नवीन लेखन...

एक अभागी – नक्षलवादी दहशतीची बळी (कथा ५)

शाळेत मुळाक्षर,शिकणे, १०० पर्यंत आकडे मोजणे, प्रादेशिक कोया भाषेत हे सर्व लिहिता येणे, ही नक्षलवादी जनता सरकारची सर्व मुलामुलींना शिक्षण देण्याची पद्धत, इयत्ता वगैरेची गरज नाही, अबुजमाड भागात अशा शाळा आहेत. एवढे जुजबी शिक्षण घेतले की यातील काही मुले खेड्यातील आपली राहती चंद्रमोळी झोपडी सोडून जंगलातील नक्षलवादिंच्या तंबूत राहण्यास येतात व तेच त्यांचे कायमचे आयुष्य जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत, नाहीतर केंव्हाही मृत्यूच्या जाळ्यात अडकायचे, नक्षल प्रमुखाच्या गोळीने नाहीतर पोलिसांच्या गोळीबारात.

ही कथा आहे सोमनी या अभागी मुलीची,जी १२ वर्षे आपले राहते घर सोडून नक्षलवादी जमाती बरोबर जंगलात राहिली म्हणजे त्यांच्या बंदिवासात होती,तिच्या जीवनाची ही आहे शोकांतिका,

मंडपली या खेड्यात ( गडचिरोली ) लालू व चीनाका हे जोडपे, त्यांना  दोन मुली विमल १५ वर्षाची, सोमनी १३ वर्षाची. मुख्य काम जंगलातील लाकूड फाटा  आणणे, तेंदू पत्ता गोळा करणे, घरच्यांची इच्छा मुलीनी शिकावे, म्हणून दोघी आपल्या झोपडी पासून ५ किमी अंतरावरील एका खेड्यातील चावडीवर शाळा भरत असे तेथे चालत जात. शाळा कसली, एकच वर्ग, एकच मास्तर कधी आले तर शाळा नाहीतर मुलांचा नुसता गोंगाट, मारामारी करत वेळ घालवायचा, विमल मनापासून अभ्यास करायची, पण शिकवणार कोण? सोमनीचे शाळेत अजिबात लक्ष नसे, गावात भटकण्यात तिचा वेळ जात असे, त्यांच्या घराला लागूनच काकांचे घर. चुलत भाऊ विश्वनाथ २० वर्षाचा, नक्षल दलमचा सदस्य, त्याला सगळे घाबरत असत. दलमचे सदस्य वरचेवर त्यांच्या घरी येत, खांद्यावर बंदुक, लाल, हिरवे पिवळे अशा बटबटीत  रंगाचे टी शर्टस, गडद रंगाच्या पॅटसं, त्यांचा दरारा पाहून सोमनीला कुतहूल वाटे. इकदा विश्वनाथ १० एक दलमच्या लोकांना घेऊन गावात आला, प्रत्येक घरातून तांदूळ गोळा करत, मुकाट्याने गावकरी देत, नाही दिल्यास खैर नसे, जबरदस्त मारपीटीचा धसका, पोटभर तांदूळ गोळा होई, त्यांच्या बरोबर सोमनी पण गावभर फिरे, एवढ्याशा पोरीला काय कळणार, हे कशाकरता चाललय, निष्पाप मनाने ती बागडत घरोघरी फिरे.

एकदा विश्वनाथ दादाने तिला आपण ज्या भागात काम करतो तेथे नेण्याचे आमिष दाखविले. तिथे राहण्यास छान घर, जेवताना रोटी, कोंबड, जेवण, तिने उभ्या आयुष्यात एकदाच असे जेवण घेतल होत, बिचारी भुलून गेली, आई बाबांना चुकवून एका काळोख्या रात्री दादा बरोबर मंडपलीचे घर सोडले, आणी रात्रभर जंगल तुडवत पहाटेला एका तंबूत दाखल झाली.बोचणारे काटे,आणी जीवघेणी चाल पायाचे तुकडे पडले होते. वेड्या आशेवर प्रवास पुढे चालू होता. दुसऱ्या दिवशी दलमच्या एका मुलाने स्कूटर वरून तिला  ७-८ तासाचा प्रवास घडवत छत्तीसगड मधील अबुजमाड जंगलातील दलमच्या तळावर पोहचते केले. सामान ने आण करणारी सुसज्ज यंत्रणा, सर्व जण जीवावर उदार होऊन काम करत होते. आता विश्वनाथ दादाची रवानगी आल्या आल्या एका दूरच्या जंगलात झाली असल्याने त्याचे दर्शनही घडणार नव्हते. घनदाट जंगलात दोन तंबू, तेथे जमिनीवर झोपायचे, कडाक्याची थंडी, बाहेर शेकोटी, तिच्या बरोबर साधारण तिच्याच वयाच्या दोन मुली बरोबर राहत असत. रोज सकाळ संध्याकाळ जेवण्यास भाताची पेज, महिन्यातून एखादे दिवशी कोंबडे भाकरी मिळे, दिवसभर मरमर काम करायचे, रात्री झोपताना आई बाबांची आठवण काढत मुसूमुसू रडत आठवण काढत झोपी जायचे, दिवसभर tape recorder  वर दलमची शौर्यगाणी ऐकून कान कीटून जात, बंदुकधारी दलमच्या कार्यकर्त्यांचा जबरदस्त धाक, जीव अगदी मेटाकुटीला आला होता.

अबुजमाड जिल्हा दलमच्याच ताब्यात, त्यांचेच सरकार, कर वसुली तेच करणार, या पाड्यांमधील मुलांकरता दलमची शाळा, आम्ही सरकार पेक्षा किती जबाबदार आहोत, आम्हाला गरीब आदिवासींची काळजी आहे, त्यांची मुले शिकली पाहिजेत हे दाखविण्या करता  एका कच्च्या घराच्या ओसरीवर शाळेची पाटी लावून शाळा चालू केलेली. खेड्यातील २०/२२ मुले दुपार पर्यंत तेथे जमा होत, त्यांना शिकविण्या करता दोन दलमच्या मुलींची नियुक्ति करण्यात आली, एक सोमनी, दुसरी सोनू माडवी, दोघींनी शाळेतच राहायचे अशी व्यवस्था, कोया भाषेतील १ ते १०० आकडे, आणी त्याच भाषेतील मुळाक्षरे शिकवणे हाच रोजचा अभ्यासक्रम; सर्वांना एकच वर्ग, छोटा फळा, खडू, मुलांना ना पाट्या ना पुस्तके, मुलांकडून तोंडाने म्हणून घ्यायचे, काही मुले मधेच पळून जात, ३ वर्षे सर्वाना तोच अभ्यासक्रम सोबत दलम नेत्यांनी रचलेली क्रांतीची गाणी अखंड म्हणावी लागत. ती सर्व मुलांकडून पाठ करून घ्यावी लागत. दुपारी शाळा संपली की, दलमच्या तंबूत परत यायचे, सामान इकडून तिकडे न्यायचे, दोन वेळचा स्वंयपाक, तीन वर्षाचा खडतर काळ गेला होता, आपणच तुरुंगवास पत्करला होता, घरची आठवण येऊन काहीच उपयोग नव्हता, पुढे अंध:करच होता, सोमनी जसजशी वयात येत होती, तसतशा सेनापतींचा आधाशी नजर तिच्यावर पडत होती. दारू ढोसून सोमनीला टेप वरील गाण्यावर अश्लील नाच करण्यास भाग पाडत, काही उलट उत्तर दिल्यास थोबाडून काढत, बंदुकीची भीती तर कायमची पुजलेली, त्या दलम मधील दिलीप कोरसे हा मृदू स्वभावाचा सोमनिची हैवाना पासून सुटका शिताफीने करी, त्यामुळे त्याचे कामे ती मनापासून करीत असे, सर्व सेनापतींच्या बैठका रात्र रात्र एका कंदिलाच्या उजेडात चालत, सोमनी तंबूच्या बाहेर उघड्यावर एका कांबळ्यात थंडीत कुडकुडत बसलेली असे, केंव्हाही सेनापती चहा आणण्यास सांगत, न कुरकुरता चहाचे  पेले हजर करावे लागत.

दिलीप कोरसाच्या मनात सोमनी भावली होती, तिच्या बद्दल करुणा होती, तिने एकदा त्याच्या जवळ माझ्या घरी पोहचवण्याचा विषय काढला, दिलीपने तिला घरी गुपचूप नेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या, प्रथम त्याने तिला तिच्या घरच्या परीस्थितीची जाणीव करून दिली, ती पळून गेल्यानंतर पोलीसांना सुगावा लागताच घरावर धाड पडली, आई वडीलांना ताब्यात घेतले, चौकशीचा ससेमिरा लागला होता. तू जर परत गेलीस तर दलमची कार्यकर्ती म्हणून तुला पोलीस पकडतील, व तुझ्याकडून आमच्या विभागाची माहिती मिळविण्या करता तुला मारहाण करतील, व तूला तर आमच्या कार्याची काहीच माहिती नाही, पण तू खोटे बोलत आहेस म्हणून तुझे आणखीन हाल करतील, तुझा परतीचा रस्ता बंद झालेला आहे, तेंव्हा गोडीगुलाबीने तू इथेच माझी सहकारीणी म्हणून राहा, मी तुला राणी सारखी सुखात ठेवीन, कोणाचीही तुझ्यावर हात टाकण्याची हिम्मत होणार नाही. नाईलाजाने सोमनी दिलीपच्या झोपडीत राहू लागली, काही दिवस सुखात गेले, एके दिवशी दिलीप बंदुका व दारुगोळा घेऊन दूरच्या जंगलात निघून गेला, महिने चे महिने त्याला तेथे राहावे  लागले, सोमनीला  एकट्याने जीवन जगणे अशक्य होत होते, बाकीचे दलम सदस्य डोळा ठेउनच होते,तिघे जण राजरोसपणे तिचा उपभोग घेऊ लागले.दिलीप परत आल्यावर सगळे दलम वाले चुपचाप आपल्या कामात मग्न होत. दारूच्या नशेत दिलीप सोमनीवर वाटेल ते आरोप करत असे, आता संशयाचे ढग तिच्या भोवती पसरू लागल्याने रात्री तिची पिटाई होत असे.ती आता दु:खाच्या महासागरात पूर्ण बुडून गेली होती.

ती ज्या शाळेत शिकवत असे, तेथेच सुखराम नावाचा तरुण मुलगा नुकताच शिक्षक म्हणून लागला असल्याने आता दोघेही दलमच्या जाळ्यात पूर्णपणे अडकत चालले होते. शाळेच्या खोपटात दोघांचा संवाद सुरु झाला होता, या तुरुंगातून पळून जाण्याचा मार्ग कसा काढावा याच्या विचारात दोघे मग्न होत असत, आता जीवावर उदार होऊनच पावले टाकावी लागणार होती, सुखरामला या जंगल परिसराची चांगली माहिती होती, ८ वर्षे बंदिवासात काढल्याने सोमनी पार कंटाळून गेली होती.

दलमचे बरेच सेनापती एका मोठा पूल उडविण्याच्या मोहीमेवर १०० किमी अंतरावरील एका जंगलात रवाना झाले होते, दिलीप मोहिमेचा प्रमुख होता. तळावर दोन नवीन सामील झालेले कार्यकर्ते होते,अमावस्येचा एका काळोखी रात्री सोमनी व सुखराम जंगल तुडवत २० किमी अंतरावरील धोधरीपुरा या खेड्यात पोहचले,त्यांची दयनीय अवस्था पाहून सायकल व मोटरबाईक वरून दोघांना मेडापल्ली या त्यांच्या गावी पोहचते केले. जवळ जवळ १० एक वर्षानी ती आपल्या घराकडे जात होती, आपले घरही तिला शोधता येत नव्हते, शेजारी लोकांनी घरापर्यंत सोडले तर घराला कुलूप, आई चीकाला व वडील लालू दोघेही शेतावर गेलेले, मोठी बहीण विमल एका नर्सिंग होम मध्ये नर्स म्हणून काम करत होती, घरा बाहेर केविलवाणी नजरेने वाट बघत बसली होती. संध्याकाळ झाली आई बाबा घरी आले पण प्रथम  तर त्यानी सोमनीला ओळखलेच नाही, ती तर घाबरुनच गेली, पण काही वेळातच सर्व घर आनंदात बुडून गेले.

विमल ज्या नर्सिंग होम मध्ये काम करत होती, तेथील मुख्य डॉक्टर माडिया गोड जातीचे होते, विमल सोमनीला घेऊन त्यांचाकडे गेली, सर्व कथा सांगितली, सारासार विचार करून डॉक्टर तिला पोलीस प्रमुखांकडे घेऊन गेले, त्यांच्या समोर तिने शरणागती पत्करली, आत तिला पोलीस संरक्षण आहे, जीवनाची वाताहात झालेली आहे, पुढे काय वाढून ठेवले आहे ते देवासच ठाऊक.

— डॉ. अविनाश वैद्य.

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..