नवीन लेखन...

माफी

शेवटी नको ते झाले. खूप प्रयत्न केले. डॉक्टर झाले. वैद्य झाले. अंगारे-धुपारे झाले. ज्यांने जे सांगितले ते केले. पण श्रीधरपंत या आजारातून काही बाहेर येऊ शकले नाहीत. चालताना पायातली शक्ती गेली असे वाटू लागले आणि वर्षभरात हळूहळू सर्व शरीरावरील स्नायूंचे नियंत्रण कमी होत गेले. जवळजवळ बेडरिडन झाले की त्यांना छोट्या-छोट्या हालचालीही करणे मुश्किल झाले. एमायोट्रफिक लॅटरल स्क्लेरॉसिस (amyotrophic lateral sclerosis) (ALS)अशा विचित्र रोगाने त्यांना पछाडले होते. हळूहळू मृत्यूकडे वाटचाल करीत आहोत, हे त्यांच्या मनानेही स्वीकारले.

चिन्मय बारावी सायन्सच्या अभ्यासात व्यक्त आणि सोनाली सातव्या वर्गाची परीक्षा यंदा देणार होती. तशी मुक्ता मनाने खूप खंबीर आणि संसार सांभाळायला सशक्त आहे, असे त्यांचे मन आपल्या पत्नीविषयी त्यांना ग्वाही देत होते.

किती काळ किती जण त्यांच्या सेवेत हजर राहणार म्हणा? मुले शाळा-कॉलेज साठी, क्लासेस साठी बराच काळ घराबाहेर राहायची आणि मुक्ता तिची शाळेची नोकरी आणि हॉस्पिटलच्या फेऱया या चक्रात अडकली. सतत औषध गोळ्यांसाठी तिला घराबाहेर पडावे लागायचे. शिवाय संसार… दिवसभर काहीना काही व्याप तिच्या मागे असायचेच!

अलीकडे अगदी पाणी हवे असेल तरीसुद्धा श्रीधरपंत कोणालाही हाक मारायचे नाहीत; आधीच आपला इतका त्रास? सतत घरच्यांचा विचार. आला दिवस फक्त ढकलत होते. रेल्वेच्या त्यांच्या ऑफिसचा सगळा स्टाफ भेटायला येऊन गेला. अगदी गावापासून सगळे नातेवाईकसुद्धा येऊन गेले. किती वेगगवेगळया प्रकारचे सल्ले लोकांनी दिले. रामरक्षा म्हणत जा, घरामध्ये गायत्री मंत्राची सीडी चालू ठेव, मृत्यूंजय मंत्राचा जप करा, एखाद्या ज्योतिषाला दाखवून त्याच्याकडून उपाय करून घ्या, सत्यनारायण घाला, ब्राह्मणाला बोलावून घराचे शुद्धीकरण करा. आरोग्य सल्ल्यांचे तर विचारूच नका.

झोपताना चमचा भर तूप खा, सकाळी उठल्यावर अख्खी लसूण पाकळी चावून खा, विड्याची पानं खा, कच्चा कांदा पाण्यात उकळून त्याचे पाणी प्या. जिरे आणि धने याचे उकळून पाणी प्या. रोज चार मिरे चघळून खा, पंचकर्म करून घ्या. आर्युर्वेदिक औषध घ्या. होमिओपॅथिक उपचार करा…वगैरे वैगैरे. काहीही केले तरी त्यांच्याकडे फारच कमी दिवस शिल्लक होते, डॉक्टरांनी याविषयी पुसटशी कल्पना त्यांना दिली होती. त्यांच्यासोबत घरातले सगळेच येणाऱया-जाणाऱया, फोनवरून सांगणाऱया सगळ्यांचे सल्ले ऐकत होते. प्रत्येक गोष्टीला मान डोलवत होते. श्रीधरपंतांची बोलण्याची ताकद कमी होत चालली होती परंतु ऐकण्याची क्षमता मात्र फार वाढली होती.

एके दिवशी अचानक संध्याकाळच्या वेळेस श्रीयुत नार्वेकर नावाचे मुक्ताचे प्रिन्सिपल त्यांना भेटायला आले. मुक्ताला अवघडल्यासारखे झाले. नार्वेकरसरांनी घरात नजर फिरवली. वन बेडरूम किचनचे घर असावे, हे त्यांच्या लक्षात आले. भिंतीवर पांढरा रंग लावलेला होता. पण तो आता पिवळसर झाला होता. छताचे पोपडे निघाले होते परंतु श्रीधरपंतांच्या बाजूला असलेल्या टीपॉयवर असंख्य औषधं व्यवस्थित एक ट्रे मध्ये ठेवली होती. ट्रेच्या बाजूला एक सुंदर फ्ला फ्लॉवरपॉटमध्ये ताजी फुले ठेवलेली होती. त्या बेडवरची आणि श्रीधरपंतांनी अंगावर घेतलेली चादर स्वछ धुतलेली होती. समोर एक सोफासेट होता. त्यावर ठेवलेल्या उशांची कव्हरे सुद्धा स्वछ धुतलेली होती. कोणाताही भिंतीवर पोस्टर, फोटो असे काहीही लावलेले नव्हते. त्यामुळे तो हॉल थोडा मोठाच वाटत होता.

खिडकीवर हलक्या निळ्या रंगाचे पडदे सोडलेले होते; ते घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यास मदत करत होते. खाली एक छोटी चटई टाकलेली होती ज्यावर मुले बसून अभ्यास करत होती. त्यांच्या शाळेच्या बॅगा त्यात चटईवर कोपऱयात व्यवस्थित ठेवलेल्या होत्या. कुठून सुरवात करायची असे अवघडलेपण होते. पण नार्वेकर सरांनी जसे बोलायला सुरुवात केली…तसे श्रीधरपंत मोकळे होत गेले. त्यांना त्यांचे ‘बाबा आठवले’ असेही ते बोलून गेले. इतका प्रेमळ माणूस कसा एखादा शाळेचा प्रिन्सिपल असू शकतो, असे श्रीधरपंतांना वाटून गेले. किती सहजपणे ते बोलत होते.

कोणत्याही गोष्टीचा त्यांना गर्व नव्हता…आत्मस्तुती नव्हती…एक सोज्वळ, प्रसन्न, ऋषितुल्य व्यक्तिमत्व!

नार्वेकरसरांनी हळूहळू श्रीधरपंतांना त्यांच्या ऑफिसातल्या गोष्टी विचारायला सुरुवात केली. तेही मनमोकळे आणि भरभरून बोलू लागले. मुक्तानेही श्रीधरपंत कसे लष्करात होते… देशासाठी त्यांनी काय काय केले वगैरे… खूप कौतुकाने सांगून…आता तिकडून निवृत्त झाल्यावर सरकारने रेल्वेत नोकरी दिल्याचे अभिमानाने सांगितले. हीच संधी साधून नार्वेकर सरांनी छोटे-मोठे विनोद करायला सुरुवात केली. त्यांच्या ओळखी-पाळखीच्या मानसांविषयी आणि शाळेतील असे काही किस्से सांगितले की श्रीधरपंतांनाही हसू आवरेना. गप्पा चालू होत्या तेव्हा अभ्यासाची पुस्तके समोर घेऊन बसलेले चिन्मय आणि सोनाली सरळ अभ्यास सोडून गप्पात सामील झाले. ते पाहून नार्वेकर सरांना मनापासून आनंद झाला. त्यांनी आता आपली दृष्टी थोडीशी मुलांकडेही वळवली. त्यांना ना एक कोडे घातले.

सगळे गेले रानात अन् झिप्री पोरगी घरात!

हे कोडे घातल्यावर एक क्षणाचाही विलंब न करता चिन्मय पटकन म्हणाला, ‘सोनाली…’

सोनाली चिडून म्हणाली,

‘मी काय झिप्री आहे काय?’

सोनाली सोडून सगळे हसायला लागले. मग चिन्मय म्हणाला,

‘सोनालीची बाहुली.’

परत सगळे हसू लागले मग मात्र चिडून सोनाली म्हणाली,

‘चिन्मयची मैत्रीण..मुग्धा.’

चिन्मय हसत हसत म्हणाला,

‘ती थोडीच झिप्री आहे तुझ्यासारखी आणि तुझ्या बाहुलीसारखी…तिचे तर हेअर किती सिल्की सिल्की आहेत!’

‘होय का?’

सोनाली म्हणाली. मुक्ताने स्वयंपाक घरातून अर्धवट चेहरा बाहेर काढत सोनालीकडे पहात झाडू हलवला. ते पाहून सोनालीने उत्तर दिले, ‘झाडू.’

पण मुक्ताला झाडू हलवून दाखवताना नार्वेकर सरांनी आणि चिन्मयनेही पाहिले. चिन्मय म्हणाला,

‘चिटिंग…’

या संवादावर मनमोकळे हसत नार्वेकरसर म्हणाले,

‘चीटर सोनाली नाही…तर मुक्ता आहे. तिला मी योग्य शिक्षा करीनच परंतु तुमच्यासाठी मात्र मी चॉकलेट आणले आहे…ते तुम्हाला कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला म्हणून… प्रोत्साहनपर म्हणून देत आहे.’

सरांनी दोघांच्याही हातात एक कॅडबरी दिले. कॅडबरी हातात येताच दोघांचेही ते खायला सुरुवात केली. मुलांमुळे सगळ्यांची चांगलीच करमणूक झाली. मुक्ता, तिचे प्रिन्सिपल आल्यामुळे त्यांच्यासाठी काही चांगलं खायला कर, चहा कर याच्यात गुंतली होती पण येता जाता गप्पातही रमत होती. नार्वेकर सरांनी कशालाच विरोध केला नाही. अगदी घरच्यासारखं त्यांनी सगळं आवडीने खाल्लं आणि चा झाल्यावर मात्र ते मुक्ताला म्हणाले, थोडा वेळ येऊन बस ना आमच्यात.

मुक्त घरातली कामे बाजूला ठेवून तिथे येऊन बसली. त्यांनी तिला विचारले,

‘तुझे पेंटिंग्ज बघायची मला खूप उत्सुकता आहे.’ या त्यांच्या वाक्यासरशी श्रीधरपंत आणि मुले आश्चर्यचकित होऊन सरांच्या चेहऱयाकडे पाहू लागले. मुक्ता पटकन् बोलली,

‘त्याचं  असं आहार ना सर…संसार- शाळा आणि या दोन मुलांचे करता करता कधीच का निवांत वेळच मिळाला नाही की पेंटिंग्ज करावे.’

‘आई पेंटिंग करते?’

सोनालीने विचारले.

‘हो…म्हणजे…’

‘कमाल आहे… मुक्ताचे पेंटिंग्ज आम्ही शाळेच्या चित्र प्रदर्शनात ठेवले होते. तेव्हा एक गृहस्थाने चक्क दहा हजाराला विकत घेतले.’

‘आई तू म्हणजे… कसली ग्रेट आहेस!’

चिन्मय आनंदाने चित्कारला.

‘सर उगाचच फार कौतुक करतात… त्यादिवशी आपल्या मुलांचं कौतुक पाहण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांचे पालक आले होते. त्यातील एक पालक, हे एका हॉटेलचे मालक होते. त्यांना ती पेंटिंग्ज आवडली आणि त्यांनी ती विकत घेतली इतकेच. मुक्ता विषय संपवण्यासाठी घाईघाईत बोलली. काहीतरी वेगळं असल्याशिवाय कोणी इतकी किंमत देऊन विकत घेईल का?’

नार्वेकर सर म्हणाले.

‘आई…तू शाळेत शास्त्र हा विषय शिकवते ना…मग पेंटिंग्ज केव्हा करतेस?’

सोनालीने विचारले.

‘शाळेतल्या शिक्षिकेला आजकाल वेगवेगळ्या प्रकारची इतकी कामे असतात की त्यांना श्वासही घ्यायला वेळ नसतो. परंतु मुक्ताचे मला इतके कौतुक वाटते की मधल्या सुट्टीतला काहीवेळ ते मुलांना स्वतहून पेंटिंग्ज शिकवायला देते. मुलांना शिकवता शिकवता तिच्या हातून अप्रतिम पेंटिंग्ज निर्माण होतात. आमच्या शाळेत आत्तापर्यंत पंचवीसच्या वर पेंटिंग्ज मुक्ताने केलेली लावलेली आहेत. शाळेत जो कोणी येतो तो तिथून कौतुक केल्याशिवाय जात नाही.’

‘काहीतरीच हं सर…’

‘अहो श्रीधरपंत तुम्हाला सांगतो.. मध्यंतरी आमच्या शाळेत शाळा तपासणीस आले होते. मुक्ताने केलेल्या एक पेंटिंगकडे पहात पायऱयांवरच खिळून उभे राहिले. त्यांनी आम्हाला विचारले, की ते कुठून आणले म्हणून… आम्ही जेव्हा सांगितले की आमच्या शाळेच्या मुक्तामॅडम यांनी बनवले आहे. तेव्हा, त्यादिवशी त्यांनी मुक्ता मॅडमला बोलावून त्यांचा खास सत्कार केला… अगदी शाल-श्रीफळ सहित!’ मुक्ताला एकीकडे या सगळ्या गोष्टीचा आनंद होत होता कारण कोणालाच स्वतचे कौतुक आवडत नाही? आणि दुसरीकडे आपण या गोष्टी घरात का सांगितल्या नाहीत याबद्दल नवऱयाला नेमकं काय वाटेल, याबद्दल भीतीसुद्धा. सर मात्र उत्साहाने पुढे बोलत राहिले, मुक्ता शास्त्र हा विषय शिकवत असली तरीसुद्धा तिने आमच्या शाळेतल्या आत्तापर्यंत दहाच्या वर विद्यार्थ्यांना पेंटिंग्जमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिके मिळवून देण्यात मदत केली आहे. हे ऐकून सोनाली मुक्ताच्या खुर्ची मागे गेली आणि तिने आपले दोन्ही हात आईच्या गळ्यात टाकून तिला लाडिकपणे विचारले,

‘मलापण शिकवशील ना आई?’

तिने श्रीधरपंतांकडे पाहिले. ती काहीच बोलली नाही. ‘कुकर लावून येते’ म्हणत ती स्वयंपाक घरात निघून गेली. आत्तापर्यंतच्या एकंदरीत संवादानंतर नार्वेकरसर यांच्याही लक्षात आले की मुक्ताच्या कलेबद्दल घरात कोणालाच काही माहित नाही, यामागे काहीतरी ठोस कारण असेल. श्रीधरपंत खूप कडक स्वभावाचे आहेत… याची थोडीफार कल्पना त्यांना होतीच. इतक्या मोठ्या कलाकारावर स्वतच्या घरातच किती अन्याय झाला आहे, हे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. ते सोनालीला म्हणाले, ‘नक्कीच शिकवेल ती…पण तुला सुट्टी लागल्यावर…आता मात्र शाळेचा अभ्यास कर हं… परीक्षा आहेत ना महिनाभरात?’

‘होय सर…’

म्हणी सोनिया तिथून उठली आणि परत अभ्यासाचे पुस्तक घेऊन बसली. चिन्मयसुद्धा तिथून उठून जाणार इतक्यात नार्वेकरसरांनी चिन्मयला विचारले, चिन्मय…काहीही बोलायच्या आत सोनिया हसत हसत म्हणाली,

‘गोट्या हसण्यात चिन्मय आणि श्रीधरपंतसुद्धा सामील झाले. गंभीर वातावरण मावळायला सोनियाचे हे विधान कारणीभूत ठरले. त्यांचे हसणे ऐकून मुक्ता स्वयंपाकघराच्या दारातून हॉलकडे पाहू लागली. ही संधी साधून नार्वेकर सरांनी मुक्ताला आवाज दिला.’

‘मुक्ता…श्रीधरपंतांची काळजी घे. शाळेची काळजी करू नकोस. आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोतच.’ मुक्ता बाहेर आली. तिच्या मनावर आलेले प्रचंड दडपण तिच्या चेह्रयावर दिसत होते. सर गेल्यावर घरात खडाजंगी होणार, हे तिला निश्चितपणे माहीत होते. तिच्या चेहऱयावरील मलूल भाव पाहून नार्वेकरसर म्हणाले,

‘मुक्ता खूप दिवसात तुझ्या तोंडून आपल्या शाळेची प्रार्थना ऐकली नाही… इथून निघताना तेवढी ऐकवशील का?’

मुक्ता गाऊ लागते,

‘सर्वात्मका सर्वेश्वरा….’

सरांसाहित सगळेजण डोळे मिटून त्या प्रार्थनेने मंत्रमुग्ध झाले. प्रार्थना संपली आणि श्रीधरपंतांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. सर उठले. सगळ्यांना नमस्कार करून जायची परवानगी मागू लागले. तर अर्धवट उठत श्रीधरपंत त्यांना आपला क्षीण आवाजात थांबण्याची विनंती करतात. खरंतर श्रीधरपंतांना भेटायला येणाऱया माणसांना सगळेच कंटाळले होते. कोणीही घरी आले तर ते कधी जातील असं घरातल्या प्रत्येकालाच वाटायचे. या पार्श्वभूमीवर इतका वेळ बसलेले नार्वेकरसर यांना परत थांबण्याची विनंती श्रीधरपंत करताहेत, याचे घरातल्या सगळ्यांनाच नवल वाटले. सर आपल्या खुर्चीवर परत बसले आणि श्रीधरपंतांना म्हणाले,

‘बोला …मला घरी जाण्याची अजिबात घाई नाही.’  श्रीधरपंत हळूहळू बोलू लागले… आवाजात कंपन होते…

सर आमचे लग्न झाले, तेव्हा आमच्या घरात माझी लहान बहीण स्वाती शिक्षणासाठी राहत होती. त्यावेळेस ती एस.वाय.बी.एससी.ला शिकत होती. तिच्या कॉलेजमध्ये कोणतातरी कार्यक्रम  होता. त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वाती एक पोस्टर बनवत होती. एखादा इंटरनॅशनल प्रोजेक्ट असावा तसे तीन-चार दिवस तिचे काम चालू होते. एक दिवस मी बाहेरून परतलो. ती तल्लीन होऊन पोस्टरवर काम करत होती. मी घरात आल्याचेही तिला कळले नाही. मी तिच्यावर खूप डाफरलो. आशा तऱहेने चित्र काढणे…रंगवणे…या गोष्टी मला अतिशय फालतू वाटत होत्या आणि माझ्या बोलण्यातून तवंग बाहेर पडले. स्वातीला जेव्हा मी ओरडत होतो तेव्हा जीव तोडून मुक्ता तिची बाजू घेत होती. ‘स्वाती अभ्यासात हुशार आहे पण तिच्याकडे या कलेचेही ज्ञान आहे. तिला याच्यात खूप आनंद मिळतोय तर तिला प्रोत्साहन देण्याचे सोडून तुम्ही तिला असे ओरडायला नको’ … वगैरे सांगून माझी समजूत काढत होती. परंतु त्या दिवशी माझा पारा फारच चढला होता. मुक्ता स्वातीची बाजू घेते याचा तर मला फारच जास्त राग आला. स्वातीने चार दिवस रात्रंदिवस खर्चून केलेले ते पोस्टर मी उचलले आणि चक्क टराटरा फाडले. रात्रभर मुक्ताच्या कुशीत शिरून स्वाती तळमळत होती, धाय मोकलून रडत होती. खरं सांगू सर…या गोष्टीनेही मला दुःख झाले नाही…उलट अशा प्रकाराने ती नको त्या गोष्टीकडे लक्ष न देत अभ्यासाकडे लक्ष देईल, असे मला वाटून गेलं. पण झाले भलतेच…चक्क शिक्षण सोडून…हे घर सोडून…स्वाती गावाकडे निघून गेली. मी गावी गेलो…तिला खूप समजावले…तिची माफी मागितली परंतु ती बधली नाही.’

श्रीधरपंत हळूहळू थांबत थांबत हे सगळं बोलले पण तरीही त्यांना खूप दम लागला. खोकल्याची ढास लागली. मुक्ताने त्यांना पाण्याचा ग्लास उचलून दिला. त्यांचे हात थरथरत होते. मुक्ताने ग्लास हातात धरून त्यांना हळूहळू पाणी पाजले. आणि ती म्हणाली,

‘कशाला जुन्या गोष्टी आठवता?’

दोन्ही मुलं सुद्धा त्यांच्या बेडच्या जवळ येऊन उभी होती. श्रीधरपंत बोलू लागले,

‘मुक्ता मला बोलू दे गं आज…नार्वेकर सरांसारखा देवमाणूस आज घरात आलेला आहे… त्यांच्यासमोर मला बोलू दे…म्हणजे मला कदाचित देवाला माफी मागितल्यासारखे वाटेल.’

नार्वेकरसर परत आपल्या जागेवरून उठले. त्यांनी श्रीधपंतांचा उजवा हात आपल्या दोन्ही हातात घेतला आणि त्यांना म्हणाले,

‘तुम्हाला विश्रांतीची गरज आहे, मी नंतर केव्हातरी येईन.’

‘नाही सर…बोलू द्या मला…खुप वर्षातलं मनात साचलेपण आहे…आज दोन्ही मुलेही समोर आहेत…ऐकू दे त्यांना…’  असे बोलून श्रीधरपंतांनी एक दीर्घ श्वास घेतला. आणि ते पुढे बोलू लागले,

‘स्वाती पुढे शिकली नाहीच…तिचे एक शेतकरी कुटुंबातील घरात, अर्धवट शिकलेल्या माणसाशी लग्न झाले…आणि काही  दिवसात…’

‘मी म्हणते बस करा…’

त्यांना अर्धवट तोडत तळतळून मुक्ता म्हणाली.

‘स्वातीने आत्महत्या केली…’

असे म्हणत ते रडू लागले. सगळेच गप्प झाले. मुक्ताचेही डोळे भरून आले. पोरं कावरीबावरी होऊन आपल्या आई-वडिलांकडे पाहू लागली.

श्रीधरपंत पुढे बोलू लागले.

‘खूप बोलण्यासारखं आहे पण…नार्वेकरसर तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे मला. या प्रसंगानंतर मुक्ताने कदाचित तिच्या या कलेचा माझ्यासमोर उच्चारच केला नसेल…तिच्यातील कलाकार मी मारून टाकला होता पण… तुमच्या शाळेने आणि तुम्हीसुद्धा तिच्यातील कलाकार जिवंत ठेवलात… त्या कलाकाराला बहुअंगाने बहरू दिलेत याबद्दल मी हात जोडून तुमचे आभार मानतो..’

नार्वेकरसर परत उठले. त्यांचे जोडलेले हात आपल्या दोन्ही हातांनी धरले आणि ते म्हणाले,

‘जे घडायचे होते ते घडून गेले…त्याचा फार विचार करू नका. तुमच्या हातून चूक घडली, असेही वाटून घेऊ नका. तुमची त्यामागची भावना चांगली होती तर ती व्यक्त करायची पद्धत चुकली…असे होते कधी कधी…आणि आणि मुक्ताचे म्हणाल, तर ती हाडाची कलाकार आहे. तिने कधी तुमच्यासमोर तिच्यातील कोणत्याही कलागुणांचा उच्चारही केला नसेल, हा तिच्यातील चांगुलपणा आहे आहे…कदाचित तिच्या बोलण्या मागे तुमच्यावरील तिचे खूप जास्त प्रेम आणि आदर असेल, असेही आपण म्हणू शकतो…’ ‘मुक्ताने माझ्यावर…माझ्या मुलांवर…संसारावर… या घरावर अतोनात प्रेम केले आणि त्या बदल्यात मी मुक्ताला काय दिले?… एकदा संध्याकाळी मी थकून भागून घरी परतलो तेव्हा ही मुक्ता पोळ्या करत होती आणि गाणं गुणगुणत होती. तेव्हा मी तिच्यावर प्रचंड चिडलो होतो…तिला मी काय म्हणालो, ते आता मी मुलांसमोर सांगत नाही पण तुम्ही कल्पना करू शकता…त्यानंतर मुक्ता कधीच या घरात गुणगुणली नाही. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी का होईना पण तुमच्यामुळे मला मुक्ताला माफी मागायची संधी मिळाली, यासाठी मी आपले…’

हे बोलता-बोलता परत श्रीधरपंतांना खोकल्याची उबळ आली. मुक्ताने त्यांना परत पाणी पाजले. आणि ते परत बोलू लागले,

‘मुक्ता तू खुल उत्तम संसार केलास…म्हणजे मला हवं तशी तू जगलीस…त्यामुळे संसार टिकून राहिला…पण मुक्ता मी तुझा गुन्हेगार आहे…आज नार्वेकरसर आणि मुले यांच्यासमोर  मी तुला माफी मागतोय…मला तू क्षमा नाही केलीस तरी चालेल…पण तुझी माफी न मागता मी हे जग सोडून गेलो तर माझ्या आत्म्याला कधीच शांती मिळणार नाही.’

‘काय बोलताय तुम्ही हे…आता बस करा ना…मला सहन होत नाही.’

असे म्हणत मुक्ता स्फुंदून रडू लागली. मुलेही ‘बाबा…बाबा…’ करू लागली. नार्वेकरसरांना काय करावं ते सुचेना. मुक्ताला ते गेले वीस वर्षे ते ओळखत होते पण तिच्या नवऱयाला म्हणजे श्रीधरपंतांना भेटण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. त्यांना कळेना आशा या प्रसंगी त्यांनी तडक उठून जावे की आज तिथेच थांबावे. परत श्रीधरपंतांना खोकल्याचे उबळ आली आणि ती काही केल्या थांबेचना. मुक्ताला चिन्मयला डॉक्टर काटदरे यांना फोन लावायला सांगितला. चिन्मय डॉक्टरांशी फोनवर बोलत होता की बाबांना खूप खोकला येतोय आणि ते खोकायचे थांबतच नाहीयेत. मुक्ता हातात पाण्याचा ग्लास धरून त्यांच्यापुढे उभी…त्यांच्या खोकल्याची उबळ थांबण्याची वाट पाहत…आणि श्रीधरपंत खोकायचे थांबतात. त्यांचा श्वास मात्र जोरजोरात चालू असतो आणि एक क्षणी ते डोळे मिटतात ते कायमचेच! मुक्ता एक हंबरडा फोडते आणि दोन्ही मुले काहीच न कळून सुद्धा ओक्साबोक्शी रडायला सुरुवात करतात. तोपर्यंत डॉक्टर पोहोचतात आणि म्हणतात ‘ही इज नो मोअर!’ पंधरा-वीस मिनीटातच शेजारपाजारचे जमा होतात. श्रीधरपंतांनी बेडवरून उचलून खाली जमिनीवर ठेवतात. फक्त कुजबुज सुरू होते सगळ्यांना कळवले पाहिजे. नार्वेकर सर मुक्ताचा मोबाईल हातात घेतात आणि थरथरत्या हाताने एक मेसेज टाईप करतात ‘मुक्ता पोतनीस यांचे पती श्रीधरपंत यांना आज संध्याकाळी देवाज्ञा झाली!’ आणि तो मेसेज सेंट टू  ऑल करतात.

— प्रा. प्रतिभा सराफ.

1 Comment on माफी

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..