सोन्यापेक्षा महाग असणारा पण अलंकारांसाठी अनेकांना आकर्षित करणारा धातू म्हणजे प्लॅटिनम. प्लॅटिनम हा चांदीसारखा पांढरा, अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान धातू आहे. हा सोन्यापेक्षाही अधिक दुर्मीळ आहे असे मानले जाते.
पृथ्वीच्या पोटात अगदी कमी प्रमाणात सापडणारा हा धातू आहे. त्याच्या स्वत:च्या खनिजामधे तसेच निकेल व तांबं असणाऱ्या खनिजामधे हा धातू मिळतो. याचं ८ टक्के उत्पादन दक्षिण आफ्रिकेत होतं. उत्पादन कमी असल्यानं तो महाग असतो.
नामकरण:
स्पॅनिश शब्द ‘platina’ वरून आला आहे , जो ‘plata ‘ (म्हणजे ‘चांदी’) या शब्दाचा लहान रूप आहे, कारण ते दिसायला सारखे असतात. स्पॅनिश शब्द प्लॅटिनामधून प्लॅटिनम या शब्दाचा जन्म झाला. प्लॅटिनाचा अर्थ आहे ‘लिटिल सिल्व्हर’. प्लॅटिनम हे चांदीप्रमाणो पांढरं दिसतं त्यामुळे त्याला हे नाव योग्यच आहे.
शोध: याचा शोध अँटोनियो डी उलोआ (१७३५) मध्ये लावला.
प्लॅटिनमचे प्रमुख गुणधर्म आणि माहिती:
• दुर्मिळता: प्लॅटिनम पृथ्वीच्या कवचात अत्यंत कमी प्रमाणात आढळतो आणि याची उपलब्धता सोन्याच्या तुलनेत खूपच कमी आहे.
• टिकाऊपणा: हा एक अतिशय जड, मजबूत आणि गंज न चढणारा धातू आहे. रासायनिक अभिक्रियांचा यावर फारसा परिणाम होत नाही.
• दागिने: प्लॅटिनम ९५% पर्यंत शुद्ध स्वरूपात वापरला जातो. याचा पांढरा रंग कधीही फिकट होत नाही.
• औद्योगिक आणि वैद्यकीय उपयोग: मोटारींमधील धूर कमी करणाऱ्या ‘कॅटॅलिटिक कन्व्हर्टर’मध्ये प्लॅटिनमचा सर्वाधिक वापर होतो. याव्यतिरिक्त, रासायनिक उपकरणे, जेट इंजिन, आणि कर्करोगावरील (Cancer) औषधांमध्येही याचा उपयोग केला जातो.
• गुंतवणूक: सोने आणि चांदीप्रमाणेच प्लॅटिनममध्येही नाणी आणि बारच्या स्वरूपात गुंतवणूक केली जाते.
• प्लॅटिनमच्या अंगी रासायनिक रोधकता आहे. तीव्र सल्फ्युरिक आम्लाचाही यावर परिणाम होत नाही म्हणून औद्योगिक क्षेत्रात प्लॅटिनमच्या मुशी, भांडी, चाळण्या, नळ्या वगैरे वापरतात. काचेवर प्लॅटिनमचा अत्यंत पातळ थर देऊन तयार केलेला आरसा दारा-खिडक्यांना लावतात त्यामुळे घरातील व्यक्तीला बाहेरचे नीट पाहता येते पण बाहेरील व्यक्तीला या काचेतून घरातील काहीही दिसत नाही.
शारीरिक गुणधर्म: (Physical properties):
• प्लॅटिनम हा एक चमकदार, तन्य आणि वर्धनीय, चांदीसारखा पांढरा धातू आहे. प्लॅटिनम सोने, चांदी किंवा तांबे पेक्षा जास्त तन्य आहे, त्यामुळे तो शुद्ध धातूंमध्ये सर्वात तन्य आहे.
• त्याच्या भौतिक वैशिष्ट्यांमुळे आणि रासायनिक स्थिरतेमुळे ते औद्योगिक वापरासाठी उपयुक्त ठरते. त्याची झीज आणि गंजण्यास असलेला प्रतिकार मौल्यवान दागिन्यांमध्ये वापरण्यासाठी योग्य आहे.
• गरम केलेल्या धातूच्या तारांचे वजन व्हॅक्यूमपेक्षा हवेत किंवा ऑक्सिजनमध्ये जास्त वेगाने कमी होते. असे सुचवले जाते की Pt, PtO2 चा एक पातळ पृष्ठभागीय थर तयार करतो जो ५०० °C पेक्षा जास्त तापमानाला गरम केल्यावर विघटित होतो.
• १८८३ साली प्लॅटिनमच्या सहाय्याने प्रमाणित मानके (किलोग्रॅम, मीटर वगैरे) तयार करण्यात आली. या मानकांचे वेळोवेळी परीक्षण केले असता लक्षात आले की १२५ पेक्षा जास्त वर्षे होऊनही यांच्यात काहीच फरक पडलेला नाही, त्यांची झीज झालेली नाही.
इतिहास:
१६ व १७ व्या शतकात स्पॅनिश लोकांनी ॲझटेक आणि इंका लोकांकडून टनावारी सोने, चांदी आणि हिरेमाणके जहाजात भरभरून आपल्या देशात नेले. त्यातच रुपेरी धातूचे काही कणही होते. त्यांचा वितळणबिंदू फारच उच्च असल्याने ते कण निरुपयोगी ठरले, सोने मिळविण्यास अडचणीचे ठरले. स्पॅनिश लोकांनी त्यास तिरस्काराने प्लॅटिनो म्हणजे हलक्या प्रतीची चांदी असे नाव दिले.
पुढे १८ व्या शतकाच्या अखेरीस रशियन रसायनशास्त्रज्ञ व सेंट पीटर्सबर्गच्या खनिकर्म महाविद्यालयाचे उपाध्यक्ष आपोलस म्युसिन-पुश्किन यांनी प्लॅटिनमच्या अभ्यासात महत्त्वाचे योगदान दिले. त्यामुळे प्लॅटिनमसह निसर्गतः:च येणाऱ्या अनेक धातूंचा शोध लागला, या सर्वांना मिळून प्लॅटिनम वर्गीय धातू असे नाव दिले गेले. यात १८०३ मध्ये पॅलॅडियम व ऱ्होडियम, १८०४ मध्ये ॲस्मियम व इरिडियम तर १८४४ च्या सुमारास रुदेनियमचा शोध लागला. टंग्स्टनचा शोध लागेपर्यंत प्लॅटिनम-पोलाद हे सगळ्यात कठीण संयुग समजण्यात येई, त्यास डायमंड-स्टील असे म्हणत.
प्लॅटिनमची प्युरीटी / शुध्दता:
काही लोक म्हणतात की प्लॅटिनम व व्हाइट गोल्ड एक सारखेच असतात परंतु व्हाईट गोल्डची शुद्धता ही फक्त 75 टक्के असते तर प्लॅटिनम ची शुद्धता ही 95 टक्के असते. म्हणजेच प्लॅटिनम ज्वेलरी बनवताना त्यात 95% प्लॅटिनम वापरले जाते.
ज्याप्रकारे सोन्या मध्ये १८ कॅरेट, १२, व २४, कॅरेट असते, तसेच प्लॅटिनम मध्ये Pt 950 असा हॉलमार्क असतो. म्हणजेच त्या वस्तू मध्ये ९५ टक्के प्लॅटिनम वापरले गेले आहे असे ते दर्शवते.
जेव्हा तुम्ही प्लॅटिनम ज्वेलरी खरेदी करतात जसे की अंगठी, कडा, चेन, ब्रेसलेट इत्यादी, म्हणजेच जेव्हा तुम्ही प्लॅटिनम गिल्ड इंटरनॅशनल (Platinum Guild International) ची कोणतीही ज्वेलरी खरेदी करता तेव्हा तुम्हाला त्यासोबत एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर( Unique Identification Number) मिळतो जो त्या वस्तूवर दिलेला असतो व तोच नंबर तुम्ही घेतलेल्या दागिन्या सोबत मिळालेल्या सर्टिफिकेटवर सुद्धा लिहिलेला असतो. म्हणजेच तुम्हाला कळेल की हे सर्टिफिकेट त्याच दागिन्यांचे आहे आणि ते खरा आहे.
विशेष धातूची वैशिष्टय़ं :
प्लॅटिनमची घनता २१.४५ ग्रॅम (सें.मी) चा घन एवढी आहे. यावरून लगेच कळतं की हा धातू सोन्यापेक्षाही जड आहे. त्याचा वितळण बिंदूही १७६८.३°C म्हणजे सोन्यापेक्षा जास्त आहे. सोन्याप्रमाणोच तो ‘अॅक्वारेजिया’ या हायड्रोक्लोरिक आम्ल व नायट्रिक आम्ल यांच्या गरम मिश्रणात विरघळतो. प्लॅटिनमची बारीक तार निघू शकते तसेच त्याचा पातळ पत्रेही तयार होऊ शकतो. त्याला एक प्रकारची चमक असते. या सगळ्यामुळेच दागिन्यांसाठी प्लॅटिनम योग्य समजलं जातं.
प्लॅटिनमचा उपयोग / फायदे:
• प्लॅटिनम चा उपयोग वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी होतो. त्याच्या जास्त मेल्टिंग पॉइंट (Melting Point ) मुळे, शुद्धते मुळे व त्याच्या विश्वसनीयता या गुणांमुळे अनेक क्षेत्रांमध्ये प्लॅटिनम चा उपयोग होतो.
• प्लॅटिनम चा वापर जास्त करून हिऱ्याचे दागिने बनविण्यासाठी केला जातो.
• तसेच प्लॅटिनम हे दातांवर उपचार करण्यासाठीही वापरतात. याशिवाय अनेक रासायनिक उद्योग, इलेक्ट्रिकल उद्योग, विमान उद्योग, प्रयोगशाळा, औषधे, उपकरणे, लेझर उत्पादन यांसाठी प्लॅटिनम धातूचा वापर केला जातो.
• प्लॅटिनम चा उपयोग कम्प्युटरची हार्ड डिस्क बनवण्यासाठी सुद्धा होतो.
• याशिवाय प्लॅटिनम धातू चा उपयोग हा कॅन्सर सारख्या रोगावर औषध बनवण्यासाठी व केमोथेरपी साठी पण केला जातो.
• शिवाय उच्च गुणवत्तेची किमती चष्मे बनवण्यासाठी प्लॅटिनम चा उपयोग केला जातो.
• जहाजांना समुद्राच्या खारट पाण्यामुळे गंज लागू नये यासाठी जहाज बनवताना त्यात प्लॅटिनम चा वापर केला जातो.
प्लॅटिनम चा २५ टक्के उपयोग हा दागिने बनविण्यासाठी होतो तर ७५ टक्के उपयोग हा विविध उद्योगांमध्ये केला जातो.
प्लॅटिनमचे प्रमुख उपयोग.
• वाहनांमधील हानिकारक वायूंचे रूपांतर कमी विषारी वायूमध्ये करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून वापर.
• टिकाऊपणा, चमक आणि गंज-प्रतिरोधक असल्यामुळे उच्च दर्जाचे दागिने बनवण्यासाठी.
• पेसमेकरसारख्या उपकरणांमध्ये वापर
• हार्ड डिस्क, फायबर ऑप्टिक्स, इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट्स आणि स्पार्क प्लगमध्ये.
• नायट्रिक ॲसिड, सिलिकॉन आणि पॉलिस्टर तयार करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून.
• मौल्यवान धातू असल्याने गुंतवणुकीसाठीही वापरला जातो.
• काच निर्मिती, पेट्रोलियम शुद्धीकरण आणि इंधन पेशींमध्ये
प्लॅटिनम कोठे आढळते:
जगात प्लॅटिनम उत्पादन करणारे देश खूप कमी आहेत, ज्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळ जवळ ७५ टक्के उत्पादन हे साऊथ आफ्रिके मध्ये होते. याशिवाय रशिया, अमेरिका (USA), कॅनडा, झिम्बाब्वे येथे सुद्धा प्लॅटिनम चे उत्पादन केले जाते.
प्लॅटिनमचे आणखीन महत्वाचे ५ उपयोग :
प्लॅटिनमचे इलेक्ट्रॉनिक्स, वाहन उद्योग, दंतवैद्यकीय उपकरणे, दागिने आणि बुलियन यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये उपयोग होतात. तथापि, प्लॅटिनमचा सर्वात मोठा उपयोग उत्प्रेरक म्हणून होतो. उत्प्रेरक हे असे पदार्थ आहेत जे रासायनिक अभिक्रियांचा वेग वाढवतात आणि एखाद्या पदार्थाचे रूपांतर करण्यासाठी लागणारी ऊर्जा कमी करतात. तुम्हाला प्लॅटिनमबद्दल किती माहिती आहे? सोन्यापेक्षाही दुर्मिळ असलेला हा धातू एक मौल्यवान आणि औद्योगिक धातू म्हणून ओळखला जातो. इतकेच नव्हे तर, प्लॅटिनमच्या ८०% पेक्षा जास्त अंतिम उपयोगांमुळे ऊर्जेची गरज आणि/किंवा हानिकारक उत्सर्जन कमी होते.
प्लॅटिनम तथ्ये:
एक ग्रॅम प्लॅटिनम ताणून दोन किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची तार बनवता येते.( तन्य) प्लॅटिनम अत्यंत वर्धनीय आहे, म्हणजेच त्याला ठोकून १०० अणूंइतका पातळ पत्रा बनवता येतो. साधारणपणे ९५% शुद्ध असलेले प्लॅटिनमचे दागिने हे सर्व मौल्यवान धातूंमध्ये सर्वात शुद्ध मानले जातात. या शतकात प्लॅटिनमचे जागतिक साठे संपण्याचा धोका नाही, परंतु मागणी पूर्ण करण्यासाठी दरवर्षी उत्खनन होणाऱ्या प्लॅटिनमचे प्रमाण सहजपणे किंवा त्वरीत वाढवता येणार नाही. प्लॅटिनमचा पुनर्वापर केला जाऊ शकतो आणि यामुळे पुरवठ्याचा आणखी एक स्रोत उपलब्ध होतो. आजवर उत्पादित झालेले सर्व प्लॅटिनम एका ऑलिम्पिक-आकाराच्या जलतरण तलावात फक्त तुमच्या घोट्यांपर्यंतच पसरेल. आजवर उत्पादित झालेले सर्व सोने चार ऑलिम्पिक-आकाराचे जलतरण तलाव भरेल.
प्लॅटिनम-आधारित विणलेल्या गॉझ या नायट्रिक ऑक्साईडच्या उत्पादनासाठी सर्वात कार्यक्षम उत्प्रेरक आहेत, जे नायट्रिक ऍसिडच्या निर्मितीसाठी पूर्वसूचक म्हणून काम करते आणि ज्यापैकी बहुतांश खतांच्या उत्पादनात कच्चा माल म्हणून वापरले जाते.
प्लॅटिनमची वार्षिक उपलब्धता सोन्यापेक्षा २० पट आणि चांदीपेक्षा १०० पट कमी आहे. रशियामध्ये १८२८ साली नाण्यांसाठी प्लॅटिनमचा वापर सर्वप्रथम करण्यात आला प्लॅटिनमचा वितळणांक (Melting point) १७६८°C असून तो सोन्याच्या १०६३°C वितळणांकापेक्षा बराच जास्त आहे. प्लॅटिनम गटातील सहा धातू म्हणजे प्लॅटिनम, पॅलेडियम, ऱ्होडियम, इरिडियम, रुथेनियम आणि ऑस्मियम. प्लॅटिनमच्या १५ सेमी घनाकृती तुकड्याचे वजन एका सामान्य माणसाच्या वजनाइतके असते. तसेच, प्लॅटिनम २१.४५ ग्रॅम/सेमी³ घनतेसह सर्वात जास्त घनता असलेल्या मूलद्रव्यांपैकी एक आहे.
प्लॅटिनम न्युज:
सोन्या चांदीनं यंदा लाखाचा टप्पा पार केला, आता आणखी एक मौल्यवान धातू भाव खाऊ लागलाय. जागतिक बाजारात मागील महिन्यात प्लॅटिनमचे दर लाखांच्या घरात पोहोचले. गेल्या १८ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर प्लॅटिनम पोहोचलंय. मागील महिन्यात प्लॅटिनमचे दर प्रती आऊंस १९७५ डॉलर झालेत.
काय घडतंय जागतिक बाजारात?
सोनं चांदीचे दर वाढत असतानाच प्लॅटिनमच्या दरात इतकी वाढ का झाली, गुंतवणूकदारांसाठी ही संधी आहे की धोक्याची चिन्हं, गुंतवणूकदारांनी काय काळजी घ्यायला हवी.
प्लॅटिनममधील गुंतवणुकदारांमध्ये वाढ…
सोन्या-चांदीचे दर विक्रमी पातळीवर पोहोचल्याने प्लॅटिनमही गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहे. जागतिक बाजारात मागील महिन्यात प्लॅटिनमचे दर १८ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर, १९७५ डॉलर प्रति औंस (१७८,२२७ रुपये प्रति २८.३५ ग्रॅम) वर पोहोचले. कमकुवत होत असलेल्या चलनातून होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून बचाव (हेजिंग) करण्यासाठी गुंतवणूकदार प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करत आहेत. २०२५ मध्ये आतापर्यंत प्लॅटिनमची किंमत १२१ टक्क्यांनी वाढली आहे. ही वाढ सोन्यातील 74% वाढीपेक्षा जास्त आहे, तर चांदीतील १३२ टक्क्यांच्या जवळपास आहे.
सोने-चांदी गरजेपेक्षा जास्त महाग झाल्याने स्वस्त पर्याय म्हणून प्लॅटिनमकडे पाहिलं जातं आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, भारतात प्लॅटिनमची सरासरी किंमत ६१,५१३ रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. २०२४ च्या अखेरीस ती २७,५६० रुपये आणि २०२० च्या अखेरीस २४,९१० रुपये होती. आतापर्यंत प्लॅटिनमची किंमत १२१ टक्क्यांनी वाढली आहे. ही वाढ सोन्यातील ७४% वाढीपेक्षा जास्त आहे, तर चांदीतील १३२% वाढीच्या जवळपास आहे.
गेल्या काही वर्षांपासून सोन्याला पर्याय म्हणून प्लॅटिनमकडे पाहिले जात आहे. सोन्याप्रमाणे प्लॅटिनमचे दागिनेही हळूहळू लोकप्रिय होत आहेत. प्लॅटिनमचा रंग पांढरट राखाडी असला, तरी तो चांदीपेक्षा वेगळा दिसतो. हा सोन्यापेक्षाही दुर्मिळ धातू मानला जातो. त्यामुळे काही वर्षांपूर्वी तो सोन्यापेक्षा महाग होता. सध्या सोने एक लाख हजार रुपये प्रतितोळा, तर प्लॅटिनम ५० हजार रुपये प्रतितोळा आहे. गेल्या काही वर्षांत सोन्याच्या दराने प्लॅटिनमला मागे टाकले असले, तरी प्लॅटिनमच्या दरात हळूहळू वाढ होत असून, तो गुंतवणुकीसाठीही चांगला पर्याय म्हणून पुढे येत आहे.
डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
ता. २८.०७.२०२६
संदर्भ:
विकिपीडिया : प्लॅटिनम
नियतकालिक सारणी:
(periodic table) – ७८
गुगल वरील बरेच लेख
सर्व फोटो गूगलच्या सौजन्याने


Leave a Reply