नवीन लेखन...

आभासी दुनियेत.. (माझी लंडनवारी – 25)

टॉवर ब्रिजच्या ओपनिंगचा अद्भुत चमत्कार पाहून आम्ही मादाम तुसाद म्युझियम कडे आलो.  तिथे खूप मोठी रांग होती. रांग अगदी मुंगीच्या पावलांनी पुढे पुढे सरकत होती. आमचा ग्रुप मोठा असल्यामुळे कंटाळा आला नाही. मला खूप आश्चर्य वाटत होते, इतकं काय आहे या म्युझियममध्ये बघण्यासारखं? मी तशीही मादाम तुसाद म्युझियम बघायला फार उत्सुक नव्हते. पण देखल्या देवा दंडवत! त्याप्रमाणे आलोच आहोत तर बघून टाकू, या निर्विकार भावनेने मी आमच्या ग्रुप बरोबर रांगेत उभी होते. सरतेशेवटी आमचा नंबर आला. आम्ही मादाम तुसाद म्युझियमची तिकिटे काढली. त्याबरोबर पलिकडून विचारणा झाली तुम्हाला ‘डेंजर डंजन’ बघायचे आहे का? आम्ही विचारले, ते काय असते? तर त्या माणसाने खूप शांतपणे आम्हाला ते काय असते ते एक्सप्लेन केले. ती एक अंधारी गुहा आहे, ज्यामध्ये पूर्वीच्या राजे लोकांनी कैदी लोकांचा जो छळ केला आहे तो प्रात्यक्षिक रूपात तिथे दर्शविला आहे. अर्थात त्यांनी आम्हाला अशी ही वॉर्निंग दिली की, शक्यतो ज्यांचे हृदय कमजोर आहे त्या लोकांनी तिथे जाऊ नये. तिथले साउंड इफेक्ट किंवा प्रात्यक्षिक भीतीदायक आहेत.

आम्हाला त्याने जे एक्सप्लेन केलं, ते तो प्रत्येकाला तितक्याच शांतपणे आणि तितक्याच उत्साहाने एक्सप्लेन करत होता. आता मला कळलं रांग मुंगीच्या पावलांनी का पुढे सरकत होती. काय ती मन:शांती आणि देशप्रेम!  मन:शांती ढळू न  देता तितक्याच उत्साहात प्रत्येकाला दिवसभर एक्सप्लेन करणं सोप्प काम नव्हतं. एखाद्या योग्याच्या तपश्चर्ये प्रमाणे त्याचे हे काम अखंड चालू होते आणि आपल्या देशातील एखाद्या प्रेक्षणीय स्थळाकडे लोकांना कसे आकर्षित करावे ही त्याची हातोटी वाखाणण्याजोगी होती. त्याच्या त्या एक्सप्लेनेशनमुळे बहुतेक सर्व लोक लंडनच्या रेव्हेन्यूमध्ये भर घालत होते. सकाळी ज्या प्रकारे हॉटेलच्या रूमवर आमची चर्चा झाली त्यावरून प्रिया तर नक्कीच येण्यामध्ये इंटरेस्टेड नव्हती. तिच्याबरोबर अजून दोन चार लोक गळाली. एक दोघांनी ते ऑलरेडी बघितले होते.  शेवटी राहता राहिलो मी आणि उमेश. आम्ही सात म्युझियमची तिकिटे आणि दोन डेंजर डंजन तिकिटे काढली.

पुलंच्या अपूर्वाईमध्ये मी मादाम तुसाद बद्दलचे त्यांचे मत वाचले होते. त्यामुळे मला तशी फार अपेक्षा नव्हती आणि त्यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख ही माझ्या वाट्याला आले नाही.आलोच आहोत तर, रॉयल परिवाराबरोबर फोटो घ्यावा म्हणून तिथे फोटो घेतला. म्युझियमच्या सुरुवातीलाच मादाम तुसाद, जिने हे व्हॅक्सचे पुतळे बनवणे सुरू केले, तिचा काळा फ्रॉक घातलेला पुतळा होता.  कला क्षेत्र, क्रीडाक्षेत्र,साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये नाव मिळवलेल्या बऱ्याच ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींचे पुतळे तिथे होते. आधी रॉयल फॅमिलीची भेट घेऊन आम्ही पुढे निघालो. आज अनायसे 15 ऑगस्ट होती, त्यामुळे आपल्या पुढा ना भेटूनच पुढे जाऊयात असे आम्ही ठरवले.

आम्ही पोचलो राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापाशी! या पुतळ्याने खूपच निराशा केली. गांधीबाबांची स्किन कदाचित लंडनमध्ये राहून फारच लाल गोरी वाटत होती. जवळच अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय यांचे पुतळे होते. तेही तितकेसे आपले वाटले नाहीत.

पुढे अल्बर्ट आईन्स्टाईन एका बोर्डपाशी काहीतरी गणित समजावून सांगत असलेले दिसले. तो पुतळा मला आवडला. पण त्यांच्या पुतळ्यापाशी उभारायचीसुद्धा आपली लायकी नाही त्यामुळे तसेच पुढे निघालो.  थोडे पुढे गेलो आणि सुप्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहमचा पुतळा दिसला. त्याच्याशेजारी उभे राहून फोटो घेण्याचा मोह आवरला नाही. मग पुढे मायकल जॅक्सन, मॅडोना असे काही काही ओळखीचे पुतळे दिसले. मला तरी तसे विशेष असे काही वाटले नाही. लोक म्युझियम बघायला काय इतके तडफडत हे कोडे अजून तरी मला सुटले नाही.

असे बरेच ओळखी-अनोळखी पुतळे बघून आम्ही त्यांच्या शॉपिंग काऊंटरपाशी आलो. आपण आपल्याला हव्या त्या पुतळ्यापाशी उभे राहून फोटो घ्यायला सांगू शकतो. मग ते आपल्याला एक टोकन देतात. हे टोकन घेऊन आपण शॉपिंग काऊंटर जवळ जायचे आणि त्या टोकनवर असलेल्या नंबरप्रमाणे ते आपल्याला आपला फोटो टीव्ही स्क्रीनवर दाखवतात. आणि जर का तो फोटो आपल्याला आवडला तर तो फोटो, ते टी-शर्ट किंवा कॅप किंवा कॉफी मग वर प्रिंट करून देतात.  तसे मी सहा–सात फोटो काढले होते. स्क्रीनवर सुद्धा ते खूप छान दिसत होते. पण कॉफी मग वर किंवा टी-शर्टवर प्रिंट करून देण्याची किंमत ऐकून ते विकत घेण्याची माझी हिम्मत झाली नाही. तरी त्यातल्या त्यात कॉफी मगवर प्रिंट करण्याची किंमत तेरा पाउंड होती. तसे मी दोन कॉफी मग घेतले. एक कॉफी पान रॉयल फॅमिली बरोबर आणि दुसरे बेकहमबरोबर! आता अजून काही शॉपिंग करणे शक्य नव्हते. आमच्या ग्रुपने सुद्धा असे छोटे मोठे शॉपिंग केले आणि आम्ही तिथून बाहेर आलो.

बाकीच्या ग्रुपला सी ऑफ करून आम्ही डेंजर डंजनच्या दिशेने वळलो. बाकीच्या ग्रुप थोडेफार फिरून मग हॉटेलवर जाणार होता. आम्ही डायरेक्ट हॉटेलवर भेटायचे ठरवले. डंजनचा एंट्रन्स खरोखरीच खूप डेंजर होता. बाहेर एक जळता पलीता होता. त्या गुहेचे तोंड राक्षसाच्या तोंडात सारखे होते. जणूकाही आम्ही आता राक्षसाच्या गुहेत शिरत आहोत. आत मध्ये पूर्ण अंधार होता. मला आता जरा भीती वाटायला लागली. मी उमेशला पुढ्यात ठेवून त्याच्या मागोमाग जायला लागले. आत शिरल्या शिरल्या आमचे स्वागत एका हाडाच्या सापळ्याने केले तो डायरेक्ट वरून आमच्या समोर येऊन थांबला. जोरात किंचाळून थोडे मागे झालो. जोडीला भयंकर साऊंड इफेक्ट होतेच. पुढे जात असताना, तिथे एक पांढरे कपडे घातलेली, केस मोकळे सोडलेली लेडी भूत होती. तिच्या एका डोळ्यातून रक्ताचा ओघळ वाहत होता. हात रक्ताने माखलेले होते. हाताची नखे लाल आणि लांब होती आणि ती एकटक आमच्याकडे बघत होती. जसे आम्ही पुढे जाऊ, तसे तसे तिची नजर आमचा पाठलाग करत होती. अंगावर काटे आणणारे दृश्य होते. माहिती होते की ही एक्ट्रेस आहे. हा सगळा मेकअप आहे तरीही ते दृश्य खूप भीतीदायक होतं. थोडेसे सावरून आम्ही मुद्दाम तिथे थांबून तिच्या समोर उभे राहिलो आणि तिच्याकडे एकटक बघत राहिलो. स्माईल देण्याचा प्रयत्न केला. पण कौतुकाची गोष्ट अशी की, ती तिच्या भूमिकेत इतकी गुरफटलेली होती की आमच्या प्रयत्नांवर पूर्ण पाणी फिरले. तिच्या चेहऱ्यावरची रेषा तसूभर सुद्धा सरकली नाही किंवा तिच्या आमच्याकडे पापण्या न लवता बघण्याच्या भूमिकेत फरक पडला नाही.

आजूबाजूला कुठे कवटी, कुठे हाड, कुठे सापळा, कुठे नुसतच आणि नुकतंच कापलेलं वाटेल असं डोकं टांगून ठेवलेले दिसत होते. एका बाजूला हाडांचा ढीग, एका बाजूला एक माणूस झोपलाय आणि त्याला वरून आगीचा शेक देतात अशी खूप विचित्र दृश्य दिसत होती. आम्ही असेच पुढे जात होतो. तर पुढे एक लाकडी ब्रिज आला. त्याच्या एका साईडला एक डेड बॉडी पडलेली होती. त्याच्या बाजूने उमेश पलीकडे गेला. ती डेड बॉडी बघायला इतकी भयंकर होती. असं दिसत होतं की डेड बॉडीची आतडी पूर्ण बाहेर आहे आणि त्यातून रक्त वाहत आहे. हे दृश्य मी बघितले आणि डोळे बंद करून पटकन साईडने पुढे जायला लागले. अचानक डेड बॉडीचा हात पुढे येऊन तिने त्या हाताने माझा पाय धरायचा प्रयत्न केला. खर तर ती नुसतीच ॲक्शन असते. ते ऍक्च्युली आपला पाय पकडत नाहीत. पण हे अचानक झाल्यामुळे मी जोरदार किंचाळले. पण आपल्या कुठल्याही रियाक्शनचा त्यांच्यावर काहीही असर होत नाही. खरोखरीच भोवताली जग नाही या भावनेने ते आपली ॲक्टिंग करत असतात. ही सर्व ऍक्टिंग आहे हे माहित असूनही, दचकायला आणि घाबरायला होत होत, इतकी ताकद होती त्यांच्या ऍक्टिंग मध्ये!

अशी भयंकर चित्र विचित्र दृश्य! यांना तोंड देत आम्ही गुहेच्या दुसऱ्या तोंडातून बाहेर आलो.  बाहेर आल्यावर सुटकेचा निश्वास टाकला. बाजूलाच एक कॉलेजच्या वयाचे मुलगा आणि मुलगी उभे होते. बहुतेक त्यांना आता जायचं होतं किंवा त्यांची ड्युटी संपली होती.  त्यांच्या चेहऱ्यावर मेकअप होता. मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना हॅलो केले. उत्तरादाखल त्यांनी ही स्माईल दिले. मला त्यांच्याशी संभाषण वाढवायचे होते, त्यामुळे मी आज पाहिलेल्या दृश्यांचे कौतुक करून त्यांना सांगितले खूप छान-चांगली ॲक्टिंग करता तुम्ही सर्वजण! तुम्ही इथेच काम करता का कायम? तर मला जे उत्तर मिळाले त्याने मी पूर्ण स्मितीत झाले. त्यातला एक ब्रिटिश मुलगा म्हणाला, आम्हाला एक्टिंग आवडते आणि थेटर मध्ये काम करायला आवडते म्हणून आम्ही इथे काम करतो आणि कॉलेज शिक्षण घेताना आम्हाला या कामाचा मोबदला सुद्धा मिळतो, ज्याचा आम्हाला रोजचा खर्च भागवायला मदत होते. आता मात्र मी पूर्णच अवाक झाले होते. एक तर त्यांच्या ॲक्टिंग मुळे मी आधीच त्यांच्यावर खूप फिदा होते. त्यातून केवळ आवड म्हणून किंवा रोजचा खर्च व्हावा म्हणून इथे काम करतात हे ऐकल्यावर तर त्यांचे पाय धरावे असे वाटले.

मला मादाम तुसादच्या निष्प्राण पुतळ्यापेक्षा हे चालते-बोलते पुतळे जास्त भावले आणि एका दृष्टीने मादाम तुसाँद म्युझियमला आल्याचे सार्थक झाले.

— यशश्री पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..