दुःख माझे वाहताना मी तुझ्यासमवेत आहे
घर तुझे विझवायला गोदावरी जखमेत आहे.
दूध मागितले मिळाली ही उपेक्षेचीच ज्वाला
आग सरणाची तुझ्या का आचळाला येत आहे?
शेवटी उगवून आलो मी तुझ्या ज्वारीप्रमाणे
गाडला गेलो जिथे ते भाकरीचे शेत आहे.
ज्योत तेलावाचुनी जळते उपाशी झोपडीतच
मी भुकेची आग थोडी या दिव्याला देत आहे.
जर मला कुरवाळणारा केतकीला हात नाही
तू कशी फुलशील माझे दुःख त्या बागेत आहे.
प्रेम नाही जन्मले ते साजिरा मृत्यूच माझा
बघ तुझ्या गर्भात माझ्या काळजाचे प्रेत आहे.
जात नाकारून मी बाहेर गावाच्या निघालो
ये मला भेटायला तू बुद्ध ज्या दुनियेत आहे.
अनिल रुक्मिणी पांडुरंग साबळे.
संपर्क: ९३२६६७९३११.
सोमवार, 05 जानेवारी 2026 ते बुधवार, 07 जानेवारी 2026
खारघरहून सकाळच्या ६:१३च्या पनवेल C. S. T. ट्रेनने एल्फिन्स्टन महाविद्यालयात जाताना.


Leave a Reply