नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – ५७)

विजयच्या घराची बेल वाजल्यावर विजयने दरवाजा उघडला तर दरवाज्यात त्याच्या इमारतीतील काही तरुण गणपतीची वर्गणी गोळा करायला आले होते. विजयने सुरुवातील १०० रुपये वर्गणी दिली पण आम्ही सर्वांकडून १५१ रुपये वर्गणी घेत आहोत म्हटल्यावर विजयने आणखी ५१ रुपये वर्गणी दिली. वर्गणी देताना विजयला मनस्ताप वगैरे होत नाही. पण बऱ्याच लोकांना त्याचा त्रास होत असावा असे विजयला प्रामाणिकपणे वाटते.त्यामुळेच विजय कोणालाही वर्गणी देताना कमीत कमीच देतो कारण एका वर्षी आपल्याला जास्त वर्गणी द्यायला परवडत असेल तरी  ती द्यायला प्रत्येक वर्षी आपल्याला परवडेलच असे नाही ना ? माणसाने धार्मिक कार्यात सहभाग नोंदवायलाच हवा ! पण त्याचा कोणाला त्रासही नको व्हायला या मताचा विजय आहे. विजय सर्व उत्सवाची वर्गणी देतो पण त्या उत्सवांना उपस्थित मात्र राहत नाही. त्याला ते आवडत नाही कारण त्याला तो त्याच्या वेळेचा दुरुपयोग वाटतो. ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी खुशाल धर्मकार्य करावे पण ज्यांच्या वेळेला जास्त किंमत आहे आणि ज्यांचा वेळ समाजउपयोगी कामात खर्च होणार असेल त्याने या भानगडीत पडू नये असे विजयला वाटते. तशी विजय धार्मिक कार्यात कधीच ढवळाढवळ करत नाही मागे एकदा विजय त्याच्या कोकणातील गावी गेला होता. कोकणात बऱ्याच गावात पोस्त हा एक प्रकार असतो त्यात दरवर्षी देवाला म्हणजे देवाच्या पाहरेदाराना  कोंबड्या बकऱ्याच्या मटणाचा नैवद्य दाखवून ते मटण आणि तांदळाच्या भाकऱ्यांवर अक्का गाव प्रसाद म्हणून ताव मारतो. विजय आणि विजयचे बाबा शाकाहारी असल्यामुळे ते काही तो प्रसाद ग्रहण करू शकले नाही पण ते ह्या उत्सवाला उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी अंगणात बैठक बसली असता विजयचे बाबा म्हणाले की आता हे सर्व प्रकार बंद व्हायला हवेत ! मांसाहाराऐवजी शाकाहारी जेवण पोस्ताला ठेवायला हवे ! त्यावर जवळ जवळ सर्वानी होकार भरला पण ते बदलण्याचे काही त्यातील कोणाच्या आवाक्यात नव्हते.. पण विजय मात्र म्हणाला,” नाही ! हे काही बदलण्याची गरज नाही , पिढ्यानपिढ्या जे चालत आले आहे ते तसेच चालत राहायला हवे ! आणि ज्याला नाही खायचे त्याने खाऊ नये ! असेही सर्वच मांसाहार करतातच मग ती एक प्रथा बदलून काय होणार आहे ? प्रथेचा भाग सोडला तर त्या निमित्ताने का होईना गावातील सर्व लोक वर्षेतून एकदा एकत्र येतात, एकत्र जेवतात हे काही कमी नाही.त्यानंतर तो विषय थांबला.. पण विजयने या परिवर्तनाला विरोध का केला ? हा प्रश्न उरतोच ! विजयने विरोध केला कारण अशा गोष्टी बदलल्यावर जर कोणाला काही त्रास झाला तर लोक उगाचच असा समज करून घेतात कि हा त्रास त्यांनी केलेल्या बदलामुळे झालेला आहे. आणि मग ते देवदेवस्कीच्या मार्गाला लागतात जे जास्त हानिकारक आहे.. त्यामुळे ज्या प्रथांमुळे समाजाचे काही नुकसान होत नाही त्या न बदललेल्याच बऱ्या. विजयला कोणीही प्रसाद म्हणून कोणताही पदार्थ दिला मग तो त्याच्या आवडीचा असो व नसो तो तो प्रसाद म्हणून खातोच. कारण त्याला समोरच्याच्या श्रद्धेचा अपमान करायचा नसतो.

विजय स्वतः कधीच देवाची नित्यनियमाने पूजा वगैरे करत नाही पण त्याला रस्त्यात प्रवासात जेवढी देवळे मिळतात त्यांना तो हात जोडतोच ! ते जोडताना तो आजूबाजूला पाहतो कि किती लोक हात जोडतात ? पण त्याला जाणवते कि आज दुर्दैवाने फारच कमी लोक हात जोडतात. आज जी तरुण पिढी देवदर्शनाला जाते ती ही पिकनिक म्हणून जाते हे वास्तव आहे. विजयला कोणत्याही देवस्थानात जाऊन दर्शन घेण्याची संधी स्वतःहून चालत आली तर ती सोडत नाही पण तो अट्टहासाने कोणत्याही देवस्थानात दर्शनाला जात नाही. काही लोक देवाला हजार रुपयाचा हार घालतात पण दानपेटीत शंभर रुपये टाकायला रडतात. विजय त्या विरुद्ध वागतो तो हार स्वस्तातला घेतो आणि दानपेटीत जास्त पैसे टाकतो.. कारण देवाची सेवा करणाऱ्यांचा खर्च त्या दानातूनच निघत असतो.त्याहूनही जास्त दान देवळाबाहेर बसलेल्या लोकांना करावे असे विजयचे स्पष्ट  मत आहे. पण विजय त्याच्या कुवतीपेक्षा जास्त दान करत नाही आणि कोणाला तसे करण्याचे वचनही देत नाही. विजयला त्याला शक्य असेल ती मदत त्याच्याकडे मदत मागणाऱ्या प्रत्येकाला करतो मग तो त्याचा शत्रू असला तरी.. पण जी मदत करणे त्याच्या आवाक्या बाहेर आहे तेथे तो न लाजता स्पष्ट नकार देतो.. जे बऱ्याच लोकांना जमत नाही.. ती लोक उडवाउडवीची उत्तरे देतात आणि समोरच्याला भ्रमात ठेवतात. आता सहा महिने विजयला फार काही पैसे कमावता न आल्यामुळे विजयच्या बाबाना झालेला त्रास त्याला जाणवू लागला होता. पण तो त्याच्याकडे दुर्लक्ष करत होता. कारण ते आध्यात्मिक असतानाही त्यांची मोहमाया सुटलेली नव्हती आणि विजय त्यावर विजय मिळवू पाहत होता. एक अज्ञात शक्ती विजयची काळजी वाहते आणि ती शक्ती यापुढेही त्याची काळजी वाहेल याची विजयला खात्री आहे त्यामुळे त्याला व्यक्तिश : कसलीच चिंता नाही. विजयचे बाबाही कोणतीही चिंता न करता आयुष्य शांततेत व्यतीत करू शकतात पण मोह ! तो सुटत नाही.. ते नेहमी विजयला त्याच्या कमाईवरून बोलत असतात कसले टोमणे मारत असतात.. त्यांना वाटते की विजयला आर्थिक उत्पन्न कमी आहे म्हणून तो लग्न करत नाही. ते वाढले तर तो लग्नाचा विचार करेल असा त्यांचा समज आहे. पण तो गैरसमज आहे. विजय लग्न न करण्याचे कारण अनामिका आहे हे त्यांना कधीच कळणार नाही. विजय खूप कमी पैशात स्वतःही आंनदी राहू शकतो आणि इतरांनाही आनंदी ठेवू शकतो. विजयने स्वतःच्या गरजा किती मर्यादित करून घेतलेल्या आहेत. तो एक रुपयाही विनाकारण स्वतःसाठी खर्च करत नाही. त्यावर त्याच्या बाबाचे म्हणणे असते की कमाईच नाही तर खर्च कसे करणार.. म्हणजे विजय या सगळ्या मोहातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचे स्वतःला आध्यात्मिक म्हणवून घेणारे आईवडील त्याला मोहात पडण्याचा प्रयत्न करीत आहेत. पूर्वी विजयला खूप गोष्टींचे आकर्षण होते म्हणजे चांगले कपडे, चांगले बूट, चांगला गॉगल, चांगला बेल्ट, चांगले अत्तर, चांगले घडयाळ, चांगला मोबाईल, चांगला पेन, पण आता ते आकर्षण उरलेले नाही.. विजयला सोन्याचेही आकर्षण नाही. त्याचे आईवडील त्याला सणासुदीच्या दिवशी दागिने म्हणजे गळ्यात सोन्याची चैन जबरदस्ती घालायला सांगतात पण तो शक्यतोवर घालणे टाळतो.. कारण सोन त्याला त्याच्या जीवावरील संकट वाटते.. ज्या गोष्टी आपल्याकडून हरवल्यास किंवा आपल्याकडून कोणी चोरल्यास आपल्या दुःख होईल अशा कोणत्याच गोष्टी त्याला जवळ बाळगायला आवडत नाही.. विजय नेहमी म्हणतो माझ्याजवळ एक अशी मौल्यवान गोष्ट आहे जी माझ्याकडून कोणीच चोरून घेऊ शकत नाही आणि माझ्याकडील सर्व गोष्टी जरी चोरीला गेलया तरी माझ्याकडे ती गोष्ट असल्यामुळे मला दुःख होणार नाही , ती गोष्ट म्हणजे माझी बुद्धी !.. या जगात सर्वानी माझी साथ सोडली तरी चालेल तिने साथ सोडता कामा नये.बुद्धीच आहे जी माणसाला मोहात गुंतवून ठेवू शकते आणि मोहातून बाहेरही काढू शकते. गीतेचे तत्वज्ञान विजयच्या मनात खोलवर रुजलेले आहे. गीतेचे फळ काय तर तुमचा मोह नष्ट होणे ! पण वर्षनुवर्षे गीतेचे पारायण करणाऱ्या विजयच्या बाबांचा मोह नष्ट झाला नाही पण गीतेचा मराठी अनुवाद फक्त एकदाच वाचलेल्या विजयचा मोह मात्र नष्ट झाला तो त्याच्या अचाट बुद्धीमुळेच. एकाच गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो तो फक्त बुद्धीमुळे ! माणसाचा मोह नष्ट होणे हे ही त्याच्या नियतीत असावे लागते. विजयच्या नियतीत ते होते म्हणूनच त्याला त्याच्या बुद्धीचा उपयोग फक्त आणि फक्त पैसे कमवण्यासाठी करता आला नाही. जे आयुष्यभर फक्त पैशाच्या मागे धावतात त्याच्या वाट्याला पुढे जाऊन कसे आयुष्य येते हे या कलियुगात सर्वानाच उगड्या डोळ्यांनी पाहता येते पण तरीही लोक त्यातून काही बोध मात्र घेत नाहीत. हे वास्तव आहे.

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..