नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – १२ )

विजयच्या आयुष्याचा प्रवास फार खडतर होता. कुटुंबातील मोठा मुलगा म्हणून जन्माला येणे हे एखादा शाप मिळण्यासारखेच असते. विजयच्या कुंडलीत तीन भावंडांचा योग होता. विजयचा जन्म गावी आणि तो लहानाचा मोठा मुंबईतील गोरेगावात झाला. त्याचे गाव आणि गोरेगाव यात काहीही फरक नव्हता. त्यावेळी गोरेगावात डोंगरात जागा मोकळी करून लोकांनी बांबू आणि प्लास्टिकच्या मदतीने झोपड्या उभारल्या होत्या. साधारणतः दहा बाय पंधरा च्या त्या झोपड्या होत्या. विजयच्या वडिलांचा कायम स्वरूपी तेथे वास्तव करण्याचा विचार नसावा बहुतेक म्हणून ती झोपडीही त्यांनी भाड्याने घेतलेली असावी. त्या झोपडपट्टीत राहणारे बहुतेक कोकणातील एकमेकांचे नातेवाईक अथवा आजूबाजूच्या गावातीलच होते.म्हणून गुण्या गोविंदाने आणि शांततेत राहात होते. विजयचे वडील गावी सातवी शिकल्यावर मुंबईला आले होते. मुंबईत राहण्याची सोय नसल्यामुळे त्यांनी अनेक हॉटेलात काम केले आणि नंतर दादरला एका लिंबू विकणाऱ्या व्यापाऱ्याकडे स्थिरावले. पण तरीही ते मुंबईत आपल्या नातेवाईकांकडेच राहात होते अगदी लग्न झाल्यावरही काही वर्षे विजयची आई मात्र अशिक्षित होती आणि ती गावी विजयच्या घराच्या शेजारच्या घरातीलच होती. मुंबईत इकडे तिकडे वास्तव्य केल्यावर विजय आणि त्याच्या एका भावंडासह ते गोरेगावच्या या झोपडपट्टीत राहायला आले होते. त्यांनतर त्या झोपडीत त्याच्या धाकट्या भावाचा जन्म झाला आणि स्वतःची झोपडी विकत घेतल्यावर त्याच्या बहिणीचा म्हणजे विजयाचा जन्म झाला. जोपर्यंत विजयचे वडील दादरला लिंबाच्या व्यवसायात होते तोपर्यत सारे सुरळीत चालले होते. त्या झोपडपट्टीत जवळ – जवळ सर्व पुरुषांना दारू पिण्याचे व्यसन होते. रात्री त्या झोपडपट्टीत दारू प्यायला नंतर होणारा धिंगाणा सुरू होत असे. झोपडपट्टी असल्यामुळे सर्वांचा धिंगाणा सर्वांना ऐकू येत असे. दारूच्या नशेत काही नवरे  बायकांना मारत तर काही बायका नवरा प्यायला म्हणून नवऱ्याला मारत. यात विजयच्या बाबांचाही सहभाग होताच कारण त्यांनाही प्रचंड दारूचं व्यसन होतं. त्यांच्या दारूच्या व्यसनामुळेच ते अनेक उद्योग करूनही त्यात यशस्वी झाले नाहीत. उलट त्यांच्या विविध उद्योगात विजयला सोबत घेतल्यामुळे त्याचे बालपण वाया गेले आणि तो अकाली मोठा झाला.

विजयने त्याच्या वडिलांसोबत कसले कसले धंदे नाही केले वयाच्या तेराव्या वर्षांपासून सतराव्या वर्षापर्यत…त्याने केलेला सर्वात पहिला उद्योग होता ताडी माडीच्या दुकाना बाहेर उकडलेली अंडी आणि चणे विकण्याचा, त्यानंतर अनुक्रमे कांदे, बटाटे, नारळ, लसूण, अळूची पाने, रांगोळी, होळीचा रंग, बुर्जी – पाव ! काय काय विकले नाही. म्हणूनच विजयला धंदा करण्याचा अक्षरशः कंटाळा आला होता पण तो धंदा आजही विजयचा पिच्छा सोडत नव्हता कारण विजयचे बाबा त्याला सतत नोकरी सोडून धंदा कर म्हणून मागे लागले होते. पण विजय त्याच्याकडे दुर्लक्ष करत होता. आज विजयचे बाबा आयुष्यात विजयपेक्षाही यशस्वी आहेत. पण विजय आज या वयातही यश मिळविण्यासाठी धडपडतोय ! विजयचा जन्म राहूच्या महादशेत झाला होता. राहुची महादशा भोग्य असते असे म्हणतात आणि राहू असा ग्रह आहे की राजाचा भिकारीही करतो आणि भिकाऱ्याचा राजाही करतो. एखाद्याला राजेशाही उपभोग घ्यायला देतो आणि कधी कधी भिकही मागायला लावतो. विजयचे बालपण एखाद्या राजकुमारासारखे गेले वयाच्या बारा वर्षापर्यत त्याला कसलीच कमी नव्हती. पण तेराव्या वर्षी त्याचे भाग्य बदलले. आणि त्यानंतर मात्र दोन वेळचे जेवणही नीट मिळेनासे झाले. अंगावर नवीन कपडे नाहीत पायात चपला नाहीत अशी परिस्थिती आली. त्या परिस्थितीशीही विजय झगडत राहिला. पण त्या परिस्थितीतही त्याने त्याच्या चेहऱ्यावरील हसू कधी ढळू दिलं नाही. प्रसंगी रद्दी विकून, गोट्या विकून, बिल्ले विकून  अर्धा – अर्धा किलो तांदूळ आणून किंवा बटर आणून ते खाऊन त्यांनी पोटाची भूक भागवली पण कधी कोणासमोर हात पसरले नाही.

कधी – कधी तर उरलेल्या शिळ्या चपात्या त्याने फक्त मीठ मसाल्यात आणि कांद्यासोबत खाल्ल्या होत्या. तर कधी रात्रीचा शिळा भात फक्त मीठ मसाला मिसळून तो खाल्ला होता. त्यांच्या या परिस्थितीत दोनच व्यक्ती कामी आल्या होत्या.  एक त्याची आजी आणि दुसरी त्याची मानलेली मावशी.. विजयची आई आजही या जगात फक्त एकाच व्यक्तीचे उपकार मानते ते तिच्या त्या मानलेल्या बहिणीचे. विजयचे आई एक अजब रसायन होते. ती स्वतः अशिक्षित होती पण आपल्या मुलांनी चांगलं शिकून सुशिक्षित व्हावं हा आग्रह होता. म्हणून ती सतत झटत होती. पण तिच्या प्रयत्नांना नशिबाची आणि नवऱ्याची साथ मिळत नव्हती. त्यात नवऱ्याचे दारूचे व्यसन त्यामुळे होणारी भांडणे, संशय, प्रसंगी हाणामारी आणि मारझोड या सगळ्यात ती मुलांच्या शिक्षणावर ठाम होती. पण विजयचे बाबा त्यांच्या डोक्यात फक्त धंदा होता. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाला कधीच महत्व दिलं नाही. ते तर विजयला आजही सूनवतात. तुझा शिकून काय उपयोग झाला ? तुझ्यापेक्षा ते अनाडी लोक जास्त कमावतात. म्हणूनच विजयने दहावी झाल्यावर विजयने त्या कारखान्यात नोकरी पत्करली रात्रीच्या कॉलेजात जाऊन बारावी पूर्ण केली आणि शिक्षणाला राम राम ठोकला. पण विजयने आईचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि प्रसंगी आपल्या भावंडाना कर्ज काढूनही शिकविले. या दरम्यान विजयची आई ठाम भूमिका घेऊ शकली म्हणून विजयच कुटुंब सावरलं होतं.

विजय आठवीत असताना कधीही कामासाठी घराबाहेर न पडलेल्या विजयच्या आईने एका कारखान्यात नोकरी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे विजयच्या घराला थोडा आर्थिक टेकू मिळाला होता. त्यामुळे त्या तीन वर्षात घराची जबाबदारी विजयवर होती त्यामुळे त्या काळात विजय घरातील सर्व कामे करायला शिकला होता. झाडू मारण्यापासून कपडे धुण्यापर्यंत आणि जेवण करण्यापासून भांडी घासण्यापर्यंत सर्व..

विजय दहावीला असताना विजयच्या बाबांना काय साक्षात्कार झाला माहीत नाही त्यांनी अचानक दारू प्यायची सोडून दिली आणि एका आध्यात्मिक गुरू कडून गुरू मंत्र घेऊन ते आध्यात्मिक झाले. त्यांची आध्यात्मिकता ती ही टोकाची आता तर कधी – कधी त्याचाही त्रास होतो.  ते ही धंदा सोडून एका कारखान्यात कामाला राहिले, विजयची राहुची महादशा संपून गुरुची महादशा सुरू होईपर्यंत विजयचे आयुष्य रुळावर आले होते विजयच्या आयुष्यात स्थैर्य, प्रेम, आनंद आणि मानसन्मान येऊ लागला होता. राहूच्या महादशेत विजय गरीब असतानाही त्याच्यावर प्रेम करणाऱ्या खूप सुंदर सुंदर तरुणी होत्या. पण गुरुची महादशा सुरू होताच तो अचानक विद्वान झाल्यासारखा विचार करू लागला वागू लागला तरीही त्याच्यावर प्रेम करणाऱ्या तरुणी होत्या पण आता त्याच्याकडे कोणावर प्रेम करायला वेळ नव्हता कारण त्याला वाटत होतं की तो खूप मेहनत करून खूप श्रीमंत होईल पण पण आता विजयला पटले होते मेहनत तर गाढवही खूप करतो म्हणून त्याला मान मिळत नाही रस्त्यावर आयुष्यभर रक्त आठवून मेहनत करणारे कामगार कधीही श्रीमंत होत नाहीत. श्रीमंती ही नशीबातच असावी लागते.

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 417 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..