नवीन लेखन...

बेवड्याची डायरी – भाग ८ – व्यसनाधीनतेची कबुली.. स्वतः ठरवा

सरांनी त्यांच्या हातातील पुस्तक सर्वाना दाखले त्यावर ‘ रोजचे प्रतिबिंब ‘ असे नाव होते .. मित्रानो हे अल्कोहोलीक्स अँनॉनिमस या संघटनेने प्रकाशित केलेले पुस्तक असून या पुस्तकातील सर्व विचार हे पूर्वी व्यसनी असलेल्या माणसांनी लिहिले आहेत ..अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस या संघटनेने सुधारणेसाठी ज्या बारा पायऱ्या किवा ज्या सूचना दिल्या आहेत ..त्यावर हे पुस्तक आधारित आहे..प्रत्येक महिन्यात एका पायरीवरचे विचार यात दिलेले आहेत ..आपण रोज या पुस्तकातील ऐक विचार वाचून त्यावर चिंतन करत असतो ..या चिंतनामुळे आपल्याला व्यसनापासून दूर राहण्याची मानसिक शक्ती मिळते असा हजारो व्यसनींचा अनुभव आहे …सुधारणेसाठी आवश्यक असणारी मानसिकता आपली आहे अथवा नाही हे यात तपासता येईल आपल्याला व जेथे आपण चुकत असू तेथे आवश्यक तो वैचारिक व मानसिक बदल करण्यास मार्गदर्शन मिळेल ..थोडक्यात सांगायचे झाले तर हे प्रतिबिंब आहे मनाचे ..जसे आरश्यात पाहून आपण निटनेटके आहोत की नाही ते तपासून ..योग्य तो बदल करणे शक्य होते तसेच आहे या विचारांचे.. आजचा विचार हा व्यसनाधीन झाल्याची स्वतःला कबुली देण्यासंबंधी आहे ..

आपण इथे उपचारांसाठी दाखल झालो आहेत खरे असले तरी ..बहुतेकजण आईवडिलांच्या ..पत्नीच्या ..किवा मुलांच्या आग्रहाखातर इथे दाखल झाले आहेत तर काहीजणांना जबरदस्ती उपचारांना घेवून यावे लागले आहे ..त्यांना अजूनही मनात वाटत असेल की मी काही फारशी दारू पीत नव्हतो किवा फारसे व्यसन करत नव्हतो .. पण नातेवाईकांना उगाचच चिंता ..काळजी वगैरे वाटली आणि त्यांनी आग्रह केला तो मोडता आला नाही म्हणून उपचार घेण्यास तयार झालो . काही जणांना पत्नीने माहेरी निघून जाण्याची धमकी दिली असेल ..काही जणांना नोकरीवर गैरहजर राहण्याबद्दल नोटीस मिळाली असेल म्हणून जरा तब्येत बरी करण्यासाठी ते येथे आले असतील .. तर काही जण असेही असतील की व्यसनमुक्ती केंद्रात नेमके काय उपचार चालतात हे पाहण्यासाठी येथे दाखल झाले असतील ..मात्र मनातून प्रत्येकाला मी दारुडा नाही असेच वाटत असते कारण दारुडा म्हंटले म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर जी प्रतिमा उभी राहते ती म्हणजे फाटके कपडे ..दाढी वाढलेली .. नोकरी गेलेली .. घरात सतत भांडणे .. लोकांकडे पैसे मागणे .. दारू पिऊन रस्त्यावर झिंगत चाललेला .. रस्त्याच्या कडेला नशेत पडून असलेला ..अश्या व्यक्तीशी तुलना करता आपल्या पैकी बहुतेक जणांना कधीच या अवस्थेला तोंड द्यावे लागले नसल्याने स्वाभाविक पणे आपण दारुडे आहोत हे मनापासून आपण कबुल करण्यास नकार देत असतो …

सरांचे म्हणणे अगदी पटले मला ..माझ्या मनात देखील दारुडा म्हणजे अशीच ऐक भणंग .. कर्जबाजारी ..झोपडपट्टीत राहणारा ..पत्नी .मुलांना मारझोड करणारा ही प्रतिमा होती ..आणि त्या तुलनेत मी जरी दारू पीत असलो तरी माझ्यावर अशी वेळ कधीच आली नव्हती .. मी नेहमी अलकाला हेच सांगत होतो की मी दारू पितो म्हणजे एकदम आभाळ कोसळल्यासारखे घाबरण्याची काही गरज नाहीय ..मी काही दारुडा नाहीय अजिबात , मी स्वतः नोकरी करतो ..घरचा खर्च भागवतो .. कधीही तुला मारझोड केली नाहीय ..तू उगाच बाऊ करते आहेस माझ्या पिण्याचा ….आणि अलकाचे त्यावर असे म्हणणे होते की अहो पण तुम्ही रोजच दारू पीत आहात ..आता तुमचे प्रमाणही वाढत चालले आहे ..जेवण कमी झालेय ..सुटीच्या दिवशी तुम्ही दुपारी देखील पिता ही सगळी लक्षणे पाहून मला माझी आणि मुलांच्या भविष्याची काळजी वाटते ..रोज वर्तमानपत्रात दारूबद्दल काय काय बातम्या असतात ..कितीतरी अपघात होतात मग मला काळजी वाटणारच . अलकाचे म्हणणे तेव्हा मला पटत नसे पण आता सर् अगदी सविस्तर सांगत होते तेव्हा पटत होते ..

सर् पुढे बोलू लागले ..मित्रानो जो पर्यंत आपण दारूच्या किवा जे काही मादक द्रव्य सेवन करत असू त्याच्या आहारी गेलो आहोत अशी कबुली देत नाही तो पर्यंत व्यसनमुक्त होण्याची ताकद मिळणे अवघड आहे …जो पर्यंत आपण व्यसनी झालो आहोत अशी आतून अंतर्मनातून कबुली देत नाही तो पर्यंत उपचारामधील आपला सहभाग वाढणार नाही आणि मानसिक शक्ती देखील वाढणार नाही . आपण व्यसनी झालो आहोत की नाही हे तपासण्यासाठी स्वतःलाच काही प्रश्न विचारून आपण त्याची प्रामाणिक पणे उत्तरे दिली तर नक्कीच आपण व्यसनी झाल्याची कबुली आपल्याला देता येईल . अल्कोहोलीक्स अँनॉनिमस ने या साठी वीस प्रश्नांची ऐक प्रश्नावली तयार केली असून त्या वरून मी तुम्हाला फक्त पाच प्रश्न विचारणार आहे व जर त्याची प्रामाणिक पणे तुम्ही होकारार्थी उत्तरे दिलीत तर नक्कीच आपण व्यसनी झाल्याचे आपल्याला मान्य कारणे भाग आहे असे म्हणत सरांनी पाच प्रश्न फळ्यावर लिहिले..

१) माझ्या व्यसनामुळे माझे कुटुंबीय चिंतीत आहेत काय ? ( कधी ..किती .कोणत्या दर्जाची पितो हे महत्वाचे नाहीय )

२) माझ्या व्यसनामुळे अनेकदा माझा वेळ आणि पैसा मी व्यर्थ वाया घालवत आहे असे मला कधी वाटले काय ?

३) अनेकदा व्यसन बंद करण्याचा मी मनाशी निर्धार करूनही माझे व्यसन पुन्हा सुरु झाले आहे काय ?

४) दुखः , निराशा , राग , अपमान , खुन्नस , वैफल्य , कंटाळा , वगैरे प्रकारच्या भावनांनी ग्रस्त झाल्यावर मला व्यसन करावेसे वाटते काय ?

५) माझ्या व्यसनाबद्दल जेव्हा कुटुंबीय चिंता व्यक्त करतात व मला व्यसनमुक्तीचा सल्ला देतात तेव्हा मला त्यांचा राग येतो का ?

फळ्यावर सरांनी हे प्रश्न लिहून सगळ्यांना ते प्रश्न वहीत उतरवून घेण्यास सांगितले आणि मग म्हणाले ..जर या पैकी तीन प्रश्नांची जरी होकारार्थी उत्तरे आली तर आपण स्वतःशी व्यसनी झाल्याची कबुली दिली पाहिजे . सर् फळ्यावर लिहीत असतानाच मी मनात या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिक पणे देत होतो आणि तीनच काय पण सर्वच प्रश्नांची उत्तरे होकारार्थी येत होती . मला पटले की मी नक्कीच व्यसनी झालो होतो आणि मला उपचारांची गरज होती ..मनातल्या मनात मी अलकाचे आभार मानले कारण तिनेच मला इथे येण्याचा आग्रह केला होता . सर् पुढे सांगू लागले ‘ मित्रानो आपला अहंकार बहुधा अशी कबुली देण्याचा आड येत असतो ..आपली संपत्ती ..शारीरिक क्षमता ..आपले शिक्षण .. सामाजिक सन्मान ..अधिकाराचे पद .. वगैरे अहंकारामुळे आपण व्यसनी झाल्याचे मान्य करत नाही त्या मुळे आपल्याला जगात कोण पीत नाही ? .. थोडीशी घेतली तरी माझे काही नुकसान होणार नाही ..आणि नुकसान झाले तर .ते नुकसान भरून काढण्यास मी समर्थ आहे असे वाटत राहते व आपल्या पिण्याचे आपण समर्थन करत जातो . सगळ्यांनी तटस्थ पणे स्वतःकडे पाहण्याची गरज आहे म्हणजे आपली समर्थने गळून पडतात ‘ असे सांगत सरांनी समारोप केला . सगळे उठले तसे शेरकर काका माझ्या जवळ आले आणि मिस्कील पणे भुवया उडवत म्हणाले ‘ काय आहे का कबुल ? ‘ मी हसत त्यानी पुढे केलेल्या हातावर टाळी दिली…

— तुषार पांडुरंग नातू

( बाकी पुढील भागात )

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

( माझ्या ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे. यातील विजय हे व्यसनी पात्र काल्पनिक आहे ..हा विजय आमच्या केंद्रात उपचारांना दाखल झाल्यावर काय काय होते ते त्याने इथे डायरीद्वारे सांगितलेय ..यातील माॅनीटर म्हणजे आमचा निवासी कार्यकर्ता आहे ..तर ‘ सर ‘ असा जो उल्लेख आहे तो …तुषार नातू व रवी पाध्ये या प्रमुख समुपदेशकांसाठी आहे याची दखल घ्यावी .)

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..