नवीन लेखन...

सुड्घेवू गवार ..वैरी लसूण… दावेदार मेथी (बेवड्याची डायरी – भाग – ३७ वा)

” चौथ्या पायरीत ‘ आत्मपरीक्षण ‘ करताना अनेकांना वाटेल की आम्हाला फक्त दारू सोडायची आहे त्यासाठी हे आत्मपरीक्षण वगैरेची अजिबात गरज नाही ..दारू पिणे सोडले तर माझ्यात काहीच दोष नाहीत ..आपले कुटुंबीय देखील अनेकदा आपल्याला म्हणाले असतील ‘ तू फक्त दारू सोड ..बाकी सगळे चांगलेच गुण आहेत तुझ्यात ‘ परंतु मित्रानो आपले कुटुंबीय हे आपण दारू सोडावी यासाठी म्हणत असतात ..त्यांना हे माहित नसते कि आपल्या स्वभावातील अनेक अश्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला पुन्हा पुन्हा व्यसने करण्यास भाग पाडतात ..चौथी पायरी आपल्यास व्यसन करण्यासाठी कारण ठरणाऱ्या स्वभावदोषांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी आहे ..ही विषारी मुळे जोवर आपल्या व्यक्तीमत्वात आहेत तोवर संपूर्ण व्यसनमुक्ती मिळवणे कठीण जाते ..काही दिवस व्यसन बंद ठेवता येते अनेकांना ..मात्र कायमच्या व्यसनमुक्तीसाठी ‘ आत्मपरीक्षण ‘ गरजेचे आहे “.सर देत असलेले चौथ्या पायरीचे विवेचन असलेले मला पटत होते ..

मी अनेकदा घरी राहूनच एखादा महिना किवा दोन तीन महिने दारूचे व्यसन बंद करत होतो …मात्र ऑफिसमध्ये ..घरी ..नातलगांशी ..काही वाद उदभवले ..अथवा मनात एखाद्या गोष्टीचा तणाव निर्माण झाला की ‘ फक्त आजच्या दिवस घेवूयात ‘ असा विचार करून मी दारू पीत असे ..पुन्हा पुन्हा त्याच गुलामीत अडकत असे ..निरर्थक चिंता ..अनाठायी निराशा ..आत्मप्रौढी ..अपयशामुळे आलेले वैफल्य..सतत अवस्थ ठेवणारा तणाव ..अश्या गोष्टी निर्माण होण्यास माझ्या स्वभावातील काही वैशिष्ट्ये कारणीभूत होती ..ती शोधून व्यक्तीमत्वातून अशी वैशिष्ट्ये अथवा दोष काढून टाकण्यासाठी प्रामाणिक पणे प्रयत्न करायला हवेत असे मला वाटले ..’ आत्मपरीक्षण ‘ हे समुद्र मंथन करण्यासारखे असते ..आपल्या अथांग अंतर्मनात दडलेले अनेक सुप्त स्वार्थ ..विकारांमुळे निर्माण झालेल्या अनैतिक कामना ..स्वकेंद्रित वृत्ती ..इतरांना दोष देण्याचे बचावात्मक तत्वज्ञान ..जवाबदारी टाळण्याची मनोवृत्ती ..मनाची अखंड चंचलता ..सतत वाटणारा हव्यास …आणि या सर्वातून निर्माण होत असलेले ..निरंतर असमाधान ..वगैरे गोष्टी या आत्मपरीक्षणातून आपल्याला आढळून येतील ..मित्रानो आपल्या व्यक्तीमत्वात केवळ दोषच आहेत असे नव्हे ..अनेक चांगले गुण देखील असतात प्रत्येकाच्या व्यक्तीमत्वात ..प्रत्येक व्यक्तीत गुणदोष असतात ..परंतु आता एकदा व्यसनाचा गुलाम झाल्यावर आपल्यातले चांगले गुण लोप पावत चाललेले आहेत अथवा दोष इतके वाढलेले आहेत की त्यामुळे व्यक्तिमत्वातील गुण झाकले जावून केवळ दोषच समोर दिसतात ..म्हणून हे व्यक्तिमत्वातील गुण उजळून बाहेर काढण्यासाठी त्यावर असलेली दोषांची चादर हटवली पाहिजे ” असे सांगत सरांनी समारोप केला ..आम्हाला डायरीत लिहिण्यासाठी प्रश्न दिला ‘ आपल्या स्वभावात कोणते कोणते दोष आहेत असे आपल्याला वाटते ..सविस्तर लिहा ? ”

समूह उपचार संपून जेमतेम दहा मिनिटे झाली असतील …वार्डातील बेल वाजली ..मला समजेना हे मध्येच कशी बेल वाजली ते ..शेरकर काका म्हणाले चला भाजी निवडावी लागेल आज सर्वाना ..आठवड्याची भाजी आलीय बाजारातून ..त्यात सुड्घेवू गवार ..वैरी लसूण आणि दावेदार मेथी असेलच ..शेरकर काकांनी भाजीला दिलेली ही नावे गमतीशीर होती ..त्यांना म्हणालो असे का म्हणता ? ते मिशीत हसून म्हणाले ‘ आता निवडायला बसशील तेव्हा समजेलच तुला ” .आम्हाला सर्वाना चार पाच जणांचा गट बनवून बसवण्यात आले ..मग कार्यकर्त्यांनी दोन पोती भरून मेथीच्या जुड्या आणून त्यातील चारपाच जुड्या प्रत्येक गटाला दिल्या निवडायला ..

काही गटांना लसूण सोलण्यासाठी दिले गेले ..काहींच्या पुढे गवार शेंगा ठेवल्या ..मी मेथी निवडण्याच्या गटात होतो ..जुडी सोडून आम्ही सर्वांनी मेथी निवडायला घेतली ..सुरवातीला चारपाच काड्यांची पाने मी व्यवस्थित तोडली ..मग कंटाळा येवू लागला ..बारकाईने प्रत्येक काडीची चांगली पाने खुडून ती आम्ही एका बाजूला टाकत होतो ..नंतर नंतर वाटले हे कंटाळवाणे आहे ..त्या ऐवजी गवार निवडायला जावू म्हणून मी गवार शेंगा तोडण्याच्या गटात जावून बसलो .पटापट साधारण एक इंचाचे तुकडे तोडू लागलो एका शेंगेचे ..मला गटातील एकाने थांबेवले ..म्हणाला ..अहो असे पटापट न बघता तोडू नका ..त्या शेंगेच्या शिरा देखील काढाव्या लागतात तोडताना ..नाहीतर जेवताना त्या शिरा दातात अडकतात ..

वाटले तितके हे काम सोपे नव्हते ..मी सावकाश शिरा काढत शेंगा तोडू लागलो ..सुमारे पाच दहा मिनिटात माझा उत्साह संपला .. तेथून उठून लसूण सोलणाऱ्यांच्या गटात गेलो ..शेरकर काका त्या गटात होतो .” विजयभाऊ ..लसूण सोलून झाले की हात नीट साबणाने धुवा ..नाहीतर मग भलतीकडे हात लागून बोंबा माराल ..म्हणजे डोळ्याला वगैरे हात लावू नका धुतल्याशिवाय ” ..असे म्हणत त्यांनी एक डोळा मिचकावला . लसूण सोलण्याचे कामही असे लुख्खेच वाटले मला .. अलका घरी अशी सगळी कामे किती तत्परतेने आणि कंटाळा न येत करता ते जाणवले ..आपल्या पानात आयता बनवलेले पदार्थ पडतो म्हणून कधी तो पदार्थ करण्यामागे काय कष्ट आहेत ते समजले नव्हते . ..स्त्रियांमध्ये चिकाटी हा एक विशेष गुण असतो असे वाटले ..त्यामुळेच निवडणे ..टिपणे ..सोलणे ..विणणे ..अशी चिकाटी असणारी कामे त्या सहजतेने करतात ..पुरुष अशी कामे उत्साहाने काही वेळ करेल मात्र कायम अश्या प्रकारची कामे करण्यात स्त्रियांचा हातखंडा असतो हे नक्की ..एकंदरीत शेरकर काकांनी सुड्घेवू गवार ..वैरी लसूण आणि दावेदार मेथी ही नावे का ठेवलीत ते चांगलेच समजले …

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..