नवीन लेखन...

ख्रिस्मसचे गीत (संक्षिप्त रूपांतरीत कथा १०)

मार्ले मेला होता. नक्कीच.
त्याबद्दल कांही शंकाच नव्हती.
खूप पूर्वी मार्ले आणि स्क्रूज दोघे धंद्यातले भागीदार होते.
मार्ले गेल्यानंतर कंजूष निर्दय म्हातारा स्क्रूज फर्मचा मालक झाला होता.
ती नाताळमधील संध्याकाळ होती.
आपल्या फर्मच्या जागेत स्क्रूज पैसे मोजत बसला होता.
बाहेर खूप थंडी होती.
त्याचं ऑफीसही कांही उबदार नव्हते कारण कोळसे खरेदी करणे त्याच्या चिक्कूपणात बसत नव्हते.
अचानक एक आनंदी माणूस स्क्रूजच्या दारांत डोकावला.
तो स्क्रूजचा भाचा होता.
तो म्हणाला, “मेरी ख्रिसमस, मामा. देव तुमचं भलं करो.”
स्क्रूज म्हणाला, “छ्य:! निव्वळ मूर्खपणा !”
भाचा फ्रेंड म्हणाला, “मामा, ख्रिसमस हा मूर्खपणा म्हणताय !
मला वाटते, तुम्हाला तसं म्हणायचं नाही.”
स्क्रूज म्हणाला, “मला तसंच म्हणायचय. ख्रिसमस म्हणजे तुम्हाला काय ?
पैसे नाहीत आणि बिलं भरायचीत.
एका वर्षाने म्हातारे होता पण एका तासानेही श्रीमंत होत नाही.
तुमचा ख्रिसमस तुम्ही साजरा करा, माझा मी करतो.”
दिलदार फ्रेड म्हणाला, “पण तुम्ही साजरा नाही करत.”
भाच्याने स्क्रूजला आनंदीत करायचा सुध्दा प्रयत्न केला आणि ख्रिसमसच्या दिवशी जेवायला येण्याचे आमंत्रण दिले.
पण स्क्रूजने नकार दिला आणि फ्रेडला बाहेर काढले.

फ्रेड गेला आणि दोन सद्गृहस्थ गरीब लोकांना ख्रिसमससाठी मदत म्हणून पैसे गोळा करायला आले.
कंजुष स्क्रूजने त्यांना एक पेनीसुध्दा दिली नाही.
वर तुच्छतेने म्हणाला, “तुरुंग नाहीत कां ? बेकार लोकांना सरकार काम देते ना !”
मग त्याने त्यांना बाहेर जायला सांगितले.
ऑफीस बंद करायची वेळ झाली तेव्हां स्क्रूज आपल्या कारकुनाला, बाॅब क्रॅचिटला उध्दटपणे म्हणाला, “उद्या तुला संबंध दिवस सुट्टी हवी असेल ? नाही कां ?”
कारकून म्हणाला, “ते चालेल तर ठीक आहे.”
स्क्रूज म्हणाला, “मुळीच नाही. तू काम न करता मला दिवसाचा पगार द्यावा लागेल. हे ठीक नाही.
पण जर तुला रजा हवीच असेल तर नंतर दुसऱ्या दिवशी लौकर येऊन काम करावं लागेल.”
क्रॅचिटने लौकर येण्याचे मान्य केले आणि दोघे घरी गेले.

स्क्रूज जुनाट घरात एकटाच रहायचा.
आसपास काळोख होता आणि रात्र भीतीदायक होती.
स्क्रूज कुलुप काढत असतांना त्याला दरवाजात मार्लेचा चेहरा दिसल्याचा भास झाला.
हे जरा विचित्रच होतं पण स्क्रूज बिलकुल घाबरला नाही.
‘मूर्खपणा’ असं पुटपुटत त्याने दार उघडलं आणि आंत गेला.
मग त्याने वळून दार बंद केले.
नेहमी तो दार बंद करत नसे.
त्याला थोडं सुरक्षित वाटलं आणि तो शेकोटीजवळ बसला.
अचानक स्क्रूजला खाली कोणीतरी जड सांखळी ओढतयं असा आवाज ऐकू आला.
तो आवाज आणखी आणखी जवळ येत होता आणि मग स्क्रूजला एक भूत दरवाजांतून सरळ आत येताना दिसले.
ते मार्लेचेच भूत होते.
त्याच्या अंगावर खूप लांब सांखळ्या होत्या.
त्या तिजोरीच्या पेट्या, चाव्या, पाकीटे, ह्यांच्यापासून बनवल्यामुळे खूप जड होत्या.
“तू कोण आहेस.” स्क्रूजने विचारले.
मी “मी जेकब मार्ले. तुझा व्यवसायातला भागीदार.”
स्क्रूज म्हणाला, “पण तू आता कशाला आला आहेस इथे ?”
मार्ले म्हणाला “मला असंच साखळ्या अंगावर घेऊन फिरावे लागतं.
मी जिवंत असतांना कंजूष होतो.
मी फक्त पैशाची काळजी घेतली माझ्या आजूबाजूच्या लोकांकडे पाहिलही नाही.
आता मी तुला सूचना द्यायला आलोय.
अजून तुला संधी आहे, एबनेजर.
उद्या सकाळच्या आत तुझ्याकडे तीन आत्मे येतील.
पहिला अगदी लौकर येईल, चर्चची बेल वाजण्या आधी.”
हे शब्द बोलून मार्लेचे भूत अदृश्य झाले आणि रात्रीची गाढ शांतता पुन्हा पसरली.
स्क्रूज कपडे न बदलताच सरळ बिछान्यात शिरला आणि लौकरच झोंपला.

तीन भूतातलं पहिलं भूत
जेव्हा स्क्रूज जागा झाला, तेव्हां सर्वत्र धुकं पसरलं होतं आणि खूप थंडी होती.
रस्ते सुनसान आणि काळोखे होते.
मार्लेचे भूत त्याच्या मनाला छळत होते.
खरं होतं की स्वप्न !
त्याला आठवलं की एक आत्मा त्याला एक वाजता भेटणार होता.
त्याने जागं राहून काय होतंय ते पहायच ठरवलं.
अचानक घड्याळात एकाच टोला वाजला.
प्रकाश चमकला आणि एका लहान हाताने त्याच्या बिछान्याभोवतीचा पडदा दूर केला.
पाहुणा स्क्रूजच्या समोरच आला.
ती व्यक्ती मुलासारखी लहान वाटत होती पण अगदी मुलासारखी नाही तर म्हातारीही वाटत होती.
त्याचे म्हातारपणाने पांढरे झालेले केस मानेवर व पाठीवर रूळत होते पण चेहऱ्यावर सुरकुतीही नव्हती.
स्क्रूजने विचारले, “तू कोण आणि काय आहेस.”
तो आकार म्हणाला, “मी तुझ्या गतकाळातील ख्रिसमसचे भूत आहे.
चल उठ आणि ये माझ्या बरोबर.
भूताने स्क्रूजला भूतकाळात नेले.
स्क्रूज तिथे लहान मुलगा होता.
तो तिथे इतर मुलांबरोबर खेळत होता.
मुले आनंदाने ख्रिसमसच्या झाडाभोवती फिरत होती.
जरी ती मुले गरीब असली तरी ती खूप मजा करत होती.
एका ख्रिसमसला स्क्रूज लहान असतांना छोट्या बहिणीने रागावलेल्या बाबांची समजूत काढून स्क्रूजला ख्रिसमसला घरी नेल्याचेही त्याला दिसले.
फ्रेड हा तिचाच मुलगा.

त्या आत्म्याने स्क्रूजला एका गोदामांत नेले.
तरूण स्क्रूजने तिथे उमेदवारी केली होती.
स्क्रूजला त्या ऑफीसात त्याचे तेव्हांचे मालक फेझविग आणि त्यांचे कुटुंब ह्यांच्याबरोबर तिथे साजरी केलेली ख्रिसमसपूर्व संध्याकाळ पहाता आली.
तिथे खाणे, संगीत आणि नाच चालू होता आणि प्रत्येकजण आनंदी होता.
मग त्या आत्म्याने त्याला दुसरीकडे नेले.
आता स्क्रूज थोडा प्रौढ होता.
तो एकटा नव्हता.
बरोबर एक सुंदर मुलगी, बेला, होती.
तिच्या डोळ्यांत अश्रू होते.
ती म्हणाली, “माझ्या प्रेमाची जागा दुसऱ्याने घेतलेली पहाणं फार दुःखद आहे.
तुझं हृदय मी व्यापलं होतं पण आतां तुझ्या सोन्याच्या प्रेमाने ते व्यापलंय.”
स्क्रूज तेव्हां म्हणाला होता, “पैशाशिवाय माणसाला किंमत नाही.”
तेव्हा ती म्हणाली, “आता आपण दूर जाणंच योग्य होईल.
तू जो मार्ग निवडलायस त्यात तू सुखी राहोस.”
हे दृश्य पाहून स्क्रूज म्हणाला, “हे आत्म्या, मला अाणखी कांही दाखवू नकोस.
मला घरी घेऊन चल. मला कां त्रास देतोस ?”
भूत म्हणाले, “आणखी एकच दृश्य.”
आता ते एका छान उबदार पण फार मोठी नसलेल्या खोलीत होते.
तिथे एक कुटुंब ख्रिसमस आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत होतं.
स्क्रूजने त्या कुटुंबातील स्त्रीला सहज ओळखले.
ती त्याची एकेकाळची प्रेयसी बेलाच होती.
तिचं लग्न झालं होतं, तिला मुलं होती.
तिचा नवरा हंसत म्हणाला, “बेला, आज दुपारी मी तुझ्या जुन्या मित्राला, स्क्रूजला, भेटलो.
मी त्याच्या ऑफीसवरून जात होतो आणि मी त्याला पैसे मोजतांना पाहिले.
मी ऐकलंय की त्याचा भागीदार मृत्यूपंथावर आहे आणि हा इथे ख्रिसमसला पैसे मोजत बसला आहे.
मला वाटते तो जगांत एकटा पडलाय.”
हे दृश्य पाहून स्क्रूज म्हणाला, “हे आत्म्या, मला परत ने. मी हे आणखी पाहू शकत नाही.”
त्याने भूताशी आपल्याला परत न्यावं म्हणून वाद केला.
थोड्याच वेळात तो परत आपल्या बिछान्यात होता आणि लगेच गाढ झोपी गेला.

दुसरे भूत
स्क्रूज घोरत असतांना परत मधेच जागा झाला.
त्याला जाणीव झाली की दुसरे भूत येणार होते आणि ते आले-वर्तमानातील ख्रिसमसचे भूत.
त्याचे केस कुरळे भुऱ्या रंगाचे होते, डोळे चमकत होते आणि त्याने साधा हिरवा फरचा गाऊन घातला होता.
ते अनवाणी होते आणि डोक्याला त्याने पवित्र पुष्पचक्र गुंडाळले होते.
दुसऱ्या भूताने शहरभर फिरवले.
कडाक्याची थंडी होती.
हवामान अजिबात चांगले नव्हते.
कांहीजण सांचलेला बर्फ ओढून काढत होते.
पण सर्वत्र आनंद होता.
लोक ख्रिसमसचे गीत गात होते.
ते स्क्रूजला बॉब क्रॅचिटच्या घरी घेऊन गेले.
बॉबचे घर अगदीच मामुली गरीबाचे घर होते.
स्वयंपाकघरांत बॉबची बायको ख्रिसमसचे खास जेवण बनवत होती.
तिची मुले आनंदाने बागडत होती.
दार उघडले आणि बॉब छोटुल्या टीमला खांद्यावर घेऊन आत आला.
टीम बॉबचा सर्वात छोटा मुलगा होता.
त्याच्या एका पायाभोवती लोखंडी चौकटीचा आधार दिलेला होता आणि त्याच्या एका कांखेत कुबडी होती.
बॉब म्हणाला, “आम्ही घरी परत येताना टीम मला म्हणाला, “मी पांगळा असल्याने चर्चमध्ये मला लोक पाहतील आणि त्यांना ख्रिसमसच्या दिवशी आल्हाददायक आठवण होईल की पांगळ्यांना चालते करणारा आणि अंधाना पहाते करणारा कोण होता.”
हे बोलतांना बॉबच्या आवाजांतला कंप जाणवत होता.
ख्रिसमसचा खाना तयार होता.
सर्वजण टेबलाभोवती बसले.
क्रॅचिट कुटुंब गरीब असल्यामुळे जेवण साधंच होतं.
परंतु प्रत्येकजण आनंदी होता आणि ख्रिसमसची भावना त्यांच्या हृदयांत भरलेली सहज दिसत होती.
त्या कुटुंबाला स्क्रूज फारसा प्रिय नव्हता.
परंतु बॉबच्या सांगण्यावरून सर्वांनी स्क्रूजचे भले चिंतीले.
“आपणां सर्वांना मी आनंदी ख्रिसमस चिंतीतो आणि देवाकडे आपल्यासाठी आशिर्वाद मागतो.
” बॉब क्रॅचिट म्हणाला.
“देव सर्वांचेच भले करो.” छोटा टीम म्हणाला.
तो आपल्या बाबांच्या अगदी जवळ बसला होता आणि बाॅबने त्याचा छोटा हात असा गच्च पकडून ठेवला होता की तो आपल्याला सोडून जाण्याची भीती त्याला वाटत होती.

स्क्रूजला फार वाईट वाटले.
त्याने आत्म्याला विचारले, “मला सांग. टीम जगेल ना ?”
भूत म्हणाले, “मला रिकामी खुर्ची आणि मालक नसलेली कुबडी दिसत्येय.
हे दृश्य जर बदललं नाही तर टीम नक्कीच जगणार नाही.”
हे ऐकून स्क्रूजला अतीव दुःख झाले पण भूताने त्याला त्याच्या भाच्याच्या घरी नेले.
फ्रेड आणि त्याचे मित्र ख्रिसमस मेजवानीच खूप मजा करत होते, खेळत होते.
स्क्रूजला ती मेजवानी खूप आवडली.
तिथेही सर्वच स्क्रूजला समजून घेणारे नव्हते.
पण फ्रेडने सांगितले की मी स्क्रूजला घरी बोलावले आहे.
आपण त्याच्या भल्याचाच विचार करूया.
त्याला आणखी तिथे थांबायचे होते पण क्षणात सर्व अदृश्य झाले आणि भूत स्क्रूजला पुढे घेऊन निघाले.
त्यांनी अनेक घरांना भेटी दिल्या.
त्यांनी आजारी लोक आनंदीत झालेले पाहिले,
दूर गेले असून मनाने कुटुंबाबरोबर असणारे लोक पाहिले.
त्या दिवसापुरते स्वतःला श्रीमंत समजणारा गरीब लोक पाहिले.
हे सर्व केवळ ख्रिसमसच्या प्रभावामुळे झाले होते.
अचानक स्क्रूजला भूताच्या पायाजवळ दोन लहान मुलांसारख्या आकृत्या दिसल्या.
एक मुलगा आणि एक मुलगी.
पण ते म्हातारे आणि भीतीदायक, एखाद्या छोट्या राक्षसासारखे वाटत होते.
स्क्रूजला धक्काच बसला.
त्याने विचारले, “आत्म्या, ही तुझी मुलं आहेत ?”
आत्मा म्हणाला, “ती मानवाची अपत्ये आहेत. तो मुलगा म्हणजे प्रत्यक्ष ‘अज्ञान’ आहे आणि मुलगी म्हणजे “हांव” आहे.
दोनांपासून सावध रहा.
पण मुलगा “अज्ञान” यापासून तर लांबच रहा.”
स्क्रूजने विचारले, “त्यांना ख्रिसमसमधे जागा नाही ?”
आत्म्याने स्क्रूजच्याच शब्दांत त्याला उत्तर दिले. “तुरुंग नाहीत कां ? बेकार लोकांना सरकार काम देते ना !”
घड्याळात टोले पडू लागले आणि वर्तमान ख्रिसमसचे भूत अदृश्य झाले.
शेवटच्या टोल्याला तिसरे भूत त्याच्याकडे येतांना दिसले.

तिसरे भूत
सावकाश आणि शांतपणे तिसरे भूत जवळ आले.
ते खूप उंच होते.
त्याने काळ्या वेषाने पूर्ण शरीर झांकले होते.
फक्त एक हात बाहेर होता.
स्क्रूजने विचारले, “तू अद्यापी यायचे असलेल्या ख्रिसमसचे भूत आहेस कां ?
मला सर्वांत जास्त तुझी भीती वाटते.
भूताने एका शब्दानेही उत्तर दिले नाही.
स्क्रूज खूप घाबरला.
भूताबरोबर तो शहरांत सगळीकडे फिरला.
काही लोक कुणा एका मृत माणसाबद्दल बोलतांना स्क्रूजने ऐकले.
ते लोक स्क्रूजच्या ओळखीचे होते.
स्क्रूजला त्यांच्याकडून जाणून घ्यायचे होते की ते कुणाबद्दल बोलत होते ?
पण भूताने त्याला तिथे थांबू दिले नाही.
भूताने स्क्रूजला परिचयाच्या सर्व रस्त्यांवर फिरवून आणले.
स्क्रूज इकडे तिकडे पहात होता आणि स्वतःला शोधत होता पण तो कुठेच दिसत नव्हता.
ते बॉब क्रॅचिटच्या घरी आले.
घरांतले सर्वजण अगदी शांत बसले होते.
एऱ्हवी चिवचिवाट करणारं कुटुंब गप्प होतं.

बॉब क्रॅचिट घरात येताच मुलं बाबांना भेटायला धांवली.
मुलांना त्याने जवळ घेतले.
मुलांनी आपले गाल त्याच्या गालांवर घासले.
ते जणू समजूत काढत होते.
“बाबा, काळजी करू नका. दुःखी नका होऊ.”
बायकोने विचारले, “तुम्ही आज तिथे गेला होता ? “
हो. तू सुध्दा यायला हवं होतं. तिथली हिरवळ पाहून तुला बरं वाटलं असतं.
पण पुढेही अनेकदा तुला ती जागा दिसेलच.
मी त्याला वचन दिलंय की दर रविवारी आम्ही तिथे येऊ.
माझे छोटे बाळ. माझा छोटुला.”
बॉबच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
भूत पुढे निघाले आणि स्क्रूजला घेऊन चर्चच्या मागे आले.
थडग्यांच्यामधे उभं राहून भूताने एका थडग्याकडे बोट दाखवले.
स्क्रूजने सावकाश जाऊन भूताने दाखवलेल्या थडग्यावरचे नांव वाचले तर ते त्याचेच होते.
“एबनेझर स्क्रूज”.
स्क्रूज रडत म्हणाला, “हे आत्म्या, मी आता पूर्वीचा राहिलो नाही.
ऐक माझे. मी आतापर्यंत जसा माणूस होतो तसा आता नाही रहाणार.
मला हे कां दाखवतोस ?
जर माझ्या भविष्यांत बदल होणार नसेल इतका मी वाया गेलो असेन तर काय उपयोग ?
मी ह्यापुढे माझ्या हृदयांत ख्रिसमसला सन्मान देईन आणि वर्षभर तो पाळीन.
मी आतां भूत, वर्तमान आणि भविष्य ह्या तिन्ही काळांत जगेन.
तीन्हीचे खरे मर्म माझ्या आचरणांत राहिल.
ते तिघे जे धडे शिकवतात ते मी विसरणार नाही.
मला सांग, मला माझं भविष्य बदलायचं आहे.
भीतीने स्क्रूजने आत्म्याचा हात गच्च पकडला.
पण तो अचानक बदलू लागला.
लहान लहान होऊ लागला.
शेवटी तो अगदी लहान होऊन बिछान्यात नाहीसा झाला.

आणि शेवट
तो बिछाना स्क्रूजचाच होता.
खोली त्याचीच होती.
मुख्य म्हणजे त्याच्याकडे वेळ होता आणि तो वेळ तो उत्तम प्रकारे वापरू शकत होता.
तो मनाशी म्हणाला, “मी भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ यांचा विचार करूनच जगेन.
मला माहित नाही की काय करायला हवं ?
पण मी एखाद्या देवदूतासारखा आनंदात आहे.
मला आजची तारीख, दिवस कांही आठवत नाही.
त्या आत्म्यांबरोबर किती काळ काढला कुणास ठाऊक ?”
तो बिछान्यातून बाहेर आला.
धांवत खिडकीकडे जाऊन ती उघडली आणि बाहेर वांकून त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका मुलाला विचारले, “हॕलो, आज कुठला दिवस आहे ?”
मुलगा म्हणाला, “आज ? आज तर ख्रिसमसचा दिवस आहे.”
स्क्रूज स्वतःशी म्हणाला, “आज ख्रिसमस. म्हणजे माझा ख्रिसमस चुकला नाही तर ! त्या आत्म्यांनी एका रात्रीत सगळं घडवलं !”
मग त्या मुलाला म्हणाला, “तुला ती कोप-यावरची पोल्ट्री माहित आहे ?
तिथे ती मोठ्ठी टर्की कोंबडी होती, ती आहे कां विकली गेली ?”
मुलगा म्हणाला, “ती माझ्याइतकी उंच वाटते ती ? ती तर अजून तिथेच लटकते आहे.”
स्क्रूज म्हणाला, “अस्सं ! मग जा आणि ती विकत घेऊन ये.
खरंच सांगतोय मी.
येतांना ती टर्की मी सांगीन तिथे पोहोचवेल अशा माणसाला घेऊन ये.
तुला मी ह्याबद्दल पूर्ण एक शिलींग देईन.
पांच मिनिटांत आलास तर अर्धा क्राऊन आणिक देईन.”
हे ऐकून मुलगा तीरासारखा धांवला.
“मी ती टर्की बॉब क्रॕचिटकडे पाठवीन.
ती छोट्या टीमच्या दुप्पट आकाराची आहे.”
स्क्रूज आनंदाने स्वतःशीच पुटपुटला.

मग त्याने छान वेश परिधान केला आणि तो रस्त्यावर आला.
जरा पुढे जाताच त्याला गरीब मुलांसाठी मदत गोळा करणारे ते दोन सद्गृहस्थ समोर दिसले.
स्क्रूज त्यांना म्हणाला, “सद्गृहस्थानो, कसे आहांत ?
मला वाटते मी काल तुमच्याशी चांगला वागलो नाही.
मला क्षमा करा.
मला तुमची क्षमा मागू द्या आणि माझ्याकडून…….”
असे म्हणून स्क्रूजने त्याच्या कानांत कांही सांगितले.
तो गृहस्थ उद्गारला, “खरंच ! बाप रे !
एवढं औदार्य तर मी कधी ऐकलंच नाही.
काय म्हणू मी तुम्हाला ?”
मग स्क्रूज चर्चकडे गेला.
रस्त्यांतून फिरला.
लोकांना पाहू लागला.
त्याला स्वप्नातही कधी वाटले नव्हते की आपल्याला असा आनंद कोणत्याही गोष्टीपासून मिळेल.
दुपारी तो आपला भाचा फ्रेड याच्याकडे गेला.
“फ्रेड, मी तुझा मामा स्क्रूज तुझ्याकडे जेवायला आलोय.
आंत येऊ ना ?”
फ्रेडने अर्थातच मामाचे आदराने आणि आनंदाने स्वागत केले.
मग सर्वांनी मजेंत मेजवानी केली.
दुसऱ्या दिवशी स्क्रूज लौकर ऑफीसात गेला.
बॉबला ऑफीसात उशीरा आलेला पकडायचा होता त्याला.
बॉब खरंच चांगला अठरा मिनिटे उशीरा आला.
बॉब येतांना दिसावा म्हणून स्क्रूजने मुद्दामच आपला दरवाजा उघडा टाकला होता.
बॉब दिसताच तो नेहमीप्रमाणे गुरगुरला, “एवढ्या उशीरा ऑफीसमधे येतोस म्हणजे काय ?
मी ह्यापुढे हे सहन करणार नाही.
म्हणून, म्हणून….”
जागेवरून उडी मारून पुढे येत स्क्रूज म्हणाला, “मी तुझा पगार वाढवत आहे. ख्रिसमस तुला आनंदाचा जावो, बॉब.”
बॉब क्रॕचिटला खूप आश्चर्य वाटलं.
आणखी अनेकांना, ज्यांनी ज्यांनी स्क्रूज एवढा बदललेला पाहिला, त्या सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
टीम मेला नाही.
स्क्रूज छोट्या टीमचा गॉडफादरच झाला.
स्क्रूज चांगला माणूस झाला.
चांगला मित्र, चांगला मालक, त्या जुन्या शहराने किंवा कोणत्याही जुन्या शहराने पाहिलेला किंवा जगाला माहित असलेला चांगल्यातला चांगला माणूस झाला.
स्क्रूजबद्दल नंतर नेहमी बोललं जाई की ख्रिसमस कसा साजरा करावा ते स्क्रूजला फार छान समजलं होतं.
असंच आपल्याबद्दल बोललं जावं, आपणां सर्वांबद्दल बोललं जावं.
जसं छोटा टीम म्हणतो, “देव आपल्या सर्वांच भलं करो.”

अरविंद खानोलकर.

मूळ लेखक – चार्लस् डीकन्स (१८१२-१८७०)

मूळ कथा – ख्रिसमस कॕरोल


तळटीपः चार्लस डीकन्स हा व्हीक्टोरीयन काळांतील सर्वांत सुप्रसिध्द लेखक. त्याचे लिखाण आजही वाचले जाते. आजही शालेय/महाविद्यालयीन अभ्यासक्रमात त्याच्या वाङमयाचा समावेश असतोच. त्याला स्वतःला मात्र जास्त शिक्षण घेतां आलं नव्हतं. त्याच्या अनेक कादंबऱ्या, कथा आणि एखाद-दोन नाटके प्रसिध्द झाली. त्याचे बरेच लिखाण प्रथम साप्ताहिक किंवा इतर नियतकालिकांमधून मालिका स्वरूपांत प्रसिध्द झालं. सामाजिक विषयांवर लिहिणारा लेखक म्हणून तो गाजला. अनेक कृतींचे चित्रपटांत रूपांतर झाले. पिकवीक पेपर्स, टेल आॕफ टू सिटीज, डेव्हिड कॉपरफील्ड, आॕलीव्हर ट्वीस्ट, ग्रेट एक्स्पेक्टेशन्स आणि वरील कादंबरी ख्रिसमस कॕरोल ह्या कांही त्याच्या प्रसिध्द साहित्यकृती. ख्रिसमस कॕरोल ही कादंबरी सर्वांत प्रसिध्द कृती म्हणावी लागेल. त्यांत स्क्रूजच्या माध्यमातून दिलेला संदेश फारच महत्त्वाचा आहे. कादंबरी अर्थातच मोठी आहे. परंतु ती कथेच्या स्वरूपांत मी आपल्यापुढे सादर केली आहे. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..