नवीन लेखन...

आठवा खंड

पृथ्वीवरचा भूभाग हा सात खंडांत विभागला आहे. भूप्रदेशांची ही भौगोलिक विभागणी जरी सोयीनुसार केली गेली असली तरी, त्याला भूशास्त्राचा काहीसा आधार आहेच. परंतु पूर्णपणे भूशास्त्रीय दृष्टीनं पाहायचं तर, एखाद्या भूप्रदेशाला ‘खंड’ म्हणण्यासाठी त्या भूभागाला स्वतःचं स्वतंत्र भूशास्त्रीय अस्तित्व हवं, तो सर्व बाजूंनी समुद्राच्या पाण्यानं वेढलेला असावा आणि तो पुरेशा मोठ्या क्षेत्रफळाचा हवा. या भूशास्त्राच्या भाषेनुसार, खंडांच्या यादीत अलीकडेच आणखी एका खंडाची भर पडली आहे. दक्षिण पॅसिफिक महासागरात वसलेल्या या नव्या खंडाला नाव दिलं गेलं आहे – झिलँडिया. मात्र हा झिलँडिया खंड इतर खंडांपेक्षा खूपच वेगळा आहे. कारण या खंडाचा ९४ टक्के भाग पाण्याखाली दडला आहे, तर फक्त ६ टक्के भाग पाण्याच्या वर आहे. पाण्याच्या वर असलेला या खंडाचा भाग म्हणजे फक्त, ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला असणारा न्यूझिलंड हा देश आणि त्याच्या वरच्या बाजूस असणारी न्यू कॅलेडोनिया ही बेटं.

पृष्ठभागाच्या बदलत्या स्वरूपानुसार त्या ठिकाणच्या गुरुत्वाकर्षणात सूक्ष्मसे बदल होत असतात. हे बदल टिपून पाण्याखालच्या पृष्ठभागाचा नकाशा तयार करता येतो. कृत्रिम उपग्रहांद्वारे १९९०च्या दशकात आणि त्यानंतर आता २०१४ सालाच्या सुमारास केलेल्या, अशा मापनांवरून झिलँडियाचं अस्तित्व आणि व्याप्ती स्पष्ट झाली. या मापनातून झिलँडिया खंडाचं क्षेत्रफळ भारताच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत सुमारे दीडपट भरलं. या खंडाचा बराचसा पृष्ठभाग हा पाण्याखाली सुमारे दोन किलोमीटर इतका खोलवर आहे. आजूबाजूच्या समुद्रतळापासून या पृष्ठभागाची उंची सुमारे अकराशे मीटर इतकी आहे. सन २०१४ सालाच्या सुमारास केलेल्या विश्लेषणात, हा थर भूशास्त्रीयदृष्ट्या आजूबाजूच्या समुद्रतळापेक्षा वेगळा असल्याचं आढळलं आहे. समुद्राचा तळ हा साधारणतः शिलारसापासून तयार झालेल्या खडकांचा बनलेला असतो. याउलट झिलँडियाचा थर हा – शिलारसापासून तयार झालेले खडक, उष्णता व दाबामुळे रूपांतरण झालेले खडक तसंच गाळापासून तयार झालेले खडक – अशा सर्व प्रकारच्या खडकांचा बनलेला आहे.

इ.स. २०१७ साली केलेल्या अभ्यासात, या खडकांच्या नमुन्यांत वनस्पतींचे परागकण आणि उथळ पाण्यात आढळणाऱ्या प्राण्यांचे अवशेष सापडले. त्यावरून संशोधकांनी हा सर्व भूभाग पूर्वी पाण्याच्या वर असल्याचा निष्कर्ष काढला आहे. संशोधकांच्या मते, एकेकाळी दक्षिण गोलार्धातली सर्व जमीन गोंडवन या मोठ्या आकाराच्या भूप्रदेशाच्या स्वरूपात एकवटलेली होती. गोंडवनामध्ये या झिलँडियासह आजचे ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशियाचा काही भाग आणि अंटार्क्टिका, हे सर्व भूभाग येत होते. सुमारे आठ कोटी वर्षांपूर्वी, पृथ्वीच्या कवचातील वेगवेगळ्या भागांच्या हालचालींमुळे झिलँडिया हा भूभाग गोंडवनापासून वेगळा झाला. त्यानंतर सुमारे अडीच कोटी वर्षांपूर्वी हा सर्व भाग पाण्याखाली गेला व कालांतरानं त्यातील न्यूझिलंडसारखा प्रदेश काही काळानं पुनः पाण्याबाहेर आला.

झिलँडिया खंडाचा पाण्याखालचा थर आणि ऑस्ट्रेलिया खंडाभोवतीचा पाण्याखालचा थर हे स्पष्टपणे वेगवेगळे झालेले असून, ते एका खोल घळीनं विभागले आहेत. सुमारे साडेतीन किलोमीटर इतकी खोली असणारी ही घळ ‘कॅटो ट्रफ’ या नावानं ओळखली जाते. आश्चर्य म्हणजे झिलँडिया खंड काही ठिकाणी ऑस्ट्रेलिया खंडापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर असल्याचं या घळीच्या अरुंद स्वरूपावरून लक्षात येतं. ऑस्ट्रेलियातल्या क्विन्सलँड विद्यापीठातील डेर्या ग्युरेर यांनी नुकतंच आपल्या सहकाऱ्यांसमवेत या कॅटो ट्रफ घळीच्या परिसराचं, चार आठवड्यांचं तपशीलवार सर्वेक्षण यशस्विरीत्या पूर्ण केलं. हे सर्वेक्षण म्हणजे पृथ्वीवरील सर्व समुद्रतळांचे नकाशे तयार करण्याच्या, ‘सीबेड २०३०’ या प्रकल्पाचा एक भाग आहे. या सर्वेक्षणाबरोबरच या संशोधकांनी इथल्या खडकांचे चुंबकीय व इतर गुणधर्मही अभ्यासले. खडकांच्या या अभ्यासातून, आठवा खंड म्हणून उल्लेख झालेला हा झिलँडिया खंड नेमका का व कसा वेगळा झाला, या प्रश्नाचं उत्तर मिळण्यास मदत होणार आहे.

चित्रवाणीः https://www.youtube.com/embed/_qepWb_NVj4?rel=0

— डॉ. राजीव चिटणीस.

छायाचित्र सौजन्य: University of Nebraska–Lincoln / NOAA – Wikimedia

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..