नवीन लेखन...

अल्पोपहार (संक्षिप्त रूपांतरीत कथा २४)

मी नाट्यगृहात बसलो होतो.
तिने मला पाहिले व बोलावून घेतले.
मी तिला ह्यापूर्वी पाहिल्याला अनेक वर्षे झाली होती.
तिचे नाव सुध्दा माझ्या लक्षांत नव्हते.
तिच्या बोलावण्यावरून मध्यंतरात मी माझी जागा सोडून तिच्या बाजूला जाऊन बसलो.
तिने उत्साहाने बोलायला सुरूवात केली, “काळ किती भराभर जातो नाही ?
आपण प्रथम भेटलो त्याला अनेक वर्षे झाली, नाही कां ?
तुला आठवतंय आपण प्रथम भेटलो, तेव्हां तू मला भोजनाचं निमंत्रणच दिलं होतं !”
मला चांगलंच आठवलं.
वीस वर्षांपूर्वीची ती गोष्ट होती.
मी मुंबईत रहात होतो.
मुगभाटातील एका मित्राबरोबर खोली भागीदारीने भाड्याने घेतली होती.
जेमतेम दोन वेळचं जेवण आणि जागेचं भाडं भरण्याएवढीच माझी कमाई होती.
तिने माझं एक पुस्तक वाचलं होतं आणि पुण्याहून मला त्यासंबंधी पत्र लिहिलं होतं.
ती बंगाली होती पण पुण्यांत राहून तिला मराठी उत्तम येत असे.
तिचं नांव लिली होतं.
मी तिला धन्यवाद देणारं छानसं उत्तर पाठवलं होतं.
मग तिच्याकडून दुसरं पत्र आलं होतं.
ती मुंबईत येणार होती.
ती खरं तर पालघरला जाणार होती.
पण मला मान्य असल्यास मला भेटण्यासाठी मुंबईत थांबणार होती.
‘ताजमधे तिला अल्पोपहार देणं मला जमेल कां ?’ असंही तिने पुढे विचारलं होतं.
ताज म्हटल्यावर तुम्हाला कल्पना आलीच असेल.
परदेशी पाहुणे, मोठे सरदार, उद्योगपती, इ. लोकांचा राबता असलेल्या त्या हॉटेलात कधी पाय ठेवायचाही मी विचार केला नव्हता.
चैन म्हणजे छत्रेंच्या हॉटेलमधे मिसळ खाणे, एवढीच माझी धांव.
पण लिलीच्या स्तुतीने मी भाळलो होतो.
शिवाय एखाद्या स्त्रीला नकार कसा द्यायचा ते अजून शिकलो नव्हतो.
मी विचार केला की माझ्याकडे थोडी शिल्लक होती व नुकताच एका प्रकाशकाकडून अागाऊ रक्कम मिळाली होती.
साधारण तीन हजार रूपये माझ्याकडे होते.
त्यापैकी दोन हजारात ताजमधला अल्पोपहार (त्या काळच्या किंमतींनुसार) सहज होईल. राहिलेल्या हजारांत महिना कसाबसा भागवू.
चहा पिणे महिनाभर बंद करायला लागेल, इतकंच.
मी उत्तरादाखल तिला लिहिलं की ताजमधे तिला अल्पोपहार देणं सहज शक्य आहे.
“आपण येत्या गुरूवारी साडेबारा वाजतां ताजमधेच भेटू.”
आणि आम्ही भेटलो.
ताजमधेही वेगवेगळ्या वैशिष्ट्याची वेगवेगळी रेस्टॉरंटस आहेत.
पण सुदैवाने मी पसंत केलेलं इंडीयन रेस्टॉरंट तिने चालवून घेतलं.
मला वाटलं होतं तितकी ती तरूण नव्हती.
तिचं वय पस्तीशीच्या आसपास असावं.
सारखं हंसून ती आपले दात जरा जास्तच वेळा मला दाखवत होती.
असं निदान मला आपलं वाटलं.
ती खूप बोलत होती पण ती माझ्याबद्दल बोलू इच्छित होती.
त्यामुळे मी तिचा श्रोता व्हायला तयारच होतो.
एका सुटातल्या मॅनेजरने मेनु आणून ठेवला.
ताजमधे ऑर्डर घेणारे आणि पदार्थ आणून देणारे वेगळे होते.
हे मी प्रथमच पाहिले.
मी मेनुवरून नजर फिरवतांना उजवीकडच्या किंमतींवरून नजर फिरवू लागलो आणि मला धक्काच बसला.
माझ्या कल्पनेपेक्षा त्या बऱ्याच जास्त होत्या.
तेवढ्यात लिली म्हणाली, “मी ह्यावेळी फारसं काहीच खातं नाही.”
मी उसन्या औदार्याने म्हणालो, “अस्सं कसं ! कांहीतरी घे.”
“एखादाच पदार्थ घेईन मी. मी एकापेक्षा जास्त काही एकाच वेळी खात नाही.
मला वाटतं की लोक हल्ली फारच खातात.
असं कर, एक बोनलेस फीशची डीश सांग.”
मी आशा करत होतो की असा पदार्थ इथे नसेलच.
पण वेटर म्हणाला, “आहेत ना, अगदी ताजे मासे आणलेत थोड्या वेळापूर्वी.
एका डीशमधे दोन मोठ्या तुकड्या येतील.
फक्त तयार व्हायला थोडा वेळ लागेल.
बाईसाहेब, तोपर्यंत वेळ घालवायला काहीं आणू कां ?
एखादं ॲपेटायजर?”
ती म्हणाली, “नाही, एकावेळी मी एकच पदार्थ खाते पण जर जास्तच वेळ लागणार असेल तर कोणतंही ॲपेटायजर आणा आणि तुमच्याकडे माशाची गाभोळी खायला तयार असेल तर ती आणा. ती पचायला हलकी असते.”
माझ्या छातीत थोडी धडधड झाली.
हे सर्व अत्यंत महागडे पदार्थ होते.
मग मी माझ्यासाठी सगळ्यात स्वस्त पदार्थ म्हणजे बटाटे वडा पाहिला आणि सांगून टाकला.
ती म्हणाली, “तू चूक करतोयसं. उगीचच तेलकट आणि जड पदार्थ मागवू नको.
असलं खाणं खाल्ल्यावर काम कसं करणार ?
मला स्वत:चं पोट असं फुगेपर्यंत खायला नाही आवडत.
शिवाय ताजमधे बटाटेवडा काय खातोस ? दादरला काणेंकडे बटाटेवडा चांगला मिळतो.”
तिची खाण्याबद्दलची माहिती अद्ययावत होती.
मग कांही पिण्याचा प्रश्न आला.
ती म्हणाली, “दुपारच्या वेळी मी नाही ‘ड्रींक’ घेत.”
मी घाईघाईने म्हणालो, “मी ही नाही कांही घेत.”
माझ्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत ती म्हणाली, “अपवाद म्हणून सफेद वाईन घेते कधी कधी.
फ्रेंच वाईन असेल इथे बहुदा.
त्या इतक्या हलक्या असतात की त्रास तर होत नाहीच पण पचनाला मदत करतात.”
इथे तिने आपली दंतपंक्ती पुन्हा मला दाखवली.
आता मला विचारणे भाग होते, “काय मागवू तुझ्यासाठी ?”
आदरातिथ्याचा भाग म्हणून मी विचारले.
आता भावना आधीच गोठल्या होत्या.
“माझ्या डॉक्टरांनी मला शॅम्पेनशिवाय इतर मद्य घ्यायला मनाई केली आहे.” ती म्हणाली.
माझा चेहरा थोडा पांढरा पडला पण मी अर्धी शॅम्पेन मागवली व म्हणालो, “माझ्या डाॅक्टरांनी मला शॅम्पेन प्यायला पूर्ण मनाई केली आहे.”
तिने विचारले, “मग तू काय पिणार आहेस ?”
मी म्हणालो, “पाणी.”
मग तिने ॲपेटायजर संपवलं, माशांची गाभोळी खाल्ली, बोनलेस फिश खाल्लं.
ती मजेंत साहित्य, संगीत, कला, इ. बद्दल बोलत होती.
मी बिल किती येईल ह्याचा विचार करत होतो.
जेव्हा माझे बटाटेवडे आले, तेव्हा तिने मला पुन्हां चांगलेच खडसावले.
“अच्छा, म्हणजे तू जेवणाच्या वेळी अशा पचायला जड वस्तू खाऊन प्रकृती खराब करून घेतोस तर !
ही घोडचूक आहे तुझी.
तू माझ्यासारखं कां करत नाहीस ?
एका वेळी एकच पदार्थ खायचा.
तुला त्याने खूप छान वाटेल.”
वेटर परत मेनु घेऊन आला, तेव्हां मी म्हणालो, “मी फक्त एकच पदार्थ खातो.”
तिने वेटरला बाजूला बोलावले व मेनु घेत म्हणाली, “छे ! छे ! मी दुपारच्या जेवणावर काहीच दुसरं घेत नाही.
फक्त एक चावा, तो सुध्दा केवळ बरोबरच्या व्यक्तीशी संवाद चालू रहावा म्हणून.
आता मी आणखी कांही खाऊ शकत नाही फक्त जर ती शतावरी भाजीची स्पेशल डीश असेल तर चालेल कारण ती मुंबई शिवाय इतरत्र मिळत नाही.
मुंबईत येऊन ती न खाता जाणं म्हणजे मुंबईचा अपमान होईल.”
आता माझं काही खरं नव्हतं.
मुंबईच्या बाजारांत दहा रूपयाला एक जुडी मिळणारी भाजी मोठ्या हॉटेलात गेली की खूपच महाग होते असं मी ऐकून होतो.
मी वेटरला म्हणालो, “बाईसाहेबांना तुमच्याकडे शतावरीची भाजी आहे की नाही ते जाणून घ्यायचय.”
हे वाक्य मी ‘नाही’ वर जोर देत बोललो, जेणेकरून वेटरने “नाही” म्हणावे.
पण एखादा चमत्कार पाहून येईल तसे त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरले.
तो म्हणाला, “बाईसाहेब, आजच ताजी ताजी लांब, कोवळी आणि छानशी पाने आली आहेत.
तुम्ही नशीबवान आहांत.”
ती म्हणाली, “मला बिलकुल भूक नाही पण आता तुम्ही म्हणताच तर मी खाईन थोडीशी ! तूही घेणार ना !”
मी म्हणालो, “नाही. मी असली पालेभाजी कधीच खात नाही.”
ह्यावर ती म्हणाली, “मला माहित आहे की कांही जणांना पालेभाज्या आवडत नाहीत पण असे लोक कितीतरी पाचक आणि सत्त्वयुक्त अन्नाला मुकतात.”
आम्ही पालेभाजी शिजण्याची वाट पहात होतो.
मी भीतीने सर्द झालो होतो.
माझं आजचं बजेट तर केव्हाच कोलमडलं होतं पण आता महिनाभर फांके मारायला लागणार, हे नक्की झालं होतं.
निदान माझ्या खिशातले तीन हजार रूपये आताच बिल द्यायला तरी पुरे पडणार की नाही ही शंकाच होती.
जर बिल भरताना पाच पन्नास कमी पडले तर हा विचार भयानक होता.
माझ्या पाहुणीकडेच मला पैसे मागावे लागले असते.
मला ते आवडले नसते.
मी ठरवले की बिल जर खिशातल्या पैशांपेक्षा जास्त आले तर खिशात हात घालायचा आणि मोठ्याने नाटकी ओरडायचे, “माझे पाकीट मारले कोणीतरी!” मग तिलाच बिल भरायला सांगायचे.
तिच्याकडेही पैसे नसले तर मग माझे घड्याळ आणि चेन तिथे गहाण ठेवायची आणि मग पैसे आणून देऊन वस्तू परत घ्यायच्या.
तिच्यासाठी शतावरीची अमूल बटरमधे केलेली गरम गरम भाजी आली.
लांब कोवळी पाने छान सजवलेली होती.
ती निर्लज्ज बाई अगदी आरामात ते खाऊ लागली.
वाफाळलेल्या भाजीतील तो अमूल बटरचा वास माझ्या नाकांत शिरत होता.
शेवटी तिची भाजी संपली.
“कॉफी ?” मी विचारले.
ती शांतपणे म्हणाली, “हो, आईस्क्रीम आणि कॉफी.”
आता मी बिलाची काळजी करणे सोडले होते.
मी माझ्यासाठी कॉफी आणि तिच्यासाठी कॉफी आणि आईस्क्रीम मागवले.
आईस्क्रीम खाता खाता ती म्हणाली, “तुला ठाऊक आहे, मी नेहमी ह्या वाक्यावर विश्वास ठेवते की जेवणावरून उठतांना तुमची थोडी भूक शिल्लक पाहिजे. आणखी थोडं खाता आलं असतं हा विचार मनांत ठेऊन पानावरुन उठावं, असं म्हणतात.”
मी तिला घाबरत विचारले, “अजून भूक आहे तुला ?”
ती म्हणाली, “नाही, नाही. मी तर बाई लंचच्या वेळी फारसं खातच नाही.
मी सकाळी कॉफी घेते आणि नंतर डीनरनंतर घेते पण लंचच्या वेळी एकच पदार्थ खाते.
मी तुझ्यासाठी ते सांगत होते.”
मी म्हणालो, “अच्छा ! माझ्यासाठी होय.”
कॉफी आणि आईस्क्रीमचा समाचार घेऊन झाला न झाला, एवढ्यांत एक माझ्या दृष्टीने भयानक गोष्ट घडली.
एक ताजची टोपी घातलेला मुलगा एक फळांची टोपली घेऊन आमच्याच टेबलाजवळ आला. त्यांत रसाळ पीच फळे होती.
ती फार महाग असतात.
युरोपहून इथे येतात.
पण हा तर त्या फळांचा सीझनही नव्हता. ,म्हणजे ती खूपच महाग असणार.
ती मला म्हणाली, “हे बघ, तू वडे खाऊन पोट भरून टाकलयस.
तेव्हा तुला कांही आता खाता येणार नाही पण मी फक्त एकच पदार्थ खाल्ल्यामुळे मी ह्या एका फळाची चव घेणार आहे.”
तिने एक फळ उचललं व खायला सुरूवात केली.
बिल आलं आणि मी पैसे भरले तेव्हा माझ्या लक्षांत आलं की पुरेशी टीप द्यायलाही माझ्याकडे पैसे नाहीत.
मी उरलेले केवळ तीस रूपये टीप म्हणून ठेवले व आम्ही उठलो.
तिच्याकडे मी पाहिलं तर तिची हांवरी नजर त्या डीशमधल्या तीस रूपयांवर खिळलेली मला दिसली.
मी मनांत विचार करत होतो की खिशात दमडी नसतांना संपूर्ण महिना कसा काढायचा ?
बाहेर पडून निरोप घेताना ती म्हणाली, “माझं उदाहरण डोळ्यांसमोर ठेव. फक्त एकच पदार्थ दुपारी लंचच्या वेळी खा.”
मी म्हणालो, “मी त्याहीपेक्षा अधिक काही करीन. आज रात्री जेवणारच नाही.”
ती टॅक्सीत बसतां बसतां म्हणाली, “विनोदी आहेस तू ! खरंच ! भीषण विनोदी. बाय.”
त्यावेळी मला राग आला पण मी कांहीच करू शकत नव्हतो.
तिने माझा सहज बकरा बनवला होता. ताज हे कांही तिचे नेहमीचे स्वतःच्या पैशांनी जायचे ठिकाण नव्हते.
स्त्री दाक्षिण्य, मैत्री, लेखक म्हणून मला दिलेला भाव ह्या सर्वांमुळे मी माझी अक्कल गहाण टाकून माझी दोन तीन महिन्यांची कमाई तेव्हा खर्च करून बसलो होतो.
त्यानंतर मी तो महिना उधारी करून, उपास करून कसाबसा काढला होता.
पण आज लिलीकडे पहातांना मला थोडंसं समाधान वाटतंय कारण अल्पोपहाराला एकच पदार्थ खाणाऱ्या, तेव्हांची जेमतेम एकूणपन्नास- पन्नास किलो वजन असलेल्या लिलीचा, तिच्या खादाड आणि फुकटखाऊ वृत्तीमुळे, आता चांगला १३२ किलोंचा मोठा गोल गरगरीत भोपळा झालेला मला समोर दिसत होता.
— अरविंद खानोलकर.
मूळ कथा – द लंचॉन
मूळ लेखक – डब्ल्यू सॉमरसेट मॉम(१८७४ – १९६५)
तळटीपः मॉमचीच आणखी एक छोटी आणि हलकी फुलकी गोष्ट सादर केली आहे. परंतु त्यावरून मॉम ह्या लेखकाविषयी गैरसमज करून घेऊ नये. त्याच्या कादंबऱ्या व कथांवर एकूण ४६ चित्रपट आले व त्याला ग्रँड मॅन ऑफ ओल्ड लेटर्स असं म्हटलं जातं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..