नवीन लेखन...

माझे आजोळ – भाग ३- आजोबांची कामे (आठवणींची मिसळ ३१)

आजी ८९ वर्षे सासरी कोल्हापूरांत होती. एवढ्या वर्षात ती एकदाच कोल्हापूरांतून बाहेर पडली. ती आजोबांबरोबर काशी-रामेश्वर यांची यात्रा करण्यासाठी. त्याच वेळी ती मुंबईला येऊन गेली. ए-हवी ती माहेरीही गेली नाही. तिच्या बहिणीचा म्हणजे मावशीआजीचा मी पहिल्याच भागांत उल्लेख केला होता. आजीचा भाऊही कांही काळ कोल्हापूरच्या घरी उपचारांसाठी होता. पण तो त्या आजारांत तीशी-पस्तीशीतच गेला. आजीचे माहेरचे आडनांव नाईक. आजीचा हा भाऊ उत्तम शिक्षक होता, हे मला फार उशीरा कळले. एका दिवाळी अंकात कुसुमाग्रजांचा (वि.वा.शिरवाडकर) एक लेख आला होता. तो त्यांनी आपल्याला इंग्रजी शिकविणा-या नाईक सरांबद्दल लिहिला होता. कुसुमाग्रजांनी त्यांचे इंग्रजी, त्यांचे इंग्रजी कविता शिकविण्याचे कौशल्य, विद्यार्थ्यांना इंग्रजीची आवड निर्माण करणे, इ. उल्लेख अत्यंत आदराने केला होता. पण ते सर नंतर कुठे गेले, हे त्यांना माहित नव्हतं. ते नाईक सर म्हणजेच हा आजीचा भाऊ. त्याला त्याकाळी असाध्य असणारा आजार झाल्यामुळे तो पुन्हां कोकणात आणि कोल्हापूरास आला. पण उपचारांचा उपयोग झाला नाही.

मधल्या चौकांतच छोटा गोठा होता. दोन म्हशी आणि एक गाय. रोज गवळी येऊन म्हशींना चरायला माळावर नेत असे. गाय मात्र मोकळी सोडली जायची. ती परंपरागत कोल्हापूरचे रस्ते अडविण्याचं काम करायची. गवळी सकाळी तिला सोडून देई. गाय मजबूत होती. शिंग छान होती. दिवसभर ती गांवात भटके. संध्याकाळी तिला कोणीतरी हूडकून परत आणत असे. तिला कसे व कुठे कुठे शोधायचे, ते पुढल्या लेखांत येईलच. तिला कधीच बछडं झालं नाही. वांझ असली तरी ती आजीची फार लाडकी होती. भाक-यांचा वास आला की स्वयंपाकघराच्या खिडकीला शिंगानी धडका मारी. मग आजी तिला प्रेमाने “रांxx” म्हणून शिवी देई आणि भाकरी नेऊन स्वतःच्या हातांने तिला देई. तिथल्या दोन म्हशी भरपूर दूध देत. आजोबा त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेत. बाजारांतून भरपूर कडबा आणत. तो स्वतःच्या हातांनी कोयत्याने तोडून तुकडे करत. कडबा आणि गवत ह्याबरोबरच आंबोणही एका वेगळ्या तपेल्यांत तयार करत. ए-हवी वाया जाणा-या फळांच्या साली वगैरे आंबोणाला कामी येत.

त्यामुळे घरांत दुधदुभत्याची लयलूट असे. चहाही दुधाचाच असे. मला जाड साय (खरवडणी) खायला आवडे, इतरांना आवडत नसे. आजी सायीने लगडलेले दोन-तीन मोठे ॲल्युमिनीयमचे टोपच माझ्यापुढे ठेवी. दुधदुभत्यासाठी एक वेगळी खोलीच होती. त्यांत दही, लोणी, ताक ह्यांनी भरलेली भांडी असत. त्या खोलीत एक ताकाचा डेरा होता. त्यांत चार फूट उंचीची रवी आणि तिच्याभोवती जाडसर दोरखंड. दोन हातात दोराची दोन टोकं धरून ताक घुसळण्याचं काम मुलांनाही आळीपाळीने करावे लागे. त्याला २५-३० मिनिटे लागत. ते काम करणा-याला वेगळा व्यायाम करायची गरज नसे. सुट्टीत गेल्यावर मीही ते काम करत असे.

त्यापैकी सर्वात मागच्या मोठ्या, दुधदुभत्याच्या बाजूच्या मोठ्या खोलीमधे जेवणाच्या पंगती बसत. साधारणपणे मुलांची एक, मोठ्यांची एक आणि बायकांची एक अशा प्रत्येकी पंचवीस-तीस जणांच्या तीन पंगती म्हणजे ७५-८० जणांचे भोजन होत असे. जेवणांत पेलाभर ताक असेच. आजोबांचा जर्मन सिल्व्हरचा मोठा मग असे. शेवटी ताक पीऊन झाले की आजोबा तिथे मोठ्याने जोsब करून ढेकर देत. त्याचा आवाज स्वयंपाकघरात पोहोचे. पु.ल. म्हणतात तशी तो ढेकर ही आजीला पावतीच असायची. एरव्ही अमुक वस्तु छान झाली आहे असं म्हणायची पध्दत नव्हती. तसंच जेवणाला नांवेही ठेवत नसत. माझ्या एका मावशीने लिहिलेला ह्या पंगतींच साग्रसंगीत वर्णन करणारा लेख महाराष्ट्र टाईम्समधे कांही वर्षांपूर्वी आला होता.

पूर्वीच्या समजुतीप्रमाणे दिवेलागणीच्या वेळी लक्ष्मी घरी येते असे मानत. त्यावेळी घराचा पुढचा दरवाजा बंद असून कसे चालेल? संध्याकाळी तो सताड उघडा ठेवण्यात येई. व आम्हाला तिथे राखण करायला बसवण्यात येई. मग दिवे लागून थोडा वेळ झाला की आम्ही माजघरांत खेळायला मोकळे होत असू. गाणी, कविता यांच्या भेंड्या, गप्पागोष्टी करताकरता रात्रीच्या जेवणाची वेळ होई. जेवणाचे पाट मांडणे, ताटे वाटया आणि पेले पाटांशी मांडणे ही कामे मुलांनीच करायची असत. ताटे मांडण्याचा प्रोटोकॉल असे. पणजोबा असेस्तोवर पहिला पाट त्यांचा असे तर दुसरा आजोबांचा. मग तशाच क्रमाने इतरांचा. पुढे पुढे घरांतली संख्या कमी होत गेली तशी मुलांची वेगळी पंगत राहिली नाही.

घरातली बरीच कामे आजोबा स्वतः करीत व इतरांना करायला लावीत. हाही त्या शिक्षणाचा भाग होता. ताक करायचे काम मुलांनाच करावे लागे. मोठ्या डे-यात ताक करायला बराच वेळ लागे. आजी कींवा आई मधूनमधून लोणी आलं की नाही ते पाहून जाई. चांगला व्यायाम होई. जेव्हां घर भरलेले होते, तेव्हां सरपण खूप लागे. आजोबा सरपणाने भरलेल्या एक किंवा दोन गाड्या घेऊन येत. मग ते सर्व सरपण दुसऱ्या मजल्यावर सांठवलं जाई. सर्व मुलगे हातांतून पाच-सहा लाकडे मोळीसारखी हातात धरून दोन जिने चढून वर घेऊन जात. आजोबा ते सर्व स्वत:च्या हाताने रचत असत. मग गरजेप्रमाणे स्वयंपाकघरांत त्यातली लाकडे नेण्याचे काम बायका करीत.

गाई म्हशींच शेणही वाया जाऊ देत नसतं. ते फावड्याने ओढून बाजूला करून ठेवीत. दुस-या मजल्यावरही एक मजला होता. तिथे फक्त पत्र्याचा मोठा चौकोन होता. जिन्याने वर जाऊन तिथे त्या शेणाच्या शेणी थापून वाळत घालत. हे काम बहुदा बायका करत. त्या शेणींचा मुख्य वापर बंबासाठी होई. नारळ सोलले की त्याचे चोडण सुकवले जात. तेही बंबासाठी वापरत. प्रत्येकाला ताकीद असे की आंबे खाल्ले की साली आंबोणाच्या घमेल्यात आणि कोयी गोठ्याच्या पत्र्यावर टाकायच्या म्हणून. वाळलेल्या कोयी चौकात बसून हातोडीने फोडल्या की त्याची बरोबर दोन शकले होतं. आतून भरगच्च बी बाहेर पडे. ती गुरांना खायला पौष्टिक असे. फोडलेल्या बिया आंबोणात टाकायसाठी ठेवत. कोयी फोडण्याचे काम मुलांकडून करून घेत.

प्रत्येक मजल्यावर छोट्या मोकळ्या गच्च्या होत्या. तिथे फुलझाडे, वेली लावलेल्या होत्या. दोन्ही मजल्यावरच्या सर्व झाडांना पाणी घालणे हेही काम असे. नंतर परडीतून देवपूजेसाठी फुले गोळा करण्याचे काम असे. प्रत्येक झाडावर थोडी तरी फुले राहू द्यावीत, हे आम्हाला तिथेच त्या काळांत सांगितले गेले. घरी भुईमुगाच्या शेंगा पोत्यानी आल्या की स्वयंपाकघराच्या मागच्या खोलीत मोठा ढीग घालत. आठ दहा बायकामुले त्याभोवती त्या शेंगा सोलायला बसवत. मग शेंगदाणे भरून ठेवले जात. काजू साफ करणे, पापड लाटणे, इ. कामही अशीच सांघिकरित्या बायकामुलं तिथे करत. म्हशींच दूध काढण्याच कामही कांहीजण करत. पण बहुदा ते काम आजोबा किंवा आजी स्वतःच करीत. मी शिकायचा प्रयत्न केला पण विशेष प्रगती झाली नाही. तिथे रहाणारा माझा भाऊ कधी सांगितल्यास ते काम करत असे. गाई-म्हशींसाठी कडबा आणत तो कोयत्याने तोडून गुरांना खाता येईल असा कापण्याचे काम प्रत्येकाला शिकवत. किती तुकडे करावे. कोयत्याने तुकडे करतांना दाबून धरलेल्या हातावरच कोयता लागू नये म्हणून कशी काळजी घ्यावी, हे ही सांगत. माडावरून काढलेले नारळ सोलायलाही मला आजोबांनीच शिकवले.

तळमजला आणि पहिला मजला दोन्ही ठीकाणी एक एक न्हाणीघर होतं. माझ्या पहाण्यात पहिल्या मजल्यावरचं न्हाणीघर वापरात नव्हतं. तळमजल्यावरचं बरचं मोठं होतं. उजेड थोडा कमी होता. सकाळी पांचपासून मोठा बंब पेटलेला असे. सर्वांच्या आंघोळी होईपर्यंत तो पेटता ठेवण्याचे काम आळीपाळीने केले जाई. स्वयंपाकघरातून आजी लक्ष ठेवून असे. त्यांत कोळसे वापरत नसत. सरपणही वाया घालवत नसत. बहुदा शेणी, नारळाची चोडणं आणि कच-यांतला जळाऊ भागच त्यासाठी वापरला जाई. साधारणपणे एक दीड वाजेपर्यंत साडेबारा एक पर्यंत अंघोळी चालत. घरांतला वाईट भाग म्हणजे संडास. दोन संडास चौकाबाहेर एका टोकाला होते. एका संडासाला बोळाच्या बाजूला एक छोटी खिडकी होती. पण चार फूटावरच कोर्टाची भिंत असल्यामुळे तिथून उजेड कमीच येई. दुसरा संडास तर अंधारात बुडालेला असे. त्यांत दोन्हींची उंची बरीच होती. लहान असताना मला आंत पडण्याची भिती वाटत असे. शिवाय ते टोपल्यांचे संडास ही व्यवस्थाच चुकीची वाटायची.

तेंडोलकरांच्या वाड्यांत मिळालेल्या संस्कारांनी अनेकांचे आयुष्य घडले. आजोबा वायफळ खर्च करत नसत. परंतु जेव्हां जेव्हां एखाद्याला नोकरी नव्हती, शिकायचे होते त्याला त्याला त्यांनी दार सदैव उघडे ठेवले. अडचणीत असणा-या सर्वांना वेळोवेळी आधार दिला. तिथे जेवणाखाण्याची, अंथरूण-पांघरूणाची, जागेची ददात नव्हती. शिस्त जरूर पाळावी लागे पण ती तुम्हालाच कांही शिकवून जाई. कोण कोण तिथे घडले तें आणि इतर कांही माहिती आता चौथ्या भागांत सांगेन.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..