नवीन लेखन...

मन नावाचे भूत.. (माझी लंडनवारी – 28)

सोमवार 23 ऑगस्ट 2004

अल्पर्टनहून येतानाच आम्ही एक आठवड्याचे सामान घेवून आलो होतो. त्यामुळे सोमवारी आमचा नेहमीसारखा दिवस सुरू झाला. फक्त ऑफिस 1-1.5 तासाच्या अंतरावर असल्यामुळे दिवस लवकर सुरू करावा लागला. आज आम्हाला तिघांना संध्याकाळी शेजारच्या ऑन्टींकडे चहाला जायचं होतं. नेहमीप्रमाणे ऑफिस संपवून आम्ही 5-5.30 ला घरी आलो. फ्रेश होऊन शेजारी गेलो. त्यांच्यासाठी थोडे स्नॅक्स नेले. त्यांनीही खूप छान स्वागत केलं. घराचं इंटिरियर मिक्स होत. ब्रिटिश, आफ्रिकन आणि साऊथ इंडियन ह्याच कॉम्बिनेशन. तिने तिच्या मिस्टरांची ओळख करून दिली. चहा आणि छान छान कुकीज् दिल्या. त्यांच्या आधीच्या पिढ्या मंगलोरच्या होत्या. पण गेले कित्येक वर्षात किंवा पिढ्यांत कोणीच भारताशी कनेक्टेड नव्हत. त्यांचे कोणी नातेवाईक नव्हते तिथे. अस त्यांच्या बोलण्यातून कळलं. आमचीही त्यांनी आस्थेने विचारपूस केली. आणि जाता जाता एक टीप पण दिली.

ती छोटी टीप आमच्या आयुष्यात इतकं मोठ्ठं टेन्शन घेवून येईल ह्याची तेंव्हा आम्हाला पुसटशी कल्पनापण आली नाही. त्यांनी जाता जाता सांगितले, काही महिन्यांपूर्वी तुम्ही राहता त्या घरात चोरी झाली होती. चुकून किचनच दार उघडं राहिला होत आणि इथे जी मुलं रहात होती, त्यांचे पासपोर्ट आणि काही वस्तू, कपडे चोरीला गेले होते. तर तुम्ही बाहेर जाताना दार आणि खिडक्या नीट बंद करून जात जा.

झालं, आधीच मला नुसत्या लॅचच टेन्शन होत त्यात आता ही भर! परेश आणि गँगला ही गोष्ट माहीत नव्हती वाटतं. त्यांनी आम्हाला सावध करून शेजार धर्म निभवला होता, पण अस वाटल कुठून चहा प्यायला आलो. आलो नसतो तर हे कळलंच नसतं आणि टेन्शन आल नसतं! अज्ञानात सुख असतं हेच खरं!

आम्ही घरी आल्याबरोबर सगळी दारं खिडक्या बंद आहेत का नाही हे पाहिलं. मग जरा निर्धास्त झालो. 1-2 दिवस गेले आणि त्या गोष्टीचा असर पण ओसरला होता. नेहमीचे रूटीन सुरू झाले.

बुधवार उजाडला, आज उमेश ऑफिसमधून परस्पर संतोषकडे रहायला गेला होता. मी आणि प्रिया दोघीच घरात होतो. बाहेर थंड हवा होती. म्हणून आम्ही बॅकयार्ड मध्ये बसून मस्त कॉफीचा आस्वाद घेत होतो. सहज वर लक्ष गेले तर निकच्या बेडरूमची खिडकी उघडी दिसली. ती बॅक साइडला होती. मला आधी वाटलं, निक आला असेल. पण बाहेर तर गाडी नव्हती.

झालं, माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. एक तर त्याच्या रूममध्ये आम्ही जात नव्हतो, मग ही खिडकी कोणी उघडली? आणि आता पण कोणी आहे का त्याच्या रूम मध्ये?

मी प्रियाला माझी शंका बोलून दाखवली आणि तिथेच सगळा घोळ झाला.

बाहेर आत्तापर्यंत चांगलाच अंधार पडला होता. सर्वत्र सामसूम होती. आम्ही घाई-घाईत आत आलो. किचनच दार बंद केलं. बाहेरच्या वातावरणाचा व्हायचा तो पारिणाम झाला होता. दोघीही जरा घाबरलो होतो. पण दोघींची कारणं वेग-वेगळी होती.

मला प्रिया अजिबात वरती जाऊन द्यायला तयार नाही. तिच्या डोक्यात काही तरी हॉन्टेड गोष्ट आहे तिथे, नाही तर आपण न उघडता ती खिडकी उघडली गेली कशी? आणि माझ्या डोक्यात चोर तर नाही वरती?

ह्या सगळ्यात भर म्हणून ते वुडन फ्लोअरिंग अधे-मधे कर्-कर् वाजत होतं. आम्ही मशीन लावलं होत, त्याच्या स्पिनमुळे निकच्या रूममध्ये लाकडी दांडू पडण्याचा आवाज आला, थोड्या वेळाने कोणी तरी चालतं जातंय वरून असा पावलं वाजल्यासरखाही आवाज आला. आता आमच्या दोघींची खात्री पटली की वरती कोणीतरी नक्की आहे. आणि आम्ही झोपण्याची वाट बघत आहे. काय करायचं काही सुचेना!

माझ्या डोक्यात खूप शंका यायला लागल्या. मी RCA मध्ये असताना, रोज संध्याकाळी रिसेप्शनमधे बसून पेपर वाचत होते. त्यात मला रोज एक तरी थेफ्ट आणि मग स्टॅबिंगची बातमी दिसत होती. ते सगळं आत्ता आठवायला लागलं. काय चोरायचयं ते चोरुन ने बाबा पण स्टॅबिंग नको! इतक्या टोकाचे विचार मनात यायला लागले. अर्थात हे प्रियाला बोलून दाखवू शकत नव्हते. ती आधीच रडकुंडीला आली होती. कसं बसं तिला समजावून मी किचन मध्ये जाऊन मोठ्ठा चाकू घेवून आले आणि एक काचेचा ग्लास आणून ठेवला. चोर खाली आला तर आपण तयारीत असावं.

वरून येणारे कर्-कर् आवाज अजूनही चालूच होते. हॉलचे दार आतून बंद करून घेतले. आम्ही दोघी डायनिंग टेबल जवळ बसून राहिलो. मी चोराच्या विचारात आणि ती भुताच्या….

पण असं बसून तरी किती वेळ राहणार? परेश आणि ग्रुप लांब रहात होता.त्यामुळे त्यांना फोन लावण्यात अर्थ नव्हता. शेवटी आम्ही संतोष आणि उमेशला फोन केला.आणि त्यांना चाललेला प्रकार सांगितला. तेही दोघे बिचारे लगेच निघाले आम्हाला मदत करायला!

अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर दोघं उगवले. ते आल्यावर मला जरा पाठबळ मिळालं आणि मी नॉर्मलला आले. प्रिया अजून त्या भुतावली मधून बाहेर नव्हती आली. ती त्यांनाही अडवायला लागली. पण तिला संतोषच्या ताब्यात देवून मी आणि उमेश जिन्यात आलो. मी एका हातात चाकू आणि एका हातात ग्लास ठेवलाच होता.

हळूच निकच्या रूमसमोर आलो. त्याच्या बेडरूमच दार तर बंद होतं. मनाचा हिय्या करून आम्ही ते दार उघडल आणि लाईट लावला. हुश्श!!!…… कोणीही नव्हते आतमध्ये!!

तरीही सावधगिरीने बेडखाली वाकून, कपाट उघडून पहिले. कोणीही नव्हते. मग आधी बेडरूमची खिडकी बंद केली. तिथेच खाली मला मॉप पडलेला दिसला.  म्हणजे मगाशी दांडू पडल्याचा आवाज आला तो ह्या मॉपचा होता तर आणि मी समजले होते की चोराच्या हातातला दंडुका पडला की काय?

हा मॉप इथे कसा आला? खिडकी कोणी उघडली? अशा सर्व प्रश्नाची उत्तरे अजूनही अनुत्तरीतच होती. आम्ही तिथून उरलेल्या सर्व बेडरूमस् आणि वॉश रूमस् चेक केल्या. सगळं काही ठिक-ठाक होतं. मग खाली हॉलमध्ये आलो. तिथे दोघांना सांगितलं कोणी नाही वरती. मी खिडकी बंद केली.

इतकं वाईट टेन्शन आत्तापर्यंत कधी आलं नव्हत. तरीही मूळ प्रश्न तसेच होते. लगेच प्रिया उसळून म्हणाली,”देख यश, मैने कहा ना कोई तो है उपर.. ये घर ठीक नाही है..”. आता माझ्या मनातली चोराची भीती पूर्ण गेली होती आणि माझा ब्रेन नॉर्मल काम करायला लागला होता. आम्हाला सगळ्यांनाच ह्या प्रश्नाची उत्तरे हवी होती. निक आम्ही नसताना जरी येवून गेला असेल तरी तो मॉपिंग का करेल? मग कोण?

आम्ही परेशला फोन केला, आणि घडलेला वृत्तान्त सांगितला. कोण येऊन गेलं असेल? परेशने आमच्या शंकांना पूर्ण विराम लावला. तिथे जे बाहेरून शिकायला येतात, ते रोजचा खर्च भागवण्यासाठी अस एकेक कॉलनी मध्ये जाऊन साफ सफाईची काम करतात. जी हे घर साफ करायला येते, ती एक कोरियन विद्यार्थिनी आहे. आणि शनिवारीच ती येऊन गेल्यामुळे, लगेच बुधवारी येईल अस त्याला वाटलं नव्हत. त्यांच्या कॉलेज रूटीन मधून त्यांना जसा वेळ मिळतो तसे ते आठवड्यातून एकदा येऊन जातात. आणि शिफ्टींगच्या नादात तो ही गोष्ट आम्हाला सांगायची विसरला. हे आधी सांगायचं ना? मला अस काही असतं अशी थोडी जरी कल्पना असती तर इतकं मोठं  रामायण घडलं नसतं. थोडा तर्क लावता आला असता. मी मनातल्या मनात चरफडले. ‘तिनेच चुकून खिडकी उघडी ठेवली असेल आणि मॉप ही तिथेच विसरली असेल, असं परेश म्हणताच, ‘अशी कशी विसरली? किती मोठा घोळ झाला ना इथे!’ ह्या एकाच वाक्यातून माझा राग, टेन्शन, सुटकेची भावना ह्या सगळ्याचा उद्रेक बाहेर पडला.

इथे तोपर्यंत संतोषचं प्रियाला समजावून सांगणं चालूच होतं. वास्तुशास्त्र, वाईट शक्ती आणि काय काय…!!  मनातल्या मनात हसून मी ते सोडून दिले. उगीच परत वाद-विवाद नकोत!

मला एक गोष्ट प्रर्कषाने जाणवली, पॅनिक न होता, थोडा शांतपणे विचार केला असता तर, इतकं टेन्शन नसतं आलं!!!!

मनातल्या विचारांच्या भुताने थैमान घालून आजचा दिवस अविस्मरणीय ठरवला होता!

— यशश्री पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..