नवीन लेखन...

द लॉर्डस्…. (माझी लंडनवारी – 17)

आम्ही RCA वर पोहचलो तोपर्यंत १-१.३० वाजला होता. रिसेप्शनिस्टशी बोलून प्रियांकाची २ दिवसांची सोय गेस्ट म्हणून माझ्याच रुममधे केली. थोडेफार वरचे चार्जेस् भरले. स्वस्तात काम झालं.अर्धा दिवस असाही संपला होता. आता विम्बल्डन शक्य नव्हते. माझ्यासारखीच प्रियांका पण क्रिकेट वेडी होती आणि लॉर्ड्स बघणे तिच्यासाठी एक पर्वणी होती. मग बहुमताने लॉर्डसवर शिक्का मोर्तब झाले. बाहेरच काहीतरी खावून पुढे जावूयात असे ठरले. आज मी, प्रियांका आणि उमेश असे तिघचं होतो फिरायला. आधी ‘रिजंटस् पार्क’, मग तिथून पुढे ‘लॉर्डस्’ असा प्लॅन ठरला.

पॅडिंग्टनला KFC, Domino’s, Fish N Chips असे वेगवेगळे फूड आउटलेटस् होते. आज प्रियांकाच्या चॉइसने KFC मधे गेलो.मग पॅडिंग्टन ट्युब स्टेशनला बेकरलू लाइन्स् ने ‘रिजंट पार्कला’ उतरलो.

थोडं चालल्यावर आम्ही पार्कमधे शिरलो.विविध टोपिअरिज्, फुलांचे विविध रंगी ताटवे, सर्वत्र हिरवळ, डेरेदार व्रुक्ष ह्यांनी आमचे जोरदार स्वागत केले. जेंव्हा कधी मी नविन पार्क बघायचे मला नेहमी वाटायचे, ही जास्त चांगली आहे.आताही तीच अवस्था झाली माझी. झाडा-झुडुपांवर, ग्रीनरीवर प्रेम करणारा इंग्रज पावलोपावली जाणवत होता.

इंग्रज आपल्याच काय दुसर्‍यांच्या मातीवरही प्रेम करायचा असे गमतीत वाटून गेलेइतकी सुंदरकंट्री सोडून कशाला तडमडायला आले होते भारतात?अर्थात लुटलेल्या मालातूनच हे उभे राहिले असावे कदाचित,असो! उगीच भूतकाळात शिरुन वर्तमान कुठे बिघडवा?

आम्ही आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य पीत, ठिकठिकाणी फोटो घेत मजेत जात होतो. आणि आमचा मार्ग रोझ गार्डनने अडवला. आधीच सौंदर्य काय कमी होत? म्हणून त्यात अजून भर? किती विविध रंगी, विविध प्रकारची, thoughtfully arranged गुलाबाची फुले!!! किती हया दोन डोळ्यात सामावून घेऊ? हे कमी पडले म्हणून की काय, थोडे पुढे गेल्यावर समोर नदीसद्रुश तलाव आणि तलावाची शान वाढवत डौलाने फिरणारे बदक, राजहंस…..

नदीच्या आसपास सुंदर ग्रीन लॅंडस्केपस्, वेगवेगळ्या आकाराची, पानांनची झाडे. सगळ्या गोष्टी स्वप्नवत!!  इतके सौंदर्य एकत्र एका ठिकाणी पहायची माझी पहिलीच वेळ होती.वर्णन करायला शब्दही अपूरे आहेत.
असे अविश्वसनीय देखावे टिपत आम्ही पार्कच्या दुसर्‍या गेटपाशी आलो.अर्थात्  सगळं कव्हर करणे, आवाक्याबाहेरचे होते. प्रचंड मोठी पार्क होती ती!
आम्ही ज्या गेटने बाहेर आलो,तिथून लॉर्डस् फक्त १० मिनिटांवर होते.आता आम्हाला लॉर्ड्सचे वेध लागले. आमच्या अधिरतेमुळे आम्हाला ते डिस्टन्स खूप वाटत होते. पार्कमधे रेंगाळणारी आमची पावले आता झपाझप पडायला लागली. आणि समोर ‘लॉर्ड्स’ अशी पाटी दिसली.

डाव्या हाताला मिडिया सेंटरचा थोडा भाग दिसत होता. दुसऱ्या बाजूला नेहमी टीव्ही वर दिसणारा तो उंच ब्राऊन टॉवर दिसला. ते हॉटेल आहे असे आम्हाला नंतर कळले.
आम्ही नेमके मागच्या बाजूला आलो होतो. एक अर्धवर्तुळाकार वळसा घेवून मेन एन्ट्रन्स्पाशी आलो.

‘रिजंट पार्क’ची हिरवळ बघूनही आमचे डोळे लॉर्ड्सच्या हिरवळीसाठी तरसत होते आणि मुख्य दारातून प्रवेश केल्यावर समोर हिरव मोठ्ठं ग्राउंड… डोळेभरून दर्शन घेतलं. तिथे तुम्हाला एक गाईड मिळतो. आम्ही तिकिटे काढून, एक छोटा टुरिस्ट ग्रुप आणि गाईड उभा होता तिथे गेलो. ते आमच्यासाठीच थांबले होते. आता आमची गाईडेड टूर सुरू झाली.

सगळ्यात आधी डोळे त्या ‘बोर्ड ऑफ ऑनर्स’ वर स्थिरावले, या ग्राऊंडवर शतक केलेल्यांची नावे होती तिथे. त्यात बरीच ओळखीची, अनोळखी नावे दिसली. मी आपली वेंगसरकर, अझरुद्दीन, गांगुली, आगरकर ही नावे डोळे भरुन पाहिली.

तिथेच MCC (Merlyborn Cricket Club) Museum चा डिस्प्ले होता. ट्रॉफिज्, जुने फोटोज्, बॅटस्, टी-शर्टस् अशा विविध गोष्टी त्या त्या प्रसंगाची आठवण म्हणून ठेवल्या होत्या.

एका ठिकाणी आम्ही एका बॉलवर एक भुसा भरून ठेवलेली चिमणी पहिली. ज्या बॉल वर ती ठेवली होती, तोच बॉल लागून तिचा ग्राऊंडवर मृत्यू झाला होता.आता ती तिथेच अमर झाली होती.

ऍशेस सिरीज तर नेहमी उत्साहाने बघितल्या जातात. त्याच्या मागची स्टोरी आणि प्रत्यक्ष एशेस अर्न(Urn) बघायला खूप थ्रिलिंग वाटले. इंग्लंड जेंव्हा होम ग्राऊंडवर हरली तेंव्हा लोकांनी स्टंम्पस् आणि बेल्स जाळल्या.आणि त्याची राख ही त्या जार मध्ये भरून ठेवली, जी आता MCC Museum चा हिस्सा बनली आहे.जे सगळं आत्तापर्यंत ऐकलं होतं ते प्रत्यक्ष बघण्यात एक वेगळचं थ्रिल वाटत होतं.

मग आम्ही फेमस ग्रँड पॅवेलिऑनला भेट दिली.तिथे बसून मॅचचा फील घेतला. तिथून आम्ही ज्या गॅलरी मध्ये बसून सौरव गांगुलीने शर्ट काढून विजयाचे सेलिब्रेशन केले त्या गॅलरीत गेलो. सगळ बघूनच इतकं एक्साईट व्हायला होत होते. तर ते प्रत्यक्ष ते अनुभवताना एखादी अशी कृती होवू शकते.त्याचा इतका इश्यू करायची गरज नाही, असे वाटले..
आम्हाला आता मीडिया सेंटरला जायचं होतं. तिथे जाता येत हे कळल्यावर आम्ही अक्षरशः वार्‍याच्या वेगाने तिथे पोहचलो. जिथे सुनील गावसकर, हर्षा भोगले बसतात तिथे आम्ही बसलो. खूप खूप धन्य वाटले. आता आम्ही मेन ग्राउंड एन्ट्रन्स्पाशी उभे होतो. तिथले गेट बंद होते. आम्हाला ग्राऊंडवर जायचे होते. पण ग्राऊंडवर पाय ठेवायला बंदी होती.आम्ही एक दोनवेळा रिक्वेस्ट केली, पण त्याने ऐकले नाही. खूप विरस झाला. पण प्रियांकाने प्रयत्न सोडले नाहीत.तिने खूपच विनवण्या केल्या आणि अहो भाग्य आमचे!!…
फक्त आम्हाला दोघींना ग्राऊंडवर एक मिनिटसाठी परवानगी मिळाली. तो क्षण म्हणजे मरणाऱ्याला जीवनदान मिळाल्या सारखा होता.

पटकन गेट उघडून दोघी ग्राऊंडवर गेलो. जाण्यापूर्वी दोघींनकडून न ठरवता एकदमच एक क्रुती केली गेली. आम्ही आमचे शूज बाहेर काढले.अनवाणी चालत ग्राऊंडवर थोडे पुढे गेलो. खाली वाकून ग्राउंडला नमस्कार करून, ती माती कपाळाला लावली. ह्याच मातीला सर डॉन ब्रॅडमन पासून लिटिल मास्टर सचिन तेंडुलकरचे पाय लागले होते.त्यांच्या चरणांची धूळ आम्ही मस्तकी धारण केली.

ह्याच मैदानावर कपिल देव आणि त्याच्या टीमने भारताचा पहिला वहिला विश्वचषक उंचावला होता. त्या आठवणींमधे आम्ही न्हाऊन निघालो.

त्या क्षणी मला बाबा, नरेन आणि शैलेशची प्रचंड आठवण झाली. जणू काही ते इथेच आहेत,माझ्याबरोबर!
क्रिकेटचे अनेक मोलाचे क्षण, अगदी 1983च्या विश्वचषकपासूनचे, आम्ही एकत्र जगलो होतो.आताही ते मनाने माझ्या बरोबर होते. एका वेगळ्याच धुंदीत आम्ही होतो. उमेशने बोलवल्यावर आम्ही भानावर आलो.

लंडनच्या माझ्या वारीचे हे पंढरी होते. ग्राउंडला नमस्कार करताना, वारकऱ्यांच्या मनात पंढरीच्या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवल्यावर जे भाव उमटत असतील तेच भक्ती भाव माझ्या मनात आत्ता होते. निःशब्द भारावलेल्या अवस्थेत, आम्ही लॉर्ड्स मधून बाहेर पडलो.

परतीच्या प्रवासात मनात एकच शब्द रुंजी घालत होता, ‘THE LORDS…. THE LORDS..’

— यशश्री पाटील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..