सोमनाथच्या घरच्यानी त्याच्या लग्नासाठी त्यांच्याच नात्यातीलच एक मुलगी पहिली. यादरम्यान सोमनाथने विरारला बँकेतून कर्ज घेऊन एक घरही विकत घेतले होते. त्याचा भाचा त्याच्यासोबत काही दिवस राहणार होता. त्या मुलीला सोमनाथने पाहिले पण तिच्याशी बोलल्यावर त्याला कळले त्या मुलीला फक्त त्या दोघांचे कुटुंब हवे होते त्यात तिला कोणाचीही लुडबुड नको होती. म्हणजे स्पष्ट सांगायचं तर मी आणि फक्त माझा नवरा इतकंच काय ते आपलं जग असा स्वार्थी विचार करणारी होती. त्याबद्दल सोमनाथने विजयला सांगितल्यावर विजयने सुरुवातीला विचार केला मुलगी श्रीमंत घरातील आणि नोकरीला असल्यामुळे त्याला आर्थिक मदतच होईल पण दुसऱ्याच क्षणी त्याने मनात विचार केला जी मुलगी लग्नापूर्वीच इतक्या अटी ठेवतेय ती लग्नानंतर सोमनाथला आणि त्याच्या आईवडिलांना योग्य तो मानसन्मान देऊ शकणार नाही. तरीही कोणाला न पाहता आपलं मत प्रदर्शित करणे विजयला योग्य वाटत नव्हतं म्हणून विजय सोमनाथला म्हणाला , उद्या तिला एका हॉटेलात भेटायला बोलावं ! त्याप्रमाणे सोमनाथने तिला एका हॉटेलात भेटायला बोलावले ते ज्या टेबलावर बसले त्यापासून काही अंतरावर विजय बसला.
त्यांच्यातील संवाद विजयला स्पष्ट ऐकू येत होता. ती निघून गेल्यावर विजय सोमनाथला म्हणाला, तिला स्पष्ट नकार दे ! सोमनाथने विजयला का ? असा साधा प्रश्नही विचारला नाही. सोमनाथने तिच्याशी लग्न करावं हा घरच्यांचा आग्रह असतानाही सोमनाथने विजयच्या सांगण्यावरून तिला नकार दिला. त्यानंतर सोमनाथला एक मुलगी सांगून आली ती मुलगी फार श्रीमंत नव्हती. तिचे वडील बेपत्ता होते तिच्या आईनेच कष्ट करून तिला वाढविले होते. पण तिची आई राजकारणात सक्रिय होती. पण त्या मुलीची काहीच अपेक्षा नव्हती. विजयने सोमनाथला होकार द्यायला सांगितले. आणि सोमनाथ सोबत तिचे धुमधडाक्यात लग्न झाले. लग्न झाल्यावर सोमनाथने त्याच्या सासुजवळ सासूच्या मदतीने एक स्वस्त घर विकत घेतले. आणि त्याचा सुखाचा संसार सुरू झाला. त्यांना दोन गोड मुलंही झाली एक मुलगा आणि एक मुलगी ! त्याच्या आयुष्यात आता तो खूपच आनंदी ,सुखी आणि समाधानी होता. आता कधी तो विजयला भेटतो तेंव्हा बोलतो की मी माझ्या बायकोला नेहमी सांगतो की विजयमुळेच आपलं लग्न झालं ! पण विजय अजून पर्यत त्याच्या घरी कधीही गेलेला नाही त्याच्या बायकोला त्याने फक्त त्याच्या लग्नातच पाहिले होते. त्याच्या मुलांना एका बगिच्यात भेटला होता. तो त्याच्या संसारात रमल्यावर विजय त्याच्या त्याच्या जगात रमला…विजय त्याला विसरला नाही पण आता तो त्याच्या आयुष्याचा भाग नव्हता. विजयच्या तोंडून अचानक निघालेली वाक्ये कधी – कधी ब्रह्मवाक्ये ठरतात असा कित्येकांचा अनुभव आहे…
नवीन वर्षाचा दुसरा दिवस ! या नवीन वर्षात देवजाणे काय काय नवीन घडेल. या नवीन वर्षात उदरनिर्वाहासाठी काहीतरी नवीन उद्योग सुरू करायला हवा ! अशा विचारात विजय होता. विजय आणि उद्योग यांचं खूपच घट्ट नातं होतं. काही केल्या उद्योग विजयचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. उद्योग करायला नको म्हणून विजयने कमी पगाराची नोकरी पत्करली आणि तिचेच रमला पण तिथे त्याची प्रगती मात्र झाली नाही. विजयची प्रगती झाली नाही पण त्या कारखान्याची आणि त्याच्या मालकांची मात्र प्रगती झाली. विजय वर्षानुवर्षे वेड्यासारखा त्या कारखान्यासाठी घाम गाळत राहिला. विजयने बऱ्याचदा तो कारखाना सोडून स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्याला यश आले नाही आणि पुन्हा – पुन्हा त्याला त्याच कारखान्याची वाट धरावी लागली. विजय जेंव्हा त्या कारखान्यात कामाला राहिला तेंव्हा फक्त सतरा वर्षाचा होता. आज बेचाळीस वर्षाचा झाला तरी त्याच्याकडे त्याच्या मालकीचं म्हणावं असं काहीच नव्हते.
इतकी मेहनत करूनही विजयला पुरेसे पैसे का मिळत नाहीत ? हे प्रश्न सर्वानाच सतावत होता. विजयची बहीण एक दिवस तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली असता. तिथे त्या मैत्रिणीचे एक नातेवाईक गृहस्थ आले होते. ते मांत्रिक नव्हते पण तंत्रमंत्राचे जाणकार होते. बोलता – बोलता विजयच्या बहिणीने म्हणजे विजयाने विजयबद्दल विचारले असता ते म्हणाले, ” त्याच्यावर वशीकरण मंत्राचा प्रयोग झालेला आहे. तो प्रयोग करणाऱ्या तीन माणसांची नावेही त्यांनी सांगितली त्यात एक स्त्री आणि दोन पुरुष होते. ते दोन पुरुष विजयला माहीत नव्हते पण स्त्री माहीत होती. विजयाने विजयला विचारल्यावर उगाच विषय वाढू नये म्हणून या नावाच्या कोणा स्त्रीला तो ओळखत नाही असेच म्हणाला. त्यापुढे ते असेही म्हणाले होते, विजय जोपर्यत या कारखान्यात आहे तोपर्यतच हा कारखाना चालेल. यातून सुटका व्हावी म्हणून त्यांनी काही लिंबू मंत्रावून दिले जे विजयच्या अंगावरून काढून टाकायला सांगितले होते. त्या प्रमाणे ते केले.
विजयचा खरं तर या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. पण सर्व गोष्टींचा आणि मागे घडलेल्या गोष्टींचा विचार करता विजयला खात्री पटू लागली की हे असं काही असूही शकतं. कारण विजय कारागीर असूनही आजही तो हेल्परच्या पगारात आनंदाने काम करतोय ! त्याच लग्न झालं नाही ते झालं असतं तर त्याला अधिक पैशाची गरज भासली असती आणि ते अधिकचे पैसे कमावण्यासाठी स्वतःचा उद्योग करण्याचा विचार त्याच्या मनात आला असता. त्याच लग्न न होण्याचा आणि या सगळ्याचा काही संबंध आहे का ? विजयने या सगळ्याची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. कारण विजय स्वतः खात्री केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवत नाही..
— निलेश बामणे.
Leave a Reply