नवीन लेखन...

आणि शेवट गोड झाला (माझी लंडनवारी – 37)

ऊमेश आणि परेश परत गेल्यावर साधारण ऑक्टोबरचा एक आठवडा व नोव्हेंबर पूर्ण महिना ऑफिसमधे एकटीच होते. पण ऍलन, नीलने फारसा एकटेपणा जाणवू दिला नाही.वेळोवेळी ते गप्पा मारत होते. लंच ब्रेकमधे कधी कधी खायला घेऊन जात होते. मार्टिन तर माझ्यासाठी फादरली फिगर होता. रोज आपुलकीने चौकशी करत होता, मला काही हवय का? एकटीने मॅनेज होतय का वगैरे.

जवळपास ३ आठवडे मी सडबरी टाऊनच्या घरात एकटी होते. आणि दिवसपण नेहमीसारखे संथ/शांत चालले होते. ह्या संथ दिवसांमधे एक दिवस अचानक एक आनंदाची लाट ऊसळली. ऑफिसने शैलेशचा व्हिसा काढण्याची तयारी दर्शवली. अर्थात्, खर्च सगळा आम्ही करायचा होता. मग काय पटापट सुत्रे हालली आणि शैलेशचे २ आठवड्यांसाठी लंडनला येण्याचे ठरले.

माझ्या आत्तापर्यंतच्या प्रोफेशनल करीयरच्या विजयाचे शिल्पकार माझे आई-बाबा आणि शैलेश होते. आई-बाबांच्या कष्टामुळे मी आज हे दिवस बघत होते. आणि शैलेशने वेळो-वेळी प्रोत्साहन देऊन,योग्य ठिकाणी सल्ले देऊन मला माझ्या मंजिलपर्यंत पोहचण्यासाठी हातभारच लावला होता. आई-बाबांचा नेमका पासपोर्ट नव्हता. पण निदान शैलेश तरी येऊ शकतो ह्या जाणिवेनेच मी खूप खुष झाले. तो १२ नोव्हेंबरला येणार होता. माझी दिवाळी छान साजरी होणार होती.

गुरुवार, ११ नोव्हेंबरचा दिवस संपता संपेना.४ वाजता शेवटी मी कंटाळून निघालेच जाताना मार्टिनकडे हाफ डे सुट्टी मागितली. ‘I want to welcome my husband early morning at Heathrow, so I will come post lunch in office.’ असं मी सांगितल्या सांगितल्या तो ऊखडलाच. ‘Why do you want to come to the office? Take a leave and enjoy long week end with him.’ असं म्हणत, त्याने माझ्या आनंदात भर टाकली. त्या दिवशी मी हॅरोला संतोषकडे रहायला गेले. कारण तिथून सकाळी लवकर बस मिळते एअर पोर्टला जायला आणि मी एकटी सडबरीला खूपच कंटाळले असते. तरीही वेळ मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होता. माझी अस्वस्थता संतोषच्या लक्षात आली. अचानक तो म्हणाला, चल्, आपण पिक्चर बघायला जाऊयात थिएटरमधे! तेव्हढाच तुझा वेळ जाईल. ईथे थिएटरमधे हिंदी पिक्चर लागतात. ऊद्या भारतात ‘वीर-झारा’ प्रर्दशित होतोय, तो आज इथे ११ च्या शोला रिलीज करतील. हे सगळं पूर्णच नवीन होतं मला. मी पण एक्साइट झाले. आणि लक्ष डायव्हर्ट झाले. मग  जेवणे करुन मी, संतोष, गोपी, बालाजी, रितेश असे आम्ही जवळच्या थिएटरमधे गेलो. तसं चालत अर्धा तासाचा रस्ता होता.पण सरावल्यामुळे चालताना थंडी  जाणवत नव्हती. चकाचक थिएटर. तिथे ‘वीर-झारा’ ची तिकीटे काढली. हेमंत कुमारचे संगीत खूप श्रवणीय होते. रात्री २ वाजता परत आलो आणि सकाळी ६ वाजता मी एअरपोर्टसाठी बसमधे होते. थोड्याच वेळात शैलेश समोरुन येताना दिसला आणि माझा डोळ्यांवर विश्वासच  बसेना. हे खरं आहे की स्वप्न? ज्या सगळ्या सुख-सोयी मी ऊपभोगल्या, जे सगळं पाहिलं, त्याचा शैलेशही आता साक्षीदार होणार! माझ्यासाठी हेच मोठ्ठ रिवॉर्ड होतं. शैलेशला घेऊन कॅब बुक करुन आम्ही सडबरीला आलो. माझं सराइतपणे लंडनमधे वावरणं बघताना शैलेशच्या डोळ्यात प्रचन्ड कौतुक आणि अभिमान होता. आजू-बाजूचा परिसर, घरं सगळं बघून शैलेशची पहिली रिएक्शन होती, हे सगळं तुझ्या आई-बाबांनी बघायला हवे. त्यांना किती अभिमान वाटेल तुझा! मलाही त्यांच्या आठवणीने भरुन आले.

पुढचे २ आठवडे अगदी स्वप्नासारखे भुरकन गेले. दिवाळी होतीच. शैलेशबरोबर माझ्या ग्रुपमधल्या लोकांच्या नातेवाईकांनी फराळ, गिफ्टस् काय काय पाठवलं  होतं. शैलेशची पण आता सगळ्यांची चांगली ओळख झाली. शैलेशने वेळोवेळी मला सपोर्ट केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. आणि ‘तू इथे आल्यामुळे आमची लवकर सुटका झाली’ असे चिडवत खेळीमेळीत त्याला आपलेसे केले.

शेवटचे दोन आठवडे मी ऑफिसला जात होते आणि शैलेश लंडन फिरुन ग्रीन  पार्कला मला आणायला येत होता. मी तशीही त्याला लिस्ट दिलीच होती. त्यानेही तिथली ट्रेन सिस्टिम/तिकीट सिस्टिम लवकर आत्मसात केली आणि रोज सकाळी माझ्याबरोबर बाहेर पडून आख्खं लंडन पालथं घातलं. लॉर्डस्, रिजन्टस् पार्क, ट्रॅफल्गर स्क्वेअर, हाइड पार्क, केसिंगटन गार्डन जे काही आम्ही पाहिल होतं ते सगळं त्याने पाहिलं. त्याने ब्रिटीश म्युझिअमला पण भेट दिली. पण त्याला काही भवानी तलवार दिसली नाही. त्यामुळे माझी म्युझिअमला भेट न देण्याची बोच जरा कमी झाली.

काही ठराविक ठिकाणी मला त्याची प्रकर्षाने आठवण झाली आणि त्याच्याबरोबर पुन्हा ते क्षण जगावेसे वाटले अशा स्थळांच्या यादीत कोहीनूर हिरा,लॉर्डस्, थेम्सची सफर, ग्रीनविच व्हिजिट अशी काही नावं होती. हे सगळं मला त्याच्याबरोबर पुन्हा अनुभवायला मिळालं. ‘देवा काय देऊ तुला? भाग्य दिले तू मला!’ अशीच काहीशी माझी स्थिती होती.

आता आमचा परत जायचा दिवस आला. शेवटच्या दिवशी ऑफिसमधे मला सगळ्यांनी सरप्राईज पार्टी दिली. टोकन ऑफ रिमेंब्रन्स म्हणून माझा ऑफिसमधला फेव्हरेट कॉफी मग आणि लंडन सोव्हेनिअर दिले. हे सगळं खूपच सरप्राईंजिंग  आणि ओव्हरव्हेलमिंग होतं मला. न कळत डोळे पाणावले. माणसं वेगळी, माती वेगळी. रहाणीमान वेगळे. पण माणुसकीचा ओलावा, भावना सगळीकडे एकच!!

ईकडे आमच्या ग्रुपने ही मला सेंड ऑफ पार्टी दिली. परत एकदा मन,डोळे भरुन आले. खूप काही मिळालं होतं मला दोन्ही व्हिजिटमधे. माझं आणि शैलेशचं फ्लाईट एकाच दिवशी होतं पण तो आधी पोहचणार होता. त्यामुळे मुंबई एअर पोर्टवर तो मला रिसीव्ह करायला होताच. मुंबईच्या विमानात बसल्यावर डोळ्यासमोर आई-बाबांनीऊमेशबरोबर जुलैमधे पाठवलेली चिठ्ठी आली.  त्यातला काही भाग ईथे नमूद करते.

आई: “माझ्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचे क्षण तू जगत आहेस. मन लावून काम कर भरपूर प्रदेश पाहून घे. खूप एन्जॉय कर. पण आपले संस्कार नको विसरुस.”

मण्या तुला आशिर्वाद देते या काव्यातून,

श तुझे सदा दिग्ंतरा जावो

शी सुर्यतिथे सदा तळपते राहै

श्रीमाता तुज नित्य प्रसन्न होवो

शैशव तुझे गोड लडिवाळ बाळे

लेणेच जीवनी बहूमुल्य मी ल्याले

क्ती युक्तीचे गुज तुज कथिले

पाहूनी तव भरारी डोळे माझे निवती

टीकवी संस्कार तू या जगती

हानपण घेऊनी द्यावी दुजा महती’

तुझी आई,

स्मिता

तिचे कवितारुपी आशिर्वाद मी पुरेपूर जगण्याचा प्रयत्न केला, हे एक समाधान बरोबर घेऊन मी चालले होते.

बाबांचे चिठ्ठिमधले शब्द डोळ्यांसमोर धावत होते. त्यांनी लिहिले होते,

“कै.दादा व कै. बाई ह्यांच्या मनात आम्हां चौघांपैकी कोणी तरी लंडनला जावे असे होते. आमच्या चौघांपैकी कोणी जाऊ शकले नाही. त्यांचे खट्याळ वासरु (तू) त्यांचे हे स्वप्न पूर्ण करु शकली. अशावेळी त्यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.”

खरचं! त्यांच्या आशिर्वादाने, त्यांनी लावलेल्या आणि आई-बाबांनी कष्टरुपी खत-पाणी घातलेल्या कल्पवृक्षची फळे चाखत होते मी.

‘कल्पवृक्ष नातीसाठी, लावूनिया…!’ इथे आजोबा म्हणायला हरकत नाही, ह्या ओळी मनात रुंजी घालत होत्या. त्या विचारात माझी लंडनवारी सुफळ संपूर्ण झाली.

— यशश्री पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..