नवीन लेखन...

“फिर वहीं ‘दिलीप’ लाया हूँ “

एन एच फोर महामार्गावरुन एक कार सुसाट वेगाने जात असते. वाटेत खेड शिवापूरचा टोलनाका येतो. रांगेतून जेव्हा या कारचा नंबर येतो तेव्हा कार चालविणारी गाॅगलधारी व्यक्ती काच खाली करुन एक कार्ड त्या टोलवाल्याच्या हातात देते. ते कलरफुल कार्ड तो मागून पुढून पहातो. कार्डवरील फोटोतील बडी आसामीच कार चालवते आहे याची खात्री करून त्याच्याकडून टोल न घेता बॅरीकेटर वर करुन जाण्यास मार्ग मोकळा करतो.
वरील प्रसंग हा काल्पनिक नसून खरा आहे आणि हा अनेक टोलनाक्यावर वर्षानुवर्षे घडत आहे. ती कार चालविणारी व्यक्ती जनतेवर राज्य करणारी कोणी राजकीय पुढारी नसून तमाम मराठी रसिकांच्या हृदयावर विराजमान असलेली विनोदी कलाकार दिलीप हल्याळच असते.
किर्लोस्कर कंपनीमध्ये काही वर्ष काम केल्यानंतर दिलीपला बीएसएनएलमध्ये नोकरीची संधी मिळाली. त्या संधीचे त्यानं अडतीस वर्षें ‘सोनं’ केलं. आपल्या मनमिळाऊ स्वभावानं बाॅससह ऑफिसमधील सर्वांना आपलसं केलं. दिलीपला कधीही रजा मागण्याचा प्रसंग आला तर, बाॅसला रजेतला ‘र’ म्हणायचा अवकाश बाॅस लगेचच ‘जा’ म्हणायचा! नोकरी सांभाळून दिलीपने ज्येष्ठ अभिनेते निळू फुले, राजा गोसावी, राघवेंद्र कडकोळ अशा गुरूसमान दिग्गजांबरोबर काम केलेले आहे. योगायोगानं दिलीपला मेधा, ही पत्नी देखील बीएसएनएलमध्ये नोकरी करणारी मिळाली.
वीस वर्षांपूर्वी दिलीपची पहिली भेट झाली ती ‘हास्यवाटिका’ या द्विपात्री प्रयोगाचे डिझाईन करण्याच्या निमित्तानं. त्याच्या आधी त्यानं संजय डोळे बरोबर ‘माणसं अशी वागतातंच का?’ या द्विपात्री प्रयोगाचे शेकडो शो केले. अनेक भावगीतांच्या कार्यक्रमातून खुमासदार निवेदन केले. काही नाटकांतून धम्माल विनोदी भूमिकाही केल्या. पण त्यात त्याचे मन रमले नाही. काही मालिकांमध्ये त्यानं आपली चुणूक दाखवली. काही मराठी चित्रपटांत छोट्या पण लक्षवेधी भूमिकांनी प्रेक्षकांना पोट धरून हसविले देखील.
दिलीप म्हणजे ‘डोंगरे बालामृत’ सारखं गुटगुटीत व्यक्तीमत्व! डावीकडून उजवीकडे केसांचा पाडलेला देवानंद स्टाईल कोंबडा, तलवार कट मिशी, गोलाकार चेहरा, गोबरे गाल, बोलके टपोरे डोळे, चेक्सच्या फुल शर्टवर ढेरीमुळे बटणं न लावलेलं ‘फाकडू’ जाकीट, डार्क पॅन्ट, पायात बुट. मला तर तो साऊथच्या चित्रपटातील सदाबहार हिरो, रजनीकांतच वाटतो.
दिलीप येताना मोटरसायकल स्टॅण्डला लावून पहिल्यांदा केसांवरुन कंगवा फिरविणार, छोट्या नॅपकिनने चेहरा स्वच्छ पुसून घेणार आणि मग हसतमुखाने ‘काय नावडकर साहेब’ म्हणत एंट्री करणार. अशा टापटीप रहाण्याच्या त्याच्या सवयीमुळेच तो सर्वांना हवाहवासा वाटतो.
‘हास्यवाटिका’ कार्यक्रमाचा आम्ही लोगो केला. प्रकाश कान्हेरे कडून दिलीप व स्मिता देसाई यांचे फोटो काढून घेतले. डिझाईन तयार झालं, पेपरमध्ये जाहिरात आल्यापासून दिलीपला शेकडो प्रयोग मिळाले. दिवाळीसाठी दोघांचे फोटो वापरुन शुभेच्छा कार्ड केले. एकदा ‘हास्यवाटिका’चा प्रयोग वारजे येथे होता. आम्ही कारमधून चौघेजण एकत्र गेलो. प्रयोग धम्माल रंगला. परतताना आम्ही ‘पावभाजी पार्टी’ करुन दिवसाची सांगता केली.
‘हास्यवाटिका’चे प्रयोग पुणे, मुंबई बरोबरच अनेक ठिकाणी झाले. गणपतीच्या दहाही दिवसांत दिलीपचे तुफान प्रयोग झाले. नवरात्रीत देखील एकही दिवस त्याला उसंत अशी मिळालीच नाही.
काही वर्षांनंतर स्मिता देसाईंना काही कारणास्तव ‘हास्यवाटिका’ सोडावी लागली. दिलीपने बागेश्रीला घेऊन काही प्रयोग केले. बागेश्री नंतर कस्तुरी सारंग ही त्याची सहनायिका झाली.
एक दिवस दिलीप मृदुला मोघे यांना घेऊन ऑफिसमध्ये आला. दोघांनी मिळून ‘हास्य षट्कार’ नावाने नवीन कार्यक्रम सुरु केला. मोघे या चांगल्या गायिका होत्या, म्हणून संहितेत काही हिंदी व मराठी गाणी समाविष्ट केली. प्रयोग उत्तम रंगू लागले. गाण्यांना वन्समोअर मिळू लागला. दिलीपच्या या कार्यक्रमाचे अल्पावधीतच महाराष्ट्राभर शेकडो प्रयोग झाले. या ‘हास्य षट्कार’ची डिझाईन, कार्ड, व्हिजिटींग कार्ड, कॅलेंडर, अलका टॉकीज चौकात मोठ्ठे बॅनर, फ्लेक्स, स्टॅण्डी असे भरपूर काम केले. या कार्यक्रमाच्या शेवटच्या प्रसंगात दिलीप व मृदुला दोघंही आजोबा आजीच्या वेशभूषेत जे हृदयस्पर्शी सादरीकरण करायचे, त्याला तमाम रसिक उभे राहून, उत्स्फूर्त दाद देत असत.
काही वर्षांनंतर दिलीपने सिने-नाट्य अभिनेत्री स्मिता ओक हिला घेऊन ‘नजराणा हास्याचा’ हा कार्यक्रम सुरु केला. या कार्यक्रमाचे देखील शेकडो प्रयोग झाले. जेव्हा स्मिता शुटींगमध्ये बिझी असायच्या तेव्हा मेधा गोखले यांना घेऊन दिलीपने प्रयोग चालू ठेवले. कधी कुणाला कमी वेळेचा कार्यक्रम हवा असेल तर दिलीपने ‘बम्पर लाफ्टर’ नावाचा एकपात्री प्रयोग ठेवलेला आहे. आजपर्यंत दिलीपने हजारों प्रयोग करुन लाखों रसिकांना हसविण्याचा विक्रम केलेला आहे.
दिलीपच्या या कलाप्रवासात वहिनींची साथ मोलाची आहे. त्यांनी नोकरी आणि घर सांभाळले म्हणून दिलीपचा झेंडा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर कॅनडापर्यंत फडकला. दिलीपला दोन कन्या आहेत. मोठी कॅनडात असते तर धाकटी पुण्यात, सीए आहे. दिलीप नंबर एकचा खवय्या आहे. तो ऑफिसमध्ये आल्यावर आमचं भेळ, वडापाव, सामोसे खाणं आणि पोटभरून गप्पा होतातच. पाणीपुरी हा तर त्याचा ‘विकपाॅईंट’ आहे. गप्पांमध्ये त्याच्या तोंडून मिश्राहारी विनोद, किस्से ऐकण्याची पर्वणी आम्ही कधीही सोडत नाही. त्याच्या घरातील प्रत्येक समारंभास आम्ही दोघेही हजर असतो.
गेल्याच वर्षी बीएसएनएल मधून निवृत्त होऊन दिलीप आता समाधानाचे आयुष्य जगतो आहे. कोरोनाच्या महामारीमुळे सध्या कार्यक्रम बंदच आहेत. तरीदेखील दिलीप फेसबुकवर देवानंद, राजेश खन्ना, इ. ची साभिनय गाणी गाताना दिसतो आहे…शेवटी तो हाडाचा कलाकार आहे! माझं तर त्याला मनापासून सांगणं आहे…
‘दिल्या’, घरी तू ‘सुखी’ रहा!!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२०-९-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..