नवीन लेखन...

नादलुब्धा

आषाढातील पावसाचे थैमान तिला जाणवत नव्हते .
रात्रीचा कितवा प्रहर हेही तिच्या लक्षात येत नव्हते .
आजूबाजूचा सगळा अंधार गच्च तरीही ओलेता .
मधूनच लख्ख चमकणारी आणि क्षणार्धात भाजून काढील अशी भीती वाटायला लावणारी वीज .
मेघांचा भयप्रद कडकडाट .
रक्त गोठवू शकेल अशी विलक्षण थंडी .
पायाखाली गुडघाभर चिखल .
उजव्या बाजूला घनदाट जंगल आणि डाव्या बाजूला दुथडी भरून वाहणारी कालिंदी .

राधेला कशाचंही भान नव्हतं .
दूरवरून येणाऱ्या मुरलीधराच्या वंशीची धून तेवढी तिला ऐकू येत होती .
त्याच अनुरोधानं ती वेड्यासारखी पळत होती . त्या बेभान अवस्थेत सुरांची दिशा तेवढी तिला समजत होती .
कानाशी रुंजणारा वंशीनाद तिला खुणवत होता .

ती जीवाच्या आकांतानं धावत होती .

रात्रीच्या भोजनानंतरची आवराआवर करून राधा झोपडीतल्या आतल्या भागात आली तेव्हा , दिवसभराच्या कामामुळं थकून झोपलेल्या अनय कडे तिनं पाहिलं .
तो झोपला होता पण कण्हत होता .
तिनं दिव्याची ज्योत मोठी करून त्याच्याकडे पाहिलं . आणि तिला धक्का बसला .
त्याचं उजवं पाऊल फुगलं होतं आणि त्याच्या वेदना त्याला झोपेतही सहन होत नव्हत्या .
तिला स्वतःची लाज वाटली .
संध्याकाळी गोधने घेऊन आल्यावर त्यानं तिला सांगितलं होतं.
” माझ्या पायात काटा घुसला आहे , तेवढा काढ . खूप वेदना होत आहेत .”
ती त्यावेळी हो म्हणाली , पण कामाच्या धबडग्यात ती विसरून गेली होती .
ती खंतावली .
खाली बसून तिनं त्याचा पाय हातात घेतला .
आणि तिला चटका बसला .
एखाद्या निखाऱ्यासारखा पाय गरम झाला होता .
तिला काय करावं कळेना . काटा रुतलेल्या जागी पाय काळानिळा पडला होता . काटा काढायला जावं तर तो जागा होईल या भीतीनं तिनं पाय खाली ठेवला आणि त्यावर गोधडी पांघरली .
त्याच्या वेदना कमी होण्यासाठी काय करता येईल याचा विचार ती करू लागली .

आणि इतक्यात सुसाट वाहणाऱ्या वाऱ्यानं तिच्या झोपडीच मोडकळीस आलेलं दार भुईसपाट केलं . वाऱ्याच्या झोतामुळं दिवा खाली पडला आणि विझाला .
त्याक्षणी दूरवरून येणारा वंशीनाद तिच्या कानी पडला .
आणि क्षणार्धात ती सगळं काही विसरली .
अनय , त्याच्या वेदना , वादळी पावसाची अंधारी रात्र …

ती मंत्रमुग्ध झाल्यासारखी आवेगानं बाहेर पडली .
आणि सुरांच्या अनुरोधानं धावू लागली .
भान हरपून .

— वंशीनादाचा उगम राधेला जाणवला .
ती थबकली .

राधारमण तिथेच उभा होता .
एक पाय मुडपून .
कदंब वृक्षाला रेलून .
सभोवती वाऱ्या वादळाला , मुसळधार पडणाऱ्या पावसाला आणि कालिंदीच्या वाढणाऱ्या पाण्याच्या आवाजाला घाबरून , भेदरून गेलेली गोधने थरथर कापत मनमोहनाला बिलगून उभी होती .

” कन्हैयाsss ”

तिनं जीवाच्या आकांतानं साद घातली .

” ये . तू येणार हे माहित होतं राधे मला . किंबहुना तू यायला हवं असंच मला वाटत होतं . या आषाढघनांच्या रौद्रसंगीतात , माझ्या बासरीच्या सुरांची ताकद मला पहायची होती . तू माझी चांगली सखी आहेस , पण माझ्या सुरांसाठी अवेळी का होईना पण घराचा, अडचणींचा , संकटांचा आणि हो अनयचा विचार न करता तू येतेस का हे पहायचं होतं . ”

कृष्ण बोलताना थांबला .
मिश्किल नजरेनं तिच्याकडे पाहू लागला .

राधा त्याच्या बोलण्याने गोंधळली .
” तुला काय म्हणायचं आहे कन्हैया ? माझ्या प्रेमाची परीक्षा घेतो आहेस की तुझ्या बासरीच्या स्वरांची परीक्षा घेतो आहेस ? ”
” परीक्षा घेणारा मी कोण ? ”
तो पुन्हा थांबला .
ती त्याच्याकडे पाहू लागली .

ही त्याची सवय तिला खूप वर्षापासून माहीत होती .
काहीतरी जगावेगळं सांगायचं असेल तेव्हा तो याच पद्धतीने बोलायचा . बोलताना थांबायचा .

” बोल ना . का थांबलास ? ”
ती त्याच्याकडे बघत राहिली .
तो दूरवर कुठेतरी पहात होता .
” काय पाहतो आहेस ? कुणी येणार आहे का ? ”
” हो . मी अनयची वाट बघतोय . पण त्याला वेळ लागणार आहे . त्याच्या पायात काटा घुसला आहे आणि त्याला प्राणांतिक वेदना होत आहेत . तरीही तो येतोय . सावकाश . पायाच्या वेदना सहन करत . त्या वेदना मलाही जाणवत आहेत . म्हणूनच वाट बघतोय .”

कृष्णानं सांगितलं .
आणि आता तिची तिलाच लाज वाटली . आपण त्याच्या वेदनांचा विचार न करता केवळ मुरलीधराच्या वंशीचा वेध घेत आलो आणि हा कन्हैया त्याच्या वेदनांची काळजी करतोय . तिची मान खाली गेली .

” तो बघ , अनय आलाच . ”
खूप वेळाने कृष्ण म्हणाला .

तिनं वर पाहिलं .
अनय तिच्याकडेच पहात होता .
” बरी आहेस ना तू . अंधारातून , पावसातून , चिखलातून येताना लागलं तर नाही ना तुला ? कालिंदीच रौद्ररूप पहायचं होतं की आपलं गोधन हरवलं असं वाटलं तुला ? की या श्रीकृष्णाने तुला पुन्हा बोलावून घेतलं .? ”

” किती ते प्रश्न ? अरे तुम्ही दोघं इथं यावीत असं मलाच वाटलं . कधी नव्हे ते कालिंदी भरभरून वाहते आहे . प्रचंड पाऊस पडतो आहे . आणि आता भविष्यात ही भूमी सुजलाम् सुफलाम् होईल अशी खात्री मला वाटली . म्हटलं चला , हा निसर्गोत्सव तुमच्यासवे पाहू या . ”

” माधवा , तुला काही तरी वेगळं सांगायचं आहे . बरोबर ना ? ”

कृष्ण हसला .
“अनया , तुला जे कळतं , ते विलक्षण आहे . तुला माहितेय, ही राधा म्हणजे केवळ स्त्रीशक्ती नाही , ते धरतीचं दुसरं रूप आहे . तिची काळजी तुला वाटली . हे ही मला अपेक्षितच होतं . कारण तू म्हणजे नुसता अनय नावाचा पुरुष नाही . तर स्वतःला होणाऱ्या वेदना सहन करत धरतीची काळजी घेणारा महान पुरुष आहेस . आणि ही नदी , हा पाऊस , ही गोधने आणि भवतालचा सगळा निसर्ग, हे सगळं तुझ्यामुळं भविष्यात समृद्ध होणार आहे . हे तुम्हाला दाखवायचं होतं . म्हणून हा घाट घातला . तुझ्या वेदना राधेला सांभाळण्यानं कमी होणार आहेत . आणि मी केवळ निमित्तमात्र आहे . राधे , जा , या अनयला घेऊन जा .आणि असेच एकमेकांना जपत राहा . ”

कृष्ण निर्व्याजपणे हसला .

पुन्हा एकदा वीज चमकली .
त्या प्रकाशात कृष्ण अंतर्धान पावताना सगळ्यांना दिसला .

राधेनं डोळे पुसले .
अनयचा हात हाती घेऊन ती घरी निघाली .
अंतर्धान पावणाऱ्या कृष्णानं हळूच पाठी वळून पाहिलं .
आणि तो हसला .
पाऊस पूर्ण थांबला होता .
सस्यश्यामल धरती प्रसन्नपणे हसत होती .
———–
डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
८९५१९०६७०१
————
ही रूपककथा आवडल्यास नावासह सर्वत्र पाठवायला आणि अभिप्राय कळवायला हरकत नाही

Avatar
About डॉ. शीतल म्हामुणकर 21 Articles
डॉक्टर शीतल म्हामुणकर ज्येष्ठ आहारतज्ज्ञ आहेत. त्या या क्षेत्रात ३० हून अधिक वर्षे कायरत असून क्रिडापटूंसाठी आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच काम केले आहे. डॉ. म्हामुणकर या प्रिव्हेंटा क्लिनिक या संस्थेच्या संचालिका आहेत. आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..