नवीन लेखन...

नकटीच्या लग्नाला… (माझी लंडनवारी – 2)

29 जून 2004 (मंगळवार)

मला आता कंपनी जॉईन करून आठ दिवस झाले होते. मला माझ्या ऑन-साईट जाण्याबद्दल काही माहिती होते ना कामाबद्दल!! तरीही धीर ठेवून वाट बघायची असं मी ठरवलं. थोड्या वेळाने अमरेशचा स्वतःहून फोन आला त्याने सांगितले मेल सर्व्हर डाऊन आहे, तो सुरू झाला की मी मेल पाठवतो.आता या मेल सर्व्हरला पण काय आजच डाऊन व्हायचे होते? जरा वेळाने म्हणजे एक दीड तासाने मेल सर्व्हर सुरू झाला. मी वाट पाहिली परत काही मेल नाही. अमरेशला फोन केला तर तो म्हणाला, तुझ अपॉइंटमेंट लेटर मिळाले की मी ईमेल पाठवू शकतो. अपॉइंटमेंट लेटरसाठी जयश्रीला फोन कर. जयश्रीला फोन केला तर तिथून कळले की अग्नेलोला कॉन्टॅक्ट कर. तो तुझे अपॉइंटमेंट लेटर देईल. त्याला कॉन्टॅक्ट केला तर कळले की, तो आज लवकर गेला आहे. आज हा लवकर गेला, उद्या तो लवकर गेला,आज ती उशिरा आली, परवा तो उशिरा आला या सर्व गोंधळात मनात विचार आला, ब्रह्मा, विष्णु, महेश ही त्रिमूर्ती पण एक वेळ लवकर भेटतील पण या त्रिमूर्ती यांची गाठ कशी घालू? अपॉइंटमेंट लेटर मिळाल्याशिवाय मेल जाणार नाही, मेल गेल्याशिवाय व्हिसा प्रोसेसिंग सुरू होणार नाही म्हणजे एकंदरीत सगळं त्रांगडं झालं होतं. पण ते सर्व विसरून मी उमेश प्रोजेक्ट आणि तिकडच्या कामाबद्दल डिस्कस करत बसलो. सर्व गोंधळात मंगळवार पण असाच संपला टेन्शन आणि अस्वस्थते मध्ये! त्या त्रांगड्याच्या तिरमिरीत घरी आले.

30 जून 2004 (बुधवार)

आज सकाळी फोनवर कळले की अग्नेलो उशिरा येणार आहे.साडेबाराला फोन केल्यावर म्हणाला, दुपारी अपॉइंटमेंट लेटर मिळेल आणि शेवटी अडीच वाजता अपॉइंटमेंट लेटर मिळाले. माझ्याकडून सही घेऊन पूनम तेही लेटर परत घेऊन गेली.मला कळेचना काय चालले आहे आणि परत एक कॉपी माझ्याकडे देऊन गेली. लगेच मी अमरेशला फोन केला त्यानेही लगेच झेराला मेल केली. तिने सांगितले यादीत दिल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे घेऊन उद्या ये. चला! एक पाऊल पुढे! असेही सांगितले तुझी प्रोजेक्ट मॅनेजर नीलम आता युकेमध्ये आहे. ती सोमवारी येईल. तिने जर का तुला पाठवायचं ठरवलं तर तुझा व्हिसा रेडी असायला हवा म्हणून ही तयारी आहे. परत तळ्यात मळ्यात ….जायचं का नाही. ठीक आहे पण निदान व्हिसा साठी तरी हालचाल सुरु झाली एक पायरी पुढे ढकलले गेले माझ्या स्वप्नांच्या दिशेने !! आत्तापर्यंत बाहेरचे अनेक कॉल्स आले. काही अगदी क्लोज पण होते पण वर्कआउट होत नव्हते. मंजिल नुसतीच समोर दिसत होती. आता त्या मार्गावर एक पाऊल पुढे पडले. घरी येऊन शैलेशला सांगितले. त्याने ही डॉक्युमेंट्स साठी खूप धावपळ केली माझे बँक स्टेटमेंट नव्हते ते आयसीआयसीआय च्या कुठल्याही शाखेतून मिळू शकेल असे कळले. आणि उद्या प्रभादेवीच्या शाखेतून ते घेता येईल असा विचार करून मी निर्धास्त मनाने झोपले.

1 जुलाई 2004  (गुरुवार)

सकाळी साडे दहा नंतर सर्व कागदपत्रे घेऊन मी झेराकडे गेले. तिने व्हिसा एप्लिकेशन फॉर्म भरून घेतला. फॉर्म भरताना मी खूप उत्सुक होते. कारण आत्तापर्यंत आई-बाबांना यातले काही सांगीतले नव्हते. एरवी नरेन आणि मी अशा गोष्टी डिस्कस करत असू. पण या वेळेस मी नरेनलाही काही सांगितले नव्हते. कारण मी दर वेळेला त्याला खुप एक्साइटमेंट मध्ये सांगायचे आणि पुढे काही वर्क आऊट झालं नाही तर आम्ही दोघेही हिरमुसले व्हायचो आणि एकमेकांना धीर देत रहायचो. त्यामुळे मी सर्व मनात ठेवले होते. अर्थात शैलेश हा माझ्या मनाचा एक कप्पा होता ही गोष्ट वेगळी. कधी एकदा मी आई बाबा आणि नरेनला हे सांगते असं झालं होतं. एक दोनदा फोनही फिरवला होता. पण आयत्या वेळेस माघार घेतली. या गोष्टीने त्यांना इतका आनंद झाला असता ,त्यांच्या आशा उंचावल्या असत्या आणि जर का माझं जाण्याचं ठरलं नसतं तर मला माझ्या न जाण्याच्या दुःखापेक्षा आई-बाबांच्या अपेक्षाभंगाचे दुःख जास्त झालं असतं. आतापर्यंत त्यांनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. माझ्या डिग्रीच्या ऍडमिशनच्या वेळेस आईने खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहून मला प्रोत्साहन दिले. बाबांनी साप्ताहिक सुट्टी न घेता सतत काम केले. का तर जे एक्स्ट्रा पैसे मिळतात ते यशला होस्टेलवर पाठवता येतील म्हणून आणि त्यांच्या कष्टाचे मी त्यांना अपेक्षित फळ दिले नव्हते मी जॉब करत होते. पण त्यांच्या कष्टाच्या दृष्टीने अजून फार काही ब्राइट काम मी केलं नव्हतं.

आता हा चान्स आला होता तो पूर्ण झाला असला तर आई-बाबांच्या कष्टाचे सार्थक झाले असे वाटले असते. त्यांनाही अभिमान वाटला असता. अशा केसमध्ये त्यांना उगीच अपेक्षा लावून ठेवणे मला रुचत नव्हते. मी वाट पहायची ठरवली. माझी ही अस्वस्थता शैलेशने बरोबर ओळखली. त्याने वेळोवेळी मला धीर दिला. प्रोत्साहित केले. माझ्या मनात निराशा जनक विचार आले की तो म्हणायचा, तुझं काम का होणार नाही? अशा प्रकारे तो नेहमी धीर द्यायचा . मी सर्व कागदपत्रे झेराकडे  दिली. स्टँड बाय म्हणून एसबीआयचे पासबुक सुद्धा घेऊन ठेवले होते. ती म्हणाली, ‘हे पण असू दे, तरीही लास्ट सिक्स महिन्यांचे ऑपरेटिंग अकाउंट असलेले स्टेटमेंट आण. उगाच छोट्या गोष्टींसाठी काम अडायला नको. आज संध्याकाळपर्यंत घेऊन ये. कारण उद्या सकाळी लवकर ही सगळी डॉक्यूमेंट सबमीट करायची आहेत. मी म्हणाले, आता आणते. नेटवर मी डाऊनलोड करू शकते.

पण अगेन, सगळ सुरळित झालं तर कसं होणार? My Bad Luck.  माझा पासवर्ड एक्सपायर झाला होता. त्यामुळे मला नेटवरून स्टेटमेंट डाऊनलोड करता आले नाही. मग मी ठरवले, त्यात काय विशेष!! मी प्रभादेवी ब्रांच ला जाऊन प्रिंट आउट घेउन येते. लंच मध्ये उमेश ला बरोबर घेऊन प्रभादेवी ला गेले. तिथे त्यांनी मला  एप्लीकेशन द्यायला सांगितले आणि म्हणाले दीडशे रुपये पडतील. काय गंमत आहे!! माझा अकाउंट, माझं स्टेटमेंट, मलाच हवं आहे तर मी बँकेला दीडशे रुपये भरायचे?? त्यापेक्षा आपल्या नेहमीच्या बँक परवडल्या. पासबुक अपडेट करून आणायचं. आता काय करणार?? अडला हरी… मी सहज विचारलं की ‘कधी मिळेल?’ तर ती म्हणाली, आज प्रिंटर खराब आहे उद्या संध्याकाळपर्यंत मिळेल. कल्याण…

तिथून काढता पाय घेतला. नशीब ॲप्लिकेशन सबमिट केलं नव्हतं. चौकशी करताना कळलं की दादरला पारसी कॉलनी च्या समोर दुसरी ब्रांच आहे. टॅक्सी करून आम्ही तिकडे गेलो. तिथे त्यांनी व्यवस्थित स्वागत केलं. मी म्हणाले, अर्जंटली बँक स्टेटमेंट हवा आहे. लगेच मिळेल का? तर ती म्हणाली,’ हो नक्की मिळेल. 25 रुपये पर पेज पडतील. आता ते एक्सेप्ट करायलाच हवं होतं. तिने प्रिंट कमांड दिली .चार-पाच वेळा दिली पण प्रिंट आउट यायला तयार नाही. अर्धा-पाऊण तास ती त्या प्रिंटरशी झगडत होती. पण शेवटी आले नाही तर नाहीच!!

एका स्टेटमेंटसाठी गोष्ट खूप वाकड्यात शिरत चालली होती.नाही नाही त्या गोष्टी आठवायला लागल्या. कुंडलीत परदेशी योग नाही वगैरे सांगितले होते. कोणीतरी हात बघून सांगितले होते,  तुम्हाला परदेशी जाण्याचा जबरदस्त योग आहे पण तुमचे डॉक्युमेंट्स नीट तयार ठेवा. आयत्या वेळी एखादा डॉक्युमेंट नसल्यामुळे तुमचा परदेश प्रवास रद्द होऊ शकतो. नेमकं ते सगळं आत्ता यावेळी मला आठवत होतं आणि माझे हातपाय गळाले. बँक स्टेटमेंट ही खूप छोटी गोष्ट होती. कुठेही आणि कसेही मिळाले असते पण ते मिळत नाही म्हटल्यावर तो खूप मोठा इशू झाला. लगेच शैलेशला फोन केला. त्याला म्हटलं तू काही कर आणि संध्याकाळी सहाच्या आत मला सारस्वत पासबुक आणून दे. यावर माझं पहिलं नाव होतं ते चाललं असतं.

एरवी मी शैलेश वर चिडत असते कारण तो पासबुक आणि चेकबुक नेहमी स्वतःजवळ ठेवतो आणि आयत्यावेळी मला घरात सापडत नाही. आज त्याचं ते पासबुक स्वतः जवळ असणं मला एवढं मोठं समाधान देऊन गेलं. नेमक्या शैलेशला तीन मीटिंग होत्या. तरीही दहा मिनिटात त्याचा परत फोन आला. तो ते पासबुक त्याच्या एका मित्राबरोबर वरळी ऑफिसला पाठवणार होता. त्याने सांगितले, तू वरळी ऑफिस मधून ते कलेक्ट कर. या प्रकाराने मी थोडी रिलॅक्स झाले. तरी शेवटचा प्रयत्न म्हणून मी आयसीआयसीआय च्या मॅनेजरला भेटले. तिने मला सुचवले की, आम्ही तुला हे मेल करू शकतो आणि तू तुझ्याकडून प्रिंटाऊट काढ. इतकी सोपी गोष्ट मला कशी सुचली नाही. पण ते म्हणतात ना….टेन्शनमुळे बुद्धी भ्रष्ट होते. तशीच काहीशी अवस्था माझी झाली होती. अखेर शेवटी 84 रुपयांमध्ये (टॅक्सी भाड्यामध्ये) माझे काम झाले.

मी ऑफिस मध्ये आले आणि स्टेटमेंट डाऊनलोड केले. प्रिंट आउट दिले. काम झालं तर ते काम कसलं!! नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न!! प्रिंटर खराब होता. साईडला दोन काळ्या पट्ट्या येत होत्या. झेराला फोन करून हे सांगितले. तिने मला सांगितले मला फॉरवर्ड कर. मी माझ्या प्रिंटरवर प्रिंट आउट घेईन.  तिला फॉरवर्ड केले तर तिच्याकडे त्या ओपन होत नव्हत्या. शेवटी मीच काहीतरी डोकं चालवलं आणि माझ्या कॉम्प्युटरला तिचा प्रिंटर कनेक्ट केला आणि माझ्या कॉम्प्युटरवरून तिच्या प्रिंटरवर प्रिंट दिले. फायनली जे डॉक्युमेंट मला हवे होते ते मिळाले.

या सर्व खटाटोपात पाच वाजले होते. दुपारी दीड पासून पाच वाजेपर्यंत मी फक्त एका स्टेटमेंटच्या मागे होते. आता मला या सर्व गोंधळामध्ये पुलंच्या अपूर्वाईची आठवण होईल तर काय नवल!

त्यांच्या व्हिसा प्रोसेसिंग आणि परदेशवारीवर जागतिक अस्थिरतेच सावट आणि ईथे वैयक्तिक अनिश्चिततेचं!

अशाही स्थितीतही मला हसायला आले. हा माझ्या जीवनात सुरु होणार्‍या अपूर्वाईचा पूर्वरंग तर नाही?

— यशश्री पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..