काही व्यक्ती स्वतःच्या यशाने मोठ्या होत नाहीत; त्या आपल्या गावासाठी,समाजासाठी केलेल्या कार्यामुळे लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करतात. अशा व्यक्तींच्या कामामागे प्रसिद्धीची अपेक्षा नसते, तर समाजाप्रती असलेली निष्ठा, जिव्हाळा आणि कर्तव्याची भावना असते. मंदोशी गावचे दत्ता आंबेकर हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक.
नोकरीच्या निमित्ताने ते मुंबईत स्थायिक झाले. अनेक तरुणांप्रमाणे त्यांनीही उपजीविकेसाठी गाव सोडले; परंतु गावाशी असलेली त्यांची नाळ कधीच तुटली नाही. सुट्टी मिळाली की त्यांची पावले आपोआप मंदोशीकडे वळत. गावातील माणसे, वाडी-वस्ती, देवस्थाने आणि गावाचा विकास याच विचारांनी त्यांचे मन सतत व्यापून राहत असे.
त्यांच्या मनात एक प्रश्न वारंवार डोकावत असे.”आपल्या गावासाठी आपण कायमस्वरूपी असे कोणते कार्य करू शकतो, ज्याचा लाभ पुढील अनेक पिढ्यांना होईल?”
याच विचारातून एका सामाजिक परिवर्तनाची बीजे रुजली.
देआई मंदिराचे जुने वैभव
मंदोशी–हुरसाळेवाडी–टोकावडे मार्गावर, रस्त्याच्या कडेला एका विशाल पिंपरीच्या झाडाखाली देआईचे जागृत स्थान आहे. त्या ठिकाणी देवीची मूर्ती आहे; मात्र मंदिर नव्हते. साधे, नैसर्गिक आणि श्रद्धेचे ते स्थान अनेक वर्षे गावकऱ्यांच्या भक्तीचे केंद्र होते.
पूर्वी साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर पसरत असत. घराघरांत लहान मुले आजारी पडत. अशा वेळी गावकरी श्रद्धेने देआईला नवस करीत. देवीच्या कृपेने संकट दूर होईल, असा त्यांचा दृढ विश्वास होता.
दरवर्षी देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाई. गावातील स्त्री-पुरुष, तरुण, वृद्ध आणि लहान मुले या उत्सवात सहभागी होत. हुरसाळेवाडीला यात्रेचे स्वरूप येई. नातेवाईक भेटत, जुने मित्र एकत्र येत आणि सुख-दुःखाच्या गप्पांमधून सामाजिक बंध अधिक दृढ होत.
परंतु पुढे काळ बदलला. वैद्यकीय सुविधा वाढल्या, साथीचे आजार कमी झाले आणि हळूहळू देआईच्या स्थानाकडे लोकांचे येणे-जाणे कमी झाले. काही वर्षांतच त्या जागेचे पूर्वीचे वैभव लोप पावले. गावाच्या दुर्लक्षामुळे ते पवित्र स्थान शांत आणि ओसाड होऊ लागले.
एका विचारातून सुरू झालेला प्रवास
ही परिस्थिती पाहून दत्ता आंबेकर यांच्या मनाला वेदना होत असत.
एक दिवस त्यांच्या मनात ठाम विचार आला.”देआईचे पूर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त करून देता आले, तर गाव पुन्हा एकत्र येईल. एक दिवसाची का होईना, पण यात्रेची परंपरा पुन्हा सुरू होईल. गावातील सामाजिक ऐक्य वाढेल.”
हा विचार त्यांनी मनातच न ठेवता कृतीत उतरवण्याचा निर्णय घेतला.
सर्वप्रथम त्यांनी आपले बालमित्र श्री भगवान हुरसाळे यांच्याशी चर्चा केली. त्यांनाही ही कल्पना मनापासून आवडली. त्यानंतर नामांकित पहिलवान श्री अंकुश हुरसाळे यांच्यासमोरही हा विषय मांडण्यात आला.
तिघांचाही निष्कर्ष एकच होता. देआई मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे.
परंतु हे काम सोपे नव्हते. मंदिर उभारण्यासाठी आर्थिक साधने नव्हती. गावात मतभेद आणि हेवेदावे होते. काही जण कोणत्याही चांगल्या कामालाही विरोध करत असत. त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धैर्य, संयम आणि सर्वांना एकत्र आणण्याची क्षमता आवश्यक होती.
दत्ता आंबेकर यांनी ठरवले की हे कार्य एका व्यक्तीचे नसून संपूर्ण वस्तीचे असले पाहिजे. त्यासाठी हुरसाळेवाडीतील सर्व तरुणांची बैठक बोलावण्यात आली. मंदिराच्या जीर्णोद्धाराची कल्पना सर्वांसमोर मांडण्यात आली. विशेष म्हणजे उपस्थित प्रत्येक तरुणाने या कार्याला उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
बैठकीत दत्ता आंबेकर यांनी अत्यंत मोलाचे शब्द उच्चारले
“आपण हे काम करणार असाल, तर आपापसातील मतभेद, राग, हेवेदावे आणि भांडणे विसरावी लागतील. मंदिर हे कोणाचे वैयक्तिक नसून संपूर्ण गावाचे आहे. म्हणून आपण सर्वांनी एकदिलाने काम केले, तरच हे स्वप्न साकार होईल.”
या शब्दांनी उपस्थित सर्वांच्या मनात नवी ऊर्जा निर्माण झाली. एका सामाजिक चळवळीची खरी सुरुवात झाली होती.
मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय तर झाला होता; पण त्या निर्णयाला प्रत्यक्षात उतरविण्यापूर्वी गावाच्या परंपरेनुसार एक महत्त्वाचा विधी आवश्यक होता. कोणतेही धार्मिक कार्य हाती घेण्यापूर्वी ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यांचा कौल घेतल्याशिवाय पुढे जाणे योग्य मानले जात नव्हते.
दत्ता आंबेकर, भगवान हुरसाळे, अंकुश हुरसाळे आणि इतर काही तरुणांनी गावातील धार्मिक परंपरांचे जाणकार गोविंदराव हुरसाळे यांची भेट घेतली. त्यांनी सर्व परिस्थिती शांतपणे ऐकून घेतली आणि स्पष्ट सांगितले,
“जर मंदिराचा जीर्णोद्धार करायचा असेल, तर प्रथम ग्रामदैवताचा कौल घेणे आवश्यक आहे. देवाची संमती मिळाली, तर पुढचा मार्ग निश्चितच सुकर होईल.”
हा सल्ला सर्वांनी मान्य केला.
ग्रामदैवताचा कौल
रविवारी सकाळी सर्वजण श्री काळभैरवनाथ मंदिरात गेले. गावातील पुजाऱ्यांनी विधीपूर्वक देवाला कौल लावला. त्या क्षणी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आणि थोडीशी धाकधुक होती.
“देवाने कौल दिला नाही तर?” हा प्रश्न अनेकांच्या मनात घोळत होता.
मात्र काही क्षणांतच आलेला कौल सर्वांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला. ग्रामदैवताने मंदिराच्या जीर्णोद्धारास संमती दिली होती.
हा क्षण त्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला. आता हे कार्य केवळ त्यांचे स्वप्न नव्हते, तर देवाची आज्ञा मानून स्वीकारलेले एक पवित्र कर्तव्य बनले होते.
गावाची बैठक आणि विरोध
यानंतर संपूर्ण गावाची बैठक बोलावण्यात आली. वाडी-वस्तीतील सर्व नागरिक उपस्थित होते.
दत्ता आंबेकर यांनी देआई मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रस्ताव मांडला. काही ज्येष्ठांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. तरुणांच्या पुढाकाराचे कौतुक केले.
परंतु प्रत्येक चांगल्या कामाला विरोध करणारे काहीजण येथेही होते. विविध कारणे पुढे करून त्यांनी या कामाला विरोध करण्याचा प्रयत्न केला.
काहींना खर्चाची चिंता होती. काहींना मंदिर उभारण्याची गरजच वाटत नव्हती.
सर्वांचे म्हणणे संयमाने ऐकून घेतल्यानंतर दत्ता आंबेकर यांनी शांतपणे एकच भूमिका मांडली.
“देवाने कौल दिला आहे. हे काम कोणत्याही व्यक्तीचे नसून संपूर्ण गावाचे आहे. आपण मतभेद बाजूला ठेवून एकत्र आलो, तर हे कार्य नक्की पूर्ण करू.”
या भूमिकेमुळे वातावरण शांत झाले आणि अखेरीस मंदिराच्या कामाला हिरवा कंदील मिळाला.
सर्वात मोठे आव्हान – निधी
आता प्रश्न होता पैशांचा.
तरुणांच्या हातात मोठी आर्थिक साधने नव्हती. अनेकांकडे स्वतःच्या गरजा भागविण्यासाठीही पुरेसे पैसे नव्हते.
मात्र त्यांनी हार मानली नाही.
बैठकीत निर्णय झाला की प्रत्येक तरुणाने दरमहा दहा रुपये वर्गणी द्यायची. त्याशिवाय वस्तीतील प्रत्येक घरातून स्वेच्छेने वर्गणी जमा करायची.
रक्कम लहान होती; पण त्यामागची भावना मोठी होती.
हळूहळू निधी जमा होऊ लागला आणि मंदिराचे स्वप्न प्रत्यक्षात येण्याचा मार्ग खुला झाला.
मंदिराचा आराखडा
दत्ता आंबेकर, भगवान हुरसाळे आणि अंकुश हुरसाळे यांनी मुंबईतील अनेक लहान-मोठ्या मंदिरांना भेटी दिल्या. विविध मंदिरांची रचना, बांधकाम आणि सौंदर्य यांचा अभ्यास केला.
अनेक दिवसांच्या पाहणीनंतर त्यांना मनासारखा आराखडा मिळाला.
गावी परतल्यानंतर पुन्हा बैठक घेण्यात आली. मंदिर बांधण्यासाठी योग्य कारागिराचा शोध सुरू झाला.
त्यावेळी गावातील अनुभवी कारागीर श्री दूंदाजी बांगर यांचे नाव पुढे आले. त्यांनी यापूर्वीही अनेक धार्मिक बांधकामे केली होती.
सर्वांच्या संमतीने मंदिराच्या बांधकामाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.
स्वप्न साकार होऊ लागले
विधीवत पूजन करून मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली.
मुंबईत नोकरी करत असूनही दत्ता आंबेकर आणि त्यांचे सहकारी प्रत्येक सुट्टीच्या दिवशी गावात येत. बांधकामाची पाहणी करीत. आवश्यक साहित्याची व्यवस्था करीत.
अल्पावधीतच पिंपरीच्या झाडाखाली एक सुंदर, देखणे आणि आकर्षक मंदिर उभे राहिले. जे स्थान वर्षानुवर्षे दुर्लक्षित होते, ते पुन्हा भक्तीचे केंद्र बनले. मंदिर पूर्ण झाल्यावर वस्तीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
याहून मोठा आनंद म्हणजे या कामामुळे गावातील जुने रुसवे-फुगवे आणि किरकोळ वाद मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. मंदिराने केवळ दगडांची रचना उभी केली नव्हती; तर माणसांच्या मनांमध्येही एकतेचा पूल बांधला होता.
पहिली महापूजा
मंदिर पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच वर्षी मोठ्या उत्साहात जीर्णोद्धार सोहळा आणि महापूजेचे आयोजन करण्यात आले.
गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
देआईच्या मंदिरात पुन्हा भक्तांची गर्दी होऊ लागली आणि अनेक वर्षांनंतर त्या परिसरात पुन्हा यात्रेसारखे वातावरण निर्माण झाले.
देआई प्रतिष्ठानची स्थापना
मंदिराच्या यशस्वी जीर्णोद्धारानंतर सर्व तरुणांना एक जाणीव झाली.
“हे कार्य इथेच थांबता कामा नये. समाजासाठी अजून अनेक उपक्रम राबवता येतील.”
या विचारातून अधिकृत संस्थेची गरज जाणवू लागली.
सन २०१० मध्ये सर्वांच्या एकमताने देआई प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करण्यात आली. शासनाकडे तिची विधिवत नोंदणी करण्यात आली.
संस्थेच्या अध्यक्षपदी दत्ता आंबेकर यांची बिनविरोध निवड झाली.
ही केवळ पदाची निवड नव्हती; तर त्यांच्या नेतृत्वावर गावाने व्यक्त केलेला विश्वास होता.
देआई प्रतिष्ठानची स्थापना झाल्यानंतर गावातील सामाजिक कार्याला नवी दिशा मिळाली. मंदिराच्या जीर्णोद्धारातून निर्माण झालेली एकजूट आता विविध लोकोपयोगी उपक्रमांमध्ये दिसू लागली. केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी कार्य हेच प्रतिष्ठानचे मुख्य ध्येय बनले.
२०१३ मधील ऐतिहासिक सोहळा
सन २०१३ मध्ये प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. देआई देवीचा उत्सव गावच्या यात्रेच्या धर्तीवर मोठ्या प्रमाणात आयोजित करायचा, असा सर्वानुमते निर्णय झाला. त्यासाठी गावातील आणि मुंबईतील ग्रामस्थांकडून देणग्या जमा करण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे स्वरूप केवळ धार्मिक न ठेवता सामाजिक बांधिलकी जपणारे असावे, यावर सर्वांचे एकमत झाले. त्यामुळे विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली.
त्यामध्ये सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, सुश्राव्य कीर्तन, सर्वरोग निदान शिबिर, मोफत चष्मे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दकोशांचे वितरण आणि देवीचा पारंपरिक सन्मान अशा अनेक उपक्रमांचा समावेश करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत बारकाईने करण्यात आले. प्रत्येकाने स्वतःहून जबाबदाऱ्या स्वीकारल्या.
श्री बंडूशेठ सिताराम हुरसाळे यांनी महाप्रसादाची जबाबदारी स्वीकारली. श्री एकनाथ आंबेकर यांनी विद्यार्थ्यांना शब्दकोश वाटपाचा उपक्रम हाती घेतला. तर श्री गणेश हुरसाळे, श्री भगवान हुरसाळे, श्री अंकुश हुरसाळे आणि दत्ता आंबेकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व समन्वयाची जबाबदारी सांभाळली.
मंगळवार, दिनांक २३ एप्रिल २०१३ रोजी हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला.
एकतेचा विजय
प्रत्येक चांगल्या कामाप्रमाणे या उपक्रमालाही काही विरोध झाला. चुकीच्या अफवा पसरविण्याचा प्रयत्न झाला. काही कार्यकर्त्यांचे मन वळविण्याचाही प्रयत्न झाला.
मात्र कार्यकर्त्यांची एकजूट अबाधित राहिली.
त्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला. मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित राहिले. अनेक ज्येष्ठांनी हा कार्यक्रम “न भूतो न भविष्यति” असा गौरविला.
या यशामुळे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढला.
समाजसेवेचा विस्तार
यानंतर देआई प्रतिष्ठानने सामाजिक कार्याची व्याप्ती सातत्याने वाढवली.
विविध आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. मोफत सर्वरोग निदान, मोफत चष्मे वाटप, फळझाडांचे वितरण, शालेय विद्यार्थ्यांना संगणक, वह्या, गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप असे अनेक उपक्रम राबविण्यात आले.
स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त गावातील शाळांमधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाची परंपरा सुरू झाली. कीर्तन, प्रवचन, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे कार्यही सातत्याने सुरू राहिले.
गावातील लग्नसमारंभ, धार्मिक विधी आणि सामुदायिक कार्यक्रमांसाठी आवश्यक असलेली भांडी उपलब्ध नसल्याचे लक्षात आल्यानंतर प्रतिष्ठानने त्यासाठी स्वतंत्र भांडार उभारण्याचा निर्णय घेतला.
दत्ता आंबेकर आणि श्री मनीष हुरसाळे यांनी मुंबईतील विविध बाजारपेठांचा अभ्यास करून आवश्यक ती सर्व भांडी खरेदी केली. त्यामुळे आज वस्तीतील कोणत्याही सामुदायिक कार्यक्रमासाठी भांड्यांची अडचण राहत नाही.
ही छोटी वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात गावाच्या सामूहिक जीवनाला मोठी मदत करणारी ठरली.
माझ्या आठवणीतील दत्ता आंबेकर
दत्ता आंबेकर माझ्यापेक्षा काही वर्षांनी मोठे आहेत. लहानपणापासून त्यांच्यातील माणुसकी अनुभवण्याची संधी मला मिळाली.
डेहणे येथे झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेनंतर आम्ही सर्व विद्यार्थी पायी घरी निघालो होतो. त्या वेळी मी दुसरी इयत्तेत होतो. रस्त्यात पडल्यामुळे माझ्या पायाला गंभीर खरचटले होते आणि रक्तही येत होते.
लहान वयामुळे चालणेही कठीण झाले होते.
अशा वेळी दत्ता आंबेकर यांनी कोणताही विचार न करता मला वांजळ्यापासून मंदोशीपर्यंत उचलून आणले.
आजही तो प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर ताजा आहे.
त्या दिवशी मला जाणवले की, दुसऱ्याच्या वेदना स्वतःच्या मानणारा माणूसच पुढे जाऊन समाजाचा खरा आधार बनतो.
संघर्षातून उभे राहिलेले आयुष्य
मुंबईत गेल्यानंतर सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होता. अनेक छोटी-मोठी कामे करून त्यांनी आयुष्याचा संघर्ष केला. आर्थिक परिस्थिती इतकी कठीण होती की स्वतःसाठी कपडे घेण्याइतकेही पैसे अनेकदा उपलब्ध नसत.
मात्र त्यांनी कधीही हार मानली नाही.
त्यांच्या प्रामाणिकपणाला आणि परिश्रमाला अखेर यश मिळाले. द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (GIC) त्यांची निवड झाली आणि त्यांच्या आयुष्याला स्थैर्य प्राप्त झाले.
परंतु आर्थिक प्रगती झाली म्हणून त्यांनी गाव विसरले नाही. उलट गावासाठी काम करण्याची त्यांची तळमळ अधिक वाढत गेली.
एक अविस्मरणीय भेट
गावातील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आम्ही मुंबईत देणग्या गोळा करण्यासाठी गेलो होतो. त्या दिवशी सर्व ग्रामस्थांची बैठक संपल्यानंतर दत्ता आंबेकर यांनी सर्वांना आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले.
मी पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेलो होतो.
जेवणासाठी बसल्यावर त्यांच्या पत्नीने मला हसत विचारले,
“रामदास, कसा आहेस?”
मी क्षणभर आश्चर्यचकित झालो. कारण आमची ओळख असल्याचे मला आठवत नव्हते.
नंतर त्यांनी सांगितले की आम्ही शालेय जीवनात पाचवी ते सातवीपर्यंत एकाच वर्गात शिकत होतो. इतकेच नव्हे, तर त्या माझ्या पत्नीच्या नात्यातीलही निघाल्या.
तो योगायोग आजही स्मरणात आहे.
दत्ता आंबेकर यांचे कार्य पाहिले की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. समाजपरिवर्तनासाठी मोठी पदे किंवा अफाट संपत्ती आवश्यक नसते; आवश्यक असते ती चांगला विचार, प्रामाणिक नेतृत्व आणि लोकांना एकत्र आणण्याची क्षमता.
देआई मंदिराचा जीर्णोद्धार हा केवळ एका मंदिराचा पुनर्जन्म नव्हता; तो मंदोशी गावातील सामाजिक ऐक्य, परस्पर विश्वास आणि सामूहिक जबाबदारीचा पुनर्जन्म होता.
आजही दत्ता आंबेकर गावातील प्रत्येक सुख-दुःखात धावून येतात. त्यांच्या कार्याचा लाभ अनेकांना झाला आहे. त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे की, “समाजासाठी जगणाऱ्या माणसाचे नाव काळाच्या ओघातही जिवंत राहते.”
दत्ता आंबेकर यांच्यासारखी माणसे कोणत्याही गावाची खरी संपत्ती असतात. त्यांच्या कार्याची नोंद पुढील पिढ्यांसाठी जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)


Leave a Reply