नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – १७ )

काल  कित्येक वर्षानंतर विजयने पुन्हा हातात रंग आणि ब्रश घेतला. त्याच्या पुतणीला  एक चित्र काढून हवं होतं. पण विजयचा हात आता पूर्वीसारखा वळण घेत नव्हता. पूर्वी तो चित्र काढताना त्याला खोडरबर क्वचितच वापरावा लागत असे. दोन चार कोरी पाने खराब झाली तरी चित्र काही आकाराला येत नव्हते. चित्र आकाराला येत नव्हते, म्हणजे नक्की काय ? चित्र काय काढावे तेच कळत नव्हते. पण हळू – हळू चित्र आकार घेऊ लागले. रात्री अकरा वाजता त्याने चित्र काढायला सुरुवात केली. चित्र रंगवून होईपर्यत रात्रीचे दोन वाजले पण त्याला अजिबात झोप आली नाही. पूर्वीही तो असाच रात्री दोन – दोन वाजेपर्यत इतरांसाठी चित्रे काढत बसत असे.  कधी कोणाला नाही म्हणाला नाही. पण! जगाचे रंग दिसल्यावर त्याने हे थांबवले होते. आज कित्येक वर्षांनंतर विजयमधील चित्रकार पुन्हा जागृत झाला. आज चित्र काढताना विजयचे मन त्या चित्रात एकाग्र झाले होते. त्याला आयुष्यातील सर्व समस्यांचा जणू विसरच पडला होता. यापूर्वी त्याने काढलेली सर्व चित्रे त्याच्या नजरेसमोरून चित्रांच्या रीलसारखे पुढे सरकत होते. विजयच्या चित्रांवर सर्वात जास्त प्रेम कोणाचे होते तर ते रश्मीचे! त्यानंतर निलिमाचे. आणि त्या दोघींपेक्षाही मेनका आणि दिव्याचे! त्यावेळी विजय रांगोळीही काढत असे आणि मुलींच्या हातावर मेहंदीही काढत असे. रश्मी मेनका आणि दिव्या यांच्या हातावर विजयने मेहंदी काढली होती. तो स्वतःच्या हातावर मेहंदीने एन, आर आणि एस ही इंग्रजी अक्षरे कोरत असे. इतकेच काय विजय त्याच्या अंगट्याच्या नखाला नेलपॉलिशही लावत असे. तीही लाल!  ती पाहून एक मुलगी त्याच्यावर फिदा झाली होती. फक्त तिच्यासाठी त्याने टाइपिंगचा क्लास लावला होता. तिने तेथील टायपिंग क्लासला शिकविण्याचे काम सोडले आणि विजयने टायपिंग!

ही विजयची जगाला माहीत नसणारी सर्वात लहान प्रेमकथा होती. सर्वात मोठी प्रेमकथा ठरली ती विजय आणि प्रेरणाची! त्याहून मोठी प्रेमकथा होणार आहे विजय आणि अनामिकेची.विजय आणि प्रेरणाची प्रेमकथा यशस्वी झाली असती पण विजयचा भ्रमरासारखा स्वभाव आणि फुलासारखं दिसणं आणि त्यामुळे फुलपाखरांचं त्याच्या प्रेमात पडणं आडवं आलं होतं. विजय प्रेरणाच्या आठ वर्षे प्रेमात होता. त्यातून तो तेंव्हाच बाहेर पडला जेंव्हा फेसबुकवर तिच्या लग्नाचे फोटो पाहिले. तिला कधीही कळणार नव्हते कीं एक तरुण तिच्यावर आठ वर्षे जीवापाड प्रेम करत होता. ती दिसायला खूपच सामान्य असताना.तो तिच्या चेहऱ्यावरील तिळाच्या प्रेमात पडला होता.

त्याच टायपिंग क्लासमध्ये विजयला त्याचा एक शालेय मित्र भेटला. समीर. शाळेत असताना खूपच सामान्य विद्यार्थी होता. पण घरची श्रीमंती असल्यामुळे शाळेतून बाहेर पडल्यावर चतुर बिरबल झाला होता. त्या टायपिंग क्लासमध्ये टायपिंग क्लास कसा चालतो हे शिकून घेतले आणि स्वतःचा टायपिंग क्लास उघडला, नंतर कोचिंग क्लास, कम्प्युटर क्लास सुरू केला.  त्याच्याच क्लासच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेरणा आणि विजयची एकदा भेट झाली पण तेंव्हा विजय तिच्याशी बोलला नाही कारण तेंव्हा विजयची सामाजिक पत वाढली होती. आणि तो सवयीप्रमाणे सुष्माचा प्रेमात पडला होता. पण तरीही अनामिका नंतर सर्वात जास्त काळ तो प्रेरणाच्या प्रेमात होता म्हणजे ती दिसली की त्याच प्रेम उफाळून यायचं! तेंव्हा ती चवळीची शेंग होती आता भोपळा झाली आहे. आणि विजय आजही शेवग्याची शेंग आहे. फक्त केस सोडले तर आता तो पूर्वीपेक्षाही बरा दिसतो. समीर विजयचा सल्ला घेतल्या खेरीज काही करत नसे. विजय त्याच्या आयुष्यात आला आणि त्याच्या यशाचा आलेख वाढत गेला. प्रेरणाला पाहण्याच्या निमित्ताने तो रोज त्याला भेटायला जात असे. बऱ्याचदा विजय ज्या मुलीच्या प्रेमात पडायचा तिची मैत्रीण नाहीतर बहीण त्याच्या प्रेमात पडायचीच आणि त्याच्या प्रेमाची गाडी प्रत्येक वेळी भरकटायची.

समीरने  एकदाच विजयचे म्हणणे ऐकले नाही आणि तो अपयशाच्या गर्तेत सापडला इतका की त्या गर्तेतून तो बाहेरच येऊ शकला नाही. समीर एका त्याच्याच क्लासमध्ये शिकलेल्या एका मुलीच्या प्रेमात पडला होता ती मुलगी विजयच्या ओळखीची होती. समीरने विजयला ती मला आवडते असे विजयला सांगितल्यावर विजय सवयी प्रमाणे स्पष्टीकरण न देता त्याला म्हणाला, ” त्या मुलीच्या भानगडीत पडू नको! फसशील. पण समीर तिच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की नेहमीच विजयचा सल्ला मानणाऱ्या त्याने  त्यावेळी त्याचा सल्ला मानला नाही आणि तो त्या मुलीत गुंतत गेला तिला प्रेमात पाडण्याच्या नादात तिच्यावर त्याने प्रसंगी उदारी घेऊन बरेच पैसे खर्च केले. पण शेवटी तिने समीरला टांग दिलीच.

त्यानंतर समीरने लग्न केले आणि विजयचे मित्र नसणारे नवीन श्रीमंत मित्र जवळ केले ज्यांनी त्याला ह्याची टोपी त्याला आणि त्याची टोपी ह्याला करायला शिकविले. त्या नादात त्याने लाखो रुपयाचं कर्ज पठाणी व्याजावर घेतलं जे फेडण्यासाठी त्याच्या वडिलांना राहतं घर विकावं लागलं. त्यानंतर तो विजयला कधीच भेटला नाही की विजयने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला नाही कारण एका प्रकरणात त्याने विजयलाही अडकविण्याचा प्रयत्न केला होता.

प्रेरणा आणि विजय यांची पहिली नजरानजर प्रतिभा बारावीला असताना झाली होती. प्रेरणाची क्लासला जाण्याची वेळ आणि विजयची कामाला जाण्याची वेळ एकच होती. दोघे एकाच बस स्टॉप वर उतरत. प्रेरणा सोबत एक सोनाली नावाची मुलगी असे.  प्रेरणा बस मधून उतरल्यावर तिच्या मागून चालणाऱ्या विजयकडे वळून वळून पाहत असे! तेंव्हा नक्की ती त्याच्या प्रेमात पडली होती की तिच्या मैत्रिणींपैकी कोणी त्याच्या प्रेमात पडली होती ते कळत नव्हते. पण त्याचवेळी विजयच्या आयुष्यात वादळ होऊन एक तरुणी आली होती.  त्याचं काय झालं होतं बसमध्ये एका तरुणी सोबत विजयच शाब्दिक भांडण झालं होतं. पण त्यानंतर ती तरुणी बसमध्ये कितीही सीट रिकाम्या असल्या तरी विजयच्याच बाजूला येऊन बसायची. एक दिवस बसमध्ये तिच्या ओळखीचं कोणी तरी होतं म्हणून ती एकटी बसली असता बदला! म्हणून विजय तिच्या बाजूला जाऊन बसला. ती विजयने त्याच्या आयुष्यात केलेली सर्वात मोठी चूक होती! असे विजयला आजही वाटत होते. कारण ती मुलगी नेमकी प्रेरणाची मैत्रीण निघाली आणि बसमधून उतरण्यासाठी विजय दरवाज्यात येताच ती प्रेरणाला  म्हणाली,” हा मुलगा माझ्या मागे लागला आहे. त्यानंतर प्रेरणाचे वळून – वळून पाहणे थांबले.  पण हे येथेच थांबणार नव्हते प्रेरणाची मैत्रीण सोनाली ती विजयच्या एका जिवलग मित्राची बहीण निघाली. पण प्रेरणाला पटविण्यात तिचा काही उपयोग झाला नाही कारण ती ही विजयच्या प्रेमात पडली होती. पुढे विजय कामासाठी इकडे – तिकडे जायला लागला आणि मधे तीन वर्षे गेली. एक दिवस विजय त्याच्या वर्गातील एका जिवलग मित्राला भेटायला गेला आणि त्याला कळले की प्रेरणा त्याची बहीण आहे. विजयला प्रेमात पडायचं होतं म्हणून नाहीतर तो तिच्यासोबत लग्नासाठी सरळ – सरळ विचारु शकला असता पण कदाचित त्यांचं प्रेमही नियतीलाच मान्य नसावं म्हणून त्यांच्या बाबतीत कारण नसतानाही सोप्प्या गोष्टी अवघड झाल्या. प्रेरणा नाही म्हणून सोनालीला जवळ करणं हे विजयला पटत नव्हतं! म्हणूनच तो दोघींनाही गमावून बसला. पण विजय प्रेरणाच्या प्रेमात होता म्हणून तो फक्त तिच्यात गुंतलेला नव्हता. मधल्या काळात त्याच हृदय चोरणाऱ्या त्याच्या आयुष्यात येतच होत्या. आजही येत आहेत.

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 417 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..