतरी महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन तिथल्या डॉक्टरांना रिपोर्ट्स दाखवण्याचं सुचवलं. अर्थात संदीपला उठणही अशक्य असल्यामुळे त्याच्या पत्नीलाच जाणं भाग होतं. त्यावेळी महानगरपालिकेची इस्पितळं , दवाखाने कोरोनाच्या रुग्णांनी तुडुंब भरलेली असायची. जोगेश्वरीतील महानगरपालिकेच्या नटवर नगर आरोग्य केंद्र दवाखान्यात ती पोहोचली तेव्हा तिला माहितही नव्हतं की महानगरपालिकेच्या दवाखान्यात TB च्या रुग्णांसाठी वेगळा विभाग आहे. विमनस्क अवस्थेत बसलेली असताना तिची भेट डॉक्टर संगीताशी झाली ज्या या विभागाच्या तज्ञ होत्या. आणि इथूनच संदीपच्या नशिबाने त्याला साथ द्यायला सुरवात केली. संदीपचे रिपोर्ट्स पाहून आणि त्याची एकूण परिस्थिती व्यवस्थित जाणून घेऊन डॉक्टर संगितानी त्यांचे वरिष्ठ डॉक्टर वाल्मिकी (अंधेरी K ward) याना संपूर्ण केस सांगितली. आणि आश्चर्य म्हणजे कोविडच्या या भयानक वातावरणात स्वतः घरी येऊन संगीतानी संदीपच्या आजाराची पूर्ण तपासणी केली. रिपोर्ट्स पुन्हा एकदा तपासले आणि एकदा सगळे रिपोर्ट्स घेऊन अंधेरी K ward मध्ये असलेल्या TB रुग्णांच्या मुख्य दवाखान्यात यायला सांगितलं. तिथल्या डॉक्टरानी सगळे रिपोर्ट्स पाहून संदीपला घरात ठेऊनच उपचार करण्याला परवानगी दिली. डॉक्टर संगीतानी तर संदीप आणि त्याच्या पत्नीला दिलासा दिला की ऑपरेशन करावं लागणार नाही , तुम्ही अजिबात घाबरु नका . Spine TB असला तरी यातून तुम्ही पूर्ण बरे व्हाल ,आणि अगदी स्वतःच्या पायांनी आमच्याकडे चालत याल. फक्त सकारात्मक रहा आणि आहार व्यवस्थित ठेवा कारण यावरची औषधं खूप strong आहेत. त्यांच्या या शब्दांनी संदीप खूपच सावरला. शिर्के पती पत्नीला हा सुखद अनुभव खूपच नवीन होता. महानगरपालिकेचा एक डॉक्टर या कोरोना काळात आपल्या घरी येऊन रुग्णाची तपासणी करतो , अत्यंत आपुलकीने आणि आपल्याला जराही न घाबरवता शंभर टक्के यशाची ग्वाही देतो हे फारच समाधान देणारं होतं. आपण अनेक प्रसंगी देवच मदतीला धावून आला असं सहज म्हणून जातो. त्याचा अर्थच असा असतो की देव मनुष्यरूपात धावून येतो. या मधल्या काळात संदीपला या याच्या इमारतीमध्ये रहाणाऱ्या अनेक तरुण मुलांनी कोरोनाची पर्वा न करता मदत केली.
ज्याला अंथरुणातून उठून बसण्याची सोडाच पण हलण्याचीही ताकद नव्हती , ज्याला आपलं भवितव्य अंधारमय दिसू लागलं होतं तो संदीप हळुहळु उठून बसू लागला. सुरवातीला प्रथमच पाय जमिनीला लावून उभा रहाताच त्याचे पाय शरीर थरथरू लागलं , घाम फुटला पण त्याच्या फिजीओने त्याला धीर दिला की प्रयत्न करत रहा , हळूहळू यशस्वी व्हाल हा कानमंत्र दिला. आणि नेटाने त्याच्याकडून हे करवूनही घेतलं.
संदीपच्या तब्येतीत औषधोपचारांनी चांगलाच फरक पडू लागला , इतकंच नव्हे तर डॉक्टर संगीतानी सांगितल्याप्रमाणे तो पत्नीसह त्यांना भेटायलाही गेला. या संपूर्ण काळात संदीपच्या पत्नीने त्याला धीराने साथ दिली. डॉक्टर संगीतानी आपला शब्द खरा केला. आज संदीप कमरेला सुरक्षा बेल्ट लावून नेमाने खाली उतरू लागलाय. त्याच्या प्रकृतीत खूपच सुधारणा होतेय. तो अगदी मनापासून याचं श्रेय त्या दोन डॉक्टरांना आणि पत्नीला देतो. संदीप आणि त्याच्या पत्नीला महानगरपालिकेच्या जोगेश्वरी दवाखान्यात आलेला हा सुखद अनुभव आपल्याला खूप काही सांगून जातो.
मित्रानो ! महानगरपालिका त्याची कार्यपद्धती यामध्ये दोष असतीलही. रुग्णांचा ओघ प्रचंड असल्यामुळे तिथला कारभार थोडा ढिसाळ आणि वेळखाऊ होत असेलही. पण डॉक्टर संगितासारख्या व्यक्ती त्यामध्येही प्रामाणिकपणे , निरपेक्षपणे आणि समरसतेने आपलं कर्तव्य निभावतायत. तसच त्यांच्याकडे येणाऱ्या आर्थिक दृष्ट्या कमजोर रुग्णांना आपल्यापरीने शक्य होईल तेव्हढी मदत करतायत , त्यांना धीर देतायत आणि सेवाव्रती असणं म्हणजे काय याचा वस्तुपाठच आपल्या कार्यपद्धतीतून दाखवून देतायत.
मुंबई महानगरपालिकेचे अनेक डॉक्टर , कामगार , आरोग्य विभागातील कर्मचारी या सगळ्यांनाच एक कडकडीत सॅल्युट जे या कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी राबत होते.
शक्य असल्यास हा अनुभव नक्की शेअर करा जेणेकरून मनपा ची चांगली बाजुही लोकांना कळेल

प्रासादिक म्हणे

–प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..