नवीन लेखन...

जवळचं कृष्णविवर…

ताऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या गाभ्यातली ऊर्जानिर्मिती थांबते व ताऱ्याचा गाभा कोणत्याही अडथळ्याविना, स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणामुळे आकुंचन पावू लागतो. अतिवजनदार ताऱ्याच्या बाबतीत तर तो इतका आकुंचन पावतो की, त्याची घनता अनंत होते. या अनंत घनतेमुळे या वस्तूचं गुरुत्वाकर्षण इतकं प्रचंड असतं की, अशा वस्तूकडून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, ताऱ्याच्या गाभ्याचं रूपांतर कृष्णविवरात होतं.

आतापर्यंत सगळ्यांत जवळचं ज्ञात कृष्णविवर होतं, ते सूर्याच्या सुमारे अकरापट वस्तुमान असलेलं, शृंगाश्व तारकासमूहातलं कृष्णविवर. हे कृष्णविवर आपल्यापासून सुमारे तीन हजार प्रकाशवर्षं दूर आहे. म्हणजे आपण जर प्रकाशाच्या वेगानं प्रवास सुरू केला तर, या कृष्णविवरापर्यंत पोचायला आपल्याला तीन हजार वर्षं लागतील. परंतु अलीकडेच याहूनही जवळ असणारं एक कृष्णविवर शोधलं गेलं आहे. ते आपल्यापासून सुमारे एक हजार प्रकाशवर्षं दूर आहे. हे कृष्णविवर दूरदर्शी या दक्षिणेकडील तारकासमूहात सापडलं आहे. हा शोध युरोपियन सदर्न ऑब्झर्वेटरीच्या, चिलीतील ला सिला येथील २.२ मीटर व्यासाच्या दुर्बिणीतून निरीक्षणं करताना लागला.

या कृष्णविवराचा शोध लागण्यास कारणीभूत ठरला ‘क्यूव्ही टेलेस्कोपी’ या नावानं ओळखला जाणारा एक निळ्या रंगाचा तारा. हा तारा अंधूक असला तरी तो नुसत्या डोळ्यांना दिसू शकतो. प्रत्यक्षात हा तारा जोडतारा, म्हणजे दोन ताऱ्यांची जोडी आहे. या ताऱ्यांच्या कक्षा अभ्यासताना, संशोधकांच्या लक्षात आलं की या जोडगोळीतील एक तारा, एका वजनदार परंतु दुर्बिणीतून दिसू न शकणाऱ्या एका साथीदाराभोवती प्रदक्षिणा घालत आहे. ही प्रदक्षिणा चाळीस दिवसांत पूर्ण होते. या साथीदाराचं वस्तुमान, सूर्याच्या तुलनेत सुमारे चारपट असावं. संशोधकांच्या मते, इतका वजनदार परंतु अदृश्य असणारा तारा फक्त कृष्णविवरचं असू शकतो.

क्यूव्ही टेलेस्कोपी हा तारा आपपल्यापासून फक्त एक हजार वर्ष प्रकाशवर्षं दूर असल्यानं, हे कृष्णविवर आपल्यापासूनचं सर्वांत जवळचं कृष्णविवर ठरलं आहे. तसं पाहिलं तर एक हजार प्रकाशवर्षं हे अंतर काही कमी नाही. परंतु अब्जावधी प्रकाशवर्षं आकाराच्या या विश्वातील विविध अंतरांच्या तुलनेत ते नगण्यंच. संशोधकांच्या मते, आपल्या आकाशगंगेत अशी कित्येक लाख कृष्णविवरं अस्तित्वात असावी. इतकंच नव्हे, तर यातील काही कृष्णविवरं तर आता शोधल्या गेलेल्या कृष्णविवरापेक्षाही जवळ असावी. काय सांगावं, नजीकच्या भविष्यकाळातच अशा आणखी कृष्णविवरांचा शोध लागेलही!

— डॉ. राजीव चिटणीस.

छायाचित्र सौजन्य: European Southern Observatory

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..