नवीन लेखन...

स्वर्गादपि गरीयसि! (माझी लंडनवारी – 27)

रविवार सकाळ. आम्ही सगळं सामान घेवून कॅब करून सडबरी टाउनला गेलो. परेशने आधीच सांगितल्याप्रमाणे त्याने किल्ली शेजारच्या काकूंकडे ठेवली होती. एकदम इंडियात असल्यासारखं वाटलं. शेजारी एक इंडियन ओरिजिन पण इंडियाला कधीही भेट न दिलेल्या ऑन्टी रहात होत्या. त्यांच्याकडून किल्ली घेतली. थोडेफार संभाषण झाले. त्या जन्मापासून साऊथ आफ्रिका मध्ये होत्या.आणि आता गेले कित्येक वर्षे लंडनमध्ये आहेत.हे दारात उभे राहूनच त्यांनी सांगितले. भारतात राहिल्या नसल्यामुळे चहा-पाणीच्या शिष्टाईची अपेक्षा ठेवलीच नव्हती. पण surprisingly, त्यांनी आम्हाला दुसर्‍या दिवशी संध्याकाळी चहा प्यायला बोलावलं.

आम्ही घरी आलो. आता रूम Allocation! आणि त्यातही आम्हाला असे कळले होते की, पहिल्या मजल्यावरच्या तीन रूम्सपैकी एक रूम बंद असते. तिथे आमचा sales head नचिकेत खरे (निक) अधे मध्ये येवून राहतो. आणि त्यामुळे मेन डोअरसुद्धा पूर्ण बंद करायचे नाही. फक्त लॅच लावयाच. मध्यम वर्गीय मुंबईकरांना नुसतं लॅच लावून झोपणे म्हणजे चोराला चोरी करायला येण्याचे निमंत्रण देण्यासारखे होते. त्यापेक्षा रात्री-मध्यरात्री उठून मी दार उघडायला तयार होते. पण इतरांनी माझ्या बुद्धीची कीव करत माझं बरच बौद्धिक घेतलं. हे लंडन आहे, मुंबई नाही. अस बरचसं समजल्यावर कुठे मला ते थोडफार पटलं. आणि जे जे होईल ते ते पहावे असा विचार करून सुरुवात केली.

मला खर तर, वर कौलारू रूम मध्ये राहायचे होते. पण प्रिया आणि मी शेजारी शेजारी 2 खोल्यात रहावे आणि उमेश वर राहील असे मत पडले. त्यामुळे वॉश रूम्स पण सेपरेट रहातील. हे ही एक सोयीचे होईल. हॉटेलमध्ये जरी आमचं एकत्र जेवण-खाण असलं तरी एका घरात एकत्र राहणं ह्या मागच्या practical अडचणी ह्या arrangement मुळे आपोआप सुटणार होत्या. इथे प्रियाच्या भित्रेपणाचा मला फायदा झाला. सगळ्यात मोठ्ठी रूम माझ्या वाटेला आली. प्रियाने छोटी, कोझी रूम सिलेक्ट केली.

झालं, सगळं बस्तान बसल्यावर आम्ही पोटोबा केला. तोपर्यंत संतोष आणि गोपी लंच पार्सल घेवून आले होते.गोपीने मस्त भाज्या घालून भात केला होता आणि संतोषने सॅलड! घरी फ्रिजमध्ये परेशने आमच्यासाठी फ्रोझन पराठे आणि फ्रूट ज्युसेस ठेवले होते. सगळ्यांचा हेतू हाच की आल्या-आल्या आम्ही जेवणाच काय करणार? बर हे टाउन साइड असल्यामुळे जवळ-पास पॅडिंगटनसारखी फूड आउटलेटस् नव्हती ना ही कुठली दुकाने! किती विचार करतात लोकं दुसर्‍यांचा! ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप काही शिकवून जातात आयुष्यात आपल्याला!

संतोष आणि गोपी हॅरोला रहात होते आणि इथून ते फक्त बसने 15 मिनिटाच्या अंतरावर होते. बसेस तशाही दिलेल्या वेळेप्रमाणेच येतात. त्यामुळे एकदा टाइम टेबल कळलं की तुम्ही 15-20 मिनिट मध्ये हॅरोला.

दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तिथे फोन होता आणि वॉशिंग मशीन होते.

पहिले 2 आठवडे माझी कपडे धुण्याची सोय झाली होती.नंतर मला निलेश आणि कार्तिकने laundry facility दाखवली होती. हॉटेलच्या थोडे पुढे कॉमन laundry होती. तिथे 2-4 पौंड टाकून वॉशिंग करता येत होत. आणि ड्रायर्स वेगळे असतात. ते पहिल्यांदा मला कळलंच नव्हत. मी नुसतेच वॉश करून आणले कपडे आणि पुढे 2-4 दिवस ते वाळवत होते रूममध्ये.  Reception मधून टेबल फॅन आणून फुल फॅन चालू ठेवून एकेक कपडे वाळवले. एक उपद्व्याप झाला होता तो. घर पहावे बांधून सारखे कपडे पहावे धुवून अस झाल होतं अगदी.मग जरा खोलात चौकशी केल्यावर मला ड्रायर ऑप्शन कळला. ड्रायर वेगळा असतो तिथे. परत काही पाऊंड्स टाकून drying करायचं. ते इतके ड्राय होतात की डायरेक्ट अंगावर पण चढवू शकतो.

तर हे सगळे उद्योग करण्यापेक्षा इथे घराच्या घरी वॉशिंग मशिन होतं आणि वॉशिंग आणि ड्राईंग दोन्ही एकत्रच होतं. किती बरं वाटलं! तर अशी नवीन घरातील सुरुवात अनेक सुखसोयी आणि थोड्याफार शंका कुशंकाने झाली.

आता जेवणे पण उरकली होती. इथे जवळपास काय आहे बघायला? लगेच माझ्यातली टुरिस्ट डोकावली. सडबरी टाउनच्या आधीच स्टेशन होते अल्परटन. तिथे एक मोठे देऊळ आहे आणि पुढे गेल्यावर बरीच इंडियन शॉप्स आहेत असे कळले.

आम्ही लगेच दौर्‍यावर निघालो. अल्परटनला एक मोठे मंदिर होते. त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू होणार होते. म्हणून आजूबाजूला खास जयपूरहून मागवलेले पिंक मार्बल्स होते. देऊळ मोठे आणि प्रशस्त होते. सगळ्या देवांनी तिथे हजेरी लावली होती. मुंबईच्या जिव्हाळ्याचा सिद्धिविनायक पण होता तिथे. ज्याला ज्या देवावर श्रद्धा त्यांनी त्याला नमस्कार करावा. पण  नुसत्या तसबिरी लावून श्रद्धा कशी विकत घेता येणार? सगळं कृत्रिम वाटलं. विम्बल्डनच्या गणपती मंदिराचे पावित्र्य इथे जाणवले नाही. तरी उगीच देवाला राग नको यायला, म्हणून मी आपलं सगळ्या देवांना नमस्कार ठोकला.

थोडा वेळ तिथे थांबून मग बाहेर पडलो. थोडा पुढे चालत गेल्यावर जवळ इंडियन / एशियन मार्केट आहे हे सांगायची गरजच पडली नाही. रस्त्यात कचरा, भिंतीवर चक्क पानाची पिंक. मी आयुष्यात पहिल्यांदा भिंतीवर पानाची पिंक पाहून खुष झाले. नाव ठेवायची सोडून मी खुश का झाले? सगळे कोड्यात पडले. म्हणजे इथे पान मिळतं ना? मला खायचेय. लोकांनी डोक्यावर हात मारला. आहे पुढे दुकान, घेवू आपण नंतर. अस संतोषने सांगितले.

गलिच्छ रस्ते, कोंदट छोटी दुकाने, खूप दाटीवाटी अस आत्तापर्यंतच्या लंडनच्या सौंदर्य सृष्टीला गालबोट लावणारे दृश्य बघून मी खरच लंडन मध्ये आहे ना? असे वाटले मला. किती विरोधाभास?

फिरता फिरता समोर चक्क भुट्ट्याची गाडी दिसली. मस्त पावसाळी कुंद वातावरण होते. भुट्टा नाही घेतला तर तो त्याचा अपमान नाही होणार? केवळ ह्या सद्-भावनेने मी 175-200 रुपयाचा (2.5 पौंडाचा) भुट्टा घेतला. अहाहा! किती हे स्वर्ग सुख!

पण ह्याची खरी मजा ही मुंबई ठाण्यात. धो-धो पावसात मान तिरकी करून छत्रीचा दांडा पकडून ठेवायचा, एक हातात तो गरम भुट्टा पानात पकडून खायचा आणि अधे-मधे मस्त तिखट मसाल्याने सू-सू करत आलेलं नाक टिपायचं. ही मजा काही लंडन मध्ये आली नाही.ह्यासाठी कितीही खराब असू दे इंडिया, किती पण गर्दी असू दे, इंडिया इज बेस्ट!!!.

असो, 200 रुपयाचा खुर्दा करून शेवटी इंडियाताच कशी मजा आहे अस म्हणून आत्मिक समाधान मिळवत आम्ही पुढे कूच केले.

पुढे वेगवेगळी इंडियन/एशियन शॉप्स होती. वेगवेगळ्या वस्तू विकायला होत्या तिथे. आम्ही वापरणारी calling cards इथेच मिळत होती. म्हणजे परेश इथून आमच्यासाठी calling cards आणत होता तर.

पुढे चक्क एक घसीटाराम हलवायासारखे एक sweet mart लागले. तिथे आपली मिठाई, समोसे, वडे, जिलेबी असे किती तरी पदार्थ होते. वजनी आणि चलनी पौंडाची पर्वा न करता यथेच्छ ताव मारला.आणि बाहेर राहून आपण काय गमावतो हे प्रकर्षाने जाणवले.

मनात ठरवलं घरी गेल्यावर आईला फोन करून सांगायचं की आई गरम गरम पोळी आणि अगदी माझी नावडती वांग्याची भाजी पण चालेल, पण तुझ्या हातची गरम पोळी हवी.कदाचित जरा जास्तच होम सिक् झाले होते.

मस्त चटकदार पदार्थ आणि मिठाई खावून खाली आलो आणि तिथे एका काचेच्या बॉक्स मध्ये एकदम व्यवस्थित ओळीने पाने मांडून ठेवली होती. बाजूला कात,चुना,सुपारी, कतरी सुपारी,सगळे जिन्नस नेटके मांडून ठेवले होते. पानाच्या ठेल्याची रंगत तिथे नव्हती. पण मी एकदम खजिना मिळाल्यासारखे ‘युरेका, युरेका’ ओरडले. कितीला हो एक पान? 8 पौन्ड्स. पान न खाताच तोंडात मारल्यासारखा चेहरा रंगला. 640 रुपये? पण पानासाठी काही पण! सगळ्यांच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे दुर्लक्ष करून, पु.लं.च्या पानवाल्याला स्मरुन लंडनच पान चवीचवीने खाल्ले.आणि 8 पौंड सार्थकी लावले.

पानाची चव तोंडात आणि लंडनच्या विभिन्न आठवणी मनात घोळवत आजचा दिवस संपला.

— यशश्री पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..