नवीन लेखन...

सार्वजनिक वाचनालयांतील एक पुस्तक

मुंबईच्या XXXX उपनगरापैकी एकात दीड महिन्याच्या कालावधीत तिघांनी आत्महत्या केली होती.
तीनही प्रकरणात ती आत्महत्या होती की खून होता, हे सांगता येत नव्हते.
तिघांच्याही आयुष्यात आत्महत्या करण्यासारख्या अडचणी नव्हत्या.
एकनाथ खर्डेकर, समता मायजीकर, सदानंद मोहिते ही त्याची नांवे होती.
तिघेही चाळीशीच्या आसपास होते.
एकाच पोलिस स्टेशनांत आत्महत्यांची नोंद झाली होती. तिघांपकी कोणीही कांही चिठ्ठी लिहिली नव्हती.
तिघेही सुखवस्तु होते.
तिघांचेही छोटे कुटुंब होते.
तिघांनीही इमारतीच्या गच्चीवर जाऊन तिथून खाली उडी मारली होती.
प्रथम पोलिसांना त्या आत्महत्या वाटल्या पण तिसऱ्या घटनेनंतर पोलिसांना खूनाचा संशय येऊ लागला.
तिन्ही मृत्यूची वेळ, गच्चीवरून उडी मारणे, कांहीही कारण नसणे, ह्या समान गोष्टी पाहून पोलिस चक्रावले होते.
गुन्हेगारी जगतातील सर्व बातम्या देणारी वर्तमानपत्रांत यशवंतानी ह्या गुन्ह्यांबद्दल त्यांनी वाचलं होतं.
त्यावरच विचार करत असतांना एक गृहस्थ त्यांना भेटायला आले.
चंदूही तिथे होताच.
ते गृहस्थ जवळपास साठीचे असावेत.
ते म्हणाले, “माझे नांव रमाकांत उपळीकर, मी XXXX उपनगरात रहातो. मी तुम्हाला जे सांगणार आहे ते महत्त्वाच असेल वा कदाचित नसेल पण माझी विनंती आहे की माझ्या समाधानासाठी माझं ऐकून घ्या.
मी मुंबईच्या त्याच उपनगरांत रहातो, जिथे गेल्या दोन महिन्यात तीन माणसे गच्चीवरून पडून मेली.
त्यांनी स्वत: उड्या मारल्या की कोणी त्यांना ढकलले की ते चुकून पडले, ह्याबद्दल खात्रीलायक माहिती मिळाली नाहीय.
मला त्या बाबत एक वेगळीच गोष्ट सांगायची आहे.
त्या भागांत एक सार्वजनिक वाचनालय आहे.
त्या वाचनालयाचा मी ग्रंथपाल आहे.
ह्या प्रकरणांतील हे तीनही जण ह्या वाचनालयाचे सदस्य होते.
तिघांनाही वाचनाची आवड होती.
तिघेही नियमित पुस्तकं नेत, भराभर वाचून परत करत.
तिघांनीही त्यांच्या मृत्यूच्या आधी कांही दिवस एकच पुस्तक वाचनालयातून नेलं होतं.
म्हटलं तर ती कादंबरी होती आणि म्हटलं तर ते “अघोरी विद्या” ह्या विषयावरील पुस्तक होतं.
वशीकरण, संमोहन, परकायाप्रवेश, इ. अनेक कल्पना कादंबरीत गुंफलेल्या होत्या.
मी ते पुस्तक पूर्ण वाचलेलंही नाही पण माझ्या मनांत आले की ह्या तीन मृत्यूंचा ह्या एकाच पुस्तकाशी संबंध नाही ना ?
तिघांनीही पुस्तक वेळेत परत केले होते.
त्या प्रत्येकाच्या मृत्यूची बातमी त्यांनी पुस्तकं परत केल्यानंतर पंधरा दिवसांच्या आंत आली होती.
आता हा योगायोगही असेल.
म्हणूनच मी आपल्याकडे आलो.
पोलिसांना हे सांगण्यात अर्थच नव्हता.
यशवंत त्यांना म्हणाले, “रमाकांत, ते पुस्तक तुम्ही बरोबर आणलं आहे, ते मला द्या.”
रमाकांत जरा चकीत झाले पण मग आपल्या झोळीतले ते पुस्तक काढून त्यांनी यशवंतांच्या हाती दिलं.
यशवंत म्हणाले, “ह्या पुस्तकाबद्दल कुणाला सांगू नका. वाचनालयांत त्याच्यापुढे ‘हरवले आहे.’ असं लिहा.”
रमाकांत यशवंताना नमस्कार करून निघून गेले.
पुढच्या दोन दिवसात चंदू आणि यशवंत दोघांनीही ते पुस्तक वाचलं.
लेखक कुणी महंत वज्रनाथ होता.
यशवंतानी चंदूला विचारले, “काय चंद्रकांत, काय वाटलं पुस्तक वाचून?”
चंदू म्हणाला, “मामा, खूप कुतुहल वाटत आहे.
बंगालच्या काळ्या जादूहून जास्त कांहीतरी ह्यांत आहे.
ही गोष्ट अभ्यासण्यासारखी वाटते.”
यशवंत म्हणाले, “ठीक आहे. असे कदाचित प्रत्येक वाचकाला वाटेल, असे समजू पण वाचक शिकणार कसा ?
कारण पुस्तकावरून शिकणं तर शक्यच नाही.
त्यांत फक्त नायकाने हे शिकून पुढे काय केलं, ते आलंय पण शिकण्याबद्दल काय मार्गदर्शन आहे ?”
चंदू म्हणाला, “मामा, तुम्ही माझी परीक्षा घेताय ना ?”
यशवंत हंसले.
चंदू पुढे म्हणाला, “मामा, लेखक वज्रनाथनी शेवटी आपला फोन नंबर दिला आहे.
ज्याला ज्याला कुतुहल वाटेल, त्याने फोन करावा, असं म्हटलं आहे.”
यशवंतानी विचारले, “मग करणार आहेस कां फोन ?”
चंदू म्हणाला, “मामा, संमोहन, वशीकरण, जादू, गुप्तधन, चमत्कार, इ. च्या नादी कधीच लागायचं नाही, हे मी तुमच्याकडूनच शिकलो आहे.
तेव्हां माझ्या मनाला जरी वाटलं तरी मी त्याच्याशी संपर्क साधणार नाही.”
यशवंत म्हणाले, “पण चंदू मी त्याला फोन करणार आहे.”
पुस्तक वाचून होताच यशवंतानी ठरवलं होतं की फोन करायचाच.
त्यांना वाटत होतं जर ह्या प्रकरणाशी ह्या पुस्तकाचा संबंध असला तर तो ह्या फोनच्या मार्गानेच जात असावा.
वशीकरण, चमत्कार, हे जरी खोटे असले तरी संमोहन आणि इतर जादू खऱ्या आहेत, हे तें जाणून होते.
त्यांनी त्या फोनवर संपर्क केला.
एक भारदस्त आवाज आला, “बोला ! मी महंत वज्रनाथ.
यशवंतानी एखाद्या नवख्या माणसागत उत्साहाने विचारत आहोत, असा आव आणून विचारले, “लेखक महंत वज्रनाथ आपणच ना !”
पलिकडून आवाज आला, “हो ! आपल्याला मार्गदर्शन हवंय ?”
यशवंत म्हणाले, “हो, आपलं पुस्तकं वाचलं.
मला ह्याबद्दल मार्गदर्शन हवंय.
मला ही विद्या शिकायची आहे ?”
तो आवाज म्हणाला, “ही विद्या शिकणं सोपं नाही.
खूप कष्ट घ्यावे लागतील.
एकदा आत आलास की मागे फिरतां येणार नाही.
हे झेपेल कां ह्याचा विचार कर.”
यशवंताना त्या आवाजातील ऐकणाऱ्याला संमोहित करण्याची ताकद जाणवली.
यशवंत म्हणाले, “मला आधीपासूनच आवड आहे.
आपलं पुस्तक वाचून मी नक्की ठरवलं की शिकून घ्यायचं.
मला कृपया मार्गदर्शन करा.”
तो आवाज म्हणाला, “तुला कुणाला वश करायचं आहे की कुणाला क्लेश द्यायचे आहेत ?”
यशवंत म्हणाले, “असं कांहीच नाही. मला ही विद्या शिकण्याचीच ओढ आहे.”
तो म्हणाला, “तू मी सांगतो तशी दिनचर्या सध्या ठेव.
मी सांगीन तोच आहार घ्यायचा आणि मी देतो तो मंत्र म्हण.
ओम् ऱ्हां…. ….” रोज हजार वेळा तरी मंत्र म्हटलाच पाहिजे. येत्या अमावास्येपर्यंत त्यांत खंड पाडू नको.
तोपर्यंत निश्चय टिकला तर मी तुला प्रत्यक्ष भेटून दीक्षा देईन.
यशवंताचा संशय बळकट झाला.
इथे कांहीतरी पाणी मुरतयं.
हा माणूस दीक्षा देतो म्हणजे नेमके काय करत असावा ?
एकनाथ खर्डेकरने अघोरी विद्या शिकायला त्याच्याशी संपर्क केला असेल ?
त्याला श्रीमंत व्हायचं होतं ?
समता मायजीकर कां बोलली असावी ?
तिला काय हवं होतं ?
तिघांनाही त्याने फोनवरील प्रथम बोलण्यांतच संमोहीत केलं होतं.
कुतुहल त्यांना महाग पडलं असावं ?
तिघांच्याही आयुष्यात अडचण नव्हती परंतु माणूस पूर्ण समाधानी कधीच नसतो. यशवंत समजले की ह्याच इसमाने त्यांना ह्यात गुंतवले होते.
त्याच्या धीरगंभीर आवाजातली ताकद त्यांनी अनुभवली होती.
यशवंताना प्रयत्नपूर्वक संमोहन टाळावे लागले.
ह्या तिघांनाही त्याने नक्कीच संमोहित करून दीक्षा देण्याच्या नांवावर जबरदस्तीने कुठल्या तरी पंथात सामील करून घेतलं असावं.
नंतर ते तो सांगेल तसे वागत असावेत पण मग शेवटी त्यांनी जीव कां दिला ?
कांही तरी गौडबंगाल आहे.
आपला जीव धोक्यात घालूनही ते शोधून काढलं पाहिजे.
त्याची आज्ञा पाळतोय असं दाखवून त्याला गाफील ठेवलं पाहिजे.
चंदूला हे सांगावं की नाही ?
चंदूने ते वाचल्यानंतर नंबर लिहून ठेवला होता आणि यशवंतानी फोन करण्याआधीच त्याला फोन केला होता.
चंदू लगेचच त्याच्या प्रभावाखाली आला होता.
त्यालाही त्यांनी तसाच मंत्र देऊन दीक्षा घ्यायला तयार रहाण्यास सांगितले होते.
इतर कोणालाही हे न सांगण्याची सूचनाही दिली होती.
यशवंत कांही मंत्र वगैरे म्हणत नव्हते पण चंदू तें ही करू लागला होता.
चंदू हा शारिरीक ताकद, चपळता, ह्यांच्या जोरावर यशवंताना सहाय्य उत्तम करायचा पण स्वतंत्र विचार करण्यांत तो थोडा कच्चा होता.
दोघांनी आपापल्या मोबाईलवरून फोन करून आपली तयारी झाली असल्याचे त्याला कळवले.
आता दोघेही वाट पहात होते दीक्षेच्या दिवसाची.
तो कोणता दिवस देणार ह्याबद्दल यशवंताना कल्पना होती.
असली कामे करणाऱ्यांना अमावास्या किंवा पौर्णिमा हवी असते.
पूर्वीचे दोन पुरूषांचे मृत्यू अमावास्येचे होते तर एका मुलीचा पौर्णिमेचा होता.
आता अमावास्या जवळ आलेली होती.
बहुदा तो दिवस तो कळवेल, अशी त्यांची अटकळ होती आणि ती बरोबर ठरली.
दोघांनाही फोन कॅालवर दिवस कळवला आणि तो तोच अमावास्येचा दिवस होता.
वार येत होता शनिवार.
यशवंत तसे देवभोळे नव्हते पण मारूतीरायाच्या दिवशी आपल्या मनाच्या खंबीरतेची कसोटी लागणार, ह्याचा त्यांना आनंद झाला.
त्यांना स्वत:बरोबर चंदूचीही काळजी घ्यायला हवी होती.
तो नेमकं काय करणार, हे अजूनही ठाऊक नव्हतं.
शनिवारी संध्याकाळी साडेसातला तो येणार होता.
रात्र काळोखी असणार होती.
यशवंतानी पांढरा शुभ्र सदरा आणि पायजमा असा वेश केला होता.
त्यांनी पाहिले तर चंदूनेही तसाच वेश केला होता.
त्यांनी चंदूला विचारले की कोणी येणार आहे कां आज आपल्याकडे ?
चंदू म्हणाला, “नाही, तसं कोणी कळवलेलं नाही परंतु आपल्याकडे कोणीही अचानक येऊ शकतात.”
यशवंतानी मग त्याला जास्त कांही विचारले नाही.
स्वत:च्या मनाला फक्त सूचना दिली की चंदूला सांभाळायलाच हवे.
संध्याकाळी बरोबर साडेसातला एक दाढी मिशांचे जंगल ठेवलेले एक बळकट गृहस्थ घरी आले.
त्यांनी झोळीतून एक छोटं होमपात्र काढलं.
त्यांत चार काटक्या ठेवून पेटवल्या.
धूर पसरू लागला.
थोडा विस्तव दिसला.
महंत वज्रनाथ चंदूला आणि यशवंताना म्हणाले, “आता दीक्षाविधी सुरू करूया, बसा समोर.”
मग कांहीतरी मंत्र पुटपुटत ते थातुर मातुर विधी करू लागले.
पावणे नऊ नंतर ते म्हणाले, “आता विधीचा शेवटचा टप्पा राहिला.
त्यासाठी वर चला.”
त्यांनी संमोहित केलेला चंदू गच्चीकडे जाऊ लागला.
यशवंत मोठ्या हिंमतीने त्याचा प्रभाव टाळत पण प्रभावाखाली आहोत, असे नाटक करत मागून जाऊ लागले.
तो शेवटी गच्चीवरून उडी मारायची सूचना देणार.
त्या आधी चंदूला सावध करायला हवे होते.
यशवंतानी लपवून आणलेली टाचणी चंदूला जोरांत टोचली.
चंदू कळवळला पण तो क्षण साधून यशवंतानी चंदूला म्हटले, “हा महंत भोंदू आहे. तुला त्याने संमोहित केले आहे. जागा हो.”
चंदू “ट्रान्स”मधून बाहेर आला.
दोघेही सावध होते.
त्याने सांगितल्याप्रमाणे गच्चीच्या कठड्याकडे उभे राहिले.
त्याने त्यांना कठड्यावर चढायला सांगितले.
तसें यशवंत म्हणाले, “ढोंगीबुवा, तुमचा खेळ संपलाय आतां. तुमची आज्ञा कोणी नाही पाळणार पण तुम्हाला तुमच्या गुन्ह्यांची शिक्षा नक्कीच मिळेल.”
त्यावर तो विकट हंसला व त्याने दोघांवर पिस्तुल रोखले आणि म्हणाला, “आज तर मी तुमचे बळी घेणारच.”
यशवंत शांतपणे म्हणाले, “भोंदूने महंता, मागे उभ्या असलेल्या इन्सपेक्टरना हे सांग आतां”.
पुढच्या क्षणी इन्सपेक्टरनी त्याला बेड्या ठोकल्या.
सरकारने बुवाबाजी, खून, इ. सर्व आरोप ठेवून त्याच्यावर खटला भरला.
पत्रकारांशी बोलतांना यशवंतानी रमाकांत उपळीकरांना पुढे केले आणि म्हणाले, “ हे सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल रमाकांत उपळीकर.
सर्व श्रेय यांचे आहे.
वाचनालयांतून एकच पुस्तक खुनापूर्वी तिघांनीही घेतलं होतं.
त्या पुस्तकाचा संबंध ह्या खूनांशी असावा, ही कल्पना त्यांच्या तरल मनात आली व ते माझ्याकडे आले.”
एक पत्रकार म्हणाले, “धुरंधर, परंतु आपण व चंद्रकांत यांनी प्राणांची बाजी लावून महंताला उघडा पाडलात, तेव्हा आपल्यालाही त्याचे श्रेय आहेच.”
यशवंत म्हणाले, “मला दुसरा मार्ग नव्हता.
त्याच्या मूर्ख समजुतीप्रमाणे त्याला आणखी दोन बळी हवे होते.
त्यांनंतर त्याला अनेक भूतपिशाच्चांवर ताबा मिळणार होता.
आमचा दोघांचा एकच पत्ता पाहून त्याला थोडी शंका आली असावी पण त्याचा आपल्या संमोहन सामर्थ्यावर अनाठायी भरोसा होता.
शिवाय त्याने रिव्हॅाल्व्हर बरोबर ठेवले.
मी मात्र इन्सपेक्टर हिरवेंना विश्वासांत घेऊन मदतीला तयार रहायला विनंती केली होती.
त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून आम्हाला योग्य वेळी मदत केली, त्यांनाही ह्याचे श्रेय आहेच.
मला खात्री आहे की ह्या भोंदूबाबाला फांशीचीच शिक्षा होईल.”

-अरविंद खानोलकर.
वि.सू. – कथेतील प्रसंग आणि पात्रे सर्वस्वी काल्पनिक आहेत. कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..