नवीन लेखन...

एक परीस स्पर्श… ( भाग -२८ )

आज १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे ! व्हॅलेंटाईन डे म्हटला की विजयला न चुकता आठवण येते ती चंचलाची ! तेव्हा ती तर चंचल होतीच पण विजयही काही कमी चंचल नव्हता. तो तेंव्हा न चुकता प्रत्येक व्हॅलेंटाईन डे ला एक ग्रिटींग विकत घ्यायचा तिच्यासाठी पण तिला देण्याची हिंमत काही त्याला कधी झाली नाही… एकदा तर त्याने ती सोबत असताना व्हॅलेंटाईन ग्रिटींग विकत घेतले…ती आठवडाभर विचारत होती ते ग्रिटींग कोणासाठी घेतले…पण विजय तिला टाळत राहिला. ते ग्रिटींग त्याने पुढे कित्येक वर्षे जपून ठेवले होते. पण त्यानंतर त्याने कधीच व्हॅलेंटाईन ग्रिटींग काही विकत घेतले नाही…कदाचित ते ग्रिटींग विजयने चंचलाला न दिल्यामुळेच ती चंचल झाली असावी कारण त्यामुळेच विजयचे तिच्यावर प्रेम नाही आणि तो दुसऱ्याच कोणाच्यातरी प्रेमात आहे असा तिचा समज झाला असावा…

मग ती कधी ह्याच्या तर कधी त्याच्या प्रेमात पडून शेवटी एका सामान्य दिसणाऱ्या तरुणासोबत वयाच्या विसाव्या वर्षी लग्न करून मोकळी झाली. ती विजयचं  पहिलं अपयशी प्रेम होतं…पण विजय अजूनही तिला विसरलेला नाही…पहिलं प्रेम माणूस ते कसही असलं तरी कधीही  विसरत नाही हे शंभर टक्के खरं आहे…तिचं विजयच्या चित्रांवर खूप प्रेम होतं…पुढे कित्येकींच्या  प्रेमात पडल्यावर आणि त्याच्यातील कवी जरा रुळल्यावर त्याने व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने लिहिलेली एक कविता एका वर्तमानपत्रात प्रकाशित झाली…ती विजयची पहिली प्रेम कविता होती…ज्या कवितेची पहिली ओळ काहीशी अशी होती…पाहतो वाट जशी चातक वर्षाच्या मिलनाची ….पाहतो वाट तशी मी तुझ्या मिलनाची… या कवितेने विजयची वर्तमानपत्रात लिहिण्याची सुरुवात झाली होती…त्यांनतर विजयने वर्तमानपत्रासाठी जे जे लिहिले ते प्रकाशित झाले…

वर्तमानपत्रात त्याची छायाचित्रेही प्रकाशित होऊ लागली त्याच्या साहित्यासोबत…आणि त्याच्या डोक्यात हवा शिरली प्रसिद्धीची…त्याला वाटू लागले आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत…हेच कारण होते खरंतर त्याने कित्येकीचे प्रेम नाकारायला…त्याचा कवितासंग्रह वाचून मुली त्याच्या प्रेमात पडायच्या…म्हणूनच तो त्याच्या प्रेमात पडणाऱ्या मुलींकडे दुर्लक्ष करायचा…पण याच प्रसिद्धीच्या मागे धावण्यात त्याचे आयुष्य आणि तारुण्य वाया गेले…कालपरवाच विजयने एक बातमी वाचली कोणत्यातरी देशातील एका ४९ वर्षाच्या मंत्र्याने १८ वर्षाच्या सुंदर तरुणीसोबत तिसरे लग्न केले… ती बातमी वाचून विजयने पहिल्यांदा जयेशला फोन केला…मग त्यांच्यात बराच वेळ भारतातील तरुणी लग्नाच्या बाबतीत हल्ली कसा वयाचा बाऊ करतात यावर चर्चा झाली आणि आज विजयमधील प्रगल्भ कवी जागा झाला आणि त्याने शेवटी व्हॅलेंटाईन डे च्या विरोधात नाही पण किंचित प्रेमातील नकारात्मकता दाखवणारी कविता लिहून ती सोशल मिडियावर प्रकाशित केलीच..

त्याच्याशिवाय करमत नसल्याचा फोन स्वप्नीलने विजयला केला…कारण विजय हा स्वप्नीलचा मार्गदर्शक होता…कारण आजच्या काळातही विजयचा तंत्रमंत्र, जादूटोणा, ज्योतिष्य वगैरे गोष्टींचा अभ्यास होता म्हणजे त्याच्या तो संशोधनाचा विषय होता…का कोणास जाणे या विषयावरील काहीही म्हणजे काहीही विजयला वाचायला आवडते…हल्लीच त्याने हिलींग या विषयावरील चक्क एक  इंग्रजी पुस्तक वाचायला घेतले होते ३०० पृष्टांचे . मराठी पुस्तक असते तर ते त्याने दोन दिवसात वाचले असते पण इंग्रजी असल्यामुळे रोज तीस एक पाने वाचून होता आहेत… विजयला इंग्रजी बोलता येते तोडके – मोडके, पण वाचता मात्र उत्तम येते आणि ते वाचलेले कळतेही उत्तम…ते पुस्तक वाचता वाचता त्याला माणसाच्या मेंदूत लपून राहिलेल्या सुप्त शक्तीची कल्पना येत होती…

असो हे सगळे वाचताना त्याच्या मेंदूत साठून राहिलेल्या चार गोष्टी  म्हणजे ऐकलेल्या चार गोष्टी विजयला अचानक आठवल्या त्यातील एक गोष्ट त्याला त्याच्या चौथीच्या शिक्षिकेने सांगितली होती…दुसरी गोष्ट त्याच्या नववीच्या वर्ग शिक्षकाने सांगितली होती आणि तिसरी गोष्ट त्याच्या मित्राने वर्गात सांगितली होती आणि चौथी गोष्ट त्याच्या अशिक्षित आईने त्याच्या लहानपणी सांगितली होती…त्या चारही कथा आजही इतक्या वर्षानंतरही त्याच्या मेंदूत रुंजी घालतात…त्यातील पहिली कथा…नाव माहीत नाही पण आपण त्या कथेला नाव देऊया जादुई घोडा, काटी आणि झोळी…

आटपाट नगरात एक राजा होता…त्या राजाला दोन राण्या होत्या एक आवडती आणि एक नावडती…असं काही नव्हतं फक्त दोन राण्या होत्या.  फक्त वृत्तीने एक चांगली आणि एक दृष्ट होती. त्या राजाला बरेच वर्षे संतती होत नव्हती…एक दिवस त्या राज्यात एक साधू प्रकट झाले… त्यांची मोठ्या राणीने खूप सेवा केली. तिच्या सेवेने प्रसन्न होऊन त्या साधूंनी तिला संतती होण्याचा आशीर्वाद दिला…थोड्या दिवसांनी राणी गरोदर राहिली…ती गरोदर राहिल्यामुळे राजाला खूप आनंद झाला कारण त्याच्या राज्याला वारस मिळणार होता… राजा त्या राणीची खूप काळजी घेऊ लागला.  तिच्या मागेपुढे करू लागला.  ते पाहून दुसऱ्या राणीचा खूप तळतळाट होऊ लागला.

त्यात तिच्या जोडीला दृष्ट सुईनही होती…काही महिन्यांनी जेव्हा राणीची प्रसूती होऊन तिने दोन जुळ्या मुलांना म्हणजे एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला….पण राणी बेशुद्ध असल्यामुळे त्या सुईनीने ती दोन्ही मुले उचलून त्या दृष्ट राणीच्या हातात दिली आणि त्या राणीच्या मुलांच्या जागी कुत्र्याची पिल्ले ठेवली…आणि संपूर्ण राज्यात राणीने कुत्र्यांच्या पिल्लांना जन्म दिला म्हणून बातमी पसरली…इकडे त्या दृष्ट राणीने त्या मुलांना जंगलात टाकून दिले…इकडे राजाने आपल्या राणीने कुत्र्यांच्या पिल्लाला जन्म दिला म्हणून तिला रागाच्या भरात  जंगलात एका अंधाऱ्या खोलीत बंद करून ठेवले ते हि त्या खोलीकडे पुन्हा कधीच वळून न पाहण्यासाठी…इकडे ती मुलं जंगलात रडत असतात पुन्हा तेच साधू प्रकट होतात.  ज्यांच्या आशीर्वादाने त्यांचा जन्म झालेला असतो…ते साधू त्या दोन्ही मुलांना आपल्या सोबत घेतात आणि आपल्या कुटीत जातात….त्या कुटीतच ती मुले लहानाची मोठी होतात… ती मुले वयात आल्यावर साधू महाराज त्या दोघांना जवळ बोलावून सांगतात तुम्ही दोघे माझी मुले नाही. तुम्ही मला जंगलात  सापडला होतात. तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा शोध घ्यायचा आहे… माझी आता स्वर्गात प्रयाण करण्याची वेळ जवळ आली आहे…

त्या पूर्वी मी तुम्हाला काही जादुई वस्तू देणार आहे आणि त्यांचा उपयोग करण्याचा मंत्र देणार आहे…साधू त्यांना एक जादुई घोडा, काटी आणि झोळी देतो आणि त्यांच्या कानात एक मंत्र सांगतो. हा घोडा तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी घेऊन जाईल..ही  झोळी तुम्हाला हव्या त्या वस्तू देईल…आणि ही काटी तुमच्या शत्रूंचा नाश करेल…आणि ते साधू स्वर्गात प्रयाण करतात. ते दोघे बहीण भाऊ घोड्यावर बसतात आणि मंत्र म्हणून घोड्याला आदेश देतात आमचे आईवडील ज्या राज्यात असतील तेथे आम्हाला घेऊन चल…क्षणात ते घोड्यासह आटपाट नगरात पोहचतात…तेथे पोहचल्यावर ते झोळीतून मंत्राच्या साह्याने मोहरा निर्माण करतात आणि एक वाडा विकत घेतात…आपल्या राज्यात कोणी श्रीमंत बहीण भाऊ राहायला आल्याची बातमी राजदरबारात पोहचते… दृष्ट राणीला त्यांना भेटण्याची उत्सुकता निर्माण होते…

ती त्यांना भेटायला जाते आणि बोलता बोलता तिच्याकडून सर्व माहिती काढून घेतल्यावर तिच्या मनात शंका निर्माण होते…ही राजाची मुले तर नाहीत ना ! त्यामुळे ती त्या मुलीशी ओळख वाढवते आणि तिचा भाऊ घरात नसताना काही गोष्टी करण्यास तीस भरीस पाडते…तिला सांगते तुमच्याकडे जादुई झोळी आहे ना तर त्यातुन आणखी संपत्ती घेऊन एक महालच का बांधत नाही ? ती भाऊ आल्यावर त्याला आग्रह करते आणि महाल बांधून घेते…त्यानंतर ती दृष्ट राणी तिला सांगते बाजूच्या राज्यात एका डोंगरावर एक सोनेरी झाड आहे ते का नाही तुझ्या भावाला आणायला सांगत…भाऊ आल्यावर ती पुन्हा आग्रह करते आणि तो घोड्याला आदेश देऊन त्या झाडाजवळ जातो तर त्याचा पहारा काही राक्षस करत असतात. तो काटीला त्यांना मारण्याचा आदेश देतो आणि ते झाड घेऊन येतो…ते पाहून ती मुलगी खुप खुश होते नंतर राणी तिला दुसऱ्या राज्यातील एका तळ्यातील सुवर्ण कमळ आणायला सांगते..

पण त्या तळ्याजवळ पोहचताच त्याची भाकरी होते आणि घोड्याचा दगड होतो…त्याच्या झालेल्या भाकरीतून राम राम असा आवाज येत असतो…तेथून आकाशातून जाणारे शिव पार्वती तो आवाज ऐकतात आणि पाणी शिंपडून त्याला व त्याच्या  घोड्याला पूर्ववत करतात…आणि त्याला ते सुवर्ण कमळ देतात…ते घेऊन तो घरी येतो .. ते पाहून ती धूर्त राणी त्या मुलीला सांगते आता तुमच्याकडे सर्व काही आहे तुझ्या भावाला आता तुझ्यासाठी एक सुंदर वहिनी आणायला सांग…बाजूच्या राज्यात एक काचेच्या महालात एक तपस्वी राजकुमारी आहे तुझ्या भावाला तिच्याशी  लग्न करायला सांग…ती भाऊ आल्यावर पुन्हा त्याच्याजवळ हट्ट करते..तो घोड्यावर बसून त्या काचेच्या महालाजवळ पोहचतो तर त्याला सैनिक अडवतात…काटीच्या साहाय्याने तो त्या सैनिकांना पराभूत करून पळवून लावतो तर आत तपस्वी राजकुमारी असते…ती त्याला त्याच्या येण्याचे प्रयोजन विचारते…तर तो म्हणतो मला तुझ्याशी विवाह करायचा आहे.  त्यावर ती तपस्वी राजकुमारी म्हणते मी अशाच तरुणाशी विवाह करू शकते जो आपल्या आईचे दूध प्यायलेला नसेल…इतक्यात तिथे भगवान शिव प्रकट होतात आणि सांगतात ह्याने त्याच्या आईचे दूध प्यायले नाही. तू याच्याशी विवाह कर…तो त्या राजकुमारीशी  विवाह करून तिला घरी घेऊन येतो….

त्यांनतर लग्नाच्या निमित्ताने ते एक मेजवानी ठेवतात. तेव्हा ते बहीण भाऊ झोळीला आदेश देतात आमच्या आई वडील धरून जितकी माणसे या  राज्यात आहेत तेवढी ताटे दे !  राज्यातील सर्व लोक जेवायला येतात शेवटी चार ताटे उरतात. राजा ती दृष्ट राणी आणि ती सुईन  बाकी असतात…थोड्या वेळाने राजाही येतो.  तरी तीन ताटे उरतात मग त्या राणीला निरोप पाठवल्यावर ती राणी आणि सुईन येते. तरी एक ताट उरतो…आता कोण राहिलं तर लोक बोलतात आता फक्त मोठी राणी शिल्लक आहे पण त्या जिवंत असण्याची शक्यता नाही. मग त्या मुलाची पत्नी विचारते त्या कोठे आहेत ? मला दाखवा मग सर्वजण राज्याने राणीला जंगलात ज्या खोलीत ठेवलेले  असते तेथे जातात.  दार उघडतात तर आत तिचा फक्त सांगडा असतो… तर त्या मुलाची पत्नी आपल्या तप सामर्थ्याने त्या सांगाड्यातून राणीला पुन्हा जिवंत करते.  राणी जिवंत झाल्या बरोबर तिच्या स्तनातून तिच्या दुधाच्या  धारा त्या मुलाच्या आणि मुलीच्या तोंडात उडतात…आणि राज्याच्या लक्षात येते की हे दोघे आपलीच मुलं आहेत….लगेच राजा त्या सुईनीला कैद करायला सांगतो तिला कैद केल्यावर ती दृष्ट राणीचे नाव घेते राजा त्या सुईनीला आणि त्या दृष्ट राणीला मृत्युदंडाची शिक्षा जाहीर करतो…राजा लगेच आपल्या मुलाला भावी राजा म्हणून घोषित करतो…आणि आपल्या राणी मुलांसह पुढे सुखाने संसार करतो…

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..