नवीन लेखन...

उल्लू टिल्लू बेडूक (संक्षिप्त रूपांतरीत कथा २२)

ह्या राजा जेवढा विनोदप्रिय होता, तेवढी विनोदप्रियता असलेल्या दुस-या कुणा व्यक्तीबद्दल मी कधी ऐकलं नव्हतं. त्याचे जगणंच विनोदासाठी होतं असावं. त्याची मर्जी कमवायची असेल तर विनोदी गोष्ट त्याला ऐकवायची. त्यामुळे त्याचे जे सात मंत्री होते ते सगळे उत्तम विदूषक होते.
ते राजाची यथास्थित काळजी घेत व स्वत:चीही.
त्यामुळे ते चरबीने युक्त गोल गरगरीत झाले होते.
विनोद करून विदूषक जाडे होतात की जाडेच विदूषक होतात हा प्रश्न मला सुटलेला नाही पण रोड विदूषक बहुदा नसतोच.
त्यांच्या (मंत्र्यांच्या), ज्यांना तो भुतावळही म्हणत असे, विनोदाच्या दर्जाबद्दल तो एवढा आग्रही नव्हता.
त्याला विनोदाची रूंदी आवडायची आणि म्हणून तो लांबी खपवून घेई.
फार विचार करायला लावणारे विनोद त्याला आवडत नसत.
त्याला जुन्या लेखकांचा पुस्तकी विनोद फारसा आवडत नसे. खरं तर शाब्दिक विनोदाहून प्रत्यक्ष विनोद त्याला जास्त आवडे.
मी हे लिहितोय त्या काळांतही आपल्या पदरी डोक्याला उंच तिरकी टोपी घालणारे विदूषक बाळगणारे हौशी राजे होते.
ह्या विदूषकांकडून नेहमी विनोदी, कोटीबाज बोलणं अपेक्षित असे.
त्यासाठी राजांकडून त्यांची जेमतेम पोटाची सोय होई.
आमच्या ह्या राजानेही एक विदूषक ठेवला होता कारण त्याचे सात मंत्री आणि तो ह्यांच्या शहाणपणाशी समतोल राखायला मूर्खपणा गरजेचा होता.
त्याचा मूर्ख माणूस हा केवळ विदूषक नव्हता तर तो खुजा आणि पायांनी थोडा अधू होता, त्यामुळे राजाला त्याची किंमत तिप्पट वाटे.
अनेक राजे असे खुजे विदूषक पदरी ठेवत, ज्यांच्याबरोबर, आणि ज्यांना बघूनही हंसता येत असे.
नुसता मूर्ख विदूषक चालत असे, तिथे ‘उल्लू टिल्लू बेडूक’ सारखा तिप्पट मजा असलेला विदूषक मिळाल्याने राजा खूष होता.
‘उल्लू टिल्लू बेडूक’ हे नांव कांही त्याला पाळण्यांत मिळालेले नव्हते.
कांही मंत्र्यांनी मिळून सहमतीने त्याच्या उडी मारत चालण्याच्या पध्दतीवरून त्याला बेडूक हे नांव ठेवलं होतं. त्याला इतरांसारखं सरळ चालतां येत नसे. आंखूड व अधू पायांमुळे तो उडी मारल्यासारखा चालत असे.
लोकांना ते विचित्र चालणं पहायला मौज वाटे.
तो मूर्ख होता म्हणून त्याला उल्लू आणि खुजा होता म्हणून टिल्लू म्हणत.
राजालाही स्वत:चं घेरेदार पोट आणि सुजरं-फुगरं डोकं असल्याची खंत त्याला, पाहून कमी होई कारण ह्याशिवाय राजाच्या अवयवांत दोष नव्हता.
उल्लू टिल्लूला जरी असा पायांचा थोडा कमकुवतपणा दिला असला तरी भक्कम हात देऊन निसर्गाने त्याची भरपाई केली होती.
त्या हातांच्या जोरावर झाडांवर किंवा दोरखंडावर सरसर चढणे आणि कसरती करणे हा त्याचा छंद आणि व्यायाम होता. ते करतांना तो एखादी खार किंवा माकड ह्यांच्यासारखा वाटे.
उल्लू टिल्लूला नेमके कोणत्या प्रांतातून आणले होते ते नाही माहित पण तो कांही त्या राज्यांतला नव्हता.
एखाद्या दूरच्या प्रांतातील रानांत रहाणा-या जमातीचा तो असावा.
राजाच्या एका बलाढ्य सरदाराने, त्याला व त्याच्याबरोबरच त्याच जमातीतील एका खुज्या पण प्रमाणबध्द शरिर असणा-या नर्तिकेला, कुठून तरी जबरदस्तीने पकडून आणले होते व ती जोडी राजाला नजर केली होती.
त्यामुळे त्या दोघा बंदीवानांमधे घनिष्ठ मैत्री झाली होती.
उल्लू टिल्लू जरी खूप खेळ व मौज करी तरी व राजा त्याच्या मजेचा आनंद घेई तरी तो त्रिपुरीसाठी फार कांही करू शकत नव्हता. ह्याउलट त्रिपुरी खुजी असुनही सुंदर आणि नृत्यप्रवीण असल्यामुळे तिचा अनेकांवर प्रभाव होता व ती त्याचा उपयोग उल्लू टिल्लूला सोयी मिळण्यासाठी करत असे.
एका कोणत्या तरी सणाच्या दिवशी राजाने मुखवटा दिन पाळायचे जाहिर केले.
जेव्हा जेव्हा असा दिवस साजरा करण्यात येई तेव्हा उल्लू टिल्लू बेडूक आणि त्रिपुरी यांची मदत राजा घेई. विशेषत: उल्लू टिल्लू मुखवटे कोणते घालावेत, कसे रंगवावेत, कसे सादर करावेत, त्याबरोबर कपडे कोणते घालावेत, ह्याची फार चांगली आंखणी करत असे.
हे काम तो इतकं छान करत असे की त्याच्याशिवाय असा मुखवटा दिन साजरा करणच शक्य नव्हतं.
तो दिवस अखेर येऊन ठेपला. राजमहालातलं एक भव्य सभागृह त्यासाठी सजवण्यात आलं होतं.
ती सर्व सजावट त्रिपुरीच्या सूचनांनुसार व तिच्या देखरेखीखाली झाली होती.
कपडे आणि मुखवटे कोणते घालावेत ह्याचा विचार अनेकांनी महिनाभर आधीच सुरू केला होता.
त्यामुळे आज सर्वच सज्ज होते.
कुठेही अनिश्चितता नव्हती.
केवळ राजा व त्याचे सात मंत्री ह्याला अपवाद होते.
कारण सांगणे कठीण होते.
कदाचित हाही त्यांचा विनोद असावा.
अशीही शक्यता होती की ते सगळे इतके जाडजूड झाले होते की कोणताच वेश त्यांना शोभून दिसणे कठीण होते. मग शेवटचा उपाय म्हणून त्यांनी उल्लू टिल्लू आणि त्रिपुरी ह्यांना बोलावून घेतले.
दोघे छोटे मित्र राजाची आज्ञा मानून त्याच्या समोर हजर झाले तेव्हां राजा मद्य प्राशन करत आपल्या सात मंत्र्यांबरोबर बसला होता पण अस्वस्थ होता.
राजाला माहित होतं की उल्लू टिल्लूला मद्य आवडत नाही कारण त्या बिचा-याला मद्याच्या उत्तेजनाने वेड लागायची पाळी येई आणि वेडेपणा त्याला आवडत नसे.
पण राजाला आपल्या प्रत्यक्ष विनोदाचा अभिमान होता आणि त्यामुळे उल्लू टिल्लूला मद्य प्राशन करायला, मजा करायला, भाग पाडण्यांत त्याला विकृत आनंद मिळत असे.
उल्लू टिल्लू व त्याची मैत्रिण आंत येतांच राजा म्हणाला, “ये उल्लू बेडूक, हा मद्याचा चषक घे आणि तुझ्या नसलेल्या मित्रांच्या आरोग्यासाठी तो पिऊन टाक (उल्लू टिल्लूने इथे हलका सुस्कारा सोडला) आणि मग आम्हाला तुझी करामत दाखव. आम्हांला पात्रे रंगवायची आहेत पण अगदी नवीन, जराशी ‘हटके’ पात्रे असली पाहिजेत. आम्ही तीच तीच पात्रे रंगवून कंटाळलो आहोत. कांहीतरी नवीन सुचव. हे मद्य पी. म्हणजे तुला काही तरी सुचेल.”
उल्लू टिल्लूने नेहमीसारखे कांहीतरी विनोदी उत्तर द्यायचा प्रयत्न केला पण तो वाया गेला कारण तो उल्लू टिल्लूचा वाढदिवस होता आणि तिथे हजर नसलेल्या त्याच्या मित्रांच्या उल्लेखामुळें त्यांची आठवण होऊन त्याच्या डोळ्यांत पाणी तरळले.
राजाच्या हातचे मद्य पितांना त्यांत त्याच्या कटू अश्रुंचे कित्येक मोठे थेंब पडले.
राजा म्हणाला, “पहा, एक मद्याचा प्याला किती फरक पाडतो तें! तुझे डोळे आताच प्रकाशू लागलेत.
बिचारा उल्लू टिल्लू! त्याचे मोठे डोळे प्रकाशून चमकायलाही लागले होते कारण मद्याच्या त्या चषकाने क्षणात त्याच्या मेंदूवरच परिणाम केला होता.
त्याने चषक मेजावर ठेवला आणि सर्वांवरून अर्धवट वेडाच्या भरात नजर फिरवली.
ते सर्व राजाच्या प्रत्यक्ष विनोदाने खूष झालेले दिसले.
“आता कामकाजाकडे वळूया” राजाचा सर्वांत जाडाजुडा प्रधान मंत्री म्हणाला.
“होय, आम्हांला व्यक्तीरेखा हव्यात. मस्तपैकी नव्या व्यक्तीरेखा. हा, हा! आमची मदत कर.” आणि राजाचा हा विनोदच आहे हे लक्षांत घेऊन राजाबरोबर त्याचे सातही मंत्री हास्याच्या कोरसमधे सामील झाले.
उल्लू टिल्लू सुध्दा कसंनुसं हंसला.
राजा त्याला घाई करू लागला, “चल, चल, लौकर सुचव. तुझ्याकडे सुचवण्यासारखं कांही नाही कां?”
बुटका उल्लू टिल्लू कुठेतरी हरवल्यासारखा म्हणाला, “मी कांही तरी नवीन करण्याचा विचार करतोय.”
तो मद्यामुळे खूपच उत्तेजीत झाला होता.
“प्रयत्न करतोयसं? म्हणजे काय?” राजा रागाने ओरडला, “हा तुला आणखी मद्य हवंय म्हणून तू अशी लबाडी करतोयसं! घे, हे मद्य, पी.”
असं म्हणून राजाने पुन्हा चषक भरला व उल्लू टिल्लू पुढे धरला.
पण उल्लू टिल्लू नुसता श्वास रोखून त्या चषकाकडे पहातच राहिला.
तो राक्षस (राजा) ओरडला, “पी, मी सांगतो ना, नाहीतर….”
तरीही खुजा बावरलेलाच होता.
राजा रागाने काळानिळा झाला.
मंत्रीगणही चिडले.
त्रिपुरी प्रेतवत पांढरी पडली आणि पुढे होऊन राजाच्या चरणांवर डोकं ठेवून त्याला आपल्या मित्राला माफ करण्याची विनंती करू लागली.
राजा कांही क्षण तिच्या त्या मूर्ख धैर्याकडे आश्चर्याने पहात राहिला.
आपला राग जास्तीत जास्त वाईट शब्दांत कसा व्यक्त करावा हेही त्याला उमजेना.
शेवटी तोंडातून आवाजही न काढतां त्याने जोराने आपल्या पायांनीच तिला दूर ढकलली आणि त्याने तिच्या चेह-यावर हातातल्या चषकातले मद्य फेंकले.
बिचारी जेमतेम उभी राहिली आणि निःश्वास सोडायलाही भीत पूर्वीच्या जागी जाऊन उभी राहिली.
पुढलं अर्ध मिनिटं तिथे पूर्ण शांतता होती.
पीस, झाडाचं पान जरी पडलं असतं तरी आवाज आला असता, अशी शांतता खोलीच्या सर्व कोंप-यातून एकाच वेळी येणा-या एका दीर्घ कर्कश कांहीतरी घांसण्याच्या आवाजाने भंग पावली.
राजा उल्लू टिल्लूकडे रागाने वळून पहात म्हणाला, “तू हा आवाज कां करतो आहेस?”
उल्लू टिल्लूने आता स्वत:ला त्या मद्याच्या परिणामापासून पूर्णपणे सांवरले होते आणि तो राजाकडे स्थिर नजरेने पहात म्हणाला, “मी? मी कसा असा आवाज करीन?”
राजाचा एक मंत्री म्हणाला, “तो आवाज बाहेरून आल्यासारखा वाटला. एखादा पोपट पिंज-याच्या दांडीवर चोंच घासतो तसा आवाज होता.”
राजाला हा तर्क आवडला. तो स्वस्थ होत म्हणाला, “खरं आहे, पण हे जर तू म्हणाला नसतास तर मी शपथेवर सांगितले असते कीं ह्या नालायक उल्लू टिल्लूनेच तो आवाज केला.”
ह्या बोलण्यावर उल्लू टिल्लू हंसला (राजा पक्का विदूषक होता आणि कुणाच्याही हंसण्याला त्याची हरकत नसे) आणि उल्लू टिल्लूने आपले मोठे भीती वाटावेंत असे दांत दाखवले.
शिवाय त्याने सांगितले की तो शपथेवर आणखी हवं तेवढं मद्य प्यायला तयार आहे.
त्याच्या ह्या बोलण्याने राजा शांत झाला आणि आणखी एक मद्याचा चषक सहज पिऊन दाखवून उल्लू टिल्लू सरळ राजाशी मुखवटा दिन साजरा करण्याच्या योजनेबद्दल बोलू लागला.
मद्याचा आपल्यावर कांही परिणाम झालेला नाही हे सर्वांच्या ध्यानात येईल इतक्या शांतपणे उल्लू टिल्लू पुढे म्हणाला, “कसं तें मी सांगू शकत नाही पण ज्यावेळी महाराजांनी ह्या मुलीला पायांनी ढकलले आणि तिच्या तोंडावर मद्य फेकले आणि जेव्हां पोपट बाहेर विचित्र आवाज करत होता, त्यावेळीच माझ्या मनांत आपल्या आजच्या मुखवटा दिनासाठी एक वेगळीच कल्पना आली. मी ज्या राज्यांत पूर्वी होतो तिथे ती मुखवटा दिनाला नेहमीच करतात. इथे एकदम ताजी व नवी कल्पना वाटेल. पण दुर्दैवाने त्या खेळाला आठ लोक लागतात.”
राजा उत्साहाने ओरडला, “अरे आम्ही आठजणच आहोत ना! मी आणि माझे सात मंत्री मिळून आठ नाही कां होत? काय अडचण आहे?”
“आम्ही त्या खेळाला ‘आठ साखळबंद ओरांगउटांग’ असे म्हणतो आणि जर सर्वानी मनापासून नाटक केले तर खेळांत खूप मजा येते.” उल्लू टिल्लूने सांगितले.
राजा उठला व म्हणाला, “आम्ही सहज करू हे नाटक.”
“ह्या खेळाची खरी मजा तो बघतांना भ्यालेल्या बायका पाहून वाटते.” उल्लू टिल्लूने माहिती दिली
“मस्त, मस्त !” राजा व मंत्री एका सुरांत ओरडले.
“ठीक आहे. मी तुम्हांला ओरांगउटांग म्हणून सजवतो. इतके साम्य असेल की सगळे जमलेले मुखवटाधारी लोक तुम्हांला खरेंच वानर मानतील. ते एकाच वेळी आश्चर्यचकीत आणि भयभीत होतील.” उल्लू टिल्लूने पुढचा बेत सांगितला.
“ही कल्पना फारच अनोखी आहे. उल्लू बेडका, ह्यासाठी मी तुला वेगळं बक्षीस देईन.” राजा म्हणाला.
उल्लू टिल्लूने सांखळ्या आणवल्या व म्हणाला, “ह्या साखळ्या तुम्हाला बांधायच्या आहेत, त्या फक्त त्यांच्या आवाजाने गोंधळ निर्माण करण्यासाठी. तुम्ही आठही जण एकाच वेळेस पिंज-यातून पळालेले वानर असणार. राजेसाहेब, तुम्हाला कल्पनाही नाही येणार की शहरांतल्या चांगल्या लोकांच्या समोर एकदम आठ ओरांगउटांग सुटून आलेत आणि आपल्यावर आरडाओरड करत चालून येताहेत असा भास त्यांना झाला की काय प्रचंड गोंधळ माजेल!”
राजा म्हणाला, “नक्कीच मजेदार गोंधळ उडेल.” राजा व पाठोपाठ सर्व मंत्री ढोलूची योजना अंमलात आणायला उठले.
त्यांना ओरांगउटांग म्हणून सजवण्याची पध्दत अगदी साधी होती पण ढोलूच्या उद्दीष्टासाठी उपयुक्त होती.
ही कथा लिहिली जात्येय ह्या काळांत सुधारलेल्या जगांतील फारच कमी लोकांनी खरे ओरांगउटांग पाहिले होते. परंतु ढोलूने त्यांच्यावर घातलेली बंधनं ही रानटी प्राणी बांधून आणल्यासारखी वाटायला पुरेशी विचित्र आणि नैसर्गिक वाटत होती.
राजा आणि मंत्री ह्यांना प्रथम अगदी हालचाल करायला कठीण होईल असे घट्ट कपडे घातले होते.
मग त्यावर डांबर फासण्यांत आलं होतं.
मग एका मंत्र्याने पिसे लावायला सुचवले पण ढोलूने ती सूचना फेटाळून लावली.
त्याने त्याऐवजी धाग्यांच्या गुंडाळ्यांनी डांबरावर पूर्ण फेरे बांधून घट्ट करून टाकले.
मग एक लांब सांखळी प्रथम राजाच्या कमरेला बांधली.
मग दुस-याच्या मग तिस-याच्या. असं करत आठही जणांच्या कमरा एकाच सांखळीने एकत्र बांधल्या.
जेव्हा सर्वांना बांधून झाले, तेव्हां सर्व थोड्या थोड्या अंतरावर उभे राहिले.
ते गोलाकार उभे राहिल्यासारखे वाटत होते.
त्यांची साखळी चार पांच फूट अंतरावर उल्लू टिल्लूच्या हाती होती आणि बरेच शिकारी जसे प्राण्यांना विशेषत: चिपांझी व इतर जातीच्या वानरांचे फोटो काढून पाठवत तसेंच दृश्य दिसतं होतं.
राजमहालाचं सभागृह गोलाकार आणि भव्य होतं.
सभागृहाला एकच खिडकी होती ती मध्यभागी छताला वर होती.
तिथून खाली लोंबणारं एक प्रचंड मोठं झुंबर त्या सभागृहाची शान होतं.
ते झुंबर अर्थातच एका जाड सांखळीवर तोललेलं होतं आणि त्याचा तोल संभाळणारी चेनची दुसरी बाजू वरच्या खिडकीच्या बाहेर होती, त्यामुळे विशोभित दिसत नव्हती.
खोलीची बहुतांश सजावट त्रिपुरीने आपल्या कल्पनेने केली होती पण कांही बाबतीत तिने रचना आपल्या खुज्या मित्राच्या सूचनेप्रमाणे केली होती.
आजच्या दिवसापुरतं ते झुंबर काढून टाकण्यात आलं होतं.
मेणाचे सारखे पडणारे थेंब लोकांना त्रासदायक झाले असते.
त्यांचे वेश खराब झाले असते.
सभागृहात गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे लोकांना झुंबर होतं, त्या जागेखाली उभं रहाणं भागच पडलं असतं. मात्र उजेड पुरेसा असावा म्हणून मेणबत्त्यांचे दिवे भिंतीवर जागोजाग बसवले होते.
कांही ठीकाणी अनेक सहा मेणबत्त्या एकत्र धरणारे संच लावले होते. सुंदर स्त्री आकृत्या असलेले सुमारे साठ खांब सभोवार होते.
आठ ओरांगउटांग ढोलूच्या सूचनेप्रमाणे शांतपणे वाट पहात मध्यरात्रीपर्यंत थांबले होते.
मुखवटाधारी प्रेक्षकांनी सभागृह पूर्ण भरले की त्यांना बोलावणे येणार होते पण जसे बाराचे ठोके वाजतांच ते सर्व धांवू लागले पण सगळे सांखळ्यामुळे सभागृहात प्रवेश करत असतांनाच एकमेकांत अडकून पडले.
मुखवटाधारी प्रेक्षकांत एकदम उत्सुकतेची लहर सळसळली.
अगदी ओरांगउटांग नाही तरी कोणीतरी भयानक दिसणारे प्राणी पकडून आणलेत असे अनेक प्रेक्षकांना नक्कीच वाटलं.
त्यांच्या चीत्कारांतून ते कळतं होतं.
राजा खूष झाला.
अनेक बायकांनी किंचाळ्या फोडल्या.
राजाने सभागृहातली सर्व हत्त्यारं काढून ठेवली होती, नाही तर लोकांनी ती स्वसंरक्षणासाठी हाती घेतली असती. अनेकांनी सभागृहाबाहेर पळ काढायचा प्रयत्न केला पण राजाज्ञेप्रमाणे सर्व दारे बाहेरून बंद केलेली होती आणि चाव्या उल्लू टिल्लूच्या ताब्यांत होत्या.
गोंगाट अगदी वरच्या पट्टीत असतांना आणि प्रत्येकजण स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घेत असतांना झुंबराची मोकळी सांखळी खाली खाली येऊ लागली आणि जमीनीपासून तीन फुटांवर येऊन थांबली.
लवकरच राजा आणि त्याचे सात मित्र सभागृहात इकडे तिकडे एकमेकांना खेंचत शेवटी मधोमध झुंबराच्या सांखळीच्या जवळच्या मोकळ्या जागेतच पोहोचले.
ते अगदी जवळ जवळ होते.
उल्लू टिल्लू त्यांच्या मागून हलकेच तिथे पोहोचला होता.
त्याने झटकन त्यांच्या सामाईक साखळीचा जो भाग दोन्ही बाजूंना जोडून होता आणि सांखळीचा गोल करत होता तो हातात घेतला व त्याचा हूक पटकन वरून आलेल्या झुंबराच्या सांखळीत चपळाईने अडकावला आणि त्याच वेळी कशी कुणास ठाऊक पण ती सांखळी वर उचलली जाऊ लागली.
थोड्याच वेळांत ते वर उचलले गेलेले साखळबंदांनी जवळजवळ जखडलेले ओरांगउटांग जमीनीपासून कांही फूट वर उचलले गेले व एकमेकांकडे तोंड करून एकमेकांना चिकटून उभे असल्यासारखे दिसायला लागले.
मुखवटाधारी प्रेक्षक एव्हांना भीतीतून सांवरले गेले होते.
आता त्यांना ती एक अत्यंत आखीव गंमतीची योजना वाटू लागली होती आणि त्या ओरांगउटांगची मजा पाहून ते हंसू लागले होते.
“त्यांना मी पाहून घेतो.” उल्लू टिल्लू ओरडला. “मी पहातो आणि तुम्हाला सांगतो की ते ओरांगउटांग आहेत की आणखी कोण आहेत.
तो गर्दीतील लोकांच्या डोक्यावरून उड्या मारत एका मेणबत्ती संचाकडे पोहोचला व तो संच घेऊन परत एखाद्या माकडाप्रमाणे लोकांच्या डोक्यावरून परत मधे आला.
मग तो राजाच्या डोक्यावर चढला व तिथून झुंबराच्या सांखळीवर चढला. हातांतल्या दिव्याच्या प्रकाशांत खाली पहात तो पुन्हा ओरडला, “मी बघतो की हे कोण आहेत.”
सर्वजण ह्या संवादावर खदाखदा हंसत होते.
अगदी स्वत: ओरांगउटांगसुध्दा हंसत होते.
एवढ्यांत ती चेन खूपच म्हणजे तीस फूट वर खेंचली गेली आणि ते आठ ओरांगउटांग सभागृहांचे वरचे टोक आणि जमीन ह्याच्या मधेच लोंबकळू लागले. ह्याचा त्यांना नक्कीच धक्का बसला. उल्लू टिल्लू त्यांच्याहीवर सांखळीवर मजेत बसला होता आणि मेणबत्तीच्या प्रकाशांत ते कोण आहेत हे जणू निरखून पहात होता.
एका झटक्यात ओरांगउटांग इतक्या उंचीवर गेल्याने सर्वजण चकीत झाले होते व तिथे एक मिनिटं स्तब्धता पसरली.
पूर्वी राजाने त्रिपुरीला लाथ मारून ढकलल्यानंतर कराकरा कांहीतरी घासल्याचा आवाज झाला होता, नेमक्या तशाच आवाजाने ती शांतता आतां मोडली.
परंतु ह्यावेळी तो आवाज उल्लू टिल्लूने आपले मोठे दांत दांतावर घासल्याचा आहे हे स्पष्ट कळत होते.
राजा आणि त्याचे सात मंत्री मान वर करून त्याच्याकडे पहात होते, त्यांना तो आवाज करून दाखवत होता.
“अस्सं, आता माझ्या लक्षांत आलं हे कोण भामटे आहेत ते!” असं म्हणून त्याने पहाण्यासाठी हातांतली मेणबत्ती राजाच्या जवळ नेली आणि अंगावरच्या धाग्यांना लावली भराभर धागे आणि डांबर यांच्या ज्वाळांत राजा लपेटला जाऊ लागला.
आणखी एका क्षणांतच आठही जणांचे वेश आणि देह ज्वाळांनी वेढले गेले.
त्यांच्या किंकाळ्याहून मोठ्या किंकाळ्या जमावातले मुखवटाधारी फोडू लागले.
तें भीतीदायक दृश्य ते पहात होते पण ते असहाय्य होते. ते त्यांना कांहीच मदत करू शकत नव्हते.
उल्लू टिल्लू सांखळीवर जिथे बसला होता तिथे ज्वाळांची धग पोहोचू लागली.
तसा तो सरसर करत आणखी वर गेला.
त्याची चपळ हालचाल पहातांना जमाव पुन्हा स्तब्ध झाला.
ती संधी साधून उल्लू टिल्लू म्हणाला, “आता मला स्पष्ट दिसताहेत हे लोक कोण आहेत आणि काय लायकीचे आहेत. हा महान राजा आणि हे त्याचे सात मंत्री— असा राजा की जो पाय धरणा-या मुलीला लाथ मारून ढकलतो आणि हे सात मंत्री त्याला तसं करतांना उत्तेजन देतात. मी! मी तर उल्लू टिल्लू बेडूक! फक्त एक विदूषक, गंमती करणारा आणि ही माझी शेवटची गंमत.”
त्या आठही जणांच्या अंगाला लावलेल्या सर्वच वस्तु अत्यंत ज्वालाग्राही असल्यामुळे काही मिनिटातच, उल्लू टिल्लूचे बोलणे संपते न संपते तोच, त्याचे सूडाचे काम पूर्ण झाले होते.
आठही जणांचे मृतदेह साखळ्यांना लोंबत होते.
खुज्याने आपल्या हातांतील संच त्यांच्यावर फेकला आणि तो आरामात सांखळीवर चढून छताच्या गवाक्षांतून बाहेर गेला.
बहुदा त्रिपुरी, त्याने घेतलेल्या भयंकर सूडातील त्याची भागीदारीण, तिथे वाट पहात होती असावी.
तीं दोघं मिळून तिथून पसार झाली.
बहुदा तीं दोघं परत आपल्या स्वत:च्या जंगलातील राज्यांत परत गेली असावीत कारण नंतर दोघंही कोणालाच पुन्हा दिसली नाहीत.
— अरविंद खानोलकर.
मूळ कथा – हॉप फ्रॉग
मूळ लेखक – एडगर ॲलन पो (१८०९- १८४९)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..