नवीन लेखन...

कळपातले डायनोसॉर

सजीवांच्या उत्क्रांतीत डायनोसॉर या सरीसृपांचं महत्त्व मोठं आहे. पृथ्वीवर सस्तन प्राण्यांचं राज्य येण्याच्या अगोदर, तब्बल अठरा कोटी वर्षं या डायनोसॉरनी पृथ्वीवर राज्य केलं. त्यामुळे संशोधकांना डायनोसॉरबद्दल प्राणिशास्त्राच्या दृष्टीनं उत्सुकता तर आहेच, परंतु त्यांना या प्राण्यांंच्या सामाजिक जीवनाबद्दलही कुतूहल आहे. संशोधकांना पडलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न म्हणजे – ‘हे डायनोसॉर एकएकटे वावरायचे की कळपात वावरायचे? कळपात वावरत असल्यास ते केव्हापासून कळपात वावरू लागले?’. डायनोसॉर हे एकत्र वावरत असल्याबद्दलचे जरी काही पुरावे उपलब्ध असले, तरी ते अपुरे आहेत. कारण, या प्रश्नांचं निश्चित उत्तर मिळण्यासाठी अनेक डायनोसॉरचे अवशेष एकाच ठिकाणी सापडायला हवेत आणि तेसुद्धा अभ्यासता येतील इतक्या सुस्थितीत.

मात्र असा एक भक्कम पुरावा आता अर्जेंटिनामध्ये सापडला आहे. तोही तब्बल एकोणीस कोटी वर्षांपूर्वीचा! आतापर्यंत सापडलेल्या अशा सर्वांत जुन्या पुराव्यापेक्षा हा पुरावा चार कोटी वर्षं अगोदरच्या काळातला आहे. हा पुरावा म्हणजे डायनोसॉरची एक वसाहतच आहे. अर्जेंटिनातील ट्रेल्यू येथील पुरातत्त्व संग्रहालयातील दिएगो पॉल आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना गेल्या दोन दशकांच्या अथक परिश्रमांतून या वसाहतीचा शोध लागला आहे. या संशोधनादरम्यान, या संशोधकांनी सुमारे एक चौरस किलोमीटरचा प्रदेश अक्षरशः विंचरून काढला. दीर्घकाळ चाललेल्या या संशोधनातून निघालेले निष्कर्ष काही महिन्यांपूर्वी ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत. दिएगो पॉल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सापडलेले डायनोसॉरचे हे अवशेष, अगदी जुने अवशेष नाहीत. या अवशेषांच्या पाच कोटी वर्षं अगोदरच्या काळातल्या डायनोसॉरचे अवशेष पूर्वीच सापडले आहेत. परंतु डायनोसॉरचा इतका जुना कळप प्रथमच सापडला आहे. म्हणजे किमान एकोणीस कोटी वर्षांपूर्वीपासून तरी डायनोसॉर कळपात राहू लागले होते!

दिएगो पॉल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सापडलेले हे अवशेष ‘मुसॉरस पॅटॅगोनिकस’ या जातीच्या डायनोसॉरचे आहेत. हे डायनोसॉर अवजड शरीराचे आणि लांब मानेचे डायनोसॉर होते. शाकाहारी असणाऱ्या या डायनोसॉरची पूर्ण वाढीनंतरची लांबी सुमारे सहा मीटर इतकी होती, तर त्यांचं वजन दीड टनाच्या आसपास होतं. म्हणजे आजच्या पाणघोड्याइतकं. या डायनोसॉरचं वास्तव्य मुख्यतः दक्षिण अर्जेंटिनामधील पॅटॅगोनिआच्या परिसरात होतं. दिएगो पॉल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, हे सर्व अवशेष याच भागातील जमिनीत, सुमारे तीन मीटर जाडीच्या मातीच्या थरात सापडले आहेत. जन्मल्यानंतर पहिल्या वर्षी या डायनॉसॉरची पिल्लं चार पायांवर चालत असल्याचं, दिएगो पॉल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या अवशेषांच्या अभ्यासावरून दिसून आलं आहे. कालांतरानं या प्राण्यांच्या शारीरिक ठेवणीत काहीसा बदल होऊन, हे प्राणी दोन पायांवर चालायला सुरुवात करीत. मुसॉरस पॅटॅगोनिकसबद्दलची ही सर्व माहिती महत्त्वाची आहे. कारण सुरुवातीच्या काळातले डायनोसॉर हे आकारानं कुत्र्याएवढे लहान होते. त्यानंतर उत्क्रांतीद्वारे हे प्राणी आकारानं मोठे होत जाऊन अखेर, त्यांचे आकार तीस-पस्तीस मीटरपर्यंत पोचले आणि वजन साठ-सत्तर टनांपर्यंत पोचलं. एकोणीस कोटी वर्षांपूर्वीच्या, पाणघोड्याएवढं वजन असणाऱ्या या मुसॉरस पॅटॅगोनिकसची निर्मिती म्हणजे डायनोसॉरच्या या उत्क्रांतीतील एक मधली पायरी असावी.

दिएगो पॉल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या वसाहतीत, डायनोसॉरची शंभराहून अधिक अंडी आणि ऐंशी डायनोसॉरची हाडं सापडली आहेत. अंड्यांपासून ते प्रौढ वयापर्यंतच्या सहा टप्प्यांतल्या अवशेषांचा यात समावेश आहे. इथे सापडलेली अंडी ही थोड्याथोड्या अंतरावरील घरट्यांत विखुरली आहेत. या घरट्यांतल्या अंड्यांची संख्या आठपासून तीसपर्यंत अशी वेगवेगळी आहे. दिएगो पॉल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी क्ष-किरणांच्या साहाय्यानं या अंड्यांचा अंतर्भाग अभ्यासला. या अंड्यांत हाडं विसकित झालेल्या पिल्लांचे अवशेष त्यांना सापडले. मुख्य म्हणजे अंड्यातले हे सर्व अवशेषसुद्धा ‘मुसॉरस पॅटॅगोनिकस’ या जातीचेच होते. यावरून हे ठिकाण म्हणजे मुसॉरस पॅटॅगोनिकस या डायनोसॉरची, अंडी घालण्यासाठी वापरली जाणारी जागा असल्याचं स्पष्ट होतं.

या परिसरात सापडलेल्या या सर्व डायनोसॉरच्या अवशेषांवरून, हे डायनोसॉर वयानुरूप विभागलेल्या गटांत वावरत असल्याचं दिसून येतं. डायनोसॉरच्या हाडांचं स्वरूप हे, यातला एक गट हा छोट्या डायनोसॉरचा असल्याचं दर्शवतं. या गटात एक वर्षापेक्षा कमी वयाच्या अकरा डोयनोसॉरचा समावेश होता. अवशेषांच्या अभ्यासावरून, या गटातल्या प्रत्येक डायनोसॉरचं वजन दहा किलोग्रॅमच्या आसपास असल्याचा अंदाज या संशोधकांनी, व्यक्त केला आहे. डायनोसॉरचा दुसरा गट हा थोड्या मोठ्या वयाच्या डायनोसॉरचा होता. या गटातल्या प्रत्येक डायनोसॉरचं वजन शंभर किलोग्रॅमच्या आसपास असावं. गटांत वावरणाऱ्या या डायनोसॉरव्यतिरिक्त, या वसाहतींत काही प्रौढ डायनोसॉर एकटे वा जोडीने वावरत असल्याचंही या अवशेषांवरून दिसून आलं.

वेगवेगळ्या वयाच्या डायनोसॉरचं हे एकत्र राहणं, संशोधकांना अतिशय महत्त्वाचं वाटतं. डायनोसॉरचे हे सर्व अवशेष एकमेकांपासून जवळच्याच अंतरावर सापडले आहेत. डायनोसॉरच्या दोन्ही गटांतलं अंतर तर फक्त पन्नास मीटरचं आहे. हे सर्व पुरावे डायनोसॉर हे कळपात राहणारे प्राणी असल्याचं दर्शवतात. दिएगो पॉल आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते, इथे सापडलेले सर्व डायनोसॉर हे एकाच कळपाचा भाग आहेत. मात्र एकाच कळपात असूनही, बालवयातील डायनोसॉरचे वयानुसार वेगळे गट तयार झाले होते. बालवयात हे डायनोसॉर जरी गटानुसार राहात असले, तरी प्रौढ झाल्यानंतर ते थोडेफार स्वतंत्र होत असावेत. परंतु स्वतंत्र झाले तरी, ते एकाच कळपाचे सभासद म्हणून राहात होते.

या सर्व डायनोसॉरना एकाच काळात मृत्यू आला असावा. इथल्या मातीत दुष्काळाच्या खुणा आढळतात. या दुष्काळामुळे त्यांना मृत्यू येऊन कालांतरानं त्यांवर माती जमा झाली असावी. परंतु, यातील अकरा छोट्या डायनोसॉरचा गट हा अचानकपणे मातीच्या थराखाली गाडला गेल्यासारखाही दिसतो आहे. या डायनोसॉरची हाडं एकमेकांत अडकली आहेत. अशीही शक्यता आहे की, इथे अचानक पूर येऊन या डायनोसॉरना मृत्यू आला असावा किंवा धुळीचं तीव्र वादळ होऊन, त्याखाली हे डायनोसॉर गाडले गेले असावेत. या ठिकाणच्या मातीत ज्वालामुखीतली राखही सापडली आहे. या दुर्घटनेच्या सुमारासच जवळपासच्या एखाद्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असावा व त्यातून उत्सर्जित झालेली राख या डायनोसॉरना गाडणाऱ्या मातीवर जमा झाली असावी.

दिएगो पॉल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, या डायनोसॉरना कळपात वावरण्याची आवश्यकता का भासली असावी, यामागचं कारण शोधण्याचाही प्रयत्न केला आहे. पूर्ण वाढ झालेल्या मुसॉरस पॅटॅगोनिकसचं वजन जरी एका पाणघोड्याइतकं असलं, तरी त्यांची अंडी मात्र अगदी लहान – जवळपास कोंबडीच्या अंड्यांइतक्या – आकाराची होती. पूर्ण वाढ होण्यासाठी या डायनोसॉरना मोठ्या आहाराची गरज असायची. परंतु या वाढीदरम्यानच्या काळात हे अन्न मिळवताना, त्यांच्या शरीराचा आकार मात्र स्वतःचं संरक्षण करण्यासाठी पुरेसा नव्हता. त्यामुळेच या लहान वयाच्या डायनोसॉरना प्रौढ वयातील डायनोसॉरचं संरक्षण घेण्याची गरज भासत असावी व त्यासाठी या सर्व डायनोसॉरना कळपात वावरणं हे सोयीचं वाटत असावं. किंबहुना डायनोसॉरचं असं कळपात राहणं, उत्क्रांतीद्वारे डायनोसॉरचा आकार वाढू लागल्यापासूनच सुरू झालं असावं… अगदी बावीस-तेवीस कोटी वर्षांपूर्वी. आणि त्यांच्या या कळपात राहण्यानंच ते इतर प्राण्यांच्या तुलनेत बलिष्ठ होऊन, त्यानंतर कित्येक कोटी वर्षं ते पृथ्वीवर निर्धोकपणे वावरू शकले असावेत!

— डॉ. राजीव चिटणीस. 

छायाचित्र सौजन्य: Jorge Gonzalez, Diego Pol.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..