नवीन लेखन...

रोमहर्षक… लंडन ! (माझी लंडनवारी – 18)

‘नणंदा भावजया दोघीजणी, रुममधे नव्हते तिसरे कोणी!’ मग काय!आमच्या दोघींच्या गप्पांचा अड्डा रात्री उशिरापर्यंत रंगला.  लॉर्डस बघून आल्यामुळे तसेही आम्ही फुल्ल चार्ज झालो होतो.

प्रियांका खूप लहानपणापासून मला ओळखत असल्यामुळे मला नेहमी ताई म्हणूनच हाक मारत होती.आणि माझ्यासाठी ती लहान बहिणीसारखी होती. तिची ही हाक नंतर पूर्ण ग्रुपमधे फेमस झाली आणि मी सगळ्यांची ताई झाले.असं एकदम खेळीमेळीचं वातावरण प्रियांकाच्या मनाला पण खूप भावलं. त्या नादात ती जे घडलं त्याचं दु:ख्ख आणि टेंशन मधून जरा बाहेर आली.

प्रियांकाने लंडनला आल्यापासूनचे सगळे किस्से सांगितले. ती एका स्काऊटच्या कॅम्पसाठी इथे आली होती. त्यांच्या ग्रुपला नॅशनल लेव्हलवर गोल्ड मेडल मिळाले होते आणि त्या ग्रुपला लंडन मधल्या ग्लोबल स्काऊट कॅम्पसाठी इन्व्हिटेशन होते. तो कॅम्प नऊ दिवसांचा होता. जंगलामध्ये टेंट मध्ये रहात होते ते! किती थ्रिलिंग अनुभव होते तिचे.

शेवटच्या क्षणी पासपोर्ट न मिळाल्यावर झालेली तिची अवस्था ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आले. त्यातून टीचर दुसरा कोणी तरी जबाबदारी घेतो आहे म्हटल्यावर तिला एकटे टाकून गेल्या हे ऐकून तर मी मनातल्या मनात टिचरला फुल्या फुल्या फुल्या ……  असो, त्यामुळे आम्ही आज दोघी एकत्र गप्पा मारत एंजॉय करत होतो.

गप्पांच्या ओघात मला तिच्याकडून कळले की, त्यांनी शुक्रवारी रात्रीच मला हॉटेलवर दोन-तीनदा फोन केला होता पण मी माझ्या रूममध्ये नसल्यामुळे बेल वाजली आणि कोणी उचलला नाही.तेव्हा मला फार प्रकर्षाने जाणवले की, मोबाईल हवा होता.

मनात ठरवले की वर्क परमिटवर यायला चान्स मिळाला तर एखादा हँडसेट घेऊन यायचे. इथले एखादे लोकल कार्ड घालून मोबाईल चालू करायचा.

गप्पांचा ओघ संपतच नव्हता, पण दुसऱ्या दिवशी फिरायचे असल्यामुळे नाईलाजाने आम्ही दोन अडीच वाजता झोपलो. सकाळी जरा आरामात उठलो. आज रविवार असल्यामुळे आणि गेले दोन विकेंड खूप धावपळीत गेल्यामुळे पटापट आवरण्याचा मूड होत नव्हता. एरवी ऑफिसची आणि विकेंडला साइट सिइंगची गडबड, त्यामुळे आज एक शांत रविवार सकाळ आम्ही एन्जॉय केली. आरामात चहा/ कॉफी – नाष्टा सगळे झाले. आता वेध लागले पुढच्या साईट सिइंगचे!

आज रविवार असल्यामुळे निलेश, कार्तिक, परेश, बालाजी, संतोष, उमेश, मी आणि प्रियंका अशी सगळी पलटण होतो.  आज कुठे धाड टाकूया याची चर्चा रंगली.

सर्वांनाच ग्रीनिच बघायचे होते, त्यामुळे मी भवानी तलवार परत म्यान करून टाकली. महाराष्ट्राला स्वराज्य मिळवण्यासाठी शतकानुशतके वाट पहावी लागली होती, मला कदाचित ज्या तलवारीने स्वराज्य मिळालं ती बघण्यासाठी अनेकआठवडे वाट पाहावी लागणार असे दिसत होते.

परेश आणि बालाजी तसेही दुपारी येणार होते. त्यामुळे आमच्याकडे दोन तास हातात होते. त्या वेळात आपण जवळचे काही स्पॉट बघून घेऊ असे ठरले.

मी, प्रियांका आणि उमेश बाहेर पडलो. आम्ही ट्रॅफल्गार स्क्वेअरला जाण्याचे ठरवले. बेकरलू लाईनने आम्ही चेरिंग क्रॉस स्टेशनला उतरलो. आम्ही फिरून फिरून ठराविक स्टेशनला उतरत होतो. त्याच्या आसपासच सगळे स्पॉट होते.

शाळेत असताना इतिहासात कधीतरी ट्रॅफल्गार स्क्वेअरची लढाई वाचली होती. ईथे नेपोलिअनला ब्रिटिश आर्मीने का नेव्हीने हरवले होते. या पलिकडे मला काही माहिती नव्हती. इतिहास/भूगोल वर माझं फार प्रेमही नव्हतं म्हणून जास्त जाणून घ्यायची इच्छाही नव्हती. मला फक्त आजूबाजूचे सृष्टीसौंदर्य बघण्यात इंटरेस्ट होता.

ट्रॅफल्गार स्क्वेअर एक मोठा प्रचंड मोठा चौक होता.  इथे मध्यभागी एक कारंजे होते. कारंज्याचा आकार फुलासारखा होता.त्याच्या आसपास फरसबंदीचे बांधकाम होते. एका बाजूला पायऱ्या आणि त्या चढून वरती बसायला मोकळी छान जागा. सर्व परिसर इतका स्वच्छ होता की तिथे कुठेही बसले तरी चालण्यासारखे होते. तिथे खूप कबुतरे होती. त्यांना लोक दाणे घालत होते. एरवी मला कबुतर हा अस्वच्छ पक्षी वाटतो. पण ही लंडन ची कबुतरे असल्यामुळे असेल कदाचित, मला स्वच्छ वाटली.

चौकात चारही बाजूला सुंदर बिल्डिंग्स होत्या.ब्रिटिश लोकांची कंस्ट्रक्शनस् स्टाइल खूप सुरेख आहे. चारही कॉर्नरच्या त्या बिल्डिंगस्, ट्रॅफल्गार स्क्वेअरच्या आखिव रेखीवतेमधे अजूनच भर घालत होत्या.

रविवार साडेअकरा-बाराची वगैरेची वेळ असेल. तरीही वातावरण कुंद होतं. पाऊस पडू का नको, या विचारात ढगांमध्ये थांबला होता. फारशी थंडीही नव्हती. एकंदरीत वातावरण आणि आजूबाजूचा माहोल खूप रिलॅक्सिंग होता.

इतकी लोक तिथे होती पण गडबड- गोंधळ नाही.खूप शांत वाटले. ब्रिटिशांच्या अबोलतेचे रहस्य ह्यातच दडले असावे. तिथला निसर्ग आणि वातावरण तुम्हाला दिगमुढ करते आणि तुम्ही आपोआपच अबोल होता.

थोडा वेळ त्या शांत कुंद वातावरणाचा आनंद घेवून आम्ही RCA आलो. तिथे सगळी गँग जमलीच होती. मग प्रियांकाची सगळ्यांशी ओळख करून दिली. थोडे फार उदर भरण करून आम्ही निघालो.

या अक्षांश रेखांशनी शाळेत असताना माझी झोप उडविली होती. आडवे असतात ते अक्षांश का उभे असतात ते अक्षांश ह्या कोड्याने मीच आडवी होत होते. ह्या गोंधळात मला भूगोलात गोल नाही मिळाला तर नवलच! आता सुद्धा झीरो lattitude का longitude? काय नक्की बघायला जातोय आपण ? आणि ते बघून माझे भूगोलाचे मार्क्स बदलणार आहेत का?

असो. जिथे ग्रुप तिथे आपण अशा धारणेने प्रवास सुरू केला. पण पुढील काही वेळातच भूगोलाच्या पलीकडचा भौगोलिक परिसर मनाला वेड लावून गेला. आणि ह्याचं पूर्ण श्रेय आमच्या वाटाड्याला -निलेशला जातं. त्याने जो मार्ग आखला होता तो आम्ही एकटे हिंडलो असतो तर कदाचित अवलंबला नसता. ह्यावेळी खरोखरच I didn’t regret!

त्याने शेवट पर्यंत आम्हाला सांगितले नाही कसे जायचे ते. आम्ही बेकरलू लाईनने पुन्हा लंडन आय पाशी आलो. परत तिथेच काय? असा प्रश्न चेहऱ्यावर उमटला. आम्हाला थांबायला सांगून, त्याने कुठे तरी जावून तिकिटे काढली.

आणि to our biggest surprise! आम्ही पिअरकडे नेणाऱ्या एका लाईन मधे उभे होतो. आपण ह्या मोहक थेम्स मधून जायचयं? माझा विश्वासच बसेना!

आता मी खूप उत्कंठेने आमचा नंबर येण्याची वाट पाहू लागले.

— यशश्री पाटील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..