नवीन लेखन...

‘गगन विहार’ ओळखीचा! (माझी लंडनवारी – 33)

मनापासून आरती केली. प्रसाद आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेवून निघाले. आता कधी भेट? असं विचारताच गमतीत म्हणाले, एअर पोर्टवर पासपोर्ट आणि इतर डॉक्युमेंट्स मिळाले तर जाईन, नाही तर उद्या गौरी जेवणाला भेटूच.

सगळ्यांच्या मनावरचा ताण एकदम हलका झाला आणि सगळे हसायला लागले. मलाही जाणवलं, पहिल्यांदा जाताना माझी मानसिक स्थिती आणि आताची स्थिती, किती जमीन – अस्मानाचा फरक आहे. आधी सगळी व्यवस्थित तयारी होती. पासपोर्ट आणि डॉक्युमेंट्सचे 3 झेरॉक्स सेट, प्रत्येक बॅगमधे एक-एक आणि एक घरी. तरी सगळ नीट होईल ना? ही काळजी, पासपोर्ट जीवापाड जपण्याची धडपड.आणि आता? हातात ना तिकीट, ना पासपोर्ट, वर्क परमिट काय आहे ते पाहिलं नाही तरी किती बिनधास्त झाले होते.

‘मिळाले डॉक्युमेंट्स तर जाऊ’ असा थोडा केअरलेस किंवा कॅज्युअल ऍटीट्युड आला होता. त्याचं फळही लगेच मिळालं पुढे!

ह्यावेळेस मी लुफ्थान्सा एअर वेजने जाणार होते. फ्रॅंकफर्टला २-२.५० तासाचा हॉल्ट होता आणि मग तिथून लंडन!  रात्री 2.30 च्या सुमारास फ्लाईट होत. ह्या वेळेस शैलेश आणि नरेन आले होते एअर पोर्टवर सोडायला. 12-12.15 ला एअर पोर्टवर पोहचलो. तिथे आमचा ऑफिस अटेंडंट आमची वाट पाहत उभाच होता.महत्त्वाची कागदपत्रे आणि करंसी माझ्या ताब्यात दिली आणि त्याने एक सेट झेरॉक्स करुन आणला होता. शैलेशने सगळे डिटेल्स नोट केले आणि तो सेट मी चेक इन बॅगेत ठेऊन दिला. त्याचे आभार मानले. त्याने मला happy journey केले आणि तो निघून गेला.

आता मला जाणवलं, खरच चाललोय आपण! आणि ह्यावेळेस दोन-सव्वा दोन माहिने मुक्काम होता कारण माझी रिटर्न जर्नी डेट नोव्हेंबर एंडला होती.मन थोडे उदास झाले. शैलेश आणि नरेनचा निरोप घेताना पाणी आलच डोळ्यात!

बॅग स्क्रीन करताना तिथल्या अधिकार्‍याने आक्षेप घेतला.एव्हढी औषध का आहेत? त्याचं प्रिस्क्रिप्शन दाखवा,असं म्हणत त्याने सगळी बॅग उघडायला लावली. व्यवस्थित पॅक बॅग केलेली बॅग उघडून सगळी औषध आणि प्रिस्क्रिप्शन पाहिल्यावर त्याच समाधान झालं. मी एक तर जिन्स घातलेली, त्यातून खाली ऊकीडवे बसून बॅग परत पॅक करताना घाम फुटला. बाहेरून नरेन आणि शैलेश माझी बॅग परत पॅक करण्याची झटापट बघत होते. बराच वेळ आणि बरीच मेहनत खाऊन बॅगने सहकार्य केलं आणि काढलेलं सगळं सामान परत आत बसलं. तिघांनीही सुटकेचा निःश्वास टाकला. माझं चेक इन झालं आणि मी पुढे सिक्युरिटीकडे गेले. तोपर्यंत दोघंही थांबले होते. मी जसं ठरवल होत त्याप्रमाणे फक्त सॅक पाठीवर आणि हातात एक हलकं जॅकेट घेऊन आरामात फिरत होते. मागच्या वेळचा अनुभव लक्षात घेता, या वेळेस मला खूप हलकं आणि मस्त वाटत होत.

मला एअर पोर्टवर पोहचायला जरा उशीरच झाला होता आणि त्यातून औषधांच्या गोंधळामुळे चेक इन सुद्धा उशिरा झालं होत. म्हणजे जास्त वेळ थांबायला लागलं नाही. सिक्युरिटी चेकिंग करून गेटपर्यंत येपर्यांत ऑलमोस्ट 1.45 वगैरे वाजले होते.त्यामुळे थोड्याच वेळात बोर्डिंग सुरू झाले. उशिरा चेक इन झाल्यामुळे, मला खूप मागे सीट मिळाली होती. पण लकीली तिथे 3 सीटवर आम्ही दोघच होतो. विंडो सीटमध्ये एक गोरा होता आणि मी आईल्स सीटवर बसले.

टेक ऑफ होवून स्थिर स्थावर झाल्यावर मी चक्क ब्लँकेट मागून घेतलं आणि मस्त मांडी घालून झोपून गेले. सगळेच झोपले होते. प्लेनमधले लाइट्स पण डीम केले होते.

प्लेनच्या मागच्या भागात असल्यामुळे, छोटे छोटे व्हॉईडस् चांगलेच जाणवत होते. कार स्पीड ब्रेकर वरून गेल्यावर कसं जाणवत तसच हे वाटत होत. सुरवातीला मी जरा घाबरले होते पण नंतर एन्जॉय केलं.

2-2.15 तास छान झोप झाली. प्लेनमधल्या लाइट्स लागल्यामुळे जाग आली.ते आख्ख उडत विश्व हळू हळू जागं होत होत. कोणी फ्रेश होण्यासाठी उठले, कोणी पाय मोकळे करायला तर कोणी एअर होस्टेसना बोलावून हॉट नॅपकिन्स मागवले. सगळे आपापल्या परीने फ्रेश झाले. पायलटपण उठले का बघून यावं असा गमतीशीर विचार मनात आला. प्लेनमध्ये कुजबुज, पिशव्यांचे आवाज यायला लागले.पण माझ्या शेजारच्या गोऱ्याची जी ब्रह्मानंदी टाळी लागली होती, त्याला कोणताही धक्का बसला नाही. किती भाग्यवान असतात अशी लोक. मला पण अजून झोपता आल असतं तर चाललं असतं. पण ..

सगळ्यांना फ्रेश व्हायला पुरेसा वेळ देऊन झाल्यावर एअर होस्टेसने चहा-कॉफी आणली. बरोबर छोटी बिस्किट पॅकेट. कसाही असला तरी उठल्याबरोबर आयता चहा हातात मिळणे ह्या सारखा दुसरा आनंद नाही. चहा घेऊन जरा हुरूप आला.मग उगाच समोरच्या स्क्रीनवर चॅनल्स सर्फ करत राहिले.एखाद दुसरा मूव्ही बघत ब्रेकफास्ट केला. फ्रॅंकफर्ट एअर पोर्ट आणि तिथली स्काय लाईन ट्रेन बघायची उत्सुकता होती. अखेर शेवटच्या त्या अधीर प्रतीक्षेनंतर आणि डोके गरगरणार्‍या नकोशा एक्सपिरीयन्स नंतर एकदाचे आम्ही फ्रॅंकफर्ट लॅंड झालो. मी खाली वाकून फ्रॅंकफर्ट शहर बघायचा निष्फळ प्रयत्न केला. पण धुकेच इतके होते आणि मी खिडकीत पण नव्हते.  त्यामुळे मला शेजारी येईपर्यंत तिथे बिल्डिंग्स् आहेत हे कळले नाही. पण प्लेनने लँडिंग एकदम व्यवस्थित केलं होत.

आता टॅक्सी वे लागणार मग झोन प्रमाणे बाहेर पडणार, म्हणजे आपल्याला अजून चिक्कार अवकाश आहे ह्या नादात मी आरामात बसून राहिले आणि अचानक माझ्या मागे एकदम गडबड जाणवली. मागे पाहिलं तर मागची एक्झीट उघडली होती आणि तिथे जिना लावला होता. प्लेन एअर पोर्ट बिल्डिंगपाशी न थांबता थोडे लांब रस्त्यावर थांबले होते. आणि पुढच्या आणि मागच्या दाराला जिने लावले होते. मागे असल्याचा आणि आईल्स् सीटचा मोठ्ठा फायदा झाला होता. माझ्याकडे एक सॅक आणि एक जॅकेट ह्या लिमिटेड सामना मुळे मी पटकन दाराजवळ आले.

प्लेनच्या बाहेर आल्यावर थंडगार वाऱ्याने माझे स्वागत केले. मोकळा श्वास मन भरून घेतला. आणि जिना उतरून फ्रॅंकफर्टच्या जमिनीवर पाय ठेवला. मला नेहमीच पर-प्रांतीय भूमीवर पाय ठेवण्याचं फार कुतूहल होतं. वसुंधरा एकच, पण माती भिन्न, त्यात वाढणारे जीव वेगळे. त्यांची जडण, घडण वेगळी. त्या भूमीवर पाय ठेवताना असेच विचार मनात येत होते. ‘घटा-घाटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे’. तसेच काहीसे मला भूमीच्या बाबतीत वाटते. टॅक्सी वेने हे सुख मिळाले नसते. पहिल्या दहा उतरणाऱ्या लोकांमध्ये मी होते. समोर एअर पोर्ट बिल्डिंगकडे नेणाऱ्या बसेस थांबल्या होत्या.पण मी मुद्दाम रेंगाळले. इकडे तिकडे नजर टाकली तर थोड्या लांबवर एअर पोर्ट बिल्डिंग होती. आणि जर्मनीच्या प्रगत तंत्रज्ञानाची साक्ष देणारी स्काय लाईन ट्रेन. एखाद्या मासोळी सारखी ती सुळकन बिल्डिंगच्या एका बाजूने बाहेर आली. थोडे चढ-उतार करून बिल्डिंगच्या भुयारात गायब झाली. थोड्या वेळाने तीच किंवा दुसरी ट्रेन बिल्डिंगच्या दुसऱ्या बाजूने बाहेर. एस्सेल वर्ल्ड मधल्या ट्रेन गेमची आठवण झाली.

ते सगळं दृश्य भान हरपून बघत असतानाच अचानक थंडी वाजायला लागली. आणि लक्षात आल की ह्या लोकांचा हिवाळा सुरू होतोय. आपल्यासाठीही चांगलीच थंडी होती. 30-35 degree celcius मधून मी डायरेक्ट 12-15 degrees मध्ये आले होते. मी घाई घाईत जॅकेट अंगावर चढवले आणि बस कडे कूच केले. बसने आम्हाला टर्मिनल 1 ला सोडले. त्या 2-4 मिनिटाच्या एक्सपोजरने माझे डोके जड होवून दुखायला लागले होते. सर्दीने कान बंद झाले आणि थंडी वाजायला लागली. हलकी बॅग घेऊन फिरण्याच्या नादात मी एकही गरम कोट, स्वेटर, मफलर काहीही सॅक मधे ठेवले नव्हते. स्वतःच्या निष्काळजीपणाचा खूप राग आला. आता काय आलिया भोगासी!!..

— यशश्री पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..