नवीन लेखन...

माझी स्वतःची खरी भूतकथा (संक्षिप्त रूपांतरीत कथा ६)

ज्या जगांत पुस्तके, चित्रे, दुकानांच्या खिडक्या आहेत आणि वेळ घालवणारे खूप लोक आहेत तिथे बेसंट नावाचा लेखक लोकांच्या गोष्टी लिहितो.
त्याने भूतांबद्दलही खूप लिहिलेय पण चेष्टेने लिहिलंय.
भूत, विशेषत: इंडीयन भूत हे चेष्टेवारी नेण्याचा विषय नाही.
तिथे भूते रस्त्यात दडलेली असतात आणि वाटसरूंच्या अंगावर उडी घेतात.
तरूणपणी मेलेल्या बायकांची भूते तुम्हांला खुणावतात पण त्याला उत्तर देणं म्हणजे मरण.
त्यांची पावले उलटी असतात.
विहिरीत टाकलेल्या लहान मुलांची भुते कुणाही बाईच्या हाताला धरून घरी येऊ पहातात.
पण ही भुतं कधी गोऱ्या साहेबांवर हल्ला करत नाहीत.
अशी अधिकृत बातमी तरी नाही.
मात्र अनेक (जिवंत) इंग्रजी भूतांनी इंग्रज आणि स्थानिक दोघांनाही घाबरवले आहे.
प्रत्येक गांवाचे स्वतःचे भूत असते.
सिमल्याला रस्त्यावर ओरडणाऱ्या बाईखेरीज दोन आहेत म्हणे.
मसूरीचा बंगला एका छान भुताने व्यापलाय तर लाहोरला एक गोरी बाई रात्री गस्त घालते.
डलहौसीला एका जुन्या अपघाताची घटना दरवर्षी परत घडते.
मूरीला एक विनोदी भूत आहे.
मियां मीर इथे अधिकाऱ्याच्या खोल्यांचे दरवाजे आपोआप उघडतात आणि कोणीही दिसत नसतांना भूत बसल्याने सोफे कुरकुरतात.

पेशावर आणि अलाहाबादचे बंगले कोणीही भाड्याने घेत नाहीत.
जुनी शहरे तर अशा भूतबंगल्यांनी भरलेली आहेत आणि भूतसेना यथेच्छ राजरस्त्यावरून फिरते.
कांही डाक बंगल्यांच्या आवारातच दफनभूमी आहे.
ह्या बंगल्यात रहाणं कठीण.
इथला खानसामा हा बंगल्याइतकाच प्राचीन असतो.
तो वेड्यासारखा बडबडतो किंवा सतत झोपतो.
त्याच्यावर रागावलांत तर तो सांगतो की एका तीस वर्षांपूर्वीच गेलेल्या गोऱ्या साहेबाकडे त्याने काम केलेलं असतं आणि संपूर्ण जिल्ह्यात त्याचा हात धरणारा कुणी नाही.
मग त्याचे पुटपुटणे, भांड्यांचा आवाज ऐकून तुम्हाला रागावल्याचा पश्चात्ताप होतो.
अशा डाकबंगल्यात भूत असण्याची फार शक्यता असते.
कांही वर्षापूर्वी मलाही डाकबंगल्यात रहावे लागे.
एकाच बंगल्यात मी कधी लागोपाठ तीन रात्र राहिलो नाही.
मी सरकारने बांधलेल्या लाल वीटांच्या घरात राहिलो, जिथे नोंदणी केलेले छान सामान आणि दाराशीच स्वागताला एखादा साप असे.
मी डाक बंगले बनवलेल्या जुन्या घरांतही राहिलो, जिथे कांहीच धड नसे.
दुय्यम प्रतीच्या महालांत राहिलो जिथे वारा अस्वस्थ करणारे आवाज करत असे.
कांही ठिकाणी माझ्या आधी दीड दोन वर्षे तिथे कुणी राहिलेलं नसे.
मला नशिबाने सर्व प्रकारचे लोक, म्हणजे ख्रिश्चन धर्मगुरू, ब्रिटीश सेना सोडून पळणारे, दारू पिऊन बाटल्या दुसऱ्याच्या अंगावर फेकणारे, पहायला मिळाले.
डाक बंगल्यात घडणाऱ्या गोष्टी पाहून मला अजून भुत कसं दिसलं नव्हतं हे आश्चर्यच.
डाक बंगल्यात स्वत:हून येणारे भूत वेडंच म्हणायचं.
पण जुन्या डाक बंगल्यांतून इतक्या लोकांचे इतके
विविध तऱ्हेने मृत्यू झालेत की वेडी भूतही असणारच.

यथावकाश मला माझं भुत किंवा भुतं भेटली.
आतापर्यंत मी लेखक बेसंट यांना पाठींबा देत होतो पण आता विरोध करतो.
आपण त्या बंगल्याला ‘खटमल’ बंगला म्हणू.
ज्याची कातडी नरम आहे त्याला डाक बंगल्यात रहायचा अधिकार नाही.
त्याने लग्न करावं.
तो बंगला जुना, घाणेरडा, दुरूस्ती न केलेला होता.
भिंती खराब होत्या, खिडक्या काळ्या पडलेल्या होत्या.
तिथे आसपास बरेच कचेरीतले मामुली अधिकारी, अर्थखात्यापासून ते जंगल खात्यापर्यंतचे, रहात पण कुणी गोरा साहेब नव्हता.
वयाच्या दुप्पट वांकलेल्या खानसाम्याने हे मला सांगितलं.
जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा वारा आणि पाऊस होता आणि बाहेरच्या पामच्या झाडांचा हाडे आपटावीत तसा आवाज येत होता.
माझं आगमन खानसाम्याला आवडलं नसावं.
त्याने पंचवीस वर्षांपूर्वी एका साहेबाची सेवा केली होती.
मी ओळखत होतो का त्या साहेबाला ?
साहेबाचा जुन्या चौकटीतला फोटो बघून मला एका जुन्या प्रसिध्द साहेबाची आठवण झाली आणि मीही जुनाट वाटायला लागलो.

दिवस संपायला आला तसा खानसामा जेवण आणायला गेला.
मी बंगल्यात फेरफटका मारला.
प्रत्येक पावलाचा आवाज तळमजल्यावर आणि भिंतीवरही आपटून परत येत होता.
तिथे लागून तीन खोल्या होत्या.
एकातून दुसऱ्यांत जायला दरवाजे होते पण ते बंद होते.
घरांत फक्त मेणबत्त्या होत्या.
मोरीमध्ये तेलाची चिमणी होती.
मी आतापर्यंत राहिलेल्यात सर्वांत खराब बंगला होता तो.
शेकोटी नव्हतीच.
खिडक्या धड उघडत नव्हत्या.
बाहेर कोल्हेकुई ऐकू येत होती.
तरस विचित्र आवाजात ओरडत होता.
त्या आवाजांनी मृताच्या पुनरूत्थानाची खात्री एखाद्या नास्तिकालाही पटली असती.
मग माझं जेवण आलं.
मी जेवत होतो आणि मागे उभा राहून खानसामा मृत गोऱ्या साहेबांच्या गोष्टी सांगत होता.

झोप येणं सोपं नव्हतं.
मोरीतली तेलाची चिमणी वेगवेगळ्या छाया भिंतीवर पाडत होती.
जेव्हां विचार बंद होऊन झोप लागत होती, तेव्हा माझ्या कानावर डोली वहाणाऱ्या भोयांचे शब्द आले, “चला, वर.”
प्रथम एक डोली आली.
मग दुसरी, मग तिसरी.
तिन्ही डोल्या तळमजल्यावर आपटल्याचा आवाज आला.
मी म्हणालो, “ कोण आहे ?”
पण कोणी उत्तर दिलं नाही.
मग बाजूचं दार उघडल्याचा आवाज आला.
कुणी मामुली अधिकारी बरोबर दोन मित्र घेऊन आला असावा.
आता रात्रभर बोलत बसतील.
पण ना पावलांचे आवाज आले न बोलण्याचे.
मला बरं वाटलं पण मग डोल्या कुठे गेल्या ?
खिडकीच्या कांचेतून बाहेर पाहिले.
डोल्या कुठे दिसल्या नाहीत.
मी परत झोंपत होतो, तेवढ्यात शेजारच्या खोलीतून ओळखीचा आवाज आला.
‘व्हर्र,’ अगदी बिलीयर्डसच्या चेंडूचा आवाज. नक्कीच.

मग बिलीयर्डसच्या चेंडूचे आवाज खेळ चालू असल्यासारखे येतच राहिले.
माझ्या अंगावरचे केस भितीने ताठ झाले, कपाळावर घाम जाणवू लागला.
‘व्हर्र’ आणि ‘क्लीक-क्लीक’ आवाज फक्त बिलीयर्डस खेळतानाच होतात.
त्या खोलीत मगाशी पाहिलेली खुर्ची, पलंग आणि टेबल ह्यापासून तर असा आवाज येणं अशक्य.
पुन्हा पुन्हा ते आवाज ऐकून मला खात्री पटली की हे आवाज बिलीयर्डचेच आहेत.
मला माझं भुत सापडलं.
त्या खोलीपासून दूर पळून जावेसे वाटू लागले.
नक्की बिलीयर्डचा खेळ चालू होता.
पुढची खोली लहान होती.
बिलीयर्ड टेबल त्यांत कसे मावणार ?
हीच भुताटकी.
मी आवाजांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला.
पण जमेना.
भिती, साधीसुधी नव्हे तर जी गोष्ट तुम्ही पाहू शकत नाही तिची.
घसा कोरडा पाडणारी, गात्रे गोठवणारी.
डाक बंगल्यांची प्रसिध्दीच अशी आहे की अशा गोष्टी तिथे शक्य वाटतात.
डाक बंगल्यात नेहमी रहावं लागणाऱ्या एखाद्याला तुम्ही सांगितलंत की पुढल्या खोलीत प्रेत पडलयं, त्याच्या पुढल्या खोलीत एक वेडी आहे आणि त्याच्या पुढल्या खोलीतील बाई आणि पुरूष उंटावरून आता पळाले नी एव्हांना साठ मैलावर पोहोचले तरी त्याला आश्चर्य वाटणार नाही.
ही प्रसिध्दी दुर्दैवाने भुतांपर्यंत जाते.
एखादा तर्कनिष्ठ माणूस कूस बदलून झोपला असता.
पण मी नाही तसं करू शकलो.

मला त्या बिलियर्डसच्या फटक्यांच्या आवाजांची खात्री झाली आणि विचार मनांत आला त्यांना मार्क लिहिण्यासाठी माणूस हवा झाला आणि मला बोलावले तर ?
खरं तर ही भिती चुकीची होती.
काळोखात खेळू शकणाऱ्यांना मार्क लिहायला कोण कशाला हवा ?
ती माझ्या मनांतली भिती होती.
खूप वेळानंतर खेळ थांबला.
दार आपटल्याचा आवाज आला.
मी झोंपलो कारण मी खूप दमलो होतो.
नाहीतर मी जागाच राहिलो असतो पण मला आशियातली कितीही संपत्ति देऊ केली असती तरी मी त्या खोलींत डोकावलो नसतो.
सकाळ झाल्यावर मी विचार केला की मी शहाणपणाच केला.
मी तिथून निघून जाण्याच्या मार्गाची चौकशी केली आणि खानसाम्याला विचारले, “काय रे, रात्री त्या तीन डोल्या इथे कशाला आल्या होत्या ?
तो पुटपुटला, “डोल्या नव्हत्या आल्या.”
मी बाजूच्या खोलीत गेलो.
उघड्या दारातून सुर्यप्रकाश येत होता.
आता उजेडात मी धीट झालो होतो.
तिथे कोण असेल त्याच्याशी बिलीयर्ड खेळायला तयार होतो.
मी खानसाम्याला विचारले, “हा बंगला नेहमीच डाक बंगला म्हणून वापरता कां ?”
तो म्हणाला, “नाही साहेब. मला नक्की किती वर्षे झाली आठवत नाही.
पण पंधरा वीस वर्षांपूर्वी ही खोली बिलीयर्डस खेळायला वापरत.”
मी ओरडलो, “काय ?”
“बिलियर्डची खोली, साहेब.”

खानसामा पुढे बोलू लागला, “त्यावेळी रेल्वे बनवणारे साहेब लोक इथून दहा-पंधरा मिनिटावर असणाऱ्या बंगल्यात रहात.
मी पायवाटेने इथे येत असे.
बाजूच्या तीनही खोल्यांची एकच खोली होती.
त्यांत बिलीयर्डचे मोठे टेबल होते.
साहेब लोक रोज संध्याकाळी बिलीयर्ड खेळत.
ते साहेब आतां नाहीत.
पण रेल्वे काबुलपर्यंत जाते, असं म्हणतात.”
मी विचारले, “साहेबांविषयी आणखी काय माहिती आहे तुला ?”
तो म्हणाला, “खूप वर्षे झाली.
एक साहेब खूप जाडे आणि रागीट होते.
ते खेळताना म्हणाले, “मंगल खान, ब्रँडी-पाणी दे मला.”
मी ग्लास भरून दिला.
ते टेबलावर खेळायला वांकले आणि त्यांचे डोके खाली खाली येऊ लागले.
मग ते टेबलावर आपटले, त्यांचा चष्मा उडाला.
मी आणि बाकीचे साहेब त्यांना सावरायला धावलो पण ते मृत्यू पावले होते.
ते खूप सशक्त होते पण गेले आणि मी मंगल खान अजून तुमच्या कृपेने जगतोय.”
ही माहिती मला पुरेशी होती.
मला माझे, मी अनुभवलेले, अधिकृत भुत सापडले होते.
आता मी ह्यावर लेख लिहून परामानस शास्त्राच्या संस्थेच्या मासिकाला पाठवीन.
माझ्या बातमीने साम्राज्य हादरेल.
पण त्या आधी रात्र होण्यापूर्वीच ह्या जागेपासून ८० मैल तरी दूर जायला हवं.
संस्था हवं तर त्यांचा माणूस पाठवेल तपासाला.

मी माझ्या खोलीत गेलो आणि हकीकतीचे मुद्दे लिहून ठेवून सामानाची बांधाबांध करायचे ठरवले.
मला परत अचानक बिलीयर्डच्या चेंडूचा “व्हर्र” कानावर आला आणि खेळ पुन्हा चालू झाला.
दार उघडंच होतं आणि मी खोलीत पाहू शकत होतो.
‘क्लीक-क्लीक’ परत आवाज आला.
मी न भितां खोलीत गेलो.
कारण आत भरपूर उजेड होता.
खेळणारे दिसत नव्हते पण खेळ जोराजोरात चालू होता.
हं ! तसंच कारण होतं त्याला.
खोलीच्या वरच्या छताच्या मळकट कापडावर एक अस्वस्थ उंदीर इकडून तिकडे ‘व्हर्र’ आवाज करत फिरत होता आणि त्याच वेळी एका खिडकीचा जरा सैल दरवाजा वाऱ्याने आपटून जागच्या जागी क्लीक-क्लीक आवाज करत होता.
हा आवाज बिलीयर्डचे चेंडू आपटल्यासारखा वाटला ?
आणि उंदराच्या फिरण्याचा व्हर्र आवाज टेबलावर घासणाऱ्या चेंडूचा वाटला ? अशक्य !
पण मला तो तसा वाटला होता.
खरं समजल्याने उघडलेले डोळे मी मिटले आणि माझ्या लक्षांत आले आवाज अगदी बिलीयर्डचा खेळ चालू असल्यासारखाच येत होते.

माझा मदतनीस कादर बक्ष आत आला आणि म्हणाला, “हा बंगला अगदी खराब आहे.
दयाळू साहेबांना झोप नीट लागली नसेल तर नवल नाही.
मी काल बाहेर झोपलो होतो आणि डोल्या वहाणाऱ्या भोयांच्या तीन जोड्या आल्या.
ते म्हणाले, ‘इथल्या साहेब लोकांच्या खोल्यात झोपायची त्यांची रीत आहे.’
मी त्यांना हांकलले.
दयाळू साहेबांना उगीचच त्रास झाला.
खानसाम्याची बेइमानी.”
कादर बक्षने हे सांगितले नाही की त्याने त्या भोयांकडून पूर्वीच दोन दोन आणे भाडं घेतलं होतं आणि मोठ्या छत्रीने मारून घालवलं होतं.
कादर बक्षला नीतीमत्तेशी देणंघेणं नव्हतं.
मी खानसाम्याशी बोललो तेव्हां त्याचे तर डोकच फिरलं, मग तो खूप बोलत राहिला.
बोलण्याच्या नादांत गोऱ्या साहेबाचा मृत्यू पाहिल्याची घटना त्याने तीनदा सांगितली पण तीन वेगळ्या, खूप दूर असणाऱ्या गावांची नावे घेऊन.
तिसऱ्यांदा तर कलकत्ता म्हणाला आणि त्या गोऱ्या साहेबाचा मृत्यू कुत्र्यांची गाडी हांकताना झाल्याचे सांगितले.
मी उत्तेजन दिले असते तर खानसामा त्या गोऱ्या साहेबाचे प्रेत घेऊन संपूर्ण बंगालभर फिरला असता.
मी त्या दिवशीच निघण्याचा बेत रहित केला.
रात्री तोच व्हर्र आणि क्लीक-क्लीक आवाज कानावर त्याच तालांत बराच वेळ येत होता.
मग वारा थांबला आणि क्लीक-क्लीक बंद होऊन खेळही थांबला.
मी माझ्या हाती लागलेल्या खऱ्या भूताची गोष्ट घालवून बसलो होतो.
मी जरा आधीच तिथून निघून गेलो नाही याचंच वाईट वाटत होतं.

— अरविंद खानोलकर.

माय ओन ट्रू घोस्ट स्टोरी.

मूळ लेखक – रूडयार्ड किपलिंग (१८६५-१९३६)

1 Comment on माझी स्वतःची खरी भूतकथा (संक्षिप्त रूपांतरीत कथा ६)

  1. मूळ इंग्रजी कथा मी वाचली असल्यामुळे तुम्ही केलेला संक्षेप पर्याप्त वाटला. भाषा ओघवती असल्याने शेवटपर्यंत कुठेही कंटाळवाणी होत नाही. मला हे रूपान्तर आवडले.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..