विजयच्या जन्मकुंडळीत तो उत्तम चित्रकार होण्याचे योग होते आणि त्याची स्वतःचीही चित्रकार होण्याची इच्छा होती पण ती इच्छा काही पूर्ण झाली नाही. आणि आता तर त्याच्यातील चित्रकार जवळ जवळ संपलाय कारण मागचे कित्येक वर्षे त्याने चित्र काढलीच नाही. विजय शाळेत असताना स्वतःच्या हाताने छान ग्रिटींग तयार करत असे आणि ते ग्रिटींग वर्गातील मुलींना खूप आवडतं पण ! विजय वर्गातील एकही मुलीशी बोलत नसे पण एका मुलींबद्दल त्याला विशेष काहीतरी वाटत असे ते कालही ते कालही वाटत होतं आजही वाटतं आणि भविष्यातही वाटत राहील. विजय शाळेत असताना आजूबाजूच्या सर्व मुलांना चित्रे काढून देत असे. अगदी रात्री बारा बारा वाजेपर्यत जागून चित्रे काढून देत असे ती एकच गोष्ट होती जी करण्याचा त्याला कधीच कंटाळा आला नव्हता. विजय जेंव्हा चित्रकार होण्याची स्वप्ने पाहत होता तेंव्हा त्याच्याकडे रंग घ्यायला पैसे नव्हते. आणि जेव्हा रंग घ्यायला भरपूर पैसे होते तेंव्हा त्याच्यातील चित्रकार खपला होता. निताच्या आईने तर विजयने काढलेले साईबाबांचे चित्र पूजेलाच लावले होते. एक दिवस विजयने प्रयोग म्हणून एका नग्न स्त्रीचे चित्र रेखाटले आणि ते फाडून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकले नेमकी त्या ढिगाऱ्यात विजयच्या मानलेल्या मावशीची मुलगी खेळण्यासाठी लागणारे माचीसचे पत्ते शोधायला गेली तेंव्हा त्या चित्राचे काही तुकडे तिला सापडले ते घेऊन ती विजयकडे आली आणि विचारले, ” हे चित्र तू काढलं होतंस का ? विजय सराईतपणे खोटं बोलला पण ते तिला पटलेलं नसावं बहुदा कारण त्या अक्क्या झोपडपट्टीत इतकी चांगली चित्रे काढणारा विजय एकटाच होता. पण हाच प्रयोग काही मूर्खानी सार्वजनिक बाथरूमच्या दरवाज्यावर केला तेंव्हा काही मित्रांनी विजयवर शक व्यक्त केल्यावर विजय म्हणाला, ” ती चित्रे जर मी काढली असती तर लोकं बाथरूमधून तासन तास उठली नसती. विजय नग्नतेतही सौंदर्य शोधत असे. विजयची ती मानलेल्या मावशीची मुलगी म्हणजे रश्मी ती विजयहून तीन वर्षांनी लहान होती. विजय हुशार असल्यामुळे तिचा अभ्यास घेत असे आणि तिला चित्रे काढून देत असे, निबंध- भाषणे लिहून देत असे, या जगात विजयने जलद लिहिलेले फक्त तिला वाचता येते. त्यामुळेच विजयने काढलेले चित्र तिने सहज ओळखले. विजय कोणत्या मुलींच्या मागे आहे आणि कोणती मुलगी त्याच्या मागे आहे हे तिला अचूक माहीत होते. ती आजही विजयच्या संपर्कात आहे. ती तिच्या आयुष्यात खूप यशस्वी झाली आहे. याचा विजयला खूप आनंद आहे. पण तिला अजूनही विजय कोणामुळे अविवाहित राहिला आहे हे गूढ काही खूप शोधूनही सापडले नाही.
ती जिचं विजयला शाळेत असताना आकर्षण होतं ती म्हणजे निलिमा…विजयच आयुष्य ढवळून काढणारी पहिली मुलगी दिसायला ? विजयच्या आयुष्यात आलेली सर्वात सुंदर स्त्री…विजय आणि तिचीही एक गोड कथा आहे ती ही सांगू कधीतरी या कथेच्या ओघात…विजयच्या शालेय जीवनात बऱ्याच गमती जमती झाल्या होत्या. विजय दहावीत असताना म्हणजे विजयच्या दहावीच्या वर्गाच्या निकालावर शाळेची सरकारी ग्रॅंट ठरणार होती त्यामुळे या वर्गावर शिक्षकांचे विशेष लक्ष होते. इतकेच काय हा वर्गही बरोबर शिक्षकांच्या स्टाफ रूमला लागून होता आणि मधोमध दोन खिडक्या होत्या. इतकेच नव्हे तर शिक्षकांचे मुलांच्या लपड्यांवरही लक्ष होते. एक दिवस अचानक एक शिक्षक आणि शिक्षिका वर्गात आले आणि सर्वांचे हात खांद्यापर्यत तपासले ज्या मुला मुलींच्या हातावर पेनाने ए बी सी डी सारखी अक्षरे कोरलेली दिसली. काही महाभागांनी ती अक्षरे ब्लेडने कोरलेली होती. त्या सर्वांना स्टाफ रूममध्ये घेऊन धू धू धुतला. विजय वाचला कारण त्याने त्याच्या हातावरचा आर त्याचा नंबर येईपर्यत थुंकी लावून लावून पुसला. पण त्या वर्गातील दहा बारा प्रेमकथा अयशस्वी ठरल्या. मुलगे पुढे यशस्वी झाले पण मुली मात्र संसारात रमल्या भविष्य गमावून…त्यात निलिमा नव्हती…ती खूपच अभ्यासू होती. ती दहावीला उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाली आणि एका चांगल्या कॉलेजात प्रवेश घेऊन पदवीधर झाली. विजय अभ्यासातही अभ्यास करत नसे त्याला वेगळं काही शिकण्याची काही तरी निर्माण करण्याची आस होती. ती असच त्याच्या गळ्यातील फास बनली होती.
विजयने त्याच्या शालेय जीवनात एकही निबंध मग तो कोणत्याही भाषेतील, कोणत्याही विषयावरील असो कधीच कोणत्याच निबंधाच्या पुस्तकात बघून लिहिला नाही की कधी कोणाकडून लिहून घेतला नाही. पण विजयच्या वहितील निबंध खूप मुलं उतरवत असतं. आजूबाजूच्या मुलांना स्पर्धेसाठी विजयने लिहून दिलेल्या निबंधाला बक्षीस मिळाले नाही असे कधीच झाले नाही. एक दिवस विजयने विजयाला एक निबंध लिहून दिला होता. त्या निबंधाच्या शेवटी विजयने स्वतः तयार केलेल्या कवितेच्या काही ओळी लिहिल्या होत्या. विजयाचा तो निबंध वाचून सर्व मुलांनी निबंध वेगळा लिहिला पण सर्वांच्या निबंधात शेवटी कवितेच्या ओळी मात्र त्याच होत्या..सर्वांचे निबंध वाचल्यावर मराठीचे शिक्षक म्हणाले, निबंध सर्वांनी वेग वेगळे लिहिले आहेत पण कविता एकच आहे ? ती कोणी लिहिली म्हटल्यावर सर्वांनी विजयकडे बोट दाखविले असता ती म्हणाली ,” माझ्या भावाने लिहिली. त्यावर शिक्षक म्हणाले, खूप छान कविता आहे. विजय आणि कविता यांचा संबंध कसा आला ? याची कथा फारच रोमँटिक आहे…जिच्यासाठी विजयने त्याच्या आयुष्यातील सर्वात पहिली कविता लिहिली ती म्हणजे शर्मिला…शर्मिला त्या विभागातील सर्वात हुशार मुलगी होती. दिसायला अतिशय सुंदर, मध्यम उंची , गोरीपान, काळेभोर डोळे, आवाज गोड पण भारदस्त, अभिनय आणि वक्तृत्वाची आवड ! शाळेत असताना भाषण स्पर्धेत कधीही पहिला नंबर सोडला नाही. फक्त चित्रकलेत तिला फार गती नव्हती. विजयच्या आयुष्यात त्याला त्याच्या तोडीची वाटणारी मुलगी ! त्यात विजयहून तीन वर्षांनी लहान त्यामुळे विजय तिच्या प्रेमात पडला होता. ती विजयच्या तुलनेत श्रीमंत म्हणावी अशीच होती. त्यावेळी विजयच्या झोपडपट्टीत नळाचे पाणी नव्हते त्यामुळे त्यांचा डोंगर उतरल्यावर असणाऱ्या विहिरीवरून पाणी आणावे लागत असे शर्मिलाने घर विजयपेक्षा उंचावर होते म्हणजे विजयच्या घराजवळूनच तिचा घरी जाण्याचा रस्ता होता. त्या रस्त्यावरून खूप सुंदर सुंदर मुली तेंव्हा जात येत असत. विजय त्या रस्त्याच्या कडेला शर्मिला येण्याजाण्याच्या वेळेला उभा राहात असे. तिला एक नजर पाहिले की निघून जात असे ! त्यानंतर ती जेंव्हा कधी विहिरीवर पाणी भरायला गेली की तो ही कधी कधी घरात पाण्याने भरलेले हांडे रिकामे करून विहिरीवर जात असे. आणि तिच्याकडे पाहात विहिरीतील पाणी उपसत असे आणि ओळखीच्या दोन चार मुलींचे हांडे भरूनही देत असे. त्यावेळी डॉगरावर पावसाळ्यात एक ओढा वाहत असे त्या ओढ्यावर पावसाळ्यात ती कपडे धुवायला जात असे आणि नाही गेली तर त्या ओढ्याकडे जाणारा रास्ता तिच्या घरासमोरून जात असे त्यामुळे विजय पावसाल्यात त्या ओढ्यावर काही नाही तर घरातील चादरी धुवायला नेत असे. आणि ती ओढ्यावर येईपर्यत तेथेच पाण्यात डुबक्या मारत राही. आणि डुबक्या मारून झाल्यावर तेथेच असलेल्या दगडावर चादरी आणि कपडे सुकवत बसत असे.. त्याच गडावर बसून विजयने कित्येकदा इंग्रजीचे शब्दही पाठ केले होते. तिला आपली हुशारी दिसावी म्हणून ती समोर असताना विजय मित्रांसोबत इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करत असे. तिच्यामुळेच विजयला आजही बरी इंग्रजी येते.
— निलेश बामणे.
Leave a Reply