नवीन लेखन...

रत्नहार (संक्षिप्त रूपांतरीत कथा ७)

कनकबाला एका गरीब मध्यमवर्गीय घरांत जन्माला आली होती तरी तिला स्वत:च्या सौंदर्याची जाणीव होती.
नांवासारखीच तिची कांती सोनेरी होती.
गोल चेहरा, सुंदर डोळे, कुरळे केस, ह्या सर्वांनी आपणास सुंदर केलं आहे, हे तिला पक्कं ठाऊक होतं.
त्यामुळे तिने अगदी राजकुमाराशी नाही तरी निदान एखाद्या लक्ष्मीपुत्राशी लग्न करण्याचे स्वप्न नक्कीच पाहिले होते.
तिची स्वप्ने वडिलांच्या विरूध्द बंड करण्याची हिंम्मत देणारी नव्हती.
कुणा लक्ष्मीपुत्राशी स्वतःहून ओळख काढणं, त्याला प्रेमांत पाडणं हेही तिला जमलं नसतं.
स्वप्ने तिच्या मनांतच राहिली आणि वडिल हुंडा देऊ न शकल्यामुळे तिचा विवाह एका साध्या सरकारी कारकुनाशी झाला होता.
तिची रहाणी होती तशीच राहिली.
स्त्री कोणत्या घरांत जन्मली आहे ह्यापेक्षा तिचं सौंदर्य, तिची कोमलता, तिचा कमनीय बांधा, तिची मोहकता, तिचा स्वाभाविक डौलदारपणा, तिचे उत्स्फूर्त विलोभनीय वागणे आणि तिचं चातुर्य ह्या गोष्टी स्त्रीचं योग्यता ठरवतात आणि एखाद्या झोपडीतील मुलीलाही एखाद्या राजकुमारीच्याच पातळीवर आणून ठेवतात.
आपला विवाह आपल्या योग्यतेपेक्षा कमी दर्जाच्या घरांत झाला, ह्या विचाराने ती दु:खी असे.

तिचं लहान घर, त्याच्या भिंती, सामान्य फर्निचर आणि कळकट्ट पडदे, सगळंच तिला सलत होतं.
ती स्वतःला सर्व सुखसोयीनी सज्ज बंगल्यासाठी लायक मानत होती आणि अशा परिस्थितीत रहावं लागतं होतं.
घरांत काम करायला येणाऱ्या मुलीकडे बघताना तिची स्वप्ने परत जागी होत.
मऊ मऊ सोफे, झुंबरे, नक्षीदार पडदे, सगळे तिच्या डोळ्यांसमोर नाचू लागे.
अलंकार, सुवासिक अत्तरांच्या बाटल्या, इतर सौंदर्य प्रसाधने, मेजवान्या देणं आणि मेजवान्यांना जाणं, समाजांतील प्रतिष्ठीत व्यक्तींच येणं जाणं, हे सर्व हवं होतं तिला.
तिचा नवरा जेव्हा साध्या कालवणाला नांवाजत जेवत असे, तेव्हां तिच्या डोळ्यांसमोर चांदीच्या ताटांत चार चांदीच्या वाट्या दिसत.
तिच्याकडे चांगल्या सिल्कच्या साड्या, दागिने, थंडीला उबदार कोट, कांहीच नव्हते आणि नेमके तेच तिला प्रिय होतं.
तिला वाटे की आपण नटावं आणि आपलं त्यांतलं सौंदर्य पाहून सर्वांनी चकीत व्हावं, हेवा करावा.
तिची एक श्रीमंत वर्गमैत्रीण होती पण ही तिच्याकडे जाणं टाळत असे.
कारण तिच्याकडे जाऊन आल्यावर हिच्या दु:खाचा अतिरेक होऊन ती दिवसभर पश्चात्ताप, निराशा, यांनी रडत बसे.

एका संध्याकाळी तिचा नवरा विजयी मुद्रेने हातात एक पाकीट घेऊन घरी आला.
“बघ, तुझ्यासाठी काय आणले आहे !”
तिने घाईघाईने ते पाकीट हाती घेतलं आणि पाहिलं.
त्यांत पतिच्या कार्यालयातले लोक वसंतोत्सव करत त्याची निमंत्रण पत्रिका होती.
त्यांच्या नांवाचे वसंतोत्सवाचे निमंत्रण पाहून ती आनंदीत होईल असे पतिदेवांना वाटले होते.
परंतु तसे कांही झाले नाही.
तिने ते टेबलावर फेकले व म्हणाली, “काय करू मी याचे ?”
नवरा म्हणाला, “मला वाटलं तू खूष होशील. तुला कुठे जायची संधि मिळत नाही म्हणतेस ना ! तुला ठाऊक आहे, हा वसंतोत्सव दरवर्षीच होतो.
पण फक्त बड्या अधिकाऱ्यांना व मोठ्या लोकांनाच त्याचे आमंत्रण असते.
मी खूप खटपट करून ते मिळवलेय.”
कनकबाला म्हणाली, “आणि अशी लंकेची पार्वती बनून जाऊ तिथे ? कोणती वस्त्रे परिधान करू ?”
नवऱ्याने हा विचारच केला नव्हता.
तो पुटपुटला, “कां ? एऱ्हवी सणासुदीला वापरतेस ती छान आहेत. तू सुंदर दिसतेस त्यांत.”
तो पुढे बोलून शकला नाही.
त्याने पाहिले पत्नीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत आहेत.
“काय झालं ? काय झालं ?” तो विचारत होता.

थोड्या वेळाने तिने हुंदके प्रयत्नपूर्वक आवरले आणि म्हणाली, “कांही नाही.
माझ्याकडे ह्या उत्सवाला हजर रहायला साजेसा वेश नाही. मी नाही जाणार.
हे निमंत्रण तुमच्या एखाद्या मित्राला द्या, जो आपल्या पत्नीला माझ्यापेक्षा चांगल्या वेशांत नेऊ शकेल.”
पतीला परमदुःख झाले.
तो म्हणाला, “अशा कार्यक्रमाला साजेश्या परंतु एऱ्हवीही तुला परिधान करता येईल अशा वेशाची किंमत अदमासे किती होईल ?”
तिने मनाशी थोडा हिशोब केला.
तिला नकार मिळणार नाही आणि कारकुन नवऱ्याला असहाय्य वाटणार नाही अशी किती मोठी रक्कम मागता येईल ?
ती म्हणाली, “साधारण ५०० रूपये !”.
तो मनांत हळहळला.
त्याने नेमके तेवढेच पैसे स्वतःसाठी बंदूक घ्यायला जमवले होते.
मित्रांबरोबर येत्या सुट्टीत आसामला शिकारीला जाण्याचा बेत होता त्याचा.
मनांतील भाव दडवत तो म्हणाला, “ठीक आहे. पांचशे रूपयाची व्यवस्था मी करतो.
पण खरंच एक सुंदर वेश निवड स्वत:साठी.”

वसंतोत्सवाचा दिवस जवळ येत होता.
कनकबालाचा उंची वेश ही तयार होता.
पण कनकबालेच्या चेहऱ्यावर हंसू कांही दिसत नव्हतं.
ती अजूनही उदासच असे.
मग पती तिला म्हणाला, “प्रिये, तुझ्या मनासारखा वेश घेतला. वसंतोत्सवाचा दिवस जवळ येतोय आणि तू अशी म्लान कां ?”
ती म्हणाली, “मी खूपच दु:खी आहे कारण एवढ्या सुंदर वेशाबरोबर घालण्यासाठी माझ्याकडे एकही सोन्या-हिऱ्यांचा दागिना नाही.
मी अगदीच क्षुल्लक वाटेन तिथे. नकोच ते वसंतोत्सवाला जाणं.”
नवरा म्हणाला, “गुलाबाची फुले माळलीस तर पुरेसं आहे
की. मी आणतो छानसे गुलाब.”
पण तिला ती सूचना आवडली नाही.
“सर्व श्रीमंत बायकांमध्ये गरीब बाईच हंसू होतं.”
नवऱ्याला कांही तरी आठवलं आणि तो उद्गारला, “वेडीच आहेस तू. किती सोप्पं आहे.
तुझी ती श्रीमंत वर्गमैत्रीण बॅनर्जी आहे ना ! तिच्याकडे जा आणि मागून आण एखादा दागिना दोन दिवसांसाठी.
ती तुला नाही म्हणणार नाही.”
कनकबाला आनंदाने ओरडली, “खरंच की ! माझ्या लक्षांतच आलं नव्हतं.”

दुसऱ्याच दिवशी तिने वर्गमैत्रिणीला आपली गरज सांगितली.
सौ. बॅनर्जींनी आपले कपाट उघडले.
त्यांतून पेटी बाहेर काढून समोर ठेवत ती कनकबालेला म्हणाली, “तुला हवे ते घे ह्यांतून.”
कनकबाला वेगवेगळ्या छोट्या पेट्या उघडून बघू लागली.
सोन्याच्या बांगड्या, कडी, मोत्यांची माळ, इ. अनेक वस्तू त्यांत होत्या.
ती एक एक दागिना घालून आरशासमोर उभी राहून पाहू लागली.
पण तिला निवड करता येईना.
काय घ्यावे ह्या विचारांत असतांना तिची नजर निळ्या मखमली पेटीतील एका हिऱ्यांच्या हारावर पडली.
तत्क्षणी तिला तो आवडला.
तिने तो उचलला आणि गळ्यात घालून आरशात पाहिले.
स्वतःला पाहून ती खूष झाली.
तिचा आनंद गगनांत मावेना !
तिने थोड्या शंकित मनाने मिसेस बॅनर्जीला विचारले, “मी फक्त हा हार घेऊन जाऊ ?”
मिसेस बॅनर्जी म्हणाली, “हो तर. ने तो हवा तर.”
कनकबालेने उठून मैत्रिणीला मिठीच मारली आणि ती हार घेऊन घरी आली.

वसंतोत्सवाचा दिवस आला.
कनकबाला वसंतोत्सवाची राणी शोभली.
सर्वांत सुंदर, डौलदार, हंसरी आणि आनंदाने स्वतःवर खूष असलेली.
सर्व पुरूष तिच्याकडे अधूनमधून पहात होते.
तिची ओळख करून घ्यायला उत्सुक होते.
सर्व प्रतिष्ठीत आणि मान्यवर पुरूषांच लक्ष तिने वेधून घेतलं.
ती सर्वांबरोबर मिसळली.
सर्वांशी गोड बोलली.
तिच्या सौंदर्याचा विजय झाला होता.
तिच्या मनांत आता कोणताच विचार नव्हता.
सर्वांच्या कौतुकाचा, सर्वांच्या आकर्षणाचा आणि स्त्रियांच्या हेव्याचा विषय ठरल्यामुळे तीचं स्त्रीहृदय आनंदाच्या ढगांवर तरंगत होतं.
काळोख पडल्यानंतरच तो कार्यक्रम संपला.
तिचा नवरा दुसरीकडे कुठे तरी दोन तीन मित्रांबरोबर बसला होता.
तोही तिच्याबरोबर निघाला.
हवेत थोडा गारवा होता म्हणून त्याने शाल तिच्या खांद्यावरून टाकली.
ती शाल आपल्या इतर पोशाखाशी विसंगत आहे हे लक्षांत घेऊन ती तिथून भराभरा निघाली.
नवरा ‘जरा थांब, व्हिक्टोरीया आणतो’ म्हणत होता पण ती निघून आली.
दोघेही थोडे दूर नदीकडल्या रस्त्यावर आले. तिथे व्हिक्टोरीया ऐवजी टांगा मिळाला.
ती दोघं घरी परतली.

तीचं स्वप्न कांही काळ खरं झालं होतं.
नवरा आॅफीसला उद्या वेळेवर गेलं पाहिजे ह्याचा विचार करत होता.
अंगावरची शाल दूर करून ती आरशासमोर स्वतःचं सुंदर रूप न्याहाळण्यासाठी उभी राहिली.
अचानक तिच्या मुखांतून चीत्कार बाहेर पडला !
तो रत्नहार तिच्या गळ्याभोवती नव्हता.
नवऱ्याने विचारलं, “काय झालं ?”
ती वळली आणि म्हणाली, “मिसेस बॅनर्जीचा हार हरवला.
गळ्यात नाही माझ्या.”
नवरा म्हणाला, “पण हे केवळ अशक्य आहे.”
मग दोघांनी प्रथम तिच्या कपड्यांत कुठे रत्नहार पडलाय कां हे पाहिले.
मग त्याच्या कोटाचे खिसे पाहिले.
खोलीत सर्वत्र शोधले.
“तिथून बाहेर येतांना हार होता कां गळ्यांत ?”
नवऱ्याने विचारले.
ती म्हणाली, “हो, नक्कीच. मी निघताना हात लावला होता.”
तो म्हणाला, “रस्त्यात पडला असता तर आवाज झाला असता.”
टांग्यात नक्कीच नाही पडला.
आपण मागे बसलो होतो.
आपल्याला दिसला असता.
तो संपूर्ण दिवस नवऱ्याने हाराच्या शोधांत घालवला.
रस्ते पुन्हा पुन्हा धुंडाळले. सगळीकडे पाहिले.
पण रत्नहार मिळाला नाही.

नवऱ्याच्या सूचनेप्रमाणे तिने मिसेस बॅनर्जीला कळवले की हार आणखी चार दिवसांनी परत करते.
नवरा त्या चार दिवसांत पाच वर्षांनी वयस्क दिसू लागला.
तो म्हणाला, “आपण तिला तसाच नवा रत्नहार दिला पाहिजे.”दुसऱ्या दिवशी दोघं पेटीवर ज्याचे नांव होतं त्या सराफाकडे गेलीं.
तो म्हणाला, “फक्त पेटी माझी आहे. रत्नहार माझ्याकडला नव्हता.”
मग त्यांनी वेगवेगळ्या सोनारांची दुकाने धुंडाळली पण अगदी तसाच सुंदर रत्नहार कुठे मिळेना.
शेवटी मालवरच्या एका सोनाराकडे अगदी तसाच रत्नहार तिला दिसला.
किंमत पन्नास हजार रूपये.
खूप घासाघीस केल्यावर तो सोनार त्यांना ४५,००० रूपयांना तो रत्नहार द्यायला तयार झाला.
तीन दिवसांची मुदत घेऊन ती दोघं घरी आलीं.
नवऱ्याने गांवचा जमिनीचा तुकडा विकून बावीस हजार उभे केले.
मग जिथे जिथे कर्ज मिळेल तिथून कर्ज मिळवून दोघांनी कसेबसे बाकीचे २३,००० रूपये जमवून सोनाराकडून तो रत्नहार घेतला.
तो पेटीत ठेवून कनकबाला वर्गमैत्रिणीकडे गेली.
तिला धागधूग वाटत होती की हार बदललेला मैत्रिणीच्या लक्षांत आलं तर तिला खरे सांगावे लागेल.
परंतु मिसेस बॅनर्जीने तो उघडूनही न पहाता पेटीत ठेवला.

त्यानंतर कनकबालेची आणि तिच्या नवऱ्याची तारेवरची कसरत सुरू झाली.
सर्वांच कर्ज लौकरांत लौकर फेडायची त्यांची इच्छा होती.
त्यांनी ते घर सोडले.
दोन खोल्यांचेच छोटे घर घेऊन राहू लागले.
तिने मोलकरणीला कामावरून काढले व सर्व काम स्वतःचं करू लागली.
धुणी, भांडी, केरवारे, जेवण सर्व स्वतःच करू लागली.
बाजारातही स्वतः जाऊन पै न पै वाचविण्याचा आटापीटा करू लागली.
कांही कर्जे फिटत होती.
कांहींची मुदत वाढवून मिळत होती.
नवऱ्याने तर स्वतःचे उर्वरीत आयुष्यच जणू कर्जापायी गहाण ठेवलं होतं.
तो संध्याकाळीही दुसरीकडे हिशोब लिहिण्याचे काम करू लागला.
अशी दहा वर्षे गेली.
शेवटी त्यांनी सर्व कर्ज व्याज, चक्रवाढव्याजासकट फेडलं.
कनकबाला आता खूप प्रौढ वाटायला लागली.
दहा वर्षात तिचं वय वीस वर्षांनी वाढलं.
गरीब घरांतल्या इतर स्त्रियांसारखीच आता ती थकलीभागली दिसू लागली.
तिचं सौंदर्य हरवलं.
तिच्या हाताला घट्टे पडले होते.
कधीतरी तिला तो वसंतोत्सवाचा दिवस आठवे.
तिच्या मनांत विचार येई जर तो हार हरवला नसता तर आज ती कशी असती ?

एका रविवारी संध्याकाळी ती नदीकांठी फिरत होती.
अचानक तिथे तिला मिसेस बॅनर्जी दिसली.
ती अजूनही तरूण आणि आकर्षक वाटत होती.
कनकबाला विचार करत होती, हिच्याशी बोलावं की नको.
सर्व कर्ज फेडल्याने आता तिचं धैर्य वाढलं होतं.
ती मिसेस बॅनर्जीला सामोरी गेली, “भारती” तिने हाक मारली.
पण मिसेस बॅनर्जीने तिला ओळखलेच नाही.
“मी कनकबाला, तुझी वर्गमैत्रीण.”
तिने ओळख दिली.
मिसेस बॅनर्जी चकीत झाली.
“अरे हो ! पण ही काय दशा करून घेतली आहेस स्वत:ची ?”
कनकबाला म्हणाली, “गेली दहा वर्षे मी फार हालांत दिवस काढले आणि हे सर्व तुझ्यामुळे झालं.”
मिसेस बॅनर्जी म्हणाली, “माझ्यामुळे ? ते कसं ?”
कनकबालाने विचारलं, “तुला आठवतंय ? मी तुझ्याकडून एकदा रत्नहार घेतला होता !”
मिसेस बॅनर्जी म्हणाली, “ हो, आठवतंय की !”
कनकबाला म्हणाली, “तो रत्नहार माझ्याकडून हरवला गेला.”
मिसेस बॅनर्जी म्हणाली, “तू तर तो मला परत दिला होतास !”
कनकबाला म्हणाली, “हो. पण तो मी सोनाराकडून आणलेला दुसराच हार होता.
त्याची भारी किंमत द्यायला खूप कर्ज काढावी लागली आम्हाला.
गेली दहा वर्ष हालअपेष्टा सहन करून आम्ही दोघं ते कर्ज फेडत होतो.”
मिसेस बॅनर्जी चालता चालता मध्येच थांबली आणि म्हणाली, “म्हणजे तू माझ्या हाराच्या ऐवजी हार द्यायला हिऱ्यांचा रत्नहार खरेदी केलास ?”
कनकबाला म्हणाली, “होय. तुझ्या लक्षांत नाही आलं ना ! दोन्ही सारखेच होते.”
असं म्हणतांना ती सुखावली होती व तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे स्मित होते.
मिसेस बॅनर्जी खूप भारावून गेली व सहानुभूतीने कनकबालेचे हात हातात घेत म्हणाली, “अग कनकबाले, पण माझा हार नकली होता.ते हिरे खरे नव्हते.
फार फार तर त्याची किंमत पांचशे रूपये असेल.”

— अरविंद खानोलकर.

मूळ कथा द नेकलेस

मूळ लेखक – गाय द मोपुसॉंत (१८५०- १८९३)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..