नवीन लेखन...

मुक्काम पोस्ट –  रॉयल कोर्ट अपार्टमेंट (माझी लंडनवारी – 9)

गाडी बोगद्यातून बाहेर आली आणि चित्रांमध्ये मांडून ठेवल्यासारखे लंडन शहराचे जवळून दर्शन झाले. टिपिकल इंग्लिश कन्स्ट्रक्शनची घरे दिसायला लागली.

सुंदर चर्चेस्, घरांचे एक एक मजली किंवा दोन मजली बांधकाम, प्रत्येक घराभोवती बाग, आखीव रेखीव मांडणी, घराला मोठ्या चौकोनी काचेच्या खिडक्या, काचेला दुधी रंग आणणारे आतले तलम पांढरे पडदे, उतरती छपरे,ब्राऊन रंगाच्या भिंती, त्यावर गोळ्या गोळ्यांचे बारीक टेक्चर किंवा आयताकार छोट्या विटांचे टेक्सचर. वा!  सगळं कसं नीट मांडून ठेवल्यासारखे! भातुकलीच्या खेळामधली घरे आणून मांडली असे वाटत होते.  डोळे भरून हे दृश्य बघत होते.

मधेच एकदा ट्रेन स्लो झाली आणि अर्ध्या किंवा एका मिनिटासाठी थांबली. तेवढ्यात ही अनाउन्समेंट झाली, सॉरी फॉर लेट!  बट,देअर इज नो सिग्नल फॉर ट्रेन !’अनाउन्समेंट संपेपर्यंत ट्रेन चालू सुद्धा झाली.  किती शिस्त असावी??

थोड्यावेळातच पॅडिंग्टन आले. मी माझा सगळा लवाजमा घेऊन उतरले.  मी  नेमकी ट्रेनच्या एका टोकाला होते. तो पुर्ण प्लॅटफॉर्म मला माझे सामान घेऊन चालायचं होते. दुसऱ्या टोकाला तिकीट पंच करतात तिकडे परेश येऊन थांबणार होता. मग तिथून तो मला माझ्या हॉटेलवर सोडणार होता. ट्रेन मध्ये माझे तिकीट चेक झालेच होते, पण तिकिट पंच करणे हा काय प्रकार आहे हे मला माहिती नव्हते. ‘पुढचं पुढे बघू या’ असे म्हणून मी खाली उतरले.

प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर ती मोकळी हवा घेत होते. मुंबई एअरपोर्ट मधे शिरताना मी मोकळ्या हवेत श्वास घेतला होता आणि आता पंधरा-सोळा तासांनी खुल्या हवेत श्वास घेत होते. हवा खूप आल्हाददायक  होती.  छान थंड होती पण थंडी नव्हती. त्यामुळे मन भरून श्वास घेतल्यावर खूप फ्रेश वाटले. आता मी सामान घेऊन चालायला सुरुवात केली. कोणाला काही विचारायची गरज पडली नाही. सर्वत्र व्यवस्थित मार्गदर्शक बोर्ड होते.  मी ‘ वे आउट’ या बोर्डला समोर ठेवून चालत राहिले. फार पूर्वीपासून इंग्रजांनी डोळे उघडे ठेवून चालायला शिकवले. जगात कुठे काय चालले आहे, हे डोळे उघडे ठेवून त्यांनी पाहिले. त्यामुळे ते जगावर राज्य करू शकले.  कुठे काय प्रकार चालतात? काय कमी आहे? याबाबत ते कायम जागरूक राहिले. प्रथमपासूनच जागृकता, समय सूचकता, वेल प्लॅनिंग आणि प्लॅनिंग प्रमाणे एक्झिक्युशन  ही मला काही प्रर्कषाने  जाणवलेली वैशिष्ठ्ये! अगदी थोड्याच वेळात मला त्याची प्रचिती आली. सगळीकडे इतक्या व्यवस्थित डायरेक्शन असतात, की तुम्ही चुकायचे म्हटले तरी चुकत नाहीत.  मी माझे सामान घेऊन ‘वे आऊट’ च्या दिशेने चालत राहिले.

पहिलाच दणका मला माझ्या ट्रॉली बॅग ने दिला. प्लॅटफॉर्म खडबडीत असल्यामुळे ट्रॉली बॅग चे व्हिल तुटले तशीच रडतखडत शेवटी तिकीट पंच त्या जागी पोचले.

तिकीट पंचिंग मशीन पाशी तुम्ही तुमचे तिकीट पंच करायचे आणि ते व्हॅलिड असेल तर अडसर ओपन होतो. नाही तर रेल्वे अटेंडंट तुम्हाला पकडतो.  अर्थात चोर-पोलिस मधला पकडणं नाही तर तो नम्रपणे तुम्हाला सांगतो, तुम्हाला किती पौंडचे तिकीट घ्यावे लागेल. मी मशीन जवळ पोहोचले आणि माझ्या पुढच्या माणसाची कृती बघितली. त्याने तिकीट एका होल मधून आत घातले आणि ते दुसऱ्या होल मधून बाहेर आले. तसा तो अडसर बाजूला झाला आणि त्याने गेट क्रॉस केले. मीही त्याचे अनुकरण केले. मी क्रॉस करून गेले, पण माझे काही सामान मागेच राहिले. मग तो रेल्वे अटेंडंट(गार्ड) लगेच आला आणि त्याने मला माझे सामान काढून दिले. त्याचे आभार मानून मी पुढे गेले.

आता घड्याळात सव्वा आठ वाजले होते. परेश साडेआठ वाजता तिथे येणार होता. मला वाटले आता दहा पंधरा मिनिटे वाट पाहावी लागेल, पण तो वेळेआधीच म्हणजे बरोबर सव्वा आठला तिथे हजर होता. मला बघून स्वत:च पुढे आला.आम्ही प्रत्यक्ष प्रथमच एकमेकांना बघत होतो. मेलवर कॉन्टॅक्ट होते, पण प्रत्यक्षात भेट झाली नव्हती. सुट्टीच्या दिवशी एवढ्या लांबून मला फक्त हॉटेलमध्ये ड्रॉप करायला आला होता. तो किती लांब राहतो हे मला वीकेंडला त्याच्याकडे गेल्यावर समजले.

सामान घेऊन आम्ही आता बाहेर रस्त्यावर आलो. सगळे रस्ते एकदम स्वच्छ होते. छान छान कन्स्ट्रक्शन्सनि आमचे स्वागत केले. आम्ही टॅक्सी केली आणि टॅक्सीवाल्याला ‘रॉयल कोर्ट अपार्टमेंट’ ला घ्यायला सांगितले. दोन मिनिटात हॉटेल आलो.  ‘चार पाऊंड फक्त’  हे फक्त जास्तच त्रासदायक! दोन मिनिटाच्या रस्त्यासाठी मी दोनशे तीनशे रुपये मोजले होते. अजूनही बाहेर व्यवस्थित उजेड होता. हॉटेल बाहेरुन खूप छान होते. आत मधे ही तितकेच स्वच्छ नेटके आणि ॲट्रॅक्टिव्ह होते.  परत ब्रिटिश पाहुणचाराची साखर पेरणी वाली वाक्य, यांची देवाण-घेवाण झाली आणि ’ रूम नंबर 305 मॅडम’असे म्हणत रिसेप्शनिस्टने किल्ली माझ्या ताब्यात दिली. इथेही संवादाची सुरुवात ‘गुड ईव्हिनींग’ आणि शेवट ‘गुड नाईट’ या शब्दांनी झाला.

परेशने रूमवर असणाऱ्या इमर्जन्सी गोष्टी दाखवल्या. त्याच्या कार्डवरूनच घरी शैलेशला आणि आई बाबांना फोन केला. मी व्यवस्थित पोहोचल्याचे त्यांना समजताच त्यांनाही खूप आनंद झाला. सर्व दाखवून आणि फोन झाल्यावर परेश लगेच निघून गेला, कारण सकाळी साडे आठ वाजता तो मला परत न्यायला येणार होता.

परेश गेल्यावर मी रूमवर एक नजर टाकली. आता पुढचे काही आठवडे माझा मुक्काम इथेच असणार होता.

छोटासा छान, सेल्फ कंटेंन्ड फ्लॅट असावा तशी होती ही रुम!  एका साईडला आरसा त्याच्याखाली टेबल, एका बाजूला टीव्ही, एका बाजूला वॉर्ड रोब, एका बाजूला  2 सिंगल बेड, साईड टेबल, छोटे डायनिंग टेबल आणि ३ खुर्च्या.

एक छोटासा पॅसेज किचनकडे आत मध्ये जात होता. त्याच्या राइट साईडला रेस्ट रूम ! सगळ्यात गंमत मला वाटले की, किचन रेस्ट रूम पेक्षा छोटे होते. किचन म्हणजे एक प्लॅटफॉर्म – एक दीड फुट, अर्धा फूट मध्ये मोकळी जागा, त्याच्यापुढे पलिकडे छोटे बेसिन. किचनची विड्थ म्हणजे प्लॅटफॉर्मच्या पुढे उभा राहून एखाद्या व्यक्तीला स्वयंपाक करता येईल एवढेच!

त्याच किचनमध्ये ओव्हन, टोस्टर, कॉफी मेकर, फ्रिज अशी  किचन अप्लायन्सेस आणि किचन प्लॅटफॉर्म इतक्या नीटपणे अरेंज केले होते की इतके छोटे किचन असूनही  कंजस्टेड वाटले नाही.

फ्रिजमध्ये मिल्क कोन होते  जे मी दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिले. परेश गेल्यावर मी थोडे फार सामान काढून जागेवर लावले. देवाचे फोटो टेबलावर ठेवले. फ्रेश झाले आणि मस्त कॉफी घेऊन झोपावं या विचारात टेबलावरच्या बकेट मध्ये कॉफी पाऊच, शुगर पाऊच शोधले. मिल्क पावडर पाऊच मला मिळालेच नाहीत.  त्यामुळे मी तसंच पाणी पिऊन झोपले.

साडेनऊ वाजता मी झोपले होते तेंव्हा बाहेर उजेड होता. तरी दिवसभराच्या दगदगीमुळे मला शांत झोप लागली….

 — यशश्री पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..