नवीन लेखन...

जादुई नगरीत (माझी लंडनवारी – 15)

तेजस्वी कोहिनूर आणि मोहक थेम्स ह्यांच्या आठवणीतच प्रसन्न सकाळ उजाडली. फ्रेश होवून निलेशच्या रूम मध्ये आले. उमेशसुद्धा माझ्या फ्लॅटवरून तोपर्यंत आला होता. चहा नाश्ता करताना पुढचं प्लॅनिंग सुरू झालं. मला भवानी तलवार बघायची होती.ती ब्रिटिश म्युझियम मध्ये होती. आज निलेश,संतोष आणि कार्तिक पण आमच्याबरोबर येणार होते. माझा

ब्रिटिश म्युझियमचा प्रस्ताव ५-१ ने अल्पमतात गेला. कोणाला म्युझियममध्ये इंटरेस्ट नव्हता.
त्यातल्या त्यात सगळ्यांनी न बघितलेल्या गोष्टी बघाव्या असं ठरलं. एकत्र बघण्यात मजा असल्यामुळे मी ही तयार झाले. आमच्यात निलेश सीनिअर पण होता आणि जास्त वेळा लंडनला आला होता. मग आम्ही त्याला वाटाड्या बनवलं. आणि आमची गँग बाहेर पडली.

‘London Eye’ बघायचे निश्चित होते. पण सकाळी तिथे खूप गर्दी असते म्हणून आम्ही तिथे दुपारी पोहचायचे ठरवले. आता कुठे जायचं मग. त्यापेक्षा पटकन जावून तलवार बघून आलो असतो ना … माझा एक वैतागून प्रश्न. त्यावर तू चल, you won’t regret. असं म्हणून निलेशने मला थोडा दिलासा दिला.आम्ही सेंट्रल लाईनने ‘लँकस्टर गेट’ स्टेशनहून ‘ऑक्सफर्ड सर्कस’ ह्या अंडर ग्राउंड स्टेशनला उतरलो.

ऑक्सफर्ड ट्युब स्टेशनहुन बाहेर पडलो आणि रस्ता माणसांनी फुलला होता. हवा छान होती. जास्त थंडी नाही ना उकाडा. त्यामुळे सगळे उत्साहात बाहेर पडले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठ्या ब्रँड्सची आउटलेटस् होती. H&M, Levi’s, Marks& Spencer… त्यातच अधेमध्ये फ्लॉवर शॉप्स. तिथे सगळीकडे फुलं इतक्या सुंदर पद्धतीने रचलेली असायची की, फुलांच मूळचे सौंदर्य अजून खुलुन दिसत होत. अधून मधून ओपन एअर कॅफे,तिथे बसून breakfast enjoy करणारी माणसे हे दृश्य खूप उत्साहदायी होते.

हे बघत चालत असताना आम्ही एका मोठ्या ५-६ मजली शॉप समोर थांबलो. बाहेरून ते पूर्ण काचेचे होते. त्याला लाल बॉर्डर्स होत्या आणि वरती लाल अक्षरात ‘Hamley’s’ असं लिहिलं होतं.

हे पूर्ण एकच दुकान आहे? विस्फारलेल्या डोळ्यांनी आणि वासलेल्या ‘आ’ ने आमचं आश्चर्य उमटले.

ते एक ६ मजली toy shop होते. हे असं मी प्रथमच बघत होते. मला माझ्या लहानपणीची खेळणी आठवली.वर्षानुवर्ष आमच्याकडे एक दणकट बाहुली होती… तिला बाहुबली म्हणणे जास्त योग्य असेल. आणि तिला शोभणारा एक बाहुला. तो ही तितकाच दणकट. दिदी पासून गौरव पर्यंत म्हणजे जवळ जवळ १२-१५ वर्ष ह्या दोघांनी आम्हा सर्व भावंडांची साथ दिली. कितीही आपटल, फेकल तरी एक स्क्रॅच नाही त्यांना. वर चेहरा तसाच हसतमुख. आणि हळू हळू त्यात सापशिडी, ल्युडो, नवा व्यापार,कॅरम,चेस अशा मोजक्या खेळांची भर पडली.

इथे ६ मजली फक्त toy shop होते. क्षणभर मला आत्ताच्या मुलांचा हेवा वाटला. नाही म्हणायला मला चौथीत एक नवीन बाहुली मिळाली होती. ‘डायना’ नाव तीच. तिने ‘प्रिन्सेस डायना’ सारखा wedding gown घातला होता. तेंव्हापासून लंडनच वेड माझ्या डोक्यात होतं.आता आले खरी लंडनला.. पण प्रिन्सेस नव्हती!

Toy shop मध्ये शिरलो आणि एखाद्या आभासी आणि जादुई नगरीत शिरल्यासरखे वाटले. तिथे विविध sections होते. एक सेक्शन पूर्ण सॉफ्ट टॉईज. वेगवेगळे प्राणी त्यात शेरू, डॉगी, टेडी, मनिमाऊ.. चित्रविचित्र अळ्या, हत्ती,जिराफ, माकड.किती काय काय होते. लहान साइज पासून आपल्या कमरेपर्यंत येणारे toys पण होते.

एक सेक्शन पूर्ण dolls section. किती विविध प्रकारच्या बाहुल्या. लहान मोठ्या, बोलक्या, डोळ्यांची उघडझाप करणारी, किती प्रकार! Doll houses तर इतकी छान डिस्प्ले केली होती की, असं वाटल आपणच डॉल बनून त्या सप्नेरी दुनियेत मिसळून जावं.

एके ठिकाणी वेगवेगळ्या cars. अगदी छोट्या high speed cars pasun मोठ्या toy cars. Ek train section hota. त्यातील काही ट्रेन्स small set उभारून त्या ट्रॅकवरून धावत होत्या.

एक छोटी चालती बोलती दुनियाच आम्ही पहात होतो. We totally got engrossed in toys.

अचानक मन जरा उदास झाले.इतकी खेळणी होती तिथे.पण कोणासाठी घेवू? खूप प्रकर्षाने वाटले आपल्याला एखादा मुलगा किंवा मुलगी तरी हवी होती. पण माझ्या दोन लेकी (यश आणि एश – दिदीच्या मुली) माझी हैदराबादला वाट पहात होत्या ना. त्यांच्यासाठी २-४ क्युट सॉफ्ट toys घेतली. मला लवकर बाहेर पडायचं होत. अजून थांबले असते तर अजून उदास झाले असते.

उमेशला सांगून समोर कॅफे मध्ये बसले. सावकाशीने एकेक करत सगळे त्या कॅफे मध्ये आले. सगळे गप्प होते.शांतपणे कॉफी घेत होते. वातावरण थोडे गंभीर झाले होते किंवा मला तसे वाटत होते.

अचानक निलेश म्हणाला, चला तुम्हाला DDLJ च शूटींग कुठे झाले ते दाखवतो. परत एक नवीन उत्साह अंगात संचारला आणि सगळे झटकन उठले.
आम्ही परत ऑक्सफर्ड सर्कस स्टेशनला आलो. तिथून Victoria लाईनने King’s Cross station ला आलो. तिथे ते

फिरते जिने चढून वर आलो आणि एक ४-५ मिनिटे चालत आम्ही त्या मेन चौकात आलो जिथे ‘ना जाने मेरे दिल को क्या हो गया’ ह्या गाण्याचे शूटिंग झाले होते. लगेच फोटो सेशन झाले. तो पूर्ण एरिया कव्हर केलेला होता आणि एखाद्या एअर पोर्ट सारखा वाटत होता. ठिकठिकाणी ट्रेन्सचे टाईम टेबल, प्लॅटफॉर्म नंबर डिस्प्ले केले होते.

थोडे पुढे आल्यावर खाली जाणारे फिरते जिने दिसले. मेन outgoing train junction खाली होतं. आपल्या मुंबई सेंट्रल टर्मिनस सारखं. ८-१० स्वच्छ चकचकीत प्लॅटफॉर्म, मधले तितकेच चकाकणारे ट्रॅक्स.

आणि आमची नजर तिथे उभ्या असलेल्या एका बुलेट ट्रेन वर पडली. पिवळ्या धमक रंगाची पुढे निमुळती होत गेलेली ट्रेन. हीच का युरो स्टार? आम्ही वेगाने पुढे झालो, पण आमचा ट्रेन पास चालणार नव्हता इथे. खाली उतरणारे गेट unlock करायला एक्स्प्रेसचे तिकीट लागणार होते. आम्ही वरूनच डोळे भरून युरो स्टार पहिली.

काश! शेंघन व्हिसा असता? लंडन पॅरिस अशी एक अविस्मरणीय जर्नी झाली असती!

मग थोडावेळ तिथे रेंगाळून आम्ही परत ऑक्सफर्ड सर्कसला आलो. हे म्हणजे परत भोज्याला शिवा असं वाटतं होत. अजून बराचसा वेळ हातात होता. मग परत सेंट्रल लाईनने सेंट पॉल कॅथेड्रलला जायचे ठरले.

इथे हे खूप बरं आहे. सकाळीच आम्ही झोन २ ते झोन ६ जर्नी एक्स्टेन्शन घेवून ठेवले होते.सो कुठूनही कुठेही कितीही वेळा जा किंवा या काही प्रोब्लेम नाही.

सेंट पॉल कॅथेड्रल हे एक खूप जुने चर्च आहे. ह्याची बांधणी इतर चर्चपेक्षा जरा वेगळी आहे. बाकी चर्चसाठी वापरलेला दगड brownish black style मध्ये वाटतो तर हे चर्च ग्रे/white stone वापरून बांधलेले होते. Unlike triangular rectangular ceiling shapes, हया चर्चचे मेन सीलिंग घुमटाकार आणि ग्रीन रंगाचे आहे. दोन्हीही कलर unusual वाटले.

चर्च बाहेरून मोठे आणि सुंदर वाटत होते. आता गेल्यावर तिथे इतकी शांतता होती. वेगवेगळी झुंबर लटकत होती. त्याचा सोनेरी पिवळा प्रकाश छतावर केलेल्या कोरीव कामाच्या सौंदर्यात भर टाकत होता. दोन्ही बाजूला सुरेख नक्षीकाम केलेले खांब, बेंचेस, मध्ये मोठा पॅसेज, समोर सोनेरी नक्षीकाम असलेली भिंत. तिथे एक विशेष दिसले की वेगवेगळ्या राजा, बिशॉपस्, सेंट्स अशा लोकांची पांढऱ्या संगमरवरात बनवलेली शिल्पे होती. खूप सुंदर शिल्पकला होती.

एकेक शिल्प बघत आम्ही पुढे जात होतो आणि अचानक एका शिल्पापुढे आम्ही थबकलो. आमचा आमच्या डोळ्यावर विश्वास बसेना. त्या शिल्पाच्या हातात एक जाड ग्रंथ होता आणि त्यावर देवनागरी लिपी मध्ये काही अक्षरे कोरली होती. म्हणून अगदी जवळ जावून वाचले तर त्या ग्रंथावर ‘मनुस्मृती’ असे कोरलेले दिसले. म्हणजे ते शिल्पा मनुचे होते. खूपच सुखद धक्का होता तो. परक्या देशात आपल्या संस्कृतीचे जतन करणाऱ्या मनूने असे अचानक दर्शन दिले आणि सेंट पॉल कॅथेड्रलला आल्याचे सार्थक झाले.

फिरून आम्ही परत ऑक्सफर्ड सर्कसला आलो. भोज्याला शिवल्यासरखे! कोणी बघत असेल तर त्यांना वाटेल ह्यांना चकवा पडलाय की काय. अर्थात तिथे कोणीच कोणाच्या अध्यात मध्यात नसते. कोणाला काही फरक पडत नाही.
आम्ही ऑक्सफर्ड सर्कसला बेकरलू लाईन्सने वॉटरलूला गेलो. लंडन मध्ये सगळी डिस्टन्सेस जवळ जवळ आहेत. त्यामुळे actual ट्रेन ट्रॅव्हलिंगपेक्षा टयुब स्टेशनवर चालणे आणि लाईन्स प्रमाणे levels चेंज करणे जास्त होते. आख्खा झोन १ तुम्ही चालत कव्हर करू शकता.

सेंट्रल लाईन मेन रोडच्या एक level खाली आहे. ऑक्सफर्ड सर्कसला ३ लाईन्स आहेत. सेंट्रल, व्हिक्टिरिया आणि बेकरलू . अशा ३ लेव्हल तुम्ही खाली असता. म्हणजे वर काही घडलं तर तुम्ही पृथ्वीच्या पोटातच गुडूप होणार. Tube train ने प्रवास करताना मला नेहमी हया पृथ्वीच्या पोटात दडलेल्या विश्वाचा आश्चर्य वाटायचं.

वरती इतक्या सुरळीतपणे धावते विश्व सुरू असते की पोटात एवढा विश्व दडलंय ह्याची कल्पनाच नाही येणार आणि ट्रेनने जात असताना आपल्या किती तरी वरती अजून एक विश्व आहे ह्याची कल्पना येत नाही.

तर असे आम्ही बेकरलूने वॉटरलूला उतरलो. थोडे फार चालल्यावर समोर ‘लंडन आय’ दिसले. एक प्रचंड महाकाय भिरभिर असल्यासारख!. ते तिरक्या थ्रेडने होल्ड केल होतं. आणि ते शुभ्र पांढर भिरभिर थेम्स किनारी डौलाने उभ होत. जवळून पाहिल्यावर मला जाणवलं,मी हेच पाहिलं होता प्लेन मधून. जी मला पांढरी कमान दिसली होती नदीवर ती हीच!
तिथेही खूप गर्दी आणि लाईन. आम्ही लाईन मध्ये थांबून तिकीट काढली. आम्हाला ३.३०चा स्लॉट मिळाला. आता हातात १-१.३० होता. मग तिथे जवळच रेस्ट रूम्स होत्या. त्या कुठल्याही एअपोर्ट किंवा फाईव्ह स्टार हॉटेलला लाजवतील अशा चकाचक होत्या. आम्ही फ्रेश होवून जवळच कॅफेमध्ये लंच केलं. दिवसभरच्या जा- ये मध्ये नाही म्हणल तरी थकायला झालं होतं. अजून जरा वेळ होता पण सगळेच ढेपाळले होते. समोर एक ice-cream stall खुणावत होता.

तिथे कोन आईस क्रीम विथ चॉकलेट फ्लेक्स हा नवीन प्रकार बघितला. चॉकलेट फ्लेक्स हा प्रकार माहीत नव्हता. इतकं yummy चॉकलेट कधी खाल्ल नव्हत. त्या थंडाई आणि स्मूथनेसने आम्ही परत रिफ्रेश झालो. मी लंडनला असेपर्यंत मी बहुतेक रोज ते आईस क्रीम स्पेसिफिकली ते चॉकलेट फ्लेक्स घेत होते.

आता आम्ही लाईनीत जावून थांबलो. १५-२० मिनिटात आमचा नंबर आला. ३०-३२ काचेच्या कॅप्सुल इतक्या स्लो फिरत होत्या की, जवळ जाईपर्यंत त्या फिरत असतील असं वाटतं नव्हत. एका कॅप्सुल मध्ये १०-१५ माणसे असावीत. आम्ही त्या कॅप्सुल मध्ये शिरलो. आणि ती हळू हळू वर जायला लागली. जशी जशी वर जात होती तसे तसे आम्हाला लंडनचे नयनरम्य दर्शन होत होते. आम्हाला तिकिटे काढताना एक कॅटलॉग दिला होता ज्यात कुठल्या दिशेला काय दिसेल असे पॉईंट्स मार्क केले होते.

आम्ही दूर नजर जाईल तिथपर्यंतचा सुंदर नजारा नुसत्या डोळ्यांनी टिपत होतो. काही लोकांनी बायनक्युलर आणले होते. पुढच्या वेळेस आणूयात असे मनाशी ठरवून आम्ही विविध नजारा बघायला लागलो. तीस ते पस्तीस मिनिटाची ती राऊंड असावी. आमचे कॅप्सूल आता बरोबर वरती टॉप ला आले होते. आम्ही जवळपास साडेचारशे फूट जमिनीपासून वरती होतो. आम्ही खाली पाहिले. खाली पूर्ण थेम्स नदी दिसत होती. नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर लंडनचे पार्लमेंट डौलाने उभे होते. किती सुंदर नजारा होता तो! जसं काय आम्ही थेम्स वर तरंगत आहोत!!

साधारण तीस- पस्तीस मिनिटांनी आम्ही कॅप्सूल मधून बाहेर आलो. एक खूपच नवीन आणि विलक्षण अनुभवाच्या लाटेत आम्ही तरंगत होतो.

आता संध्याकाळचे सहा वाजले होते. परत चहा –कॉफी, स्नॅक्स घेऊन काही जण आपापल्या घरी परतीच्या वाटेवर गेले. मी, उमेश आणि संतोष आम्ही तिथे थांबलो. विचार केला, आज अंधार पडेपर्यंत येथेच थांबून दिव्यांच्या झगमगाटात पार्लमेंटचे थेम्स मध्ये पडणारे प्रतिबिंब बघूनच जाऊयात. आता उन्हाळा संपत आल्यामुळे अंधारही जरा लवकर पडायला लागला होता. मग आम्ही तिथेच थोडावेळ बसून थोडे रिलॅक्स झालो. आता हळुहळू अंधार पडायला सुरुवात झाली होती आणि थेम्स नदी मध्ये छोटे छोटे लाईट दिसायला लागले.

आठ-साडे आठ वाजता बऱ्यापैकी अंधार पडला होता आणि थेम्स ते दोन्ही किनारे दिव्यांच्या झगमगाटाने चमकू लागले. लंडन आय सुद्धा झगमगत होते आणि ज्या दृश्याची आम्ही अथक प्रतीक्षा करत होतो, ते पार्लमेंटचे सोनसळी प्रतिबिंब नदीच्या पाण्यावर उमटले होते. आम्ही ते दृश्य भान हरपून डोळ्यात साठवून घराकडे निघालो.

— यशश्री पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..